
संहितेच्या वयाची चाळीशी ओलांडली तरी काही संहितांचे प्रयोग पुन्हा पुन्हा करण्याचा मोह रंगकर्मींना होतो आणि रसिकांनाही त्या भूतकाळात डोकवायला आवडतं… आजोबांनी बघितलेलं नाटक आज नातू बघतोय. एका पिढीकडून तिसर्या पिढीपर्यंत हास्यदरबार बहरतोय. संदर्भ, काळ, वेळ जरी बदलला असला तरीही आजच्या कंप्यूटरयुगात निर्मिती कालबाह्य ठरत नाही, तसूभरही हसू कमी होत नाही. हेच अशा दर्जेदार विनोदी नाटकांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
नाटककार रत्नाकर मतकरी यांचं ‘एकदा पहावं करून!’ हे नाटक पुन्हा पुन्हा नव्या संचात प्रगट होतं. ज्यातली धम्माल परिपक्व विनोद म्हणून नव्याने अनुभविण्यास मिळते. नाटकाचा पहिला प्रवेश हा अॅड. बबनराव बाक्रे यांच्या घरातला तर दुसरा प्रवेश त्यांचे विरोधक कानडी गुंड बाप्पाजी घरसोडे यांच्या घरातला. रात्रीचे दोन वाजले तरी बबनरावांची तरुण मुलगी सायली ही घरात पोहोचलेली नाही. त्यामुळे ते आरडाओरड करताहेत. बाक्रे घराण्याची प्रतिष्ठा, सभ्यता धुळीला मिळालीय अशी ओरड. आता मुलीचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार की अर्धनग्न अवस्थेत रस्त्यावर शोधकार्य- या विचारात ते आहेत. गावगुंड असलेला बाप्पाजी यांचा मुलगा बकुळ. बकुळ आणि सायली या दोघांच प्रेमप्रकरण सुरू आहे. दोघेही रात्रभर सोबत भटकंती, मौजमजा करताहेत. त्यांच्या मागे ‘खबरी’ म्हणून बबनरावांचा सहाय्यक अॅड. सरवटे मागोवा घेतोय. पण या मोहिमेत अॅड. सरवटे याला जखमी होणं भाग पडतं. त्याला मारहाण होते. बबनरावांना वकिली वर्दीची गुर्मी आहे. यापूर्वी बाप्पाजीच्या विरोधात त्यांनी कोर्टात एक खटला हा लढविला होता. समाजात काळी कृत्ये करणार्या बाप्पाजीपुढे बबनराव दबावानंतरही नमले नाहीत. ही पार्श्वभूमी. त्यामुळे आपल्या मुलीने अशा गुंड, मवाली घरात सून म्हणून जाता कामा नये, ही बबनरावांची मनस्वी इच्छा. तिकडे बाप्पाजी मात्र मनापासून खूष आहेत. आपल्या विरोधात केस लढणार्या वकिलाच्या मुलीला सून आणल्यामुळे वकिलाला अपमानित करण्याची सुसंधी मिळणार, म्हणून ते आपल्या मुलाच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत.

सहाय्यक वकील सरवटे म्हणजे इरसाल नमुनाच. त्याच्याशी सायलीचे लग्न लावून देण्याचा बबनरावांचा प्रयत्न आहे. पण सायलीला बकुळशीच लग्न करायचं आहे. सरवटे यांच्यापुढे बाप्पाजी जणू खलनायक म्हणून उभा. बबनराव सरवटेपुढे एक प्रस्ताव ठेवतात. बाप्पाजीचं एखादा ‘लफडं’ मिळालं तर त्याचा वचपा काढता येईल. नमविता येईल, शेवटी एक लफडं मिळतं. बाप्पाजीच्या पत्नी भामाबाईला हे लफडं सांगण्यात येतं. त्यांचा घरदार सोडून जाण्याचा निर्णय होतो. बाप्पाजीचं घर संकटात सापडतं. दुखावलेले बाप्पाजी आता सरवटेलाच गाठतात. कसंही करून बबनरावांचं लफडं शोधून काढण्याची सुपारी त्याला देतात. आणि एक नवंच कथानक लालीच्या रूपाने उभं होतं. ही गुंतागुंत वाढतच जाते. दोघांचे सभ्यतेचे बुरखे टराटर फाटले जातात. या भांडणात कोण जिंकते? दोघांच्या बायका कोणता निर्णय घेतात? सायली आणि बकुळ यांचे लग्न होते का? सरवटेच्या पदरी काय पडतं? या प्रश्नांच्या उत्तरासाठी प्रयोग अनुभवणे उत्तम!
नाटककार रत्नाकर मतकरी यांनी साहित्यातले बहुतेक सर्व प्रकार कुशलतेने हाताळले आहेत. एकांकिका, नाटके, बालनाट्ये, कादंबरी, कविता, कथा, ललितलेख यांनी त्यांचे दालन समृद्ध आहे. त्यांची नाटके गुजराती, हिंदी भाषेतही अनुवादित झाली. गाजलीही. लेखनासोबत दिग्दर्शनातही त्यांची हुकूमत होती. नाट्यसंहितेतल्या त्यांच्या सूचना त्यांच्यातील दिग्दर्शकाची पक्की नजर सिद्ध करणार्या ठरल्यात. हे नाटक आधी १९९०च्या सुमारास ‘लफडं सोवळ्यातलं’ या नावे आलं. नंतर १९९२च्या सुमारास ‘एकदा पहावं करून!’ म्हणून प्रगटलं. त्याच सुमारास गुजराती रंगभूमीवरही ‘बे लालना राजा’ म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर चमकलं. या संहितेचं वेगळेपण म्हणजे नाट्य कुठेही जराही रेंगाळत नाही. एकापाठोपाठ एक उत्कंठा वाढविणार्या घटनांमुळे खेळवून ठेवते. गमतीदार प्रसंगनिष्ठ विनोद असणारी संहिता म्हणून आजवर रसिकांनी दाद दिली आहेच. आज बदलत्या काळातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
या नाटकाच्या जन्मापासूनच विजय केंकरे यांचे दिग्दर्शन आहे. हाही एक रंगविक्रमच म्हणावा लागेल. या प्रवासात दिग्दर्शक म्हणून केंकरे हे चौथ्यांदा दिग्दर्शकाच्या खुर्चीत कायम आहेत. नाटककार-दिग्दर्शक यांचं मजबूत नातं या नाट्याशी जुळलं आहे. त्याचा सकारात्मक परिणाम सादरीकरणावर होतोय. पाच पांडवांचा बाप, ती..तीच ती, असा मी असा मी, चार दिवस प्रेमाचे, प्रियतमा, जावई माझा भला, नरू आणि जान्हवी, शु कुठे बोलायचं नाही, विठो रखुमाय- मतकरी यांच्या याही नाटकांचे दिग्दर्शन विजय केंकरे यांच्याकडेच होते. विनोदी नाटक हे फार्स शैलीप्रमाणे फास्ट चालतं. बाप्पाजी विरुद्ध बबनराव यांची जुगलबंदी धम्माल उडविते. पात्रनिवड अचूक आहे. त्यात नव्या रंगकर्मींना संधी दिलीय. व्यक्तिरेखांच्या वैशिष्ट्यांवर विशेष लक्ष केंद्रित केल्याने त्या व्यंगचित्रांप्रमाणे परिणाम करतात. काळ बदलला तरी त्यातील ताजेपणा नजरेत भरतो. जो कुठेही खटकत नाही. तांत्रिक बाजूंची उत्तम जुळवाजुळवी आहे. भरपेट हसवाहसवीचं मिशन यशस्वी होतंय.

एक खटकणारी बाब म्हणजे नाटक तीन अंकी आहे, जे आजच्या बदलत्या परिस्थितीत दोन अंकी सहज करता येण्याजोगे आहे. कदाचित भूतकाळाचा स्पर्श असावा, म्हणूनही तीन अंकी कायम ठेवले असावे. तरीही ‘सर्वसामान्य दोन अंकी’ सूचनेवर विचार करावा ही अपेक्षा. असो.
या नाटकात यापूर्वी- मोहन जोशी- रमाकांत देशपांडे, अशोक सराफ- सुधीर जोशी, मोहन जोशी- सुधीर जोशी, संजय मोने- मंगेश कदम, या बाप्पा- बबनरावांच्या जोड्या रसिकांनी अनुभवल्या आहेत. या पंक्तीत आता वैभव मांगले (बाप्पाजी) आनंद इंगळे (बबनराव) हे २०२६च्या पर्वात समर्थपणे उभे ठाकले आहेत. दोघांनाही विनोदाचे उत्तम अंग आणि उत्स्फूर्तपणा त्यांच्या नसानसात भरलेला. त्यामुळे भूमिकेच्या अंतरंगाला न्याय मिळालाय. गाजलेले दोन मुखवटे दोघांनी लिलया पेलेले आहेत. हेच या नाटकाचे बलस्थान ठरते. ज्याप्रमाणे पन्नासएक चित्रपटात गाजलेली अशोक सराफ-लक्ष्या बेर्डे यांची विनोदी जोडगोळी तशीच ही रंगमंचावरली जोडी असल्याची तुलना करण्याचा मोह होतो, एवढी रंगक्षमता दोघात आहे. वैभव मांगले यांचा बाप्पाजींच्या भूमिकेत कानडी बोलीभाषेचा प्रभाव आणि तोच पेहराव यामुळे छाप पडते. एका प्रसंगात दारूचा ग्लास टकलावर ठेवून बॅलेन्स केलेले नृत्य म्हणजे कळसच ठरतो. त्याला वन्समोअर मिळतात. विजय केंकरे यांच्या दिग्दर्शनाखाली प्रथमच त्यांचे पदार्पण झालंय. हसे वसूल करण्याची एकही जागा त्यांनी रिकामी सोडलेली नाही. बेअरिंग उत्तम सांभाळलंय. दुसरे आघाडीचे विनोदवीर आनंद इंगळे यांचेही या नाटकाशी तरुणपणापासून नाळ जुळलेली आहे. यातील मुलाची भूमिका त्याने यापूर्वी केलीय. भोळेपणा, स्वप्नाळू, घाबरट स्वभाव हे पैलू बबनरावांच्या भूमिकेतून चांगले आकाराला येतात. संवाद फेक, देहबोली मस्तच. दहा वर्षानंतर ‘वैभव- आनंद’ एकच आलेत. त्यांना वन्समोर टाळ्या, हशा यांनी रसिक डोक्यावर घेतात.
या दोघा ‘बाप’ माणसांसोबत त्यांच्या पत्नी म्हणून चित्रपट, मालिकांचा अनुभव गाठीशी असलेल्या भार्गवी चिरमुले (बाबीताई बाक्रे) आणि नेहा कुलकर्णी (भामाबाई) यांनी साथ दिलीय. घरगुती वातावरणात असलेल्या तसेच मूर्खपणामुळे हसू उडविणारी बाबी तर कानडी भाषेत संवाद साधणारी भामाबाई या दोघींनी भूमिका चोख केल्यात. नवरोजींच्या चावट लफड्यामुळे त्यांचा झालेला संताप विनोदनिर्मितीसाठी पूरक ठरतो. प्रेमवीर जोडी म्हणून गौरी महाजन (सायली), अभिषेक देशमुख (बकुळ) यांचीही निवड अचूक आहे. धनश्री दळवी यांनी मंदाकिनी आणि लाली या दोन्ही भूमिका केल्यात. अॅड. सरवटेच्या भूमिकेत कृष्णा चतुर्भुज यांच्या लवचिक देहबोलीमुळे ठसा उमटविला आहे. भूमिकेची उत्तम जाण दिसते. भूषण पाटील (मल्हारराव) नामांतर कांबळे (देखणे) यांचीही हजेरी या गोंधळात आहे. एकूणच ‘टीमवर्क’ नंबर वन!

कल्पक नेपथ्यकार राजन भिसे यांचे नेपथ्य नाटकाला लाभलंय. पहिल्या अंकातील दोन प्रसंगाचे स्थळ खूप काही सांगते. एक घर वकिलांचं आणि दुसरं गुंड मवाली माणसाचं. त्या दोघांतला फरक बारकाईने उभा केलाय. रंगसंगतीही विचारपूर्वक केलीय. त्यामुळे वातावरणनिर्मिती उत्तम होते. अजित परब यांचे संगीत आणि मंदार चोळकर यांचे टायटल साँग ताल धरायला भाग पाडते. शितल तळपदे यांची प्रकाशयोजना ठीकच. वकील बबनराव आणि गुंड बाप्पाजी या दोघांची वेशभूषा योग्य. दोघांच्या बायकांचा गेटअप ही भूमिकेला शोभून दिसणारा. जो मंगल केंकरे यांनी केलाय. अन्य तांत्रिकबाजू नाट्याला अनुकूल. ज्या नाटकाची रंगत वाढविणार्या आहेत.
समाजाशी जवळीक साधणारी आशयधन नाट्यकृती ही कायम रसिकांना खुणावत असते. मग ती विनोदी किंवा गंभीर प्रकारची असली तरीही उचलून धरली जाते. आचार्य अत्रे यांचा भ्रमाचा भोपळा, मधु मंगेश कर्णिक यांचं केला तुका झाला माका, शेखर ताम्हाणे यांची सविता दामोदर परांजपे, अद्वैैत दादरकर यांची एका लग्नाची पुढची गोष्ट, विवेक बेळे यांचं काटकोन त्रिकोण… आज काल या नाटकांनी बुकिंगवर गर्दी केलीय. त्यात अर्थातच रत्नाकर मतकरी आहेतच. अशा संहिता नवोदित लेखकांना प्रेरणादायी ठरतात… नाटककार म्हणून केवळ संहिता निर्मात्याच्या हाती सरकावून नामा निराळे राहणारे रत्नाकर मतकरी नव्हते. तर त्यांनी प्रयोगशीलता जोपासली. प्रयोगापर्यंतच्या सार्या प्रक्रियेत त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळेच त्यांची नाटके कायम ताजीतवानी, टवटवीत, फ्रेश राहिली. आणि या नाटकाला तर दिग्दर्शक विजय केंकरे नाटकाच्या जन्मापासून सोबत आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरला आजचा हुकमी एक्का असलेल्या या अभ्यासू रंगकर्मींच्या हाती सारी सूत्रे सुरक्षित आहेत. तेव्हा सर्व वयोगटातल्या रसिकांनी एकदा पहावं करून हे नाटक प्रत्यक्ष बघणं उत्तम!
एकदा पहावं करून!
लेखन- रत्नाकर मतकरी
दिग्दर्शन- विजय केंकरे
नेपथ्य- राजन भिसे
प्रकाश- शितल तळपदे
वेशभूषा – मंगल केंकरे
छायाचित्रे- संजय पेठे
निर्माते- श्रीकांत तटकरे, मंगल केंकरे, अजय विचारे
निर्मिती- भूमिका/ प्रवेश / अस्मय थिएटर्स.

