
एक आठवण मनात घट्ट आहे काही वर्षांपूर्वीची… महाबळेश्वरची. भर उन्हाळ्यात बदल म्हणून आम्ही दोन दिवस गेलेलो तिथे. एका बंगल्यातल्या खोल्या घेतल्या होत्या राहायला. तिथे ऐन दुपारच्या वेळी पोहोचल्यावर तिथल्या काम करणार्या मुलांनी बंद असलेल्या खिडक्या पटापट उघडून द्यायला सुरुवात केली, अरे म्हटलं नको गरम झळा येतील. हसून ते म्हणाले, अनुभव तर घ्या एकदा! उघडलेल्या खिडकीच्या पलीकडे काही अंतरावर घनदाट जंगल पसरलेले होते, आत अचपळ वारा असा काही शिरला म्हणता त्या खिडकीतून की विचारता सोय नाही. थंडगार तर होताच पण गंधितही होता तो. जंगलाचा हिरवा विशिष्ट गंध नाकातून थेट मनातच जाऊन रुजला जणू! अर्थात वार्याचा गंध म्हणायला तो गंध खरंतर दुसर्या कुठल्या तरी गोष्टीचा असतो, मात्र त्याला पसरवण्याचे माध्यम बनतो तो शीतल गंधित वारा!
असे वार्याचे गंध नकळत आठवताहेत आता, पावसाच्या झडीबरोबर येणारा हिरवा ओला गंध, त्याचवेळी समुद्रावर असलो तर एक खारेपणा आणि शेतीजवळ असलो तर त्या पिकाचा सुगंध! अलिबागच्या काही समुद्रकिनार्यांवर वाळत घातलेल्या माशांचा नकोसा वासही हा वाराच आणतो की वाहून! खाण्याच्या गोष्टीवरून आठवले, स्वयंपाकघरात शिजणारे गुपित सर्वदूर पोहोचवण्याचे कामही हा वाराच करतो, नाही का आमच्या खालच्या किंवा वरच्या मजल्यावर राहणार्यांच्या स्वयंपाकघरात काय बनतेय हे बसल्याजागी वार्याच्या वासावरून ठरावीक वेळी लगेच कळते! कधीतरी हवेहवेसे तर कधी नकोसे वाटणारे वासही तेवढ्याच तल्लीनतेने वाहातो हा वारा!
गेल्याच आठवड्यात एका अंत्यसंस्काराच्या वेळी प्रशांतदादा म्हणाले, बघ रे, आयुष्यभर सगळ्या अशाश्वत गोष्टींचे नियोजन करतो आपण मात्र जन्मल्यानंतरच्या एकमेव अशा शाश्वत गोष्टीचे, ह्या अंत्यसंस्काराचे मात्र कोणतेच नियोजन करायला धजावत नाही. त्या क्षणी वातावरणात पसरलेला तो विशिष्ट गंभीर वासही हा वारा इमाने इतबारे वाहातच होता की… अर्थात एक जाणीव झाली ती आयुष्यासारख्याच ह्या वार्याच्या गंधाच्या क्षणभंगुरत्वाची! चांगला वा नकोसा कोणताही गंध वाहणारा वारा मुळात एकच व ठरावीक वेळेचाच त्या गंधाचा धनी! नेमकं खरं काय हो?
हाच प्रश्न अष्टावक्र गीतेत राजा जनक अष्टावक्र मुनींना विचारतो, नेमकं काय? हे खरं की ते खरं? होतं असं की अतिशय कुशल आणि लोकप्रिय राज्यकर्ता म्हणून जगन्मान्यता पावलेल्या राजा जनकाला एक दिवस स्वप्न पडतं, राजेपद तर गेलंच आहे, पण टोकाच्या कलहामुळे राज्यातून परागंदाही व्हावं लागलंय, अन्नान्न दशा झालीये नी गतवैभवाच्या आठवणींपेक्षा पोटाची खळगी भरायला इतरांपुढे हात पसरणे जास्त गरजेचे ठरतेय. ज्यांना कायम सांभाळले ते सगळेच कुचकामी ठरलेत, मोठ्या मुश्किलीने मिळालेला कोरडा भाकरतुकडाही तोंडी लागण्यापूर्वीच सांडलाय खाली. घामाने डबडबलेला राजा उठून बघतो तर राजमहाली, रोजच्याच जागी असल्याचे आढळते. मग काय होते ते? हे आज दिसतेय ते की स्वप्नात बघितले ते… नेमके सत्य कोणते? काहीशी उद्विग्नता, विरक्ती आणि प्रचंड ज्ञानलालसा काही राजाला स्वस्थ बसू देत नाही. मुनीवर्य सांगा की हो… वारंवार एकच प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येते, राजा, ‘जसे ते, तसेच हे’ दोन्ही क्षणभंगुर!
एकदा का हे तत्व समजले की आयुष्याचा नवा अर्थ उमगतो बघा. दु:खाला लाजू नये नी सुखाने माजू नये म्हणतात ते ह्याचसाठी. कोणतीच परिस्थिती चिरस्थायी नसते. माताजी नेहमी सांगतात की पुलावरचं पाणी कधी लौकर कधी उशिरा ओसरणारच की. कधीतरी खरंच असं वाटतं की सगळ्या वाटा खुंटल्या, सगळीकडे अंधःकाराचेच साम्राज्य आहे, पण मनातील विवेकदीप जागृत ठेवला की नक्कीच पुढचा रस्ता समोर येतो. पहाटेचे सोनेरी स्वप्न पूर्ण व्हायला रात्रीचा अंधार सोसावाच लागतो की. अर्थात अंत नाही अशी कोणतीच परिस्थिती नसते, अतिआनंदाच्या भरात अहंकाराला थारा देऊन इतरांना दुखावणेही म्हणून अयोग्यच ठरते. सुपातलेच जात्यात येत असतात की सरतेशेवटी… समर्थ सांगतातच की, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे… अकस्मात तोही पुढे जात आहे!
जर ह्या क्षणभंगुर नी अशाश्वत यात्रेचे एक प्रवासी आहोत आपण सगळेच, तर मग व्यर्थ चिंता वा षड्रिपुंच्या विळख्यात अडकण्यापेक्षा सकारात्मकता, समाधान, आनंद ह्या सगळ्याचे दूत होऊन स्वतःबरोबरच इतरांचीही जीवनयात्रा समृद्ध करायला काय हो हरकत आहे? वार्याची एक सुगंधी झुळूक बनायला काय हरकत आहे मंडळी?
