• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘अझुरी’ एक कहाणी!

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
April 14, 2026
in खेळियाड
0
‘अझुरी’ एक कहाणी!

सलग तिसर्‍या फिफा विश्वचषकात इटलीला पात्रतेचा अडथळा ओलांडण्यात अपयश आलं. वैभवशाली फुटबॉल संस्कृतीचा इतिहास असलेल्या इटलीनं एकंदर चारदा विश्वविजेतेपदं जिंकलीत. अनेक दिग्गज या यशाचे शिलेदार. पण गेल्या काही वर्षांत इटलीच्या फुटबॉलचा दर्जा कमालीचा खालावला आहे… या शोकांतिकेची ही ‘अझुरी’ एक कहाणी…

 

इटली या देशाचं नाव दाक्षिणात्यांच्या इडली या पदार्थाशी साधर्म्य साधणारं. त्यामुळे बालपणी त्याची गंमत वाटायची. पुढे शालेय इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात दोन्ही महायुद्धं अभ्यासावी लागली, त्यात इटलीचं मोठेपण कळलं. रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता, ही आख्यायिकाही इटलीशीच संबंधित. कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी या इटलीच्याच आणि अर्धी चड्डी हा गणवेशही इटलीचाच. आलिशान गाड्या हीसुद्धा इटलीची ओळख. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटात ऐश्वर्या राय सलमान खानचं प्रेम मिळवण्यासाठी आपल्या पतीसोबत थेट इटली गाठते… पुढे काय होतं, ते सर्वश्रुतच आहे. आय, व्ही, एक्स… हे रोमन आकडेसुद्धा त्यांचे. इटालियन पदार्थ आणि हॉटेल्ससुद्धा नकळत भारतीय जनमानसात रुजली आहेत. तसाच रोमन साम्राज्याचा इतिहासही मोठा वैभवशाली.
इटलीची आणखी एक जागतिक ओळख होती, ती म्हणजे त्यांची वैभवशाली फुटबॉल संस्कृती. एकंदर चार ‘फिफा’ विश्वचषक त्यांच्या खात्यावर जमा आहेत. एकापेक्षा एक फुटबॉलपटू इथे घडले. पण यंदा हा देश चक्क विश्वचषकासाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरला आहे. शिवाय हे काही प्रथमच घडलेलं नाही, तर सलग तिसर्‍यांदा हे घडलंय. त्यामुळेच चिंताजनक. जसं भारतीय क्रिकेट संघाला ‘मेन इन ब्ल्यू’ म्हटलं जातं, तसंच इटलीचा फुटबॉल संघ ‘अझुरी’ नावानं ओळखला जातो. त्यांची फुटबॉल विश्वचषकातली कहाणी अलीकडे नेहमी अधुरी कशी राहते?

वैभवशाली इतिहास
फुटबॉलमधील एक तगडा आणि यशस्वी युरोपियन संघ म्हणून इटलीची ओळख होती. त्यांनी १९३४, १९३८, १९८२ आणि २००६ असा चार वेळा विश्वचषक उंचावलाय. एकंदर सहा वेळा त्यांनी अंतिम फेरी गाठण्याची किमया साधलीय. २२ पैकी १८ विश्वचषक स्पर्धांमध्ये ते सहभागी झाले. पण आताच्या लागोपाठ तीन आणि मागील शतकात १९५८मधल्या विश्वचषक स्पर्धेत ते पात्र ठरू शकले नव्हते. त्या स्पर्धेत उरूग्वे, स्पेन आणि बेल्जियमसुद्धा पात्र ठरू शकले नव्हते.

इटालियन फुटबॉलच्या यशात १९२९-३०मध्ये सुरू झालेल्या सेरी ए लीग स्पर्धेचा सिंहाचा वाटा आहे. त्या काळात युव्हेंट्स संघांचं वर्चस्व होतं. १९३०मध्ये इटलीच्या पहिल्या सुवर्णकाळाला प्रारंभ झाला आणि या दशकात ते महाशक्ती म्हणून उदयास आले. १९३४मध्ये व्हिटोरियो पोझ्झोच्या मार्गदर्शनाखाली यजमान इटलीनं चेकोस्लोव्हाकियाला २-१ असं नमवून जेतेपद पटकावलं. मग १९३८मध्ये हंगेरीला ४-२ असं हरवून ते टिकवलं. १९३६चं ऑलिम्पिक सुवर्णपदकही त्यांनीच कमावलं. ज्युसेप्पे मेआझा, सिल्विओ पिओला, अँजेलो स्कियावियो, रायमोंडो ऑर्सी आणि जिनो कोलाउस्सी हे त्या यशाचे शिलेदार. पण दुसर्‍या महायुद्धानंतर इटलीचा संघ झगडताना आढळला.

१९५०-६०च्या दशकात एसी मिलान आणि इंटर मिलान उदयास आले आणि इटलीचा संघ पुन्हा सावरला. १९६८मध्ये इटलीनं युरोपियन अजिंक्यपद जिंकण्याची किमया साधली. ‘गोल्डन बॉय’ जियानी रिवेरा, जियाचिंतो फाक्केट्टी, सांद्रो मॅझोला यांनी या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७०-८०च्या दशकात इटलीनं कॅटेनाचिओसारखी बचावात्मक शैली आत्मसात केली. या बळावर १९७८मध्ये चौथ्या क्रमांकावर त्यांनी मुसंडी मारली. पण १९८२ची स्पेनमधील विश्वचषक स्पर्धा इटलीसाठी यशदायी ठरली. इटलीकडून कोणालाही फारशा अपेक्षा नसताना या संघाने पश्चिम जर्मनीवर विजय मिळवत तिसरं विजेतेपद पटकावलं. पावलो रॉसी हा गोल्डन बूट आणि गोल्डन बॉलचा मानकरी ठरला. यावेळी गोलरक्षक आणि कर्णधार होता चाळीशीचा डिनो झॉफ. याच काळात युव्हेंटस आणि एसी मिलान संघ अधिक बळकट झाले. मार्को टार्डेली, ब्रुनो कॉन्टी, फ्रँको  बॅरेसी हे खेळाडू याच काळातले.

मग १९९०च्या विश्वचषकात त्यांनी तिसर्‍या क्रमांकावर मजल मारली. पुढे १९९४च्या विश्वचषकात रॉबर्टो बॅजिओच्या स्वप्नवत कामगिरीच्या बळावर इटलीनं अंतिम फेरी गाठली. पण ब्राझीलविरुद्धचा अंतिम सामना पेनल्टी शूटआऊटपर्यंत लांबला. तिथे बॅजिओचा शॉट बारच्या वर गेला आणि हातातोंडाशी आलेलं जेतेपद गमावलं. त्या हुकलेल्या संधीमुळे बॅजिओ देशभरात टीकेचा धनी ठरला. बचावकौशल्यात तरबेज पावलो मालदिनीनं १९८२ ते १९९४ हा काळ गाजवला. तसंच फॅबिओ कॅनावारो हा बचावपटू त्याची खेळण्याची शैली, नेतृत्व आणि समयसूचकता यासाठी ओळखला जातो. २००६मध्ये इटलीनं पेनल्टी शूटआऊटपर्यंत रंगलेल्या अंतिम सामन्यात फ्रान्सला नमवून जेतेपद काबीज केलं. हा तोच सामना ज्यात फ्रान्सच्या झिनेदीन झिदाननं इटलीच्या मार्को मातेराझीला डोक्यानं ढुशी मारली. मातेराझीनं डिवचल्यानं झिदाननं संतापाच्या भरात ही कृती केली आणि त्याला रेड कार्ड मिळालं. इटलीच्या या विश्वविजेतेपदाचं श्रेय कॅनावारोलाच जातं. अ‍ॅलेसँड्रो डेल पिएरो, अ‍ॅलेसँड्रो नेस्ता, जियानलुईजी बुफोन, फ्रान्सेस्को टॉटी, आंद्रेआ पिर्लो, जॉर्जिओ क्येलिनी, लिओनार्डो बोनुची हे तारे याच कालखंडात उदयास आले. हा त्यांचा दुसरा सुवर्णकाळ ठरला. पण २००६मध्ये कॅलसियोपोली घोटाळा उघडकीस आला. युव्हेंटससहित काही क्लब्सनी सामनाधिकार्‍यांच्या नियुक्तींवर प्रभाव टाकल्याचं समोर आलं. परिणामी युव्हेंटसवर कारवाई करून त्यांचे किताब काढून घेण्यात आले. या प्रकरणामुळे इटालियन फुटबॉलच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला. पण त्यातून सावरत २०१०नंतर युव्हेंटसनं २०१२ ते २०२०दरम्यान सलग नऊ सेरी ए जेतेपदं पटकावली.

नेमकं काय चुकतंय?
गेल्या दोन दशकांत इटलीसाठी एकच चांगलं घडलं, ते म्हणजे त्यांनी इंग्लंडला हरवून २०२०चं युरो जेतेपद जिंकलं. पण दुर्दैवानं आज इटलीच्या खेळाडू घडवणार्‍या कारखान्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉलपटू घडणं मंदावलंय, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे इटलीचा संघ संघर्ष करताना दिसतोय. सध्याच्या संघातील सर्वात महागडा खेळाडू म्हणजे मध्यरक्षक सँड्रो टोनाली, ज्याला २०२३मध्ये सुमारे आठ कोटी युरोमध्ये न्यूकॅसलनं विकत घेतलं. त्याच्याशिवाय एकमेव जागतिक दर्जाचा खेळाडू म्हणजे मँचेस्टर सिटीचा गोलरक्षक जियानलुईजी डोनारुम्मा. सध्याचे आक्रमक मातेओ रेटेगुई आणि मोईसे केन हे मूळचे अर्जेंटिनामध्ये जन्मलेले आहेत.

१९८० ते १९९०च्या दशकात सेरी ए लीग जगात सर्वोत्तम मानली जायची. दिएगो मॅराडोना, मार्को व्हॅन बास्टेन आणि रुइड गुलिटसारख्या दिग्गजांनी ती गाजवली. पण आज या लीगचं महत्त्व खालावलंय. चाळीशीचा लुका मॉड्रिच आणि ३९ वर्षीय जेमी वार्डी सारखे वयस्क खेळाडू सेरी ए या स्पर्धेत खेळतात. तसंच येथे क्रीडात्मक स्थित्यंतरही दिसून येतंय. इटलीच्या यानिक सिनरच्या यशामुळे फुटबॉलला एकीकडे ओहोटी लागली असताना टेनिस लोकप्रिय होऊ लागलंय. तसंच फॉर्म्युला-वनमध्ये १९ वर्षीय किमी अँटोनेली यश मिळवू लागल्यानं तीही लाट आलीय. इटलीचा संघ यावर्षी झालेल्या ट्वेंटी-२० विश्वचषकासही पात्र ठरला होता. हा क्रिकेटज्वरही तिथे पसरतोय. इटलीतील बड्या क्लब्सपैकी सध्या फक्त युव्हेंटसकडेच आधुनिक स्टेडियम आहे. रोमा, लॅझियो, एसी मिलान, इंटर मिलान, किवो व्हेरोना, हेलास व्हेरोना अशा अन्य क्लबकडे स्वतःची स्टेडियम नसल्यामुळे त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. परदेशातील श्रीमंत क्लब्सशी स्पर्धा करणं त्यांना कठीण जातं. याचा परिणाम सेरी ए आणि राष्ट्रीय संघाच्या कामगिरीवरही होतोय. तसंच मोठ्या कंपन्या आधुनिक सुविधा आणि महसूल रचनेमुळे इटलीपेक्षा इंग्लंड आणि स्पेनला प्राधान्य देतात.

शोकांतिका

तूर्तास विश्वचषकातून झालेल्या ताज्या गच्छंतीचे तीव्र पडसाद देशभरात उमटलेत. व्यवस्थापनानं इटलीच्या फुटबॉल संघानं मुख्य प्रशिक्षक लुसियानो स्पॅलेटीची हकालपट्टी केलीय. पण सध्या रॉबर्टो बॅजिओनं तयार केलेला ‘रिन्यू द फ्युचर’ नावाचा सुमारे ९०० पानांचा व्यापक आराखडा चर्चेत आहे. इटालियन फुटबॉलची मुळापासून पुनर्बांधणी करण्यासाठी तो तयार करण्यात आला होता. या प्रस्तावात ५० तज्ज्ञांच्या सहभागातून संरचनात्मक, तांत्रिक आणि प्रशिक्षणात्मक सुधारणांचा सविस्तर आराखडा मांडण्यात आलाय. इतक्या व्यापक योजनेनंतरही हा प्रस्ताव कधीच अमलात आणला गेला नाही, हीच इटालियन फुटबॉलची शोकांतिका आहे.

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.