५ ऑक्टोबर १९८० या तारखेच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावरील हे व्यंगचित्र. प्रâी प्रेस जर्नलचा काळ वगळता बाळासाहेबांनी नंतरच्या काळात, विशेषत: मार्मिकच्या मुखपृष्ठांवर कायम स्थानिक मुद्द्यांवरची व्यंगचित्रे काढली. वाचकवर्ग आणि शिवसेनेचा विचार पोहोचवण्याची गरज हे लक्षात घेऊन त्यांनी ही मर्यादा आखून घेतली असणार. पण, अधून मधून क्वचित कधी त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयांवर मुखपृष्ठचित्रे रेखाटली, ती पाहिली की त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती का होती, ते लक्षात येतं. इथे इराण इराक युद्धाशी संबंधित मुखपृष्ठ रेखाटताना त्यांनी युद्धाचा सगळा अर्थ, विध्वंस, व्यापकता हे सगळं फक्त दोन धडाडलेल्या तोफा आणि त्यांच्यातून तयार झालेले धुराचे लोट यांतून समर्पकपणे दाखवून दिलेलं आहे. तेव्हाची युनो म्हणजे संयुक्त राष्ट्र संघ ही आजची यूएन म्हणजे संयुक्त राष्ट्रे ही संघटना दुसर्या महायुद्धानंतर राष्ट्रांमधील संघर्षांवर आंतरराष्ट्रीय वचक ठेवण्याच्या हेतूने स्थापन झाली होती. पण ती कायमच अमेरिकेच्या ताटाखालचं मांजर बनून राहिली आणि त्या देशाच्या दंडेलीकडे तिने कायम दुर्लक्ष केलं. त्यामुळेच इतर देशही तिला जुमानत नव्हते. इथे इराण-इराक युद्धामध्ये घाबरून तोफेला बिलगलेल्या युनोचं अफाट व्यक्तिरेखाटन बाळासाहेबांनी केलेलं आहे. तिचं सगळीकडे खुपसलं जाणारं लांब नाक विशेष लक्षणीय. आज अमेरिकेने व्हेनेझुएलाची राजवट बदलून देशच ताब्यात घेतला, इराणवर हल्ला चढवला, पण कुठूनही संयुक्त राष्ट्रे काय करतायत असा प्रश्नही आला नाही, इतकी ही संघटना आज निष्प्रभ झालेली आहे.

