• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

मोदीजींच्या मागे ठामपणे उभे राहा!

टोक्या टोचणकर टोचन

marmik by marmik
June 15, 2026
in टोचन
0
मोदीजींच्या मागे ठामपणे उभे राहा!

नीट परीक्षेच्या यंत्रणेवर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्ष ठेवणार, हे ऐकून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याचा जीव अक्षरश: भांड्यात पडला. कारण पंतप्रधानांच्या सतर्कतेबद्दल पोक्याला अजिबात शंका वाटत नाही. एखादी गोष्ट पंतप्रधानांनी मनावर घेतली की ते तिच्यावर किती बारकाईने लक्ष ठेवून असतात हे आपण ऑपरेशन सिंदूरपासून अनेक बिकट प्रसंगात पाहिले आहे, असे पोक्या म्हणतो. ‘नीट’चे पेपर फुटल्याची बातमी व्हायरल झाली तेव्हा मोदी परदेशात होते. इथे असते तर त्यांनी पेपर फुटण्याआधीच चाप लावला असता आणि शिवराज मोटेगावकरांपासून विद्येच्या माहेरघराचे नाव अमेरिका-इराणपेक्षाही अधिक उंचावर नेणार्‍या तिन्ही मनीषा नावाच्या महान गुरुजनांपर्यंत सर्वांना कठोर शिक्षा देण्याचे आदेश मोदीजींनी सुप्रीम कोर्टाला दिले असते, कारण यात परकीयांचा हात असून ते पाकिस्तानीही असू शकतात, यावर पोक्याचा ठाम विश्वास आहे.

हे प्रकरण युद्धपातळीवरूनच हाताळायला हवे आणि त्यासाठी वेळ पडल्यास हवाई दलाची, नौदलाची, पायदळाची मदतही घ्यायला हवी, असे मोदींना वाटले तर त्यात वावगे काहीच नाही, असे पोक्या म्हणतो.फेरपरीक्षा घेताना ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकांना पाय फुटण्याआधीच जर ते पाय करकचून बांधून त्यांना हवाई दलाच्या विमानाने परीक्षा केंद्रांमध्ये नेले तर त्या प्रश्नपत्रिका कुणाच्या हाती पडण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय विमानात प्रश्नपत्रिकांच्या भोवती दहा-पंधरा लष्करी जवानांचा पहारा असला तर कोणी त्या लंपास करण्याचा प्रश्नच येत नाही. देशातील सर्व परीक्षा केंद्रांवर, वर्गात लष्करी जवान तैनात केल्यास एखादा परीक्षार्थी चुळबुळ करत असल्याचा संशय जरी आला तरी त्याला जेरबंद करून चौकशीसाठी लडाख सीमेवर आणले जावे, असा फतवा मोदीजींनी काढल्यास ते देशाच्या हिताचेच ठरेल.

भारतात ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका लीक झाल्या ही बातमी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानावर जाताच तेही गडबडले. अमेरिकेत असा प्रकार घडूच शकत नाही, आणि घडलाच तर त्याला जबाबदार असणार्‍यांना तिथल्या तिथे गोळ्या घालून मी स्वतः ठार केले असते, अशी तीव्र प्रतिक्रिया ट्रम्प यांनी दिली ते उगाच नव्हे. अमेरिकन शिक्षणपद्धतीत इंडियासारखे लांच्छनास्पद प्रकार घडत असतील, तर त्याचा ताबडतोब बंदोबस्त केला जाईल, हे ट्रम्प यांचे विधान अमेरिकन शिक्षणपद्धतीची मान उंचावणारे आहे, असे पोक्याला वाटते. त्याने ट्रम्प यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्यावर ट्रम्प म्हणाले, पंतप्रधान मोदी आमचे जिवलग मित्र आहेत. त्यांनी हा प्रश्न युद्धपातळीवर आपल्या हाती घेतल्यामुळे त्यांना त्याबाबत हवी ती लष्करी मदत पुरवण्याची अमेरिकेची तयारी आहे. स्वतः मोदी यांचा या विषयाचा अभ्यास दांडगा आहे. ते कधीच खोटेपणाला थारा देत नाहीत. त्या इस्रायलच्या नेत्यानाहूचे चाळे असे सुरू राहिले तर त्याला तुमच्या इंडियाच्या ‘नीट’ प्रकरणात गोवून इंटरनॅशनल पातळीवर जीभ हासडण्याची शिक्षा देऊ शकतो मी. कारण ‘नीट’ पेपरफुटीच्या प्रश्नाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय पातळीवर युनोतही होऊ शकते आणि त्या मोटेगावकराचे इंटरनॅशनल कनेक्शन असेल तर त्याला कोणते देश मदत करत होते आणि त्याबदल्यात तो त्या देशांना काय पुरवत होता याचा कसून छडा लावण्याचा प्रयत्न मोदी साहेब करत आहेत. मोदी परवा मला सांगत होते की त्या मोटेगावकराच्या क्लासच्या विद्यार्थ्यांनी इंडिया लेव्हलवरची संघटना स्थापन केली आहे. हे विद्यार्थी मोदींना सारखे फोन करून ‘एक दोन तीन चार, मोटेगावकरांची पोरे हुशार’ म्हणून चिडवत असतात.

मोदींनी या कॉल रेकॉर्डिंगचा तपास दळणवळण खात्यामार्फत सुरू केला आहे. लवकरच हे फोन करणारे सापडतील आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात येईल. मोटेगावकरांचे जे विद्यार्थी डॉक्टर म्हणून इंडियातल्या विविध इस्पितळात कार्यरत आहेत त्यांना ताबडतोब नोकरीतून बडतर्फ करण्याचे आदेश मोदींनी दिले आहेत. यापुढे ‘नीट’ च्या सर्व प्रश्नपत्रिका एआय प्रणालीद्वारे यांत्रिक रोबोच काढतील. ‘नीट’चा पेपर रोबोंनी तयार केल्यानंतर त्या रोबोंचा चेंदामेंदा करून त्याचा भुगा समुद्रात टाकण्यात येईल, हा सावधगिरीचा उपायही मोदी यांनी सांगितला. ‘नीट’ प्रकरणातील मोदींच्या भूमिकेबाबत समाजात वेगवेगळे मतप्रवाह असल्याची जाणीव पोक्याला आहे. त्यामुळे त्याने काही भारतीय नेत्यांची मते आजमावली.

विजय वडेट्टीवार : पंतप्रधान मोदींनी ‘नीट’ प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्याची जबाबदारी घ्यायला नको होती, कारण हे प्रकरण गंभीर आहे, दुसरे पक्ष फोडण्याइतके किंवा जन आंदोलने पोलिसी बळाच्या जोरावर चिरडण्याइतके ते सोपे नाही. त्यांनी विश्वासू तपास यंत्रणांमार्फत हे काम करून घ्यायला हवे. सगळीकडे मीच हा अहंकार बरा नव्हे.

राहुल गांधी : हे काय कर्माचा शोध लावणार! हे मोदींचे नवे नाटक आहे. त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही. मोदींकडून तपास हा जनतेला मोठा विनोद वाटतो.

शरद पवार : आता ते डोंगर पोखरून उंदीर काढतात की उंदीर पोखरून डोंगर काढतात ते कळेलच.

मुख्यमंत्री फडणवीस : ज्या अर्थी मोदी साहेबांनी हे काम हाती घेतले आहे त्याअर्थी त्यांना या कामातील बारकाव्यांची जाणीव असल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या शोध मोहिमेसाठी त्यांना लाख कोटी शुभेच्छा.

एकनाथ शिंदे : या प्रकरणाचे धागे कुठपर्यंत पोहोचले आहेत हे मोदी साहेब शोधून काढतीलच, कारण त्यांचा या विषयाचा अभ्यास दांडगा असल्याचे मला त्यांच्या जवळच्या सहकार्‍यांनीच सांगितले आहे. ते जे काही करतील त्यात महायुतीचाच फायदा असेल. कसलीही मदत लागली तरी मी केव्हाही तयार आहे.

Previous Post

किंगनं डाव जिंकला; पण…

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.