महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार आणि मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यावर देशातील जनतेलाही हैराण करून सोडणार, अशी अफवा महाराष्ट्रात पसरल्यावर माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या खूप अस्वस्थ झाला. कारण फडणवीसांसारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचं भाग्यच आहे, असं जाहीर सर्टिफिकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलिकडेच महाराष्ट्र दौर्यात दिलं होतं, हे पोक्याला आठवत होतं. मग फडणवीसांना एकदम दिल्ली दरबारी मंत्री होण्याची ऑफर कुणी दिली याबद्दल पोक्याच्या मनात तर्कवितर्क सुरू झाले. माझ्या सल्ल्यावरून तो तडक फडणवीसांना भेटला आणि त्यांची या अफवांबद्दल मुलाखतही घेतली.
-फडणवीसजी, तुम्ही दिल्लीत जाणार ही बातमी खरी आहे का?
-आता तुला कसं सांगू पोक्या, ही अफवा पसरवणारे माझे हितचिंतकच असणार याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. ते नेहमी माझ्या भल्याचाच विचार करतात. मी खूप मोठा व्हावं आणि संपूर्ण देशाने माझी कर्तबगारी पाहावी असंच त्यांना वाटत असणार. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, पण खरी गोष्ट ही आहे की दिल्लीतून अजूनपर्यंत मला तसा कॉल आलेला नाही आणि येणारही नाही. हे लक्षात ठेव. वाटल्यास माझी सौभाग्यवती आणि विख्यात फेमिनिस्ट व गायिका मिसेस अमृता यांना विचार. तिला माझ्या आतल्या गोष्टी माहीत असतात आणि बाहेरच्या गोष्टीही माहीत असतात. महाराष्ट्राला माझी किती गरज आहे हे तर तुला माहितच आहे आणि तिलाही.
-असं काही निश्चित म्हणता येणार नाही. तुम्ही इथून पायउतार झालात आणि दिल्लीत गेलात म्हणून महाराष्ट्राचं काही अडेल असं जनतेला वाटत नाही. यशवंतराव चव्हाणांपासून एकनाथ शिंदेपर्यंत थोर वकुबापासून सुमार वकुबापर्यंत तरतर्हेचे अनेक मुख्यमंत्री झाले आणि गेले. ते गेल्यावर महाराष्ट्राचं कुठे काहीच अडलं नाही. मग तुम्ही दिल्लीत गेल्यावर महाराष्ट्राचं घोडं अडेल, असं तुम्हाला का वाटतं?
-त्याला तशीच काही गोपनीय कारणं आहेत पोक्या. तुला ती नाही कळणार. आज महाराष्ट्राचा किती विकास झालाय हे पाहतोयस ना तू! किती रस्ते, किती पूल, किती महामार्ग, किती मेट्रो, किती चकचकीत स्टेशन, काही विचारायची सोय नाही. मला तर झोपेतसुद्धा विकासाचीच स्वप्नं पडतात. जिकडे तिकडे विकासच विकास.
-आणि जिकडे तिकडे खड्डेच खड्डे, पूल कोसळतायत, महामार्गाला भगदाडं पडतायत, रस्ते अपघातात माणसं मरतायत, महिला आणि बालिका असुरक्षित जीवन जगतायत. याला तुम्ही विकास म्हणणार का? रेल्वेत किड्या-मुंग्यासारखे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करतायत, कितीजण पडून मरतायत, नोकरदार स्त्रियांची डब्यात चढण्यासाठी होणारी गर्दी आणि चेंगराचेंगरी बघा, किती जणींचा जीव गेलाय त्यामुळे. यालाच तुम्ही विकास म्हणणार का?
-तू म्हणतोस ते पटतंय मला. पण राज्य चालवणं ही सोपी गोष्ट नव्हे. त्यासाठी खूप अभ्यास लागतो राजकारणाचा, मराठी भाषेचा आणि अस्मितेचा.
-आधी तुमच्या त्या विधानसभा अध्यक्षांना नीट मराठी बोलायला शिकवा, त्यानंतर त्या रिक्षावाल्या भय्यांना शिकवा. सगळा भंपकपणा चाललाय तुमच्या राज्यात. तुम्ही आणि काय दिवे लागणार आहात राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहून!
-खूप कल्पना आहेत माझ्या डोक्यात आणि मी त्या अंमलात आणणारच. राज्याचे सगळे मंत्री यापुढे माझ्या अधिकाराखालीच राहतील, असा कायदा पास केलाय माझ्यासाठी. राज्याच्या सामान्य प्रशासन सुधारित महाराष्ट्र शासन कामकाज नियम २०२६लागू केलेला असून त्याची अंमलबजावणीही सुरू झालीय. त्यानुसार आता कोणत्याही मंत्र्याने घेतलेला त्याच्या खात्याच्या अखत्यारीतला निर्णय मी बदलू शकतो किंवा रद्दही करू शकतो. कोणत्याही खात्याच्या मंत्र्यांच्या फाईली बघण्यासाठी मागवू शकतो. अर्थ विभागाची म्हणजे माझी पूर्वमंजुरी घेतल्याशिवाय महसुलात सवलत देणारा किंवा सरकारवर अतिरिक्त आर्थिक भार टाकणारा निर्णय इतर कोणत्याही मंत्र्याला घेता येणार नाही. हे शिंदे गटाचे मंत्री काय काय उपद्व्याप करत असतात हे सर्वांनाच माहीत आहे. ते शिरसाट ते प्रताप सरनाईक, ते दाढीवाले मंत्रीही काय काय उचापती जणू करतात ते तर तुम्ही पाहातच असता. जणू काय यांना महाराष्ट्र लुटायलाच दिलाय. कुणाचे बाप डान्स बार चालवतायत तर कुणाची पोरं बापाच्या जिवावर मौजमजा करतायत. हे सगळं बंद करायचंय मला. अशाच लोकांनी महाराष्ट्राची तिजोरी लुटलीय. यांना कसं सरळ करतो बघा. त्याची सुरुवात मी स्वत:पासून करणार. तीही कुंभमेळ्यापासून. अगदी साधूंसारखा वेश करून. खाली धोतर, वर उघडबंब शरीर, खरं तर गांधीजींसारखा पंचा नेसूनच कुंभमेळ्यात सामील व्हायचं होतं मला. भगव्या रंगाचा पंचा उपलब्ध झाला की बघा, सगळ्या मंत्र्यांना तशाच पंचावर आणतो कुंभमेळ्यात. पापं तरी धुतली जातील नदीपात्रात. म्हणून आमच्या गिरीशलाच कुंभमेळा मंत्री बनवलाय. फक्त पैशांचे व्यवहार नीट जमत नाही त्यांना. अगदी भोळे आहेत ते. कंत्राटदारांना नुसती वाटत सुटतो नोटांची बंडलं. मग लोक टोप्या घालतात त्यांना. खुद्द त्यांच्याच पुतण्याने बनावट कंत्राटं दाखवून कोट्यावधी लुटले सरकारचे. आता कोट्यवधी म्हणजे आमच्या दृष्टीने किस झाड की पत्ती म्हणा! तरीही काळजी वाटतेच ना सरकारी तिजोरीची. लोक नाव ठेवतात अशाने आमच्या पारदर्शी कारभारात म्हणून वचक ठेवण्यासाठी माझ्यासारखा कठोर मुख्यमंत्री कायम हवा या महाराष्ट्राला. पटतंय ना पोक्या!
