
‘बयाऽऽ, ह्या मुडद्याला कुणी स्टेरिंगवर बशिवलं कुणाला माहीत? बाई पोर वल्लं झालं गंऽ! ‘ म्हातारीचं वटवट करताना लक्ष दोघांकडं आलं, तसे दोघं सावध झाले, आणि सावरून बसले. त्यानं फाटलेला आणि ओला झालेला पेपर बाजूला घडी मारून ठेवला. आता नजर थेट तिच्यावर खिळली. कानात नाजूक दागिना…चाफेकळीसारखं नाक…
वेळ तर नाही ना झाला? त्यानं घड्याळ बघितलं चालुय. सूर्य बघितला पूर्वेकडे निघालाय. एकूण कोवळ्या उन्हात उभं रहावं लागणार आहे तर…
‘मालेगाव-धुळे-नंदुरबार’ माईकवरून उद्घोष चालू झाला. एक नवी लालपरी स्टँडपुढं येऊन उभी राहिली. लोकं ढेपीला मुंगळे चिटकावे तसे गाडीच्या दाराला भिडले. हे बघावं का? नकोच!
बस स्टँड. इथं पुढ्यात पेपर टांगलेले दिसताय स्टॉलवर. तो गेला. खिश्यातली दहाची नोट काढली. आणि पुढं सरकवली.
‘कोणता देऊ?’ त्या स्टॉलवाल्यानं सिगारेटचा पुडा हाताशी धरला. आता डोक्यावर हात मारायची वेळ त्याच्यावर!
‘पेपर!’ त्यानं मात्र आवरत घेतलं. तसंही आजकाल पेपर पुंगळ्या करून बिड्या बनवायच्या लायकीचेच झालेत. पण इथून पुण्याला जायचं तर वेळ घालवायला हाती काही पाहिजे ना?
‘याच्यावर बाबाचा गंडा आहे. याच्यावर गडावरच्या आईचा खण आहे. आणि याच्यावर बघा, मूर्तीवर वाहिलेलं तेल आहे. कोणता देऊ?’ त्या टपरीवाल्यानं मंदिरापुढच्या पूजा-साहित्य देणार्यासारखा खर्जातला आवाज लावला. आता हे काय नवीन? त्यानं गोल फिरून बघितलं. इथं फार तर दोनचार बस दिसताय. बस स्थानकाची इमारत आहे. काडीला सुद्धा शेंदूर फासलेलं काहीच नाही. फारतर कोपर्यातल्या सार्वजनिक मुतारीवर भडक लाल अक्षरात ‘पुरुष’ लिहिलेलं आहे. इतकंच! मग हा हे पूजा-साहित्य कश्यासाठी देतोय? तो बुचकळ्यात पडला.
‘तो चौथा बघू!’ त्यानं आधीचे तीन टाळले.
‘हे घ्या! आणि हे एक कुपन भरून द्या!’ त्यानं उत्साहाने एक पेपर देऊन त्यातलं कुपन समोर दिलं.
‘कश्यासाठी?’ तो गोंधळला.
‘म्हणजे बघा! पितृपक्षात गोदेवर होणार्या पूजाविधीत ठेवले जाणारे एक डझन केळं कुपन भरणार्या एक भाग्यवान विजेत्याला घरपोच मिळतील.’ तो टपरीवाला निरतिशय नम्रतेने सांगू लागला. आता रे? केळासाठी कुपन भरावा?
‘हॅट्!’ तो एक हात झटकत बस स्थानकाकडे निघून गेला. एक एक करत बस येऊ लागल्या आणि आपापल्या गंतव्य वेळेवर जाऊही लागल्या. त्यानं हातात पेपर घेऊन बेचैनीनं चार-दोन येरझार्या घातल्या. उभ्या बसगाड्यांच्या पाट्या निरखून बघितल्या. पण अजून पुणे बस लागलीच नाहीय, हे दिसल्यानं तो पॉपकॉर्नच्या गाड्याला खेटून उभा राहिला. इथून सगळ्या बस आणि स्टँड नजरेच्या टप्प्यात राहील, हा हेतू.
एक म्हातारी थोड्याबहुत चिल्लर आणि नोटांचा स्टीलचा डबा हातात घेऊन आणि डोक्यावर कुठल्याश्या कुंकवानं माखलेल्या बाबाची परडी घेऊन पैसे गोळा करत त्याच्यासमोर आली.
‘यंदा तुझं लग्नं होईल रे बाळा…’ त्यानं त्या गजबजाटात तेवढंच वाक्य ऐकलं. पण तोंडातून अवाक्षर न काढता त्यानं त्या म्हातारीला रस्ता करून दिला. त्यात पॉपकॉर्नवाल्याच्या आरोळ्या! ‘घ्या, पॉपकॉर्न वाले!’ इथं कानठळ्याच बसायच्या आहेत तर! कोण देव विकतो, तर कोण भूक!
‘संगमनेर-पुणेऽऽऽ’ त्यानं पुढला पुकारा व्हायच्या आत स्टँडमधी घुसलेल्या नव्या बसकडे धाव घेतली आणि ती उभी र्हायच्या आत दारातून आत प्रवेश केला. हे चालत्या गाडीत बसायचं-उतरायचं ट्रेनिंग शाळेत असल्यापासूनच! ह्या बस तश्या लालपरीच्या आधीच्या. थोड्या बुटक्या, लाल-पिवळ्या पट्ट्याच्या! ऐसपैस! एक बाजूला तीनचं शीट, दुसर्या हाताला दोनचं! पण ह्या बसची कंडिशन लालपरीपेक्षा भारी. पटपट दोनेक सीट पुढं जाऊन त्यानं खिडकीजवळची जागा धरली. आता त्याला कसलीच चिंता राहिली नाही. त्यानं पाठीची
बॅग वर रॅकवर कोंबली. मागंपुढं सरकू नये म्हणून बारीक धाग्यानं अडकवून ठेवली. आणि ऐसपैस बसकण घेतली. हळूच निवांतपणे पेपर उलगडून वाचायला सुरुवात केली.
आधी रिकामी असलेली बस एक एक करत भरत चालली. पण त्याच्या सुदैवाने अजून त्याच्या शेजारी कुणीच बसलं नाही आणि कुणी बसूही नाही, अशीच त्याची सुप्त इच्छा. तसं हे डबलचं शीट, पण याला मधी आताच्या नव्यावानी हात ठेवायला दांडा नाही. त्यामुळं जरा पसरून बसता येतं. त्यानंही दोन्ही हात लांबवून पेपर धरला. अख्खं शीट बुक केल्यावानी. तोच ड्रायव्हर आला आणि कंडक्टरसुद्धा! आता जागा मोकळीच राहण्याची त्याची आशा वाढली. कंडक्टरनं मागंपुढं बघत दोन बेल दिल्या आणि ड्रायव्हरनं गाडीला शेल मारला. बस वळायला लागली, तशी दारावर थाप पडली.
‘अरे थांब! मिलीट्री मागं लागली का तुह्याऽ? येऊ दे वलेऽऽऽ!’ म्हातारीचा आवाज आला तसं कंडक्टरनं दार उघडलं. ‘बया, तुला थोडाबी दम नाही का? हे पाण्याची बाटली घेता घेता आवाज देतेय मी! तुला ऐकंना गेलं व्हय? एवढा काय आलिपींकला चाललाय का तूऽऽ? इथं गुडघे कामातून गेले. माह्यासारख्याला पळवतं का आता?’ म्हातारीनं चढल्यासरशी कंडक्टरला पैâलावर घेतलं. मागोमाग तिची सावळी नात, जीन्स टी-शर्टचा साधासा पोशाख घातलेली पण कमालीची सुंदर अशी. हातात पिशव्या घेऊन मागून चढली. ‘नवरत्न कलेक्शन सुटिंग-शर्टिंग साड्या व चिल्ड्रेनवेअर’ अश्या छापाच्या पिशव्या. त्यानं नजर वर करून बघितलं, पण ती भांडकुदळ म्हातारी बघून त्याल्ाा धाक भरला. ही बया शेजारी बसली तर…
आजूबाजूच्या लोकांनी म्हातारीला समजावलं तशी म्हातारी हातातील संभाजी बिडीचा छाप असलेली जाड मोठी पिशवी सावरत मागं निघाली, आणि बस पुढं!
‘बया, तुला म्हंटले व्हते! लवकर उठ! लवकर चाल! पार उठती पासल्या पहारा! आता गं इथं बसायला जागा राहिली नाही पहाय!’ म्हातारी आता नातीला सुनवायला लागली. ‘त्ये शीट पहाय, पळ! बस तिथं!’ म्हातारीनं नातीला जागा दाखवली. तशी नात घाईनं त्याच्या शीटजवळ आली.
‘तू बस!’ पण जवळ येऊन त्याच्याकडं बघत नातीनं आज्जीला मान दिला.
‘वले, मला काय धाड भरली! मी अजून तुह्यासारख्या दहाजणी पायाला बांधून हिंडंल! बस तू! नाजूक मैना! खड्यात आसडा बसला हाताला तर पडशील. परत तुझी माय मला बोल लावील. बस!’ म्हातारीनं आदेश दिला तशी नात हळूच सरकून बसली. तिनं एकदोन पिशव्या दोघांच्या मधी ठेवल्या. सिक्युरिटी म्हणून. त्यानं पेपरातून नजर किंचितवर करत तिच्या चेहर्याकडं बघितलं, काळजाला जरा गारवा जाणवला. पण एकाएकी नजर चुकून आणखी वर गेली, तर म्हातारी मारक्या म्हशीवानी डोळे वटारून बघताना दिसली. त्यानं घाबरून डोळे पेपरात घातले.
‘बयाऽऽ, उलीसक नागलीचं पीठ तुझ्या मायनं मागितलं व्हतं, राहिलं ना घरीच? बाई काय म्हणंल ती?’ म्हातारीला भलताच घोर लागला. आता ह्या म्हातारीला बसमधी नागलीच्या पापड्या करायच्या आहेत काय?
‘काही बोलणार नाही ती! मी आहे ना?’ नातीनं आज्जीला आश्वस्त केलं.
‘हां तू काही म्हणली तरी तुझी आज्जी आहे ना? आत्याबाई! तिचं तोंड कोण धरील? माही पोर पडली सासुरवाशीण!’ म्हातारीला लेकीची चिंता लागली. त्या काळजीनं तोंडाची वटवट चालू!
बस एव्हाना गाव सोडून पुढं आलेली. बाजूची हिरवाई ऊन धरल्यावानी माना टाकून मलूल झालेली. सुकलेली. त्यानं पेपरचं पान उलटलं. शेजारी गंज सुंदर तरुणी बसलीय, पण त्या खडूस आज्जीच्या धाकानं त्याची नजर वळवायची हिंमत व्हईना!
‘बाईऽऽऽ’ म्हातारी गच्च शीट धरून उभी असूनबी गाडीनं खड्डा चुकवायच्या नादात हेलकावा घेतला तशी तोल जाऊन पुढं झुकली. पडता पडता वाचली. ‘मेले असते बाई! हा बाबा गाडी रस्त्यावर चालवितो का मौत का कुआंमधी?’ म्हातारीच्या डोक्यात ड्रायव्हर बसला. म्हातारी त्याला लाखोल्या वाहायला लागली.
‘आज्जी तू बस! पडायबिडायची तू परत…’ नात काळजीपोटी उठायच्या बेतात बोलायला लागली.
‘अय नको ना उठू! अख्ख्या प्रवासात तुझ्याकडं पाहायचो नाही! पण ती कजाग म्हातारी नको शेजारी!’ त्यानं मनातल्या मनात तिचा धावा केला.
‘नको बस तिथंच! त्या पिशव्या पायाजवळ घे!’ म्हातारीच्या डोक्यात वेगळंच घोळायला लागलं. तिच्या नुसत्या शब्दानं त्याच्या जीवात जीव आला. पुढं? त्या काहीही करोत! ही सालस पोर उठणार नाही ना? मग झालं की! त्यानं तिकडं दुर्लक्ष केलं, पण पॅन्टच्या मागल्या उजव्या खिश्यातून कंगवा मागं सरकल्यावानी वाटल्यानं त्यानं हात तिकडं निला अन् म्हातारीनं नातीला त्याच्याकडं सरकवीत डबलच्या शीटवर बसकन मारली. एकाएक ती सावळी सुंदरी अंगाला खेटल्यानं त्यालाच मोहरल्यागत झालं.

‘पिश्या खाली ठेवल्या तर झाली पहाय बरं जागा! आधीच डोकं चालवलं असतं तर?’ म्हातारीला स्वतःचीच टिमकी वाजवायचीय.
‘पण र्हायले असते मी उभे!’ नातीला बी अवघडल्यावानी झालं असावं. पण जास्त अवघडला तो! कसा म्हणजे? उजवा हात खिसा चाचपायला मागं घेतला, तो तसाच राहिला. आता पुढं घ्यायचा तर तिला लागंल! त्याच्यात पुढल्या ओळीत लिहिलंय पेप्रात, मुली वाईट स्पर्श पटकन ओळखतात. अश्यात मागून हात तिला खेटला अन् तिला तो योग्य नाही वाटला तर…? त्याला घाम सुटला! ही आज्जी तर गचांडीला धरून खिडकीतून बाहेर लोटील!
‘तिकीटऽ तिकीटऽऽ तिकीटऽऽऽ…’ कंडक्टर हातातला चिमटा वाजवत शिटापर्यंत आला! म्हातारीनं कमरेच्या पिशीतून दोनेक नोटा काढून कंडक्टरला दिल्या. बदल्यात कंडक्टरनं दोन तिकिटं प्रिंट करून दिली. चिमटा वाजवत कंडक्टरनं त्याला तिकीट विचारलं, त्यानं वरच्या खिश्यात ठेवलेले पुण्याच्या एक तिकिटाचे पुरे पैसे कंडक्टरला दिले, डाव्या हातानी, आणि तिकीट घेऊन वरल्याच खिश्यात ठेवलं. पण कवर असा अवघडल्यावानी एक हात तिच्यामागं अडकवून बसणार? त्यानं डोकं लावलं. खिडकीकडं जरा पाठ सरकवली, तिरका बसला. आता ती सुंदर सावळी तरुणी एकदम नजरेसमोर आली. आणि हात किमान पेपर धरण्याइतका मोकळा झाला.
‘बया, हे काय घातलं गं? मागून पर वर तरंगतं आणि पुढून बी वर होतं. पोरीच्या जातीनं नीट कपडे घालावा.’ म्हातारीनं टी-शर्ट वर करत नातीची शाळा घ्यायला सुरुवात केली.
‘तुला काही कळतं का? कुठंबी कपडे वर करती?’ नात काहीशी अवघडल्यावानी टी-शर्ट खाली ओढत घुश्यात पण तरीही बारीक आवाजात आज्जीच्या कानाजवळ पुटपुटली.
‘बया, मी काय पब्लिकमधी बोलले काय? इथं हे एकच बुजगावणं आहे. ते बी पेप्रात डोकं घालून बसलंय. आपलं ब्वॉ, हे नीट दिसंना म्हणून बोलले. त्यापेक्षा साडी नेसली असती तरी चालली असती ना?’ म्हातारी ऐकेल तर ना? त्याला फक्त बुजगावणं हा शब्द लागला. पण डोकं कोण लावील! मरो! फक्त त्यानं कान दोघींकडं ठेवले.
‘तुला कळत नाही, हीच फॅशन आहे! राहू दे!’ नात म्हातारीला गप्प करायच्या मागं.
‘अयोऽव!’ परत ड्रायव्हरनं हेलकावा दिला, तशी म्हातारी आणि नातीची टक्कर झाली आणि त्या सावळ्या सुंदरीचा कान त्याचे ओठ स्पर्शून गेला. आता सॉरी म्हणावं का? त्याला प्रश्न पडला. पण हे घडलं अपघातानं, यात ठरवून काहीही नव्हतं. फक्त तिरकं बसल्यानं डोकी टकरायच्या ऐवजी ओठाला कान लागला.
‘मुडदाऽऽ, गाडी चालवितो का काय करतो? काय वशिल्यानं लागला कानू?’ म्हातारीचा तोंडाचा पट्टा चालू झाला.
‘ती पिशवी सरळ कर ना!’ नातीनं आज्जीच्या पायाजवळच्या कललेल्या पिशवीचं ध्यान तिला दिलं. तसा आज्जीनं हात पिशवीला लावला. हळूच एक गाठ सोडून दोन बुंदीचे लाडू वर काढले. एक नातीला दिला, दुसरा स्वतःच्या हातात घेतला.
‘कश्याला काढले गं?’ नात काहीश्या त्रासिक चेहर्यानं आज्जीला विचारायला लागली.
‘आवर घे खाऊन! दोन घासाचे तर आहेत.’ म्हातारीनं खूण केली, पण शेजारी तो पेपर वाचीत बशेल आहे. आणि नजर खाली असली तरी त्याच्या नजरेसमोर दोघी आहेत. हे म्हातारीला कळलं तसा म्हातारीनं पिशवीतून तिसरा लाडू काढला. आणि नातीला खुणेनं त्याच्याकडं द्यायला सुचवलं. नातीनं चेहर्यावरला आज्जीसाठीचा राग लपवत काहीश्या अनिच्छेने आणि बुजरेपणानं त्याच्यापुढं लाडू धरला.
‘घे ना!’ त्यानं पेप्रातून वर बघितलं. ती लाडू देतेय. व्वा! एक गोड मुलगी बोलण्याची सुरुवात काय गोड करतेय ना? पण हा लाडू असा सहजासहजी घ्यावा की नको? त्याला प्रश्न पडला. परत म्हातारी म्हणायची, ‘काय डखळेल आहे मेलं?’ ते बरंबी दिसणार नाही ना?
‘ये पोरा घे!’ म्हातारीनं आग्रह केला, तसा त्यानं लाडू घेतला अन् दोन घासात पटकन संपवलाबी!
‘पाण्याची बाटली गं? आणली होती ना?’ म्हातारीला तहान लागली वाटतं.
‘तुझ्याच हातात होती ना? का पिशवीत ठेवली होती?’ नात पिशव्या बघू लागली.
‘पिशीतच वरच्या वर ठेवेल होती. त्या बघ बरं!’ म्हातारी आठवायचा प्रयत्न करू लागली.
‘हिच्यात का? नाहीये! घरंगळत गेली असंल पुढं!’ नातीनं शक्यता वर्तवली.
‘माझ्याकडं आहे, पाहिजे का?’ त्यानंही लाडवाचं कर्ज फेडायचं ठरवलं.
‘बरं होईल, दे बाबा घोटभर!’ म्हातारीनं होकार भरला.
‘हे डोक्यावर बॅग आहे ना तिच्यात बॉटल आहे… घेते का? मला उभं राहता नाही येणार.’ त्यानं थेट सावळ्या सुंदरीला गळ घातला. तशीही आज्जी तिची! त्यामुळं तीच गप्प उभी झाली. टाचा वर करून बॅगमधून बॉटल काढू लागली.
‘हे पहाय, हे शर्ट असं तरंगतं वर.’ म्हातारीनं थोडं वर झालेलं नातीचं टी-शर्ट बेंबी झाकायला खाली खेचत बोल लावला.
‘तुझं बी ना! मरु दे…’ सावळ्या सुंदरीनं लाजत काहीश्या लाडीक रागात बाटली आज्जीकडं दिली आणि त्याच्याकडं नजर फेकत खाली बसू लागली. तशी दोघांची नजरानजर झाली. ‘हाय कातिल!’ त्यानं काळजाला तिच्या नजरेचं वर्णन केलं. बाकी विचार झटपट झटकत त्यानं घाईनं नजर खाली घेतली. सगळा माहौल प्रेमात पडण्यासारखा! पण जवळ तिची आज्जी आहे ना?
आज्जीनं एक घोट पाणी घेतलं आणि बाटली नातीकडं दिली. तिनं झाकण खोललं, एक दोन घोट पाणी पिलं… बाटली त्याच्यापुढं केली. त्यानं गप एक घोट पाणी पिलं आणि पुन्हा तिच्याकडं बाटली देत वर बॅगेत ठेवण्याची खूण केली. आता मात्र ती एक हातानं टी-शर्ट खाली खेचत दुसर्या हातानं बाटली ठेवायला लागली. पण ओव्हरटेकच्या नादात ड्रायव्हरनं बाजूच्या गाडीला कट मारला, तशी गाडीतली सगळी डोकी हालली. आणि उभी ती सावळी सुंदरी अलगद पेप्रासगट त्याच्या बाहुपाशात आली आणि तिच्या हातातील बाटली त्याच्या डोक्यावर उपडी झाली. अख्खं गारेगार!
‘बयाऽऽ, ह्या मुडद्याला कुणी स्टेरिंगवर बशिवलं कुणाला माहीत? बाई पोर वल्लं झालं गंऽ! ‘ म्हातारीचं वटवट करताना लक्ष दोघांकडं आलं तशे दोघं सावध झाले आणि सावरून बसले. त्यानं फाटलेला आणि ओला झालेला पेपर बाजूला घडी मारून ठेवला. आता नजर थेट तिच्यावर खिळली. कानात नाजूक दागिना. गळ्यात सोन्याची चैन, चाफेकळीसारखं नाक. केस अर्धवट सैल, मोकळे. चेहरा गोल आणि…
‘तुला लागलं नाही ना पोरा?’ म्हातारीनं काळजीकाट्यानं विचारलं. हात लांबवून पदरानं त्याचं तोंड पुसलं! त्याला त्याच्याच आज्जीची आठवण झाली! ह्या म्हातार्या फटकळ राहत्या, पण मयाबी लै करित्या! ‘सॉरी!’ ती सुंदरी हळूच बारीक आवाजात बोलली.
‘नाही काही आज्जी!’ त्यानं सहज उत्तर दिलं पण आज्जीला! अर्थात काळजात लागलेला इश्काचा बाण दाखवणार कसा?
‘तुला नाही ना गं लागलं?’ म्हातारीनं नातीला निरखलं! अन् पुढं परत लक्ष त्याच्यावर वळवलं! ‘कुठला रे तू?’ म्हातारीनं आताशी ओळख काढायला सुरुवात केली.
‘त्याच गावचा!’ त्यानं मागल्या गावाकडं हात करत दिशा दाखवली!
‘लग्न झालंय का?’ म्हातारीनं पुढला सवाल टाकला.
‘नाही अजून!’ त्यानं काहीसं नव्या नवरीवानी लाजत, एकवार त्या सावळ्या बाहुलीकडं बघत शेजारच्या घरात स्थळ बघायला आलेल्याला उत्तर द्यावा तसं आज्जीला उत्तर दिलं.
‘आता पोरी मिळत्या कुठं? त्यांयला पार भाव आले. घर पाहिजे, जमिनी पाहिजे, नोकरी पाहिजे, पोरगं एकटंच पाहिजे. सासू-सासर्याचा जाच नको. नंदाचा तरास नको! एक भानगडी राहत्या का? मी तर हिच्या आईबापाला सरळ सांगितलंय! पोर हातावरलं असलं तरी चालंल पण जोड भारी असावा! कष्ट केले का मिळतोच ना पैसा? माणसानं कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक असावा!’ म्हातारीनं थोडक्यात नात बिनलग्नाची पण लग्नाळू आहे, हे स्पष्ट केलं!
‘मग कशी पोरगी पाहिजे तुला?’ म्हातारीनं राहवून पुढला प्रश्न केला. त्याला प्रश्न पडला, सांगावं का? तुमच्या नातीसारखी चालेल, म्हणून?
‘फार अपेक्षा नाहीत आज्जी! आईवडील ठरवतील तशी बघू!’ त्यानं संस्कारी उत्तर दिलं.
‘बया गुणाचं पोर आहे गं! हातात पेपर पाहिल्यावरच पोराचं वळण कळतं! नाहीतर आताची बेणी हातात मोबाईल, तोंडात गुटखा!’ म्हातारी बोलायला लागली! म्हणजे आज्जीची पसंती आहे तर… पण ती?
‘तुम्ही?’ त्याला काही विचारावा वाटलं.
‘हे पलीकडल्या वाडीचे! हिच्या आईबापाकडं हिला सोडायला आणि चारदोन दिस राहायला चालले.’ म्हातारीनं माहिती दिली. वाडीचे म्हणजे कुठली जात आहे यांची? तिथं सगळीच भेसळ आहे ना? त्यानं डोकं खाजवलं.
‘नाव काय्ये पोरा तुझं?’ म्हातारी अदमास घ्यायला लागली. बहुतेक तिलाबी जात शोधायची असंल!
‘शिरीष!’ त्यानं चलाखी केली.
म्हातारी काही बोलणार तोच एकाएक ब्रेक दाबले गेले. गाडी थांबली. कुठलं गाव आहे हे? त्याची पाठ खिडकीकडं! बघायला सोय नाही. काही जण उतरले. एक बाई माणूस बसले. पुढलं तीनचं शीट रिकामं झालं तिथं! बस ढळली.
‘ओ, वन्संऽ तुम्ही ये काऽऽ? या की इकडं?’ त्या बाईनं बस निरखताना म्हातारी शोधली.
‘बया, कव्हाशी चढल्या तुम्ही?’ म्हातारी लई दिसानं भेटलेल्या पाहुण्याबाईच्या शीटवर तरातरा चालत जाऊन बसली. आता हे डबलचं शीट मोकळं दोघांसाठी! आज्जी उठल्या उठल्या नात थोडी बाजूला सरकली.
‘तुझं नाव काय आहे?’ त्यानं तिला थेट प्रश्न केला.
‘स्वरा!’ काय मंजुळ आवाज आहे तिचा! त्याला तिची भुरळ पडली!
‘तू काय करतो?’ तिनं औपचारिकता पूर्ण केली.
‘सध्या इकडं नाशिकला कंपनीत जॉबला होतो, आता इंटरव्ह्यूसाठी पुण्याला चाललोय! तू?’ त्याला तिच्याविषयी जाणून घ्यायचंय!
‘अय पोरी! ती पिशी दे इकडं!’ म्हातारीनं मधीच आवाज दिला. तशी नात पिशवी घेऊन म्हातारीकडं! म्हातारीनं परत लाडू काढले. पाहुण्या बाईला आणि माणसाला दिले. दोन नातीकडं दिले. नात लाडू हातात घेऊन आली. एक त्याच्याकडं दिला. एक स्वतः घेतला.
‘तू काय करतेस? सांगितलं नाही?’ त्यानं लाडू खाता खाता खोद घालून प्रश्न विचारला.
‘जॉब शोधतेय. पूर्वी फायनान्स कंपनीत केलंय काम! पण ते लांब होतं थोडं!’ तिनं सांगितलं खरं, पण तिचं लक्ष त्या बाईपाशी बसलेल्या आज्जीच्या बोलण्याकडं लागलेलं. काय बोलत असतील त्या?
‘आमच्या इथं बँकेत जागा निघणार आहेत. करशील काम? अकाउंटिंग मला जमत नाही. नाहीतर मी माझ्यासाठीच डोकं लावलं असतं. ‘ त्यानं तिला ऑफर दिली आणि मजबुरी सांगितली.
‘तुझा नंबर देतो का? मी घरी गेल्यावर करीन फोन!’ तिनं थेट नंबर मागितला. आयला! ह्या जिंदगीत कुठल्या तरी पोरीनं नंबर मागितला! हे काय कमी आहे? त्यानं पेपरचा तुकडा फाडून त्यावर नंबर लिहिला आणि तिला दिला. पण तिचा? हे विचारायचं भान त्याला आहे कुठं?
‘अय पोरी! बाया-बाया बसा तिथं! मी बसतो इकडं!’ तो पाहुणा माणूस उठून दोघांजवळ आला. आता? अरे तिच्याशी बोलायचं आहे रे! त्याचा जीव खालीवर झाला. ‘ये नको ना जाऊ!’ असं बोलावं का तिला? पण ती लागलीच उठून आज्जीजवळ जाऊन बसली. आणि तो गुटखा खाल्लेला माणूस त्याच्याजवळ बसला. शर्ट पॅन्ट, लाल-काळे केस. थोडासा गोरटेला असा तो माणूस!
‘ही पोर माझ्या आतेभावाच्या मुलासाठी पाहतोय आम्ही! सगळं जमलं तर यंदा उन्हाळ्यात बार उडवून देऊ! तुमची काय ओळख?’ त्यानं आज्जी-नातीकडे बोट दाखवत माहिती देत संबंध विचारला. म्हणजे ही पोरगी? लग्न ठरतंय की काय..?
‘नाही. पहिल्यांदा बघतोय मी त्यांना!’ त्यानं स्पष्ट सांगितलं.
‘रंगाबाबाचे कोण तुम्ही?’ त्या माणसानं एक नाव थेट घेतलं. तसा शिरीष चमकला.
‘आजोबा होते माझे!’ त्यानं उत्तर दिलं.
‘तुमच्या जातीत आणि त्या गावात तोच भलामाणूस! आम्ही दुसर्या जातीचे असूनबी त्या माणसानं अंतर नाही दिला, माझ्या बापाला! तुकाबाबाला!’ त्या माणसाच्या बोलण्यानं अख्खं कोडं उलगडलं. त्या पोरीची जात कळली. तो माणूस कोण आहे ते कळालं. त्या पोरीचं स्थळ कळालं. आता रे? त्याचं डोकं भणभणलं! आयुष्यात काही नीट बघावा आणि ते हातून जावा, हे नेहमीचं.
‘खिडकीत बसू देतो का? हे थुकायला बरं पडलं!’ त्या माणसानं शिरीषला विचारलं तसा तो उठला, हिसक्यानं
बॅग ओढली. धागा तुटला. आणि तो मागल्या शीटवर जाऊन बसला. मोबाईल खिशातून काढून हेडफोन कानाला लावले. ‘जा बेवफा जा, तुझसे प्यार नहीं करना…’ अशी प्लेलिस्ट लावून ऐकत बसला.
पण डोक्यात तेच घोळतंय, ती फोन करेल का?

