सहा एप्रिल १९७५ या तारखेच्या अंकासाठी, म्हणजे ५१ वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी हे चित्र रेखाटले होते तेव्हा ते काँग्रेस पक्षाचे कट्टर विरोधक होते. यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश आणणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री केंद्रात परराष्ट्र व्यवहार मंत्री बनले होते. राज्यात त्या वर्षात वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झाले आणि शंकरराव चव्हाण त्यांच्या जागी नेमले गेले तरी राज्याचे खर्या अर्थाने सर्वात मोठे नेते यशवंतरावच होते. ते पं. नेहरूंच्या हाकेला प्रतिसाद देऊन दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून रवाना झाले, तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला, असे म्हटले गेले होते. त्यांची उंचीच तेवढी होती. त्यामुळे बाळासाहेबांनाही त्यांच्याविषयी किती आदर होता, ते या चित्रात दिसते आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसच्या माध्यमातून यशवंतरावांना, पर्यायाने महाराष्ट्राला पोखरण्याचे कोते राजकारण करणारे क्षुद्र उंदीर बाळासाहेबांनी रेखाटले होते… मर्हाटी नेतृत्त्व देशातल्या केंद्रसत्तेला आव्हान देऊ शकते, याची जाणीव तेव्हाच्या सत्ताधार्यांनाही होतीच… देशात सत्तापालट झाल्यानंतर आजही महाराष्ट्राला पोखरण्याचं काम इमाने इतबारे सुरूच आहे. मात्र, आज राज्याच्या सत्तेवर बसलेल्यांची वैचारिक आणि राजकीय उंची दुष्काळग्रस्त शेतकर्याच्या शेतातल्या सुकलेल्या ढेकळाइतकी तरी आहे का? राज्याचे सत्ताधारीच सह्याद्री पोखरून काढून आपल्या मालकाच्या घशात घालणारे उंदीर बनून बसावेत, हा केवढा दैवदुर्विलास!

