
मराठी साहित्याची पताका खांद्यावर घेऊन अलौकिक, भव्य आणि दार्शनिक प्रतिभेच्या बळावर जागतिक साहित्याच्या क्षितिजावर मराठीचा काव्यध्वज फडकवणारे उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे महाकवी डॉ. सुधाकर गायधनी. १८ सप्टेंबर रोजी ते आयुष्याच्या ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त विशेष लेख!
१० नोव्हेंबर २०२३ रोजी रोमानियातील मिरोस्लावा नगरपालिकेचा सिटी हॉल, मिरोस्लावा स्थानिक परिषद, दिमित्री आंन्घेल साहित्यिक-सांस्कृतिक मंडळ, उत्तर अमेरिकेसह युरोपातून प्रकाशित होणारे काँटॅक्ट इंटरनॅशनल मॅगझिन समूह आणि वर्ल्ड अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड कल्चर, यांच्या संयुक्त सहयोगाने महाकवी सुधाकर गायधनी यांच्या देवदूत या महाकाव्याच्या रोमानियन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. दिमित्री एन्घेल या महान प्रतीकवादी रोमानियन कवीवरील चर्चेसह देवदूतविषयी एका जागतिक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जगातील चार खंडातील निवडक आमंत्रित कवी, समीक्षक, प्रकाशक आणि वेगवेगळ्या विद्यापीठांचे विद्यार्थी ऑनलाइन आणि ऑफलाइन सहभागी होते. यावेळी देवदूत महाकाव्याचे अनुवादक आणि प्रकाशक डॉ. पेन्डेफुण्डा म्हणाले, सुधाकर गायधनी हे समकालीन जगतातील महान प्रतीकवादी कवी असून ते साहित्यातील नोबेल पुरस्कारासाठी पात्र उमेदवार आहेत.
अत्यंत खडतर आणि कष्टप्रद संघर्षाचे आयुष्य ते जगले. नागपूरजवळील खापा या जन्मगावी एका स्थानिक चहाच्या टपरीवर काम करताना त्यांनी पाहिलेली गरिबी, सामाजिक विषमता आणि मानवी दुःख यांचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. हे वेदनादायक अनुभव पुढे त्यांच्या प्रभावी कवितेचा गाभा बनले. त्यानंतर पोस्टात नोकरी करीत त्यांनी नागपूर विद्यापीठातून एमए मराठी पदवी मिळवली. पुढे देशाचे तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर यांनी त्यांना रामटेक लोकसभेची उमेदवारी दिली. यासाठी पोष्टाची नोकरी गेली. पण त्यांची कुटुंबनायिका देवयानी यांनी दोन मुलांसह या कवीलाही सांभाळले. पुढे त्यांनी कुठे वर्तमानपत्रात पार्ट टाईम तर शासकीय चित्रकला महाविद्यालयातही अंशकालीन अभिव्याख्याता म्हणून गुजराण केली. यासाठी त्यांनी नागपूर विद्यापीठातून मास्टर ऑफ फाईन आर्ट्समध्येही पदव्युत्तर शिक्षण घेतले. एम.ए. आणि एम.एफ.ए. शिक्षण पूर्ण केलेल्या गायधनी सरांचे मराठीसोबतच हिंदी आणि इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आहे.
१९७३मध्ये त्यांचा ‘कब्रीतला समाधिस्थ’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९८१ या वर्षी एम.ए. मराठीचा विद्यार्थी असताना याच अभ्यासक्रमात हा कवितासंग्रह एम.ए.अभ्यासक्रमात होता आणि त्यांनी स्वतःच्याच कवितासंग्रहावर परीक्षा दिली आणि नेमके याच विषयात त्यांना कमी गुण मिळाले. १९१७ साली त्यांना मंगोलिया येथे पार पडलेल्या विश्व कवी संमेलनात साहित्यातील मानद डॉक्टरेटने सन्मानित करण्यात आले. मानवी अंतर्मनातील गूढ व अतींद्रिय जाणिवा, निसर्गाशी असलेले अद्वैत आणि भावबंध यांचा वेध घेणारे सहा समृद्ध कवितासंग्रह त्यांनी मराठी साहित्यविश्वाला अर्पण केले. आधुनिक काळात महाकाव्याची परंपरा दुर्मिळ होत असताना, त्यांनी मुक्तछंदाला जगन्मान्यता आणि वैश्विक उदात्तता मिळवून देणारी दोन अजरामर महाकाव्ये रचली. महावाक्य’ (समग्र देवदूत) हे ५ खंडांत आणि ३३,००३ शब्दांत विणलेले महाकाव्य मानवी इतिहास, करुणा, अहिंसा आणि वैश्विक अस्तित्वाचा वेध घेणारे जागतिक दर्जाचे ‘आधुनिक मिथक’ ठरले. ध्वनी आणि संवादांच्या माध्यमातून श्रोत्यांच्या कल्पनाविश्वात प्रवेश करण्याचे अद्वितीय कौशल्य त्यांनी १२५ लघु रेडिओ नाटकांतून सिद्ध केले. त्यांच्या ३ नाटकांनी नाट्यरसिकांची दाद मिळवली. विशेषतः ‘रायबाई भुलाबाई’ या संगीत नाटकासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला.
गायधनी सरांच्या सूत्रानुसार कविता ही केवळ शब्दांची जुळवाजुळव किंवा सुलभ क्रीडा नाही, तर तो अंतर्मनाच्या गहन चिंतन-मंथनातून प्रगटलेला सौंदर्यगर्भ उद्गार आहे. पूर्वजन्माच्या सुप्त जनुक-स्मृतींमधून मिळणारे संचित आणि त्याची अथक साधना हीच खर्या निर्मितीची ऊर्जा असते, हा विचार त्यांनी ‘नेणिवेचा डोह’ या जगप्रसिद्ध विचारसूत्रात मांडला आहे. तो सातहून अधिक भाषांमध्ये अनुवादित झाला आहे. त्यांच्यामते सौंदर्यभावनेचे बीज निर्मिकाने प्रत्येक मानवी मेंदूत पेरून ठेवले आहे. जो त्याची नीट निगा राखेल त्याला त्याचं फळ मिळतेच. कला वा कविता निर्मिती ही देवाची देणगी नाही. प्रत्येक कला सतत साधना करणार्यास प्राप्त होते.
काव्याब्रूची जपणूक या संकल्पनेकडे लक्ष वेधताना ते म्हणतात की कवीने स्वतःच्या काव्यनिर्मितीच्या गुणवत्तेची जपणूक केली पाहिजे, दर्जेदार लिहिले पाहिजे आणि दर्जेदार वागलंही पाहिजे. कवितेची आब ही पर्यायाने कवीचीच आब असते. कवितेला वाहवाची दाद मिळवण्याची धडपड कवीकडून नसावी. कविता सादर करताना आंगिक-वाचिक अभिनय करायची गरजही नसावी. काव्यनिर्मिती ही एक तपस्या आहे, छंद नाही.
‘देवदूत’ (महावाक्य) महाकाव्य
हे महाकाव्य म्हणजे जागतिक साहित्यमंचावर केवळ महाराष्ट्राचा उमटलेला ठसा नव्हे, तर पूर्ण भ्ाारतीय लोकांच्या जीवनाकडे बघण्याच्या व्यापक दृष्टिकोनाचे दर्शन आहे. गायधनी सरांनी आधुनिक महाकाव्याला भव्यता, नादमाधुर्य आणि दार्शनिक खोली मिळवून दिली. १९७४मध्ये होळीच्या पाडव्याला या महाकाव्याच्या पहिल्या खंडाचे प्रकट वाचन थोर कवी तात्यासाहेब कुसुमाग्रज यांच्या नाशिक येथील निवासस्थानी पार पडले होते. ते ऐकून कविश्रेष्ठांनी मनापासून दाद दिली आणि खंड प्रकाशित होताच गायधनी यांना चेक पाठवून तीन प्रती खरेदी केल्या आणि त्या तीन वाचनालयांना भेट द्या असे सुचविले होते. तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि रसिकाग्रणी यशवंतराव चव्हाण यांनी ‘या काव्यात लोकजीवनाच्या युगायुगाच्या शहाणपणाचे सार सामावलेले आहे’ असा गौरवपूर्वक उल्लेख केला होता. नोव्हेंबर १९८१ साली काही ओळी औरंगाबाद येथे जाहीर भाषणातून व्यक्त केल्या होत्या.
त्या ओळी अशा-
आम्ही चिंध्या पांघरून
सोनं विकायला बसलो
गिर्हाईक कसं ते फिरकेना
मग सोनं पांघरून
चिंध्या विकत बसलो
गर्दी पेलवता पेलवेना..
महाकाव्याची सुरुवात एका विशाल समुद्रपक्ष्याच्या (देवदूत) निर्मितीने होते. गायधनी यांनी देवदूतमध्ये चितारलेला पक्षी पृथ्वीवर तीन कोटी वर्षांपूर्वी विद्यमान होता, असा अमेरिकेच्या स्मिथसोनियन इन्स्टिट्यूटने १९८७ साली लावला. पण देवदूतमध्ये हा पक्षी १९८१ सालीच अवतरला होता. हे वास्तव स्मिथसोनियनच्या लक्षात आणून दिल्यावर या विज्ञान संस्थेने गायधनी यांना अभिनंदनपत्र पाठवून त्यात लिहिले ते असे- It is a rare occasion when science and poetry can meet with such a magnificent blend of serendipity.
या महाकाव्यातील देवदूत हा महाकाय पक्षी जो पूर्वजन्मांच्या ज्ञान-स्मृतींचा आणि चेतनेचा वाहक आहे. एका पारध्याच्या बाणाने जखमी होऊन एका बेटावर पडलेला हा पक्षी इतर पक्ष्यांपुढे अनुभव कथन करतो. हा देवदूत जनुकस्मृतींच्या माध्यमातून बुद्ध आणि येशू ख्रिस्ताच्या काळात उपस्थित होता. तो जेरुसलेम, मक्का, सप्तस्वर्गाच्या कल्पना, हिंदू पुराणकथा, महाभारत इत्यादीसह वश्विभ्रमण करीत मानवी अस्तित्वाचा वेध घेतो. कवी करुणेचे सूत्र मांडताना ‘क्षमेसारखी माया नाही’ आणि ‘अहिंसेसारखी दया नाही’ हे मूल्य यात प्रस्थापित होते. हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम यांसह इतरही धर्म संकल्पनांचे उत्कृष्ट संश्लेषण करताना, सर्व धर्म आणि ईश्वरही मनुष्यनिर्मित अशी मांडणी करून महाकवी विश्वनिर्मिकाला सर्वोच्च मानतात.
‘योगिनींच्या स्वप्न-सावल्या’ या ८ स्वतंत्र खंडांत आणि २६० पृष्ठांमध्ये आणि मात्रावृत्तात विस्तारलेल्या दुसर्या महाकाव्यामध्ये कवीने स्त्रीच्या मानवी, मानसिक व लैंगिक शोषणाचा वेध घेतला असून स्त्रीला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे, शारीरीक लिंगभेदाने ती दुय्यम ठरत नाही, असे चिंतनासह सिद्ध केले आहे.
होमर, दान्ते, मिल्टन, गोथे, टागोर आणि खलील जिब्रान यांसारख्या जागतिक महाकाव्यकारांच्या परंपरेत महाकवी सुधाकर गायधनी यांचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांच्या महाकाव्यामध्ये पारंपरिक युद्धाऐवजी मानवी अंतर्मनातील संघर्ष, नैतिक मूल्ये आणि वैश्विक चेतनेचा वेध घेतला आहे. ते कोणत्याही एका संप्रदायाला न जुमानता सर्व धर्मांच्या मर्यादा ओलांडून आधुनिक, मानवकेंद्रित विचार मांडते. आधुनिक मानवी अस्तित्वासाठी ते एका नव्या ‘आधुनिक मिथकाची’ निर्मिती करतात. गोथेच्या Faust प्रमाणेच हे महाकाव्य भावकवितेच्या मर्यादा ओलांडून ‘विश्वात मानवाचे स्थान काय?’ आणि ‘दुःख का अस्तित्वात आहे?’ या दार्शनिक प्रश्नांचा काव्यात्मक शोध घेते. गायधनी अनंताची महाकाव्यात्मक अनुभूती देतात. जिब्रानप्रमाणेच गायधनी मराठी मुळांशी जोडलेले राहून संपूर्ण मानवतेशी संवाद साधणारी वैश्विक भाषा निर्माण करतात.
मराठी साहित्याला प्रादेशिक सीमांपार नेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य गायधनी सरांनी केले आहे. त्यांच्या कवितांचे इंग्रजी, इटालियन, रोमानियन, स्पॅनिश, चिनी, रशियन, जर्मन, फ्रेंच, अरेबिक, उज्बेक, स्वीडिश, ग्रीक, व्हिएतनामी, तमिळ, हिंदी आणि गुजराती अशा एकूण ३८ भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. इटलीतील ”Arteta Edizioni” या प्रसिद्ध प्रकाशनाने जगातील महान काव्यांच्या ‘POEMA’ मालिकेचा प्रारंभ गायधनी सरांच्या’Devdoot – The Angel’ या महाकाव्याने केला. ‘देवदूत’ची युनेस्कोच्या Index Translationum डेटाबेसमध्ये अधिकृत नोंद झाली असून, अमेरिकेतीलLibrary of Congress मध्येही हे पुस्तक जतन केले गेले आहे. रोमानियन कॉन्टॅक इंटरनॅशनलने विल्यम ब्लेक अवार्डने सन्मानित करून गायधनी यांच्या काव्यविश्वावर एक विशेषांक काढला आणि त्यांना महान भारतीय महाकवी, पोएट लॉरेट या विशेषणांनी सन्मानित केले.
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात त्यांच्या समग्र साहित्यावर दोघांनी पीएच.डी. प्रबंध पूर्ण केले आहेत. तर खापा या त्यांच्या जन्मगावी नगरपालिकेने २.५ एकर जागेवर ‘महाकवी सुधाकर गायधनी उद्यान’ त्यांच्या जिवंतपणीच निर्माण करून या कविला सन्मानित केले आहे. ते लिहितात-
‘मुद्दाम कुणावर चाल करून जाऊ नये…
कुणी चाल करून आले त्याला पाठ दावू नये आणि शिंप्याकडून युद्धगणवेश मिळेस्तोवर योध्द्याने वाट पाहू नये…’
एक ना अनेक अशा क्रमाने एक एक जागतिक शहाणपणाचे एक एक पदर अलगद उलगडत जाणारी ही कविता भानावर आणत जाते.
– ‘लोक जमिनीची मालकी सांगतात आणि पृथ्वीला हसू येते…’
‘माणूस असे जगावे
की बागेतल्या फुलांचे
कुणी गजरे कुणी हार व्हावे
माणूस असे खल्लास होत जावे
की जसे हळूहळू कुप्पीतले अत्तर उडावे’
याच ‘महावाक्य’मधील ओळी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘मार्मिक’ मधील एका लेखात संदर्भ म्हणून दिल्या होत्या.
अत्यंत साधेपणा, प्रसिद्धीच्या झगमगाटापासून दूर राहण्याची ऋषितुल्य वृत्ती आणि शब्दसाधनेशी असलेली असीम निष्ठा यांमुळे महाकवी सुधाकर गायधनी सरांचे स्थान साहित्यसृष्टीत अजरामर आहे.

