
संयुक्त महाराष्ट्राच्या तीव्र लढ्यानंतर आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या लढ्यात जनसंघ सोडून सर्व पक्षांचा, संघटनांचा सहभाग होता. शेठजींची काही मराठी वृत्तपत्रे सोडली तर मराठा, नवयुग, प्रभात आदी वृत्तपत्रांनी केंद्र सरकारच्या महाराष्ट्रद्रोही भूमिकेवर सडेतोड टीका केली. तर बाळासाहेब आणि श्रीकांत या व्यंगचित्रकार ठाकरे बंधूंनी ‘मराठा’, ‘नवयुग’ आदी वृत्तपत्रांतून कुंचल्याचे फटकारे दिले. ती व्यंगचित्रेही गाजली. तेव्हा महाराष्ट्रातून साप्ताहिके निघत होती. पण खास व्यंगचित्राला वाहिलेले साप्ताहिक निघत नव्हते. इंग्रजीतून व्यंगचित्रकार शंकर यांचे ‘शंकर्स वीकली’ प्रसिद्ध होत होते. त्याच धर्तीवर मराठीतून व्यंगचित्र साप्ताहिक असावे म्हणून ठाकरे बंधूंनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर शंभर दिवसांनी १३ ऑगस्ट १९६० रोजी साप्ताहिक ‘मार्मिक’चा पहिला अंक निघाला. तेव्हा अंकावर ब्रीदवाक्य होते ते असे…
‘खिंचो न कमान को,
न तलवार निकालो
जब तोफ मुकाबिल हो
तो अखबार निकालो’
केंद्रात व राज्यात काँग्रेसचे राज्य होते. मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. ‘महाराष्ट्रात मुंबई आली, पण मुंबईत महाराष्ट्र दिसत नव्हता.’ ‘असूनही मालक या घरचा, तरी मी उपाशी’ अशी अवस्था मुंबईतील मराठी माणसाची होती. तेव्हा बाळासाहेबांनी आपल्या व्यंगचित्रातून आणि लिखाणातून वाचा फोडली. सत्ताधार्यांची व महाराष्ट्रद्वेष्ट्यांची लेख व व्यंगचित्रांतून चिरफाड केली. बाळासाहेबांच्या या ’मार्मिक’ चिरफाडातून क्रांती झाली. स्वाभिमानी इतिहासाचे नवे पर्व सुरू झाले.
महाराष्ट्र निर्मितीनंतरच्या काळातील ’मार्मिक’ हे एक वैशिष्ट्यपूर्ण साप्ताहिक होय. बाळासाहेब आणि श्रीकांतजी या बंधूंनी ’मार्मिक’साठी १३ ऑगस्ट तारीख का निवडली? कारण १३ ऑगस्ट हा महाराष्ट्राचे झुंजार पत्रकार-लेखक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील एक अग्रगण्य शिलेदार, मराठाकार आचार्य अत्रे यांचा तो जन्मदिवस. संयुक्त महाराष्ट्र लढ्यानिमित्त प्रबोधनकारांचे आणि अत्र्यांचे घनिष्ठ संबंध झाले होतेच. त्याशिवाय ठाकरे बंधूंचे व्यंगचित्र काढण्यानिमित्ताने अत्रेंशी नाळ जुळली होतीच. त्यामुळे ’मार्मिक’च्या पहिल्या अंकात ‘मराठा शिलेदाराला आमचे विनम्र प्राणिपत’ या मथळ्याखाली १३ ऑगस्टच्या आचार्य अत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक निवेदन छापले होते. त्या ‘प्रणिपाता’त म्हटले होते की, ‘मार्मिक’ हे त्यांच्या पितृवत उत्तेजनाचे फळ आहे आणि ते नवमहाराष्ट्राच्या सेवेसाठी काय-वाचा-मने आपल्या करामतीची शिकस्त करीत राहील. ही त्यांनी खात्री ठेवावी. त्यांच्या या सेवेच्या यज्ञात आम्हा दोघा बंधूंना नवयुग आणि मराठामध्ये व्यंगचित्रांची त्यांनी जी छोटीशी कामगिरी देऊन आमच्या कारागिरीला मनमोकळे उत्तेजन दिले. त्या ऋणाची भरपाई केवळ कृतज्ञ प्रणिपाताने होण्यासारखी नाही -बाळ आणि श्रीकांत ठाकरे.’
‘मार्मिक’च्या पहिल्या अंकातील संपादकीयाचा मथळा होता. ‘‘आम्ही ‘तेच’ शोधीत आहोत.’’ त्यात म्हटले होते की, हे साप्ताहिक आम्ही काढले, त्यामागचा उद्देश काय? असे एक (काल्पनिक) वाचक विचारतात. खरेच, काय बरे उद्देश? लोकशिक्षणार्थ म्हणाले तर तसे हे काय १९वे शतक आहे थोडेच! हे अगदी जुन्या वळणाचे ओबडधोबड उत्तर आणि ते द्यायचे तर आमच्या डोक्यावर भले मोठे जात्याएवढे पागोटे आहे कुठे? बरे जनता जनार्दनाच्या सेवेकरिता? किंचित जुने आणि वरवर प्रेमळ उत्तर असले, तरी त्यालाही गांजा-भांगेसारखा किंचित उग्र दर्प आहेच आहे. तशात हेच उत्तर देऊन वेळ मारायची, तर अंगावर खादीच्या जाडजूड घोंगड्याचे रकटे वागविण्यार्यांनी ते दिल्यास शोभण्यासारखे आहे. ज्ञान आणि मनोरंजनासाठी? आहे हे एक अपटुडेट
फॅशनचे उत्तर. पोटासाठी हे प्रामाणिक उत्तर. उगीच हे खरे उत्तर आणि आमचे उत्तर? अहो ‘तेच’ तर आम्ही शोधीत आहोत. वाचकांनी हातभार लावावा असे मार्मिकपणे आवाहन केले.
‘मार्मिक’ला चांगला प्रतिसाद मिळू लागला. ‘मार्मिक’च्या ज्वलंत अग्रलेखांमुळे, इतर लेखांमुळे आणि व्यंगचित्रांमुळे मराठी मन चाळवले गेले आणि नंतर चवताळले गेले आणि मग एक क्रांती झाली. त्यातून १९ जून १९६६ रोजी शिवसेना जन्मास आली. त्याचे श्रेय ‘मार्मिक’ला जाते. ‘मार्मिक’मधून ‘शिवसेना’ नंतर ‘सामना’ आणि १९९५ साली शिवसेनेचे शिवशाही सरकार असे कालठसे उमटले.
‘मार्मिक’च्या पहिल्या अंकाच्या मुखष्ठावर त्यावेळी चालू असलेल्या केंद्रीय सरकारी नोकरांच्या संपाच्या संदर्भात केंद्रीय मंत्री ‘मोरारजींची दहीहंडी’ हे व्यंगचित्र होते. बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरे या पहिल्या अंकापासूनच विनायक कृष्ण जोशी यांनी ‘व्यंगचित्री नियतकालिकांची महाराष्ट्रीय परंपरा’ ही लेखमाला सुरू झाली व ती पुढे सहाव्या सातव्या अंकापर्यंत सुरू होती.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ‘मराठा’ या वृत्तपत्राने फार मोठी कामगिरी बजावली. तशीच किंवा त्याहूनही मोलाची कामगिरी ‘मार्मिक’ने महाराष्ट्राच्या अस्मितेच्या बाबतीत केली आहे. झोपी गेलेल्या मराठी माणसाला जागे केले. त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बळ दिले. ६० ते ८०च्या दशकात प्रसिद्ध झालेल्या ‘मार्मिक’च्या अग्रलेखांवर नजर टाकली तर हे निश्चितपणे जाणवते. मराठी राज्यात मराठी माणसाच्ाी ससेहोलपट (मे १९६६), शिवसेना अग्नीदिव्यातून पावनच होणार (मार्च १९६९), स्वाभिमानी मराठी माणसाने बी.पी.सी.सी. उखडली पाहिजे (ऑक्टोबर १९६९), महाराष्ट्राने राष्ट्रहित जपले हा काय गुन्हा केला ? (फेब्रुवारी १९७०), या सवलतबाजीने मुंबईतील लोंढे वाढतील (फेब्रुवारी १९७०), मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले (मे १९७१), महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी द्वेष वाढीस लागला (मे १९७२), जो तो येतो महाराष्ट्राला अक्कल शिकवतो (मे १९७७), शिवाजी महाराजांना जन्म देणारा महाराष्ट्र राजकारणात नपुसंक ठरतो (सप्टेंबर १९७७), मुंबई महाराष्ट्राची, नाही कुणाच्या बापाची (मे १९८२), सारे हलाहल पचवून शिवसेना खडी आहे (जून १९८३), मराठ्यांनो जागे व्हा (ऑगस्ट १९८३), चला उचला मुंबई वाचवण्यासाठी बेलभंडार (डिसेंबर १९८३), असे अनेक अग्रलेख लिहून बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या मनात अस्मितेचा अंगार फुलवला आणि अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढण्याचे बळ दिले. ‘मार्मिक’ने महाराष्ट्रात मराठी माणसासाठी हक्काने लढणारी शिवसेना संघटनेने फक्त चळवळ उभारली नाही तर एक क्रांती केली हे कुणालाही नाकारता येणार नाही.
१९६७ साली काँग्रेसचे स. गो. बर्वे विरुद्ध अपक्ष कृष्णमेनन यांच्यात मुंबईतील लोकसभेसाठी चुरशीची लढत झाली. त्यावेळी शिवसेनेने कृष्णमेनन यांचा पराभव करण्यासाठी स. गो. बर्वे यांना पाठिंबा दिला होता आणि तसा प्रचारही केला होता. या निवडणुकीच्या लढाईत बर्वे जिंकले. या त्यांच्या विजयात ‘मार्मिक’मधील बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांचा आणि लिखाणांचा सिंहाचा वाटा होता. मार्मिकने कृष्णमेनन, स. का. पाटील आणि आचार्य अत्रे यांच्यावर परिणामकारक व्यंगचित्रे काढली होती आणि लिखाणातून त्यांच्या भूमिकेची ‘मार्मिक’ चिरफाड केली होती. नंतर १९६७ साली शिवसेनेने पुकारलेला बेळगाव-कारवार सीमा प्रश्न लढा असो अथवा १९६८ साली शिवसेनेने लढवलेल्या पहिल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मिळवलेला देदीप्यमान विजय असो. त्या लढ्यात ‘मार्मिक’ने चोख कामगिरी बजावली होती.
१९८९ साली दैनिक ’सामना’ सुरू झाला. तोपर्यंत शिवसेनेवर होणार्या आरोपांना उत्तर देण्यासाठी व वेळप्रसंगी विरोधकांची चिरफाड करण्यासाठी ‘मार्मिक’ने पुढे-मागे पाहिले नाही. आपल्या लिखाणातून आणि व्यंगचित्रातून भल्या-भल्या राजकारण्यांना चितपट केले. १९८५ सालच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील विजयात ‘मार्मिक’ अग्रेसर होता. १९८७ची विलेपार्ले पोटनिवडणुक हिंदुत्वाच्या मुद्यावर लढवली गेली. तेव्हा ‘मार्मिक’ने २९ नोव्हेंबर १९८७ अंकात हिंदुत्वासाठी ‘पहिले पाऊल पार्ल्यात’ असा लेख लिहून हिंदुत्वाची ठिणगी टाकली आणि मग हिंदुत्वाच्या विजयाची मशाल देशभर पेटली. दैनिक ’सामना’मधून शिवसेनाप्रमुखांचे विचार आणि शिवसेनेची भूमिका मराठी वाचकांना व शिवसैनिकांना रोज समजायची-समजते तरी साप्ताहिक ‘मार्मिक’मधून प्रसिद्ध होणार्या व्यंगचित्रांची वाट मराठी माणूस चातकाप्रमाणे बघतो. ‘मार्मिक’मधून दिलेले कुंचल्याचे फटकारे आणि जळजळीत लिखाण आणि घटनांची केलेली ‘मार्मिक’ चिरफाड ही ‘मार्मिक’ची बलस्थाने आहेत. आज ६६ वर्षानंतरही ती कायम आहे.
‘मार्मिक’च्या सुरुवातीस प्रबोधनकार ठाकरे यांच्या लिखाणाने मराठी मन चेतवले. नंतर बाळासाहेब, द. पा. खाबेंटे, श्रीकांतजी, प्रमोद नवलकर आदींनी ‘मार्मिक’च्या लिखाणाची मांड घट्ट बसवली. त्यानंतर आलेल्या कार्यकारी संपादकांनी ती सैल होऊ दिली नाही. ठाकरेंच्या लिखाणाचा वारसा आणि वसा कायम ठेवला. भाऊ तोरसेकर, श्रीरंग धारप, काही काळ सल्लागार, संपादक राहिलेले वसंत सोपारकर, ह. मो. मराठे, पंढरीनाथ सावंत ते विद्यमान कार्यकारी संपादक मुकेश माचकर यांच्यापर्यंत सर्वांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या लिखाणाचा वारसा आणि वसा जपला. आज ६५ वर्षानंतरही मार्मिकचा सत्ताधार्यांवरील अंकुश कायम आहे. ‘मार्मिक’च्या लिखाणाची धग अशीच कायम राहो आणि ‘मार्मिक’ शतक गाठो. त्यासाठी साप्ताहिक ‘मार्मिक’ला वर्धापनदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

