• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आत्महत्या नव्हे, खूनच!

इन्स्पेक्टर प्रधान पोलीस पंचनामा

Marmik Team by Marmik Team
September 25, 2026
in पंचनामा
0
आत्महत्या नव्हे, खूनच!

(पूर्वसूत्र : अजय मोरेचा मृत्यू ही गळफास घेऊन आत्महत्याच दिसत होती वरकरणी. पण फॉरेन्सिक रिपोर्ट काही वेगळे सांगत होता, घातपाताकडे निर्देश करत होता. त्यात अजयच्या खोलीच्या दारावरच्या झडपेवरच्या चार बोटांच्या ठशाने इन्स्पेक्टर लोंढे यांच्या डोक्यात वेगळेच विचारचक्र फिरवायला सुरुवात केली…  आधीचा लेख वाचण्यासाठी इथं क्लिक करा )

साधारण पाच दिवसांनंतर, अजयचा मावस भाऊ डेथ सर्टिफिकेट आणि पंचनाम्याची प्रत घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आला होता. योगायोगाने त्याचवेळी अजयची पत्नी स्वाती आणि त्यांचा कौटुंबिक मित्र गणेश हेदेखील पोलिसांचे आभार मानण्यासाठी आणि पुढील कागदपत्रांच्या कामासाठी पोलीस ठाण्यात आलेले होते. पोलीस स्टेशनच्या लॉबीमध्ये स्वाती आणि गणेश यांना हसतमुखाने एकत्र उभे पाहून मावसभावाचा तीळपापड झाला. त्याला अजयच्या मृत्यूमागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आधीपासूनच होता. तो स्वतःशीच रागाने पुटपुटला : ‘नवरा मेला तरी ही अजूनही याच नराधमबरोबर बिनधास्त फिरतेय! या दोघांनीच मिळून माझ्या भावाचा घात केलाय… हा माणूस हिचा वाटोळा केल्याशिवाय गप्प बसणार नाही!’

मावसभावाचे हे शब्द ऐकल्यावर बाजूलाच उभे असलेले एक पोलीस कर्मचारी (कॉन्स्टेबल) ताबडतोब पुढे होऊन म्हणाले, ‘अहो साहेब, तुम्ही काय म्हणालात? काही संशय आहे का तुम्हाला?’

मावस भाऊ अचानक भानावर येत सावरून म्हणाला, ‘नाही नाही साहेब! काही नाही, असंच… मनाचं दुःख होतं म्हणून बोललो.’
तो निघून गेल्यावर कॉन्स्टेबलने इन्स्पेक्टर लोंढे यांच्याकडे जाऊन मावसभावाचे उद्गार त्यांच्या कानी घातले. इन्स्पेक्टर लोंढे यांच्या डोक्यात आधीपासूनच चक्र फिरत होतेच. त्यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला. त्यांनी स्वातीला पुन्हा पोलिस ठाण्यात बोलावून जुजबी चौकशी सुरू केली, ‘स्वाती मॅडम, हा गणेश नेमका कोण आहे? तो काय काम करतो? आणि अजय जिवंत असताना त्याच्या घरी त्याचे असे नियमित येणे-जाणे कशासाठी होते?’

स्वाती थोडी गोंधळून, स्वतःला सावरत म्हणाली, ‘साहेब… तो… तो अजयचा बालमित्र आहे. फॅमिली फ्रेंड म्हणून तो मदत करायला येतो.’
हे बोलत असतानाच इन्स्पेक्टर लोंढे एका खास हवालदाराला आदेश दिला- ‘जा, या गणेशची कुंडली काढा. तो काय करतो, त्याचे कॉल रेकॉर्ड्स काय आहेत आणि गेल्या काही महिन्यांत त्याचे बँक व्यवहार तपासा, स्वाती मॅडमशी त्याचे नेमके काय संबंध होते, याची पूर्ण चौकशी करा!’

हे ऐकताच स्वातीच्या पायाखालची जमीन सरकायला सुरुवात झाली. इन्स्पेक्टर लोंढे यांनी अचानक विचारलं, ज्यावेळी अजयने आत्महत्या केली त्यावेळी घरात नक्की कोण होते? स्वाती पुन्हा म्हणाली, मी आणि माझा मुलगा हॉलमध्ये होतो आणि अजय बेडरूममध्ये होता, आम्ही तिघेच होतो. लोंढे यांनी दरडावून विचारलं, नक्की खरं सांगा. अजूनही वेळ गेलेली नाही, पण, आता तुम्ही खरं नाही सांगितलं तर मग मात्र मला पोलिसी खाक्या दाखवावा लागेल.

हे ऐकताच स्वाती घाबरून गेली, तिला दरदरून घाम फुटू लागला आणि ती घाबरत कापऱ्या आवाजात बोलली, ‘साहेब, खरंच सांगते, देवाशप्पथ आम्हा दोघांशिवाय कोणीही घरात नव्हते.’ इन्स्पेक्टर लोंढे यांनी तिला आपल्या मोबाइलमधील एक रेकॉर्डिंग दाखवलं आणि म्हणाले, ‘आधी हे बघ आणि मग मला उत्तर दे.’ स्वातीने घाबरत घाबरत त्यांच्या हातातून मोबाईल घेतला आणि ती व्हिडिओ पाहू लागली. त्यात तिचा मुलगा सोहम पोलिसांना सांगत होता की, त्या दिवशी मी आणि आई रात्री घरात असताना अचानक आईला फोन आला, मग तिने दरवाजा उघडला, एक बुरखा घातलेली बाई आमच्या घरात आली आणि आईने मला लगेच दुसर्‍या बेडरूममध्ये जाऊन झोपायला सांगितलं, मी बेडरूममध्ये गेल्यानंतर आईने दरवाजा लावून घेतला.’

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वातीची बोबडी वळू लागली आणि तिला काय बोलावे ते सुचेना. इन्स्पेक्टर लोंढे म्हणाले, ‘ही बाई कोण होती, हा काय प्रकार आहे, आमच्यापासून ही गोष्ट का लपवली?’ त्यावर स्वाती घाबरून रडू लागली. त्यावेळी लोंढे यांनी दोन महिला कॉन्स्टेबलना बोलावून सांगितले की जरा हिला पोलिसी खाक्या दाखवा, म्हणजे ही बोलू लागेल. त्या कॉन्स्टेबल तिला धरून घेऊन जाऊ लागल्या, तेव्हा घाबरून स्वाती रडू लागली आणि साहेबांना म्हणू लागली, ‘साहेब माफ करा, मी सगळं सांगते, पण मला मारू नका, मला यातून वाचवा…’

इन्स्पेक्टर लोंढे यांनी इशारा केल्यानंतर त्या कॉन्स्टेबलनी तिला सोडले आणि खुर्चीवर बसवले. स्वाती रडत सांगू लागली, ‘साहेब, मी काही केलं नाही, गणेशनेच सगळा प्लॅन केला होता आणि त्याने मुलाला मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी घाबरून त्याला मदत करत होते.’ इन्स्पेक्टर लोंढे यांनी लगेच ओळखले की स्वाती खोटे सांगते आहे. या दोघांनीच मिळून हा कट रचला आहे. त्यांनी पुन्हा पोलिसी खाक्या दाखवण्याची धमकी दिल्यावर स्वाती निमूटपणे सांगू लागली, ‘गणेश नेहमी आमच्या घरी येत असे, मुलाला खाायला घेऊन येत होता, मलाही चांगले गिफ्ट देत होता. हळुहळू मी त्याच्याकडे नकळत ओढले गेले आणि आमचे एकमेकांवर प्रेम जडले. मुलगा शाळेत गेल्यानंतर आणि अजय कामावर असताना त्याचे बर्‍याच वेळा माझ्या घरी येणे होत असे. एक-दोन वेळा अचानक अजय घरी आला त्यावेळी गणेश घरीच होता, त्यावेळी काहीतरी सांगून मी वेळ मारून नेली. पण अजयला आमचा संशय येत असावा. कारण, तो अचानक बर्‍याच वेळा घरी येत होता आणि त्याच्या बोलण्यात देखील तसे जाणवत होते. त्यामुळे आम्हाला भेटता येत नव्हते. तो माझ्या आई-वडिलांना याबाबत सांगणार आहे, असे तो मला भांडणात सांगायचा. हे ऐकून मी घाबरले होते. आई-वडिलांना कळले तर ते जी मदत करीत आहेत ती करणार नाहीत आणि गणेशला देखील सोडणार नाहीत हे मला माहित होते. मला गणेशशिवाय राहणे शक्य नव्हते, तो श्रीमंत होता, मला आणि मुलाला सांभाळायला तयार होता. पण, अजयने मला घटस्फोट दिला नसता आणि माझ्या घरच्यांनी देखील मला तो घेऊ दिला नसता, त्यामुळे मला काय करायचे हे सुचत नव्हते. साधारण १५ दिवसांपूर्वी गणेश घरी आला तेव्हा मी मनातील खदखद त्याला बोलून दाखविली, त्यावेळी तो म्हणाला की अजय हा आपल्यातला मोठा अडसर आहे, तो आपल्याला दूर करावाच लागेल. गणेश म्हणाला की तो नेहमी क्राईम पेट्रोल पाहत असतो, त्यात होणार्‍या चुका टाळल्या तर पोलीस कधीच आपल्याला पकडू शकणार नाहीत. मग आम्ही अजयचा काटा कायमचा काढायचे ठरविले.’

 

त्यानंतर एका निर्जन ठिकाणी भेटून गणेश स्वातीला म्हणाला होता, अजयला कोणतंही विष किंवा अमली पदार्थ दिले, तर ते पोस्टमार्टममध्ये समोर येईल आणि आपला सगळा खेळ खल्लास होईल. मृत्यू असा वाटला पाहिजे की तो पूर्णपणे नैसर्गिक किंवा दुर्दैवी आत्महत्या आहे. थंड डोक्याने गणेशने स्वातीला प्लॅन सांगितला, ‘पुढचे दोन-तीन दिवस तू घरात वेगळी आणि लोकांसमोर वेगळी वाग. घरात त्याला सळो की पळो करून सोड, त्याच्याशी सारखी भांड. मात्र तो लोकांसमोर काही बोलला तरी गरीब असल्याचा बनाव कर. जेणेकरून लोकांना दिसेल की अजय तुला त्रास देतोय. तू सतत लोकांना सांगत राहा की अजय रोज दारूच्या नशेत मला मारहाण करतो आणि सतत ‘मी आत्महत्या करीन’ अशा धमक्या देतो. त्यानंतर तू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक खोटी ‘एनसी’ दाखल कर की नवरा जीव देण्याची धमकी देतोय. तेव्हा स्वातीच्या लक्षात आलं की गणेश अजयच्या आत्महत्येच्या बनावाची पार्श्वभूमी तयार करतो आहे. गणेशने तिला पुढची पट्टी पढवली, ज्या दिवशी मुख्य काम करायचं, त्या दिवशी तो बाहेरून नेहमीप्रमाणे मद्यप्राशन करून घरी येईल. मी त्याला बाहेर भेटल्यानंतर एक दारूची बॉटल घेऊन देईन. तो घरी आल्यावर तू त्याला गोड बोलून आणखी दारू पाज, जेणेकरून त्याचा स्वतःवर ताबा राहणार नाही. नंतर मी बुरखा घालून मुस्लिम महिलेच्या वेषात तुझ्याकडे येतो. सोसायटीच्या जिन्यावर किंवा मजल्यावर सीसीटीव्ही कॅमेरा नाही, त्यामुळे ती महिला कोणत्या घरात गेली हे देखील कोणाला कळणार नाही. आपण त्याला त्याच्या हाताने पंख्याला गळफास लावून लटकवू. घरात तू एकटी असताना एका पुरुषाला गळफासाला लटकवू शकत नाहीस. तू फक्त मी यायच्या आधी बंटीला दुसर्‍या बेडरूममध्ये झोपव. मी येताना तुला जिन्यातून कॉल करीन, तेव्हा दरवाजा उघडून ठेव! आपले काम झाल्यावर मी परत बुरखा घालून निघून जाईन. मी बाहेर गेल्यावर तुला कॉल करीन. त्यानंतर तू त्याच्या मोबाइलमधून त्याच्या मित्रांना आणि तो आत्महत्या करत आहे असा व्हाट्सअ‍ॅप मेसेज करून पाठवून दे. पोलीस तपासात सर्वात आधी आपल्या दोघांचे सीडीआर (कॉल रेकॉर्ड) काढले जातील, हे गृहीत धरून रोजच्या नंबरवरून एकमेकांशी बोलणं किंवा मेसेजिंग टाळण्यासाठी गणेशने शक्कल लढवून दोन नवीन आणि डमी सिम कार्ड्सची व्यवस्था केली होती. खुनाच्या दिवसापुरती ती सिमकार्ड वापरून नंतर ती नष्ट करण्याची त्याची आयडिया होती. क्राइम पेट्रोलच्या भागात गणेशने हेही पाहिलं होतं की पोलिस गळफासाच्या गाठीवरून ती आत्महत्या करणाऱ्याने बांधलेली आहे की इतर कोणी गळफास दिला आहे, ते ओळखतात. तो धोका टाळण्यासाठी तो स्वत:च्या गळ्याला फास लावण्याचा अभिनय करून तशी गाठ आधीच तयार करून ठेवणार होता. गणेशने स्वातीला आणखी एक क्रूर टिप दिली होती, अजयशी भांडताना त्याला ‘एखादा स्वाभिमानी माणूस असता तर केव्हाच आत्महत्या केली असती’ असं सारखं बोलत राहायला सांगितलं होतं. हा विचार त्याच्या डोक्यात भिनावा आणि तसे त्याने लोकांसमोर बोलत राहावे अशी ती आयडिया होती.

या योजनेच्या पूर्ततेसाठी गणेशने अजयलाही गाठले त्याच्या काळजीचे नाटक करत त्याला दहा हजार रुपये खर्चासाठी दिले, पण, स्वातीला अजिबात सांगू नकोस, या अटीवर. त्या पैशांतून अजय रोज उशिरापर्यंत बाहेर जाऊन भरपूर दारू पिऊन घरी येऊ लागला. दरम्यान मृतदेहाची उंची आणि स्टुलाच्या गणितात गडबड झाली, पंख्याची उंची आणि फरशीवर ठेवायचा स्टूल यात अंतर चुकलं, तर पोलिसांना खुनाची शक्यता येईल, हे लक्षात घेऊन चक्क प्रत्यक्ष बेडरूममध्ये जाऊन मृतदेह लटकल्यानंतर पाय फरशीला किती अंतरावर राहतील आणि माणूस कसा सहज फाशीवर चढू शकेल, याचे अचूक गणित डोक्यात बसवून घेतले आणि खुनाची रिहर्सलच करून पाहिली. त्याचबरोबर बेडरूमबाहेर आल्यावर स्वातीने झडपेतून कडी लावून घ्यायची आणि बेडरूम आतूनच बंद असल्याचा बनाव पूर्ण करायचा, याचीही प्रॅक्टिस झाली.

स्वातीच्या तोंडून हे नियोजन ऐकून इन्स्पेक्टर लोंढे यांचे डोके चक्रावले होते. एवढी साधी सरळ दिसणारी बाई किती थंड डोक्याने नवर्‍याचा मर्डर करण्याचा प्लॅन करत होती, हे पाहिल्यावर त्यांच्याही अंगावर काटा आला. आता वेळ होती ती या धूर्त आणि थंड डोक्याने खून करणार्‍या गणेशला त्याच्याच जाळ्यात अडकवण्याची. लोंढे यांनी आपल्या डीबी पथकाला आदेश देऊन गणेशला बोलावून एका वेगळ्या कोठडीत बसवले आणि लोंढे साहेब स्वतः एक खाकी फाइल हातात घेऊन, अत्यंत गंभीर पावले टाकत गणेशच्या समोर जाऊन उभे राहिले. गणेश खुर्चीवर बसला होता. त्याच्या चेहर्‍यावर सुरुवातीला एक खोटा आव आणि आत्मविश्वास होता. इन्स्पेक्टर सतीश लोंढे आपला चष्मा टेबलवर ठेवत, अतिशय भेदक नजरेने पाहत म्हणाले, ‘काय गणेश… तुला पोलीस म्हणजे दुधखुळे वाटले का? खून करून तो आत्महत्येचा बनाव रचला की आपण सुटलो, असंच ना?’ गणेश थोडा घाबरत, पण आवाज ताठ ठेवत म्हणाला, ‘साहेब… तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाही. मी खून केला? अजय माझा जिवाभावाचा मित्र होता!’

इन्स्पेक्टर लोंढे म्हणाले, ‘मित्राच्या बायकोशी जवळीक साधून, त्याच्याच घरात घुसून त्याचा काटा काढणारा तू कसला मित्र? अरे, तुझ्या त्या ‘क्राईम पेट्रोल’च्या आयडियाने आणि झडपेवरील बोटांच्या ठशांनी तुझा सगळा खेळ आधीच खल्लास केलाय!’ गणेशचे चेहरेपट्टीचे रंग क्षणात उडून गेले. त्याचे ओठ थरथरू लागले, पण तो स्वतःला सावरत म्हणाला, ‘साहेब, हे खोटं आहे… माझ्यावर चुकीचा संशय घेतला जातोय…’

इन्स्पेक्टर लोंढे आवाज तीव्र करत, थेट त्याच्या डोळ्यांत बघत म्हणाले, ‘चुकीचा संशय? अरे वेड्या, स्वातीने तोंड उघडलंय! तिने सगळं सत्य पोलिसांसमोर मांडलंय. तिने सांगितलंय की या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड तूच होतास! तिने तर हेही सांगितलं की, ‘माझा याच्यात काहीच संबंध नाही, मला गणेशनेच या सगळ्या गोष्टी करायला लावले, नाहीतर मी हे कधीच केलं नसतं!’ तू तिच्यासाठी जीव देतोयस, आणि ती सगळं खापर तुझ्यावर फोडतेय!’

इन्स्पेक्टर लोंढे यांचे ते शब्द ऐकताच गणेशच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहर्‍यावरचा उरलासुरला आत्मविश्वास क्षणात धुळीस मिळाला. त्याच्या डोळ्यातून भीती स्पष्टपणे वाहू लागली. गणेशचे बांध फुटले. त्याने थरथरत्या आवाजात, गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली. लोंढे साहेबांच्या एका मास्टरस्ट्रोकने तो धूर्त खुनी पूर्णपणे तुटला होता. इन्स्पेक्टर लोंढेंनी त्यांचे कबुलीजबाब वेगवेगळे नोंदवल्यानंतर त्यांना समोरासमोर उभे केले, त्यावेळी ते एकमेकांना शिव्या घालून ‘तुझ्यामुळे झालं हे’ असा एकमेकांवर आरोप करून आकांडतांडव करत होते. ते पाहून इन्स्पेक्टर लोंढे हवालदाराला म्हणाले की, ‘बघा आयुष्यभर एकमेकाला जीव लावण्याच्या शपथ घेणारे आता एकमेकाचा जीव घ्यायला तयार झालेले आहेत, हे प्रेम नाही, ही वासना आहे आणि जेव्हा वासना तुमच्या मनावर अधिराज्य करायला लागते तेव्हा ती माणसाला हैवान बनवते.

पुढे तपासात ज्याने अजयच्या हत्येला एका गूढ आणि पूर्णपणे ठरवून केलेल्या आत्महत्येचा बनाव बनवले होते, त्या व्हाट्सअ‍ॅप मेसेजची वेळ आणि फॉरेन्सिक डिजिटल लॉक तपासण्यात आले. फॉरेन्सिक सायबर टीमने मोबाईलच्या बॅकएंड डेटाची तपासणी केली तेव्हा समजले की, तो मेसेज थेट टाईप करून पाठवलेला नसून आधीच ‘ड्राफ्ट’ करून किंवा ‘ऑटो-शेड्यूल’ करून ठेवण्यात आला होता. अति दारूच्या नशेत धुंद झालेल्या स्थितीत असणारी व्यक्ती इतका मोठा, व्यवस्थित आणि व्याकरणबद्ध मराठी मेसेज टाईप किंवा शेड्यूल करूच शकत नाही, हे तांत्रिक सत्य समोर आले. गळ्यातील फाशीची दोरी आणि कपड्यांवर सापडलेले फायबरचे नमुने गणेश आणि मयताच्या कपड्यांवर आणि फाशीच्या दोरीवर तिसर्‍या व्यक्तीच्या कपड्यांचे फायबर आणि घाम व त्वचेचे कण सापडले. ते स्वाती आणि गणेशच्या कपड्यांशी तंतोतंत जुळले. या सर्व भक्कम तांत्रिक पुराव्यांच्या आणि इन्स्पेक्टर सतीश लोंढे यांच्या चाणाक्ष नजरेमुळे, तो आत्महत्येचा वाटणारा बनाव अखेर एका खुनाच्या परिपूर्ण तपासात बदलला.

Previous Post

क्षण श्रीमंतीच्या मोहाचा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.