• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

किंगनं डाव जिंकला; पण…

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
June 8, 2026
in खेळियाड
0
किंगनं डाव जिंकला; पण…

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं ‘आयपीएल’च्या १९व्या हंगामावर नाव कोरलं. १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मागील वर्षी त्यांनी हा दुष्काळ संपवला, तर यंदा सलग दुसर्‍यांदा हे यश त्यांना मिळालं. अनुभवी दिग्गज विरुद्ध युवा भावी पिढी यांच्यातील संघर्षानं हा हंगाम गाजला. पण, आता ‘आयपीएल’ने थोडं थबकून आत्मपरीक्षण करायची वेळ आलीय. धृतराष्ट्र आणि संजय यांच्यातील चर्चेतून मांडलेली ही कैफियत…

 

प्रसंग १
संजय : (समालोचकाच्या आविर्भावात सामन्याचं रसरशीत वर्णन करतो.) अर्शद खानचा चेंडू… विराट कोहलीनं मिड-
ऑनला चौकार खेचला आणि लक्ष्याची बरोबरी साधली… आणि आता पुढच्याच चेंडूवर लाँगऑनला षटकार मारत विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या सलग दुसर्‍या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. पाठलागात विराट सर्वश्रेष्ठ आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं…
धृतराष्ट्र : म्हणजे किंगनं प्रिन्स शुभमनवर मात केलीच तर! विराटच्या संघाचा आवेश पाहून मला वाटलंच होतं की, हा संघ विजेतेपद राखणार!

संजय : महाराज, हे कर्तृत्व कर्णधार रजत पाटीदारचंही म्हणायला हवं. सलग दोनदा विजेतेपद जिंकणारा तो तिसरा कर्णधार बनला. हे यश याआधी महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांनी मिळवलेलं.

धृतराष्ट्र : ‘आयपीएल’च्या मध्यापर्यंत श्रेयस अय्यरचा पंजाब किंग्ज संघ अपराजित होता. पण नंतर सलग सहा सामने हरला. तर अजिंक्य रहाणेचा कोलकाता नाइट रायडर्स संघ सुरुवातीला हरत होता, तो नंतर अथक जिंकू लागला. ही इथल्या कामगिरीतली दोन टोकं!

संजय : होय राजे, पण बेंगळुरू संघानं राखलेलं सातत्य आश्चर्यचकित करणारं होतं. गुणतालिकेत अव्वल स्थान राखत त्यांनी क्वालिफायर-१ आणि पुढे अंतिम सामनाही जिंकला. हीच त्यांची कर्तबगारी! आरसीबीची विजयगाथा एका रात्रीत लिहिली गेली नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिलावाप्रसंगीच त्यांनी जी रणनीती वापरली, तिथंच अर्धी लढाई जिंकली. पुढे मैदानावर फलंदाजीत विराट, रजत, देवदत्त पाटीदार, टिम डेव्हिड, वेंकटेश अय्यर, तर गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार, रसिक धर, जोश हेझलवूड यांच्यासह कृणाल पंड्याचं अष्टपैलू योगदान महत्त्वाचं ठरलं!

धृतराष्ट्र : भुवीचं विशेष कौतुक करायला हवं. वयाच्या ३६व्या वर्षी त्यानं केलेली कामगिरी ही संस्मरणीय अशीच! अभिनंदन बेंगळुरू! आणि अभिनंदन विराट! अभिनंदन मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, फलंदाजीचा प्रशिक्षक दिनेश कार्तिक आणि गोलंदाजीचा प्रशिक्षक ओमकार साळवी. या सगळ्यांना त्वरित अभिनंदन संदेश पाठवा!

संजय : होय महाराज! ई साला कप नमदू म्हणजेच या वर्षी हा चषक आमचाच, हे बेंगळुरूच्या संघाचं ब्रीदवाक्य सार्थ ठरलं! बेंगळुरूसारख्या लोकप्रिय संघाला विजेतेपद मिळणं, हेच ‘आयपीएल’साठी प्रेरक ठरेल!

*********

प्रसंग २
संजय : (समालोचकाच्या अविर्भावात) वैभव सूर्यवंशीनं हा चेंडू ताकदीनं फटकावलाय… उत्तुंग षटकार! प्रेक्षकांचा उत्साह द्विगुणित करणारी ही आतषबाजी! हा वैभव नामांकित गोलंदाजांच्या दर्जाची, त्याच्या यॉर्करची, त्याच्या भेदकतेची कोणतीही पर्वा न करता चेंडू सीमापार हाणतोय! नवनवे विक्रम मोडीत काढतोय!!

धृतराष्ट्र : वाह, कमाल केली या १५ वर्षांच्या बालकानं. बिहार राज्यातलं हे पोर नित्य नव्या विक्रमाची तोडफोड करतोय! हा वीर वैभव अखिल भारताचं भविष्य आहे!

संजय : महाभारतात असाच एक बाल अभिमन्यू पराक्रमानं लढला; पण दुर्दैवानं चक्रव्यूहात अडकून हकनाक मारला गेला. (धृतराष्ट्र तो प्रसंग आठवून गंभीर होतात.) पण हा वैभव भल्याभल्यांची रणनीती कुचकामी ठरवतो. समोर जसप्रीत बुमरा असो, पॅट कमिन्स असो, ट्रेंट बोल्ट असो… तो कुणाचीही पर्वा करीत नाही.

धृतराष्ट्र : होय, संजय तुम्ही जे काही गेले दोन महिने वैभवचं यथार्थ वर्णन करताय, ते पाहता हा वैभव मोठ्ठा क्रिकेटपटू होईल. त्याच्या पराक्रमानं इतिहासाची अनेक पानं लिहिली जातील, यात शंका नाही. त्याला आमचे आशीर्वाद.

संजय : बोल नक्कीच खरे ठरतील सम्राट. पण सध्या मला वेगळीच चिंता सतावतेय!
धृतराष्ट्र : चिंता…? बोला संजय, मोकळेपणानं बोला. कृपया कोड्यात बोलू नका!
संजय : ‘आयपीएल’च्या १९व्या हंगामात प्रेक्षकसंख्या थोडी घटल्याचे आकडेवारी सांगतेय!
धृतराष्ट्र : तुमच्या अभ्यासात तथ्य आहे. ‘आयपीएल’च्या यशाचं गणित तीन महानायकांवर आणि त्यांच्या संघांवर बेतलं होतं. महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा. यापैकी विराट संपूर्ण हंगाम रुबाबात खेळला. त्याचा बेंगळुरू संघही अंतिम फेरीत खेळला. पण हा न्याय अन्य दोघांना देता आला नाही. दुखापतींनी जर्जर झालेला रोहित जेमतेम नऊ सामने खेळला. पण मुंबई इंडियन्सची कामगिरी रसातळाला गेलेली. धोनीचं तर सामन्याआधी सरावाप्रसंगी क्रिकेटरसिकांना मुखदर्शन व्हायचं. धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघही धडपडताना दिसला. पण सुदैव वैभव नामक नवा तारा गवसला.

संजय : प्रक्षेपण आणि प्रेक्षक यांचं गणितच हे असं असतं. ट्वेंटी-२० विश्वचषकात बांगलादेशला खेळायचं नव्हतं, ते त्वरित मान्य करण्यात आलं; पण पाकिस्तानला स्पर्धेबाहेर जाऊ दिलं नाही. म्हणजे क्रिकेटचा विश्वचषक म्हटला की भारत-पाकिस्तान अपरिहार्य़ मुळात ट्वेंटी-२० विश्वचषकात भारतानं विजेतेपद राख्ालं. एक महिना चाहत्यांनी भारतातील चाहत्यांनी या विश्वचषकाचा मनमुराद आनंद लुटला. मग काही दिवसांत लगेच ‘आयपीएल’ आलं. अतिक्रिकेटला चाहते कंटाळलेत असं वाटतंय!

धृतराष्ट्र : स्पर्धा मोठी करण्याचा म्हणजे सामने वाढवण्याचा घाट घातला जातोय. याशिवाय काही दिवसांपूर्वी ‘आयपीएल’ स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचे सुतोवाच करण्यात आलंय.

संजय : महाभारत युद्ध १८ दिवस चाललं. या प्रत्येक दिवसांत इतिहास घडवणारं काहीतरी घडलं. स्पर्धा मोठी करून लोक कंटाळणार नाहीत ना? आता एप्रिल-मे महिन्यांतील उष्णतेचा परदेशी क्रिकेटपटूंना प्रचंड त्रास होतो. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणानिमित्त जाहिरातींना सुगीचे दिवस असतात. ही जशी कारणं आहेत. तसंच सौदी अरेबिया जागतिक स्तरावर मोठी लीग घेण्याचं नियोजन करतेय. अगदी ऑस्ट्रेलियाची बिग बॅश लीगसुद्धा हात पाय पसरू लागलीय. जागतिक क्रिकेटमधील कॅलेंडर म्हणजे कार्यक्रमपत्रिका भारताच्या पूर्णत: नियंत्रणात राहावी, हाही त्यामागे एक हेतू असू शकतो.

धृतराष्ट्र : संजय, म्हणजे ‘आयपीएल’ दिवाळीत होणार तर…? पण स्पर्धा मोठी करून तिची उत्कंठा टिकेल का? त्यापेक्षा ‘आयपीएल’चं यश कशात आहे, याची कारणमीमांसा करणं आवश्यक आहे.

संजय : महाराज, फँटसी गेमवर काही महिन्यांपूर्वी घालण्यात आलेली बंदी, हेसुद्धा ‘आयपीएल’ची आकडेवारी खालावण्याचं एक कारण असू शकतं!

धृतराष्ट्र : अगदी बरोब्बर! माझा मेहुणा शकुनी आणि १०० पुत्र कौरव आयपीएल सामन्यावरील हा गेम खेळण्यात मोठी धन्यता मानायचे, ती इतकी की गेली काही वर्षं ते द्युताचा डावही खेळले नाहीत! (द्युताचा डाव आणि द्रौपदी वस्त्रहरण हे कटू प्रसंग आठवून दोघंही क्षणभर भावुक झाले.)

संजय : यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये फलंदाजांनी टी-२० क्रिकेटचा इतिहासच बदलून टाकला. २००हून अधिक धावांचे तब्बल १७ लक्ष्यांचे पाठलाग यशस्वीपणे पाहायला मिळाले, तर अनेक संघांनी २५०चा टप्पाही सहज पार केला. अगदी २६४ धावसंख्यासुद्धा सुरक्षित नसल्याचं चित्र यावेळी दिसलं. अनुभवी दिग्गजांपासून ते युवा शिलेदारांपर्यंत सर्वांनी मिळून १५ शतकांची नोंद झाली. या हंगामात सर्वाधिक १,४२६ षटकारांची विक्रमी आतषबाजी झाली. यापैकी एकट्या वैभवनं ७२ षटकार खेचले. एकंदर फलंदाजांचाच हंगाम असं म्हणता येईल, महाराज!

धृतराष्ट्र : फलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्ट्यांवरही भुवनेश्वर कुमार, जोप्रâा आर्चर, कगिसो रबाडा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक गोलंदाजीनं सामन्यांना कलाटणी दिली. याशिवाय नव्या भारतीय बिगरआंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अनेक सामने फिरवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

संजय : बरोबर महाराज, टाटा ‘आयपीएल’चा १९वा हंगाम खर्‍या अर्थानं गाजला तो अनुभवी दिग्गज विरुद्ध युवा भावी पिढी, म्हणजेच ‘जेन बेस्ट विरुद्ध जेन नेक्स्ट’च्या संघर्षानं! ‘आयपीएल’ पुढील वर्षी २० वर्षं पूर्ण करतंय. हा विसविशीत अनुभव अधिक शानदार होईल अशी आशा बाळगू!

Previous Post

ठाण्यातल्या नद्या गुदमरताहेत…

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.