‘एका रात्रीत श्रीमंत व्हायचं स्वप्न अनेकांना पडत असते. मोठा व्यवसाय करून भरपूर पैसा कमावून आलिशान आयुष्य जगण्यासाठी अनेक लोक कायमच नवनवीन संधींच्या शोधात असतात. पण कधी हाच हव्यास फसवणुकीच्या खोल गर्तेत घेऊन जातो.
असाच एक प्रकार म्हणजे ‘हर्बल ऑइल विक्रीचा नायजेरियन फ्रॉड.’ कानपूरमध्ये राहणारा चेतन देशमुख एका बहुराष्ट्रीय कंपनीत मार्वेâटिंग ऑफिसर म्हणून काम करत होता. मोठमोठ्या कंपन्यांशी त्याचा दांडगा संपर्क होता. परदेशी क्लायंट्सशी बोलणे, ई-मेल,ऑनलाइन मीटिंग्ज, यामुळे तो डिजिटल विश्वात चांगलाच रुळला होता. पण त्याच्या मनात एक खंत होती, पाच वर्षे झाली तरी त्याला अजून प्रमोशन मिळालेले नव्हते. दुसर्यांसाठी किती दिवस काम करायचं, हा विचार सतत त्याच्या मनात यायचा. ‘माझं नेटवर्क इतकं मजबूत आहे, मी जर स्वतःचा व्यवसाय केला तर?’ हळुहळू चेतन इंटरनेटवर नवनवीन व्यवसायाच्या कल्पना शोधू लागला. कधी एक्सपोर्ट, कधी आयुर्वेदिक उत्पादने, तर कधी विदेशी बाजारपेठ… आपण श्रीमंत झालो आहोत, कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहोत, अशी स्वप्नं तो रंगवू लागला होता.
एक दिवस ऑफिसमध्ये बसून तो मेल तपासत होता. अचानक त्याच्या नजरेसमोर एक मेल आला. ‘Indian HeRal Oil has huge demand in Spain and Jordan. Earn millions every month… हे वाचून चेतनच्या डोक्यात व्यवसायाची संकल्पना घोळू लागली. हेच तर मी शोधत होतो, असे तो मनाशी पुटपुटला. मेलमध्ये स्पेनमधील एका कंपनीचे नाव, त्यांचा व्यवस्थापक
जॉन मिलेट याचा फोटो, फोन नंबर आणि ईमेल दिला होता. सगळं इतकं प्रोफेशनल दिसत होतं की एका क्षणात त्यावर चेतनचा विश्वास बसला. त्याने लगेच रिप्लाय केला, मी हे तेल भारतातून पाठवलं, तर मला किती फायदा होऊ शकतो? त्यावर अवघ्या दहा मिनिटांत उत्तर आले, हॅलो, मिस्टर चेतन, भारतीय हर्बल तेलाला युरोप आणि आखाती देशांमध्ये प्रचंड मागणी आहे. भारतात हे तेल ५० लाख रुपये लिटर मिळते आणि इथे त्याची किंमत दीड ते दोन कोटी रुपये लिटर इतकी आहे. हे वाचून चेतन आनंदित झाला. म्हणजे थेट १०० टक्के नफा, मस्तच… त्या मेलमध्ये पुढे लिहिले होते की देहराडूनमध्ये आमचे सप्लायर आहेत. तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर भारतातील प्रतिनिधीशी संपर्क करा. त्याखाली दोन नंबर देण्यात आले होते.
चेतनने लगेच सुरेश कुमार या प्रतिनिधीला फोन लावला, ‘सर, मला हर्बल तेलाच्या व्यवसायाबद्दल माहिती हवी आहे.’ सुरेश कुमार उत्साहात बोलू लागला, तुम्ही अगदी योग्य वेळी फोन केला आहे. एका हॉस्पिटलला हे तेल तातडीने हवं आहे. तुम्हाला त्यांचा मेल देतो. तुम्ही फक्त ऑर्डर मिळवा. तेल पुरवण्याची जबाबदारी माझी.
हे ऐकून चेतनला वाटलं, नशीब आपल्यावर मेहरबान झालंय. त्याने लगेच त्या हॉस्पिटलला मेल पाठवली. आणि आश्चर्य म्हणजे एका तासात त्याला उत्तरही आलं, ‘होय, आम्हाला एक लिटर तेल हवे आहे.
ऑर्डर कन्फर्म समजा, असे त्यात म्हटले होते. बस्स, आता आयुष्य बदलणार, चेतन आनंदाने ओरडला. त्याच वेळी जॉन मिलेटचाही मेल आला होता. त्यामध्ये त्या हॉस्पिटलची ऑर्डर पूर्ण करा. पुढे आणखी मोठ्या ऑर्डर्स मिळतील, असे म्हटले होते. हा व्यवसाय खरा आहे याची चेतनला खात्रीच पटली होती. त्याने लगेच सुरेश कुमारला फोन केला, मला एक लिटर तेल हवं आहे. त्यावर सुरेश कुमार म्हणाला, ‘सर, सध्या एका लिटरचा दर ६८ लाख रुपये इतका आहे. विदेशात ते दोन कोटी रुपयांना जाईल, त्यामध्ये तुम्ही मोठा नफा कमावाल. चेतन काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, एवढी रक्कम?
‘सर, मोठा व्यवसाय करायचा असेल तर मोठी गुंतवणूक करावी लागते.’ सुरेश कुमारचे हे वाक्य चेतनच्या मनाला भिडलं.
‘तुम्हाला आखाती देशांतील मोठ्या हॉस्पिटलांची माहिती हवी असेल तर पवन कुमार नावाची व्यक्ती मदत करू शकते, असे सांगून सुरेश कुमारने त्याला पवन कुमारचा नंबर दिला. चेतनने लगेच त्याला फोन केला. पवन कुमारने फोनवर पहिल्याच मिनिटाला मुद्दा मांडला, सर, या कामासाठी तुम्हाला पाच लाख रुपये कमिशन द्यावे लागेल. तुम्ही पैसे दिलेत की मी लगेच तुम्हाला मोठ्या हॉस्पिटल्सची यादी देतो. लाखो रुपयांच्या नफ्याच्या स्वप्नात हरवलेल्या चेतनने एका क्षणाचा विचार न करता पाच लाख रुपये ट्रान्सफर केले. अर्ध्या तासांत हॉस्पिटल्सची यादी त्याच्या मेलवर आली. चेतनने लगेच त्यांना मेल पाठवल्या आणि पुन्हा चमत्कार झाला. अवघ्या १० मिनिटांत, आम्हाला दोन लिटर तेल हवे आहे, आम्ही चार कोटी रुपये देऊ, अशी मेल त्याला आली. त्यामुळे चेतन हवेत तरंगत होता. त्या रात्री त्याला झोपच लागली नाही. आपण करोडपती होणार… आपल्याला आता नोकरीची गरज नाही, असा विचार करून दुसर्याच दिवशी त्याने राजीनामा दिला.
त्याचा जवळचा मित्र अमित त्याला भेटायला आला, चेतन, असा अचानक राजीनामा? वेडा झाला आहेस का तू? त्यावर तो हसला आणि म्हणाला, भाऊ, आता आपण करोडो रुपयांत खेळणार. त्याने अमितला संपूर्ण प्लॅन सांगितला. ते ऐकून अमितचे डोळे विस्फारले. खरंच एवढा फायदा? हो, फक्त थोडी गुंतवणूक करावी लागेल. अमितही त्या स्वप्नांच्या दुनियेत हरवला. चल, मी ५० लाख देतो, तो म्हणाला. दोघांनी इकडून तिकडून पैसे जमवले. काही कर्ज, काही बचत… आणि अखेर एक कोटी रुपये त्या सुरेश कुमारच्या खात्यात जमा झाले.
एका आठवड्यात तेल तयार होईल, असं सुरेश कुमार म्हणाला. तो आठवडा चेतनसाठी खूप मोठा होता. रोज तो मेल तपासत होता. हॉस्पिटल्सकडून सतत मेल येत होत्या. ‘ऑर्डर कधी पाठवत आहात?’ जॉन मिलेटही त्याच्यावर सारखा दबाव टाकत होता. डिलिव्हरी लवकर करा.एक आठवड्यानंतर चेतनने फोन केला, तेल तयार झालं का? सर, थोडा उशीर होईल, सुरेश कुमारने शांतपणे उत्तर दिले. चेतनने पुन्हा दोन दिवसांनी फोन केला. तेव्हा, सर, अजून काम सुरू आहे. त्यावर चेतन चिडला, काम शक्य नसेल तर पैसे परत करा, मी पोलिसांत तक्रार करेन… त्यावर सुरेश कुमार लगेच मवाळ झाला. सर, फक्त पाच दिवस द्या. तुम्ही दिल्लीला या. मी स्वतः डिलिव्हरी देतो.
तो आणि अमित दिल्लीला पोहोचले. सुरेश कुमारने दिलेल्या पत्त्यावर गेले. तिथे पोहोचल्यावर दोघेही आश्चर्यचकित झाले. समोर एक छोटंसं १० बाय ८ चं दुकान होतं. चेतनने विचारलं, सुरेश कुमार कुठे आहेत? तिथे बसलेला विशाल नावाचा माणूस म्हणाला, ‘ते मुंबईला गेले आहेत. ते ऐकून चेतनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने लगेच फोन लावला, ‘सर, मला अचानक मुंबईला यावं लागलं. तुम्ही इथे या,’ सुरेश कुमार त्यांना म्हणाला. आता चेतनच्या मनात संशयाची पाल चुकचुकू लागली होती. पण तरीही तो स्वतःलाच समजावत होता. ‘इतके मेल, इतक्या ऑर्डर्स… फसवणूक कशी असेल?’
तेवढ्यात हॉस्पिटलचा पुन्हा मेल आला. ‘आम्हाला तेल तातडीने हवे आहे. त्या पाठोपाठ जॉन मिलेटचाही मेल आला,
‘ऑर्डर पूर्ण करा. जास्त चर्चा नको.’ सगळे जण त्याच्यावर दबाव टाकत होते. चेतन पूर्णपणे मानसिक जाळ्यात अडकला होता. दरम्यानच्या काळात, चेतनला त्याचा जुना मित्र सुधाकर भेटला. गप्पा मारताना चेतनने त्याला सगळा प्रकार सांगितला. सुधाकर काही क्षण शांत राहिला. तो म्हणाला, ‘चेतन, तुझी फसवणूक झाली आहे.
काय?
होय, दोन वर्षांपूर्वी माझ्याबरोबरही असंच झालं होतं. कोकणातील काजू आप्रिâकेत विकण्याच्या नावाखाली मला करोडोंचा नफा दाखवला होता. ते ऐकताच चेतनच्या चेहर्यावरचा रंग उडाला. म्हणजे… हे सगळं खोटं आहे? ‘होय, हा नायजेरियन फ्रॉड आहे. मोठा नफा दाखवून लोकांना जाळ्यात ओढतात. तेवढ्यात सुरेश कुमारचा फोन आला. सर, ऑर्डर पूर्ण करायची असेल तर आणखी ५० लाख द्या. चेतन ओरडला, ‘बस्स, आता एक रुपयाही देणार नाही. त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले. सायबर पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. जॉन मिलेटचे मेल अकाउंट नायजेरियातून चालवले जात होते. सुरेश कुमार ज्या नंबरवरून बोलत होता, तो नंबर झारखंडमधील एका शेतकर्याच्या नावावर होता. पैसे ज्या खात्यात गेले होते, ते नोएडातील बँकेतले होते. सगळे धागेदोरे वेगवेगळे… कुठलाही ताळमेळ जमत नव्हता. पोलिस म्हणाले, ही आंतरराष्ट्रीय फसवणूक करणारी टोळी आहे. मोठा नफा दाखवून लोकांना फसवते. चेतन खुर्चीत बसून डोकं धरून रडत होता. एका क्षणात त्याचं सगळं संपलं होतं. चांगली नोकरी गेली, एक कोटी रुपये गेले, मित्राचे पैसे गेले आणि करोडपती होण्याचं स्वप्नही तुटलं.
सुधाकर त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, जलद श्रीमंत होण्याचा मोह माणसाला आंधळं करतो. व्यवसायात शॉर्टकट नसतो आणि इंटरनेटवर दिसणारं प्रत्येक स्वप्न हे कधीच खरं नसतं.
- हे लक्षात ठेवा
- आपल्याला आलेला ई-मेल खरा आहे का, याची कायम खात्री करा. त्यासाठी फुल हेडरची तपासणी करा.
- ई-मेल मध्ये दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून कोणतेही धाडसी पाऊल उचलू नका.
- व्यवसायासंदर्भात निर्णय घ्यायचा असेल तर त्याची कागदपत्रे, लिखापढी याची शहानिशा करा.
- आपण ई-मेलवरून ज्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत, ती खरी आहे का, याची खात्री करून नंतरच पुढचे व्यवहार करा.
- व्यवसायाच्या बाबतीत सर्व कायदेशीर तपासणी केल्यानंतरच पुढचे निर्णय घ्या.

