
विसाव्या शतकाच्या विसाव्या दशकाच्या शेवटी हिंदवी नीळकण्ठीझम या विषयावर प्रबोधनकारांनी व्याख्याने दिली. पुढे रशियन कम्युनिझमची भीती दाखवणार्यांना उत्तर म्हणून त्यांनी प्रबोधनमध्ये दोन लेख लिहिले आहेत. हा नीठकण्ठीझमने अशा अनेक विचारधारा पचवल्यात असा दावा त्यात केलाय. त्यातून त्यांना भारतीय मानसिकता किती नीट उमगली होती याचं प्रत्यंतर या लेखातून येतं.
प्रबोधनकारांनी हिंदवी नीळकण्ठीझमची सार्वजनिक गणेशोत्सवातल्या व्याख्यानांतून सूत्ररूपाने केलेली मांडणी आपण वाचली. प्रबोधनच्या पाचव्या वर्षाच्या शेवटच्या अंकातल्या हिन्दवी नीळकण्ठीझम आणि रशियन बोलशेविझम या लेखात त्यांनी भारतीय संस्कृतीची एका अर्थाने थोरवी गायलीय. म्हणजे हजारो वर्षांत कम्युनिझमसारखे शेकडो नवे विचार आले, पण भारतीय संस्कृतीने त्यातल्या चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला, त्यातलं फोलकट फेकून दिलं आणि ती पुढे जात राहिली. त्यातून हिंदू संस्कृतीविषयी त्यांची गौरवाची भावना दिसली. आक्रमणांमुळे हिंदू खतरे में आल्याच्या पारंपरिक मांडणीपेक्षा हा इझम वेगळा होता. त्यात भीती नव्हती, तर प्रचंड आत्मविश्वास होता. मात्र याच लेखाच्या दुसर्या भागात प्रबोधनकार याच नीळकण्ठीझमचा दुसरा चेहराही दाखवतात. प्रबोधनच्या सहाव्या वर्षांच्या दुसर्या अंकात हा लेख आलाय. या लेखाच्या शेवटी प्रबोधनकारांनी पुढे चालू असं लिहिलं आहे. पण यानंतर लवकरच प्रबोधन बंद पडल्यामुळे हा पुढचा भाग काही आला नाही. तो आला असता, तर कदाचित या विचाराचे आणखी पैलू आपल्याला वाचता आले असते. मूळ लेख बराच मोठा आहे. त्यातील महत्त्वाचा भाग प्रबोधनकारांच्याच शब्दात पुढे वाचता येईल.
पौराणिक सागरमंथनाने चवदा रत्ने निर्माण केली त्याच वेळी हिन्दुस्थानच्या पिण्डप्रकृतीच्या चिन्हाचेहि चित्र रेखाटले गेले. लक्ष्मी कौस्तुभ पारिजातकाच्या बरोबरच जेव्हा हलाहल विष निघाले, तेव्हा ते सार्या त्रिभुवनाला जाळू लागले. सध्या रशियन कम्युनिझममुळे पाश्चात्य देवदैत्यांची जशी दाणादाण उडाली आहे, तसा स्वर्ग मृत्यू पाताळात एकच हाहाकार उडाला. त्या भयंकर विषाला ठेवावे तरी कोठे आणि नष्ट तरी करावे कसे, असा बिकट पेच देव दैत्य घुसळ्यानाच पडला. कारण हलाहल विष हे त्यांच्याच मंथन कर्माचे फळ होते. आता काय करावे? सारे विश्व हवालदिल झाले. जिकडे तिकडे आगीआग जाळपोळ रडारड मरामर मातली. कोणाचा काहीच उपाय चालेना. अशा प्राणान्तिक काळघटकेला ‘व्याघ्रांबर फणिवर धर` श्रीशंकरजी पुढे सरसावले. त्यांनी तो हलाहल विषाचा पेला पटकन् उचलून चटकन् पिऊन फस्त केला. त्रिभुवनावर ओढवलेले काळसंकट विरूपाक्षाने डोळ्याच्या एकाच उघडझापणीत कायमचे नष्ट केले.
पण किती झाले तरी हलाहल विषच ते! ते आपला पराक्रम दाखविल्याशिवाय थोडेच राहणार? ते शंकरजीचा कण्ठ चरचर चरचर जाळीत त्यांच्या उदरात गेले. त्यामुळे महादेवाचा कण्ठ निळा पडला. तेव्हापासून नीळकण्ठ हे पुराणप्रसिद्ध नाव त्याना मिळाले. श्रीशंकराची ही नीळकण्ठी उर्फ शेकडो हलाहल विषासारख्या देशी परदेशी कम्युनिष्ट बोलशेव्हिकी क्रान्त्या आमूलाग्र पचनी पाडण्याची पुराणप्रसिद्ध पिण्डप्रकृति हेच आमचे हिन्दवी नीळकण्ठीझम होय. या नीळकण्ठीझम पुढे आजपर्यंत कोणाची मात्रा चालली नाही आणि पुढे चालणारहि नाही. प्रत्येक कम्युनिझममधले चांगले तत्व आत्मसात् करून, बाकीचा चोथा फेकून द्यायचा, या नीलकण्ठीझममध्येच हिन्दूंच्या टिकावाचे मर्म आहे.
बौद्धधर्माने अहिंसावाद पुकारताच त्यातले अहिंसा परमो धर्मः तत्व तेवढे नीळकण्ठीने पत्करले आणि बाकीचा सगळा लगदा दिला भिरकावून दूर! विद्यमान क्रिस्ती संस्कृतीच्या कम्युनिझमला सुद्धा या नीळकाठीने आरपार पचनी पाडलेच आहे. मुंबई कलकत्ता मद्राससारख्या शहरातले हिन्दी लोक नखशिखांत हॅट पाटलोण अंग्रेज बनलेले दिसले तरी हिन्दूची पंचा पत्रावळ पातळ भाजी आणि मुसलमानांचा पायजमा पाव पुलावा कायमच्या कायम. अनेक क्रांत्यांची हलाहल विषे प्राशन केल्यामुळे हिन्दुस्थानरूपी श्रीशंकराचा नाजूक कण्ठ ठिकठिकाणी भाजून करपून निळासावळा पडलेला असला, तरी तो नीळकण्ठ सध्या जगात चाललेल्या सागरमंथनाकडे ‘कुछ पर्वा नहीं’ दृष्टीनेच पहात स्वस्थ बसला आहे. सारांश, इंग्लंण्डचा बुलडॉग, जर्मनीचा गरुड, रशियाचा अस्वल, त्याप्रमाणे हिन्दुस्थानचा नीलकण्ठ शंकर ही राष्ट्रीय पिण्डप्रकृति-दर्शक निशाणी आहे, हिन्दुस्थानात सर्व देवांपेक्षा शंकराची देवळे व शंकराचे उपासक काश्मिर ते रामेश्वर मुबलक का सापडतात, याचेहि मर्म या नीळकण्ठीझम मध्येच आहे.
हिन्दुस्थानची नीळकण्ठी प्रकृती दिव्यांबरी आणि दिगंबरी अशी संमिश्र असल्यामुळे अमूक एकादी एकरंगी एकजिनशी आणि एकडोळी संस्कृति अथवा प्रवृत्ति तिच्यावर मात करील, हे शक्यच नाही. पूर्वी असे कधी घडले नाही आणि पुढे कधी घडणे शक्य नाही. परसंस्कृतीची गोष्ट कशाला? स्वसंस्कृतीच्या क्षेत्रात एखादी बारीकशी सामाजिक किंवा धार्मिक उत्क्रान्ति घडविण्याचे प्रयत्न हाणून पाडण्याच्या कामी पिशाच्चांचा वेताळी नंगा नाच घालताना नीळकण्ठी हिन्दु पागलपणाची परासीमा कशी गाठतात, हे नुकत्याच झडलेल्या शारदा बिलाच्या शिमग्याने चांगलेच सिद्ध केले आहे.
जन्माने पारशी पण मनाने हिन्दु अशा समाजसुधारक प.वा. मलबारी शेटजीने याच नीळकण्ठीझमची अनुभवसिद्ध विवंचना `Today the boldest Hindu Reformer admits that to attempt practical reform in his individual capacity is like cutting his own throat and courting the destruction of his innocent family. या उद्गारांनी व्यक्त करून ठेवलेली आहे. या उद्गारांचा भावार्थ असा कीं, कोणी कितीहि धाडशी हिन्दु सुधारक असो, त्याने आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर कोणतीहि सुधारणा घडवून आणणे म्हणजे आपल्या स्वतःचा गळा कापून घेऊन, आपल्या विनापराधी कुटुंबाचा सत्यानाश करून घेण्यासारखेच आहे, हे त्याला कबूल करणेच भाग आहे.
हिन्दुस्थानाची ही नीळकण्ठी प्रवृत्ति म्हणजे इंग्लण्डचे ‘कॉनझर्वेटिझम’ (संकुचित मनोवृत्ति) नव्हे. कॉन्झर्वेटिझम विरोधाला किंवा दडपणाला माघार घेण्याइतके थोडे ठिसूळ आणि लवचिक तरी असते; पण हिन्दवी नीळकण्ठीझम कट्टर ताठर असून, जन्मसिद्ध सरडेशाहीने विरोधाला किंवा दडपणाला अनेकरंगी भुलभुलावणीने फसवून आंग चुकविते आणि पुन्हा वेळ येताच मूळ ताठरपणातच प्रगट होते. नीळकण्ठीझमला ‘ऑर्थोडॉक्सी’ (जीर्णमतवाद) हेहि नाव देता यायचे नाही. कारण जीर्णमतवाद काळाच्या कठोर दणक्यात हळू हळू का होईना पण नवमतवादाची कात पांघरतो. पण नीळकण्ठीझम ती कात पांघरूनहि आपल्या मूळ स्वभावाचा शांकरी पाशवीपणा सोडीत नाही. गेल्या ३० वर्षांचा नुसता महाराष्ट्राचा सामाजिक धार्मिक इतिहास पाहिला तरी पूर्वीची शेकडो जीर्ण मते आज बरीच बोथटून नव्या मताच्या पाण्याने धारदार बनलेली आढळतात. परंतु त्यातलीहि नीळकण्ठीझमची नांगी कमी पडलेली नाही. वैâलासातल्या ऐश्वर्यात शंकर कितीहि रंगला तरी त्याची मसणवटीची नीळकण्ठी राहणी त्याला सुटता सुटत नाही. कोणत्याहि क्षेत्रातल्या दोषांबद्दल पूर्ण खात्री पटली तरी त्या दोषांचे विध्वंस करण्याच्या कामी हिन्दु प्रवृत्ति नेहमी मनाचा नाठाळपणा कां व्यक्त करते, याचे गूढ येथेच आहे. सामाजिक सुधारणेच्या तळमळीने विधवा पुनर्विवाहाचा प्रश्न जोराने प्रतिपादणार्या प.वा. जस्टिस रानड्यांवर द्वितीय विवाहाचा प्रसंग येताच, विधवेच्या ऐवजी त्यानी कुमारिकेचे पाणिग्रहण करणे; आणि सगळे वेद वेदान्त ज्योतिष गीता आरपार पचविणार्या प.वा. टिळकांनी, केवळ लोकमताच्या भिक्षुकी बुजगावण्याला भिऊन, परदेशगमनाच्या पापासाठी गोमुत्री प्रायश्चित्त घेणे, या आचारविचाराच्या विलक्षण व्यभिचारात ही नीळकण्ठी मेखच प्रधान आहे. समजते उमजते पण प्रसंग पडला की पहिले पाढे पढ पंचावन!
दोष किंवा अन्याय आढळताच त्याचा निःपात करण्याची खुनशी वृत्तीच जेथे ठार मेलेली, तेथे हवा तो अन्याय निमूटपणे सहन करण्यात हिन्दी लोक परमहंसासारखे निर्बुद्ध आणि निर्भाव कां? या प्रश्नातच त्याचे उत्तर आहे. असल्या वृत्तीच्या लोकांबर रशियन बोलशेविझम ऊर्फ कम्युनिझम परिणाम करील, किंवा करीत आहे, असे मानून चालणारे लोक एकतर स्वतःच मोठे लफंगे कारस्थानी असले पाहिजेत, अथवा बिन मेन्दूचे कवटीधारक असले पाहिजेत. कम्युनिझमला विश्वकुटुंबवाद असे नाव एका हिन्दी पण्डिताने दिले आहे. इतकेच नव्हे, तर या विश्वकुटुम्बवादाने रशियन समाजाच्या झालेल्या अलौकिक आत्मविकासाची (खरी खोटी) आकर्षक चित्रेहि दाखविण्यात येतात. गुलामगिरीने गांजलेल्या आणि परिस्थितीने नडलेल्या काही हिन्दी लोकांच्या मनावर त्यांच्या आकर्षणाचा थोडाफार परिणामहि होतो. मनावर परिणाम होऊन कल्पनासृष्टीत स्वर्गलोकाची उभारणी झाली, म्हणून स्वर्ग थोडाच हाती येत असतो?
हिन्दवी नीळकण्ठीझमची भरारी केवळ विश्वकुटुम्बवादाच्याहि पलीकडे जाऊन, तिने विश्वात्मैक्य भावाचा गौरीशंकर काबीज केल्याला हजारो वर्षे लोटली. हिन्दूंचे औपनिषदिक तत्वज्ञान रशियाच्या कम्युनिष्टी विचारक्रान्तीच्या पुढे केव्हाच जाऊन बसले आहे. विश्वत्मैक्य वादापुढे विश्वकुटुंबवाद म्हणजे ऐरावतापुढे तटाणीचा नाच होय. पण उपयोग काय? तत्वज्ञानाच्या भरारीने आकाशाला गवसणी घातली, तरी प्रत्यक्ष व्यवहारात नीळकण्ठीझमची कुरघोडी कायम ती कायमच! सर्वाभूत परमेश्वर मानणारे हिन्दु कुत्र्या मांजरांचे मुके घेतात, अन्यधर्मियाना सुद्धा बुटासह देवळातल्या गाभार्यात थेट देवमूर्तीपर्यंत नेऊन भिडवितात, भूतदयेच्या उत्कट उसळीने मरतुकड्या गाईचे गोरक्षण करतात, लूत लागून सडलेल्या कुतरड्यांसाठी पांजरपोळ पोसतात; पण हिन्दु धर्माभिमानी अस्पृश्य मनुष्य देवळाच्या पायरीवर चढला तर यांच्या देवाची आणि धर्माची मान कटकन् मणक्यापाशी मोडते! ‘पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्राः’च्या उद्धाराचा महामंत्र सांगणार्या गीतेचे रहस्य प्रचण्ड बुद्धीने संशोधन करणार्या प.वा. टिळकांचा हात अस्पृश्यता- विध्वंसनाच्या जाहीरनाम्यावर सही करताना नेमका आखडला.
कम्युनिझम म्हणे समतेची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अवतरले आहे. स्तुत्य. आणि सार्या जगात हा समतेचा सन्देश सक्रीय दृढमूल करण्याचा बोलशेविकांचा हेतू आहे. अभिनन्दनीय. आज हिन्दुस्थानालाहि समतेचीच फार जरूर आहे. पण हा समतेचा महामंत्र शिकण्यासाठी त्याला रशियन उपटशुंभाचाच गुरूगण्डा मनगटावर चढवून घेण्याची जरूरी नाही. ज्या हिन्दु धर्माने विश्वात्म्यैक्यवादाचा त्रिभुवननिनादित डंका पिटला, त्याला काय समतेचीच जाणीव नेमकी नव्हती? सगळ्या उपनिषदाना घुसळून श्रीकृष्णाने जे गीता-नवनीत काढले, त्याचा मुख्य पाया तर ‘समत्वम् योगमुच्यते’ यावरच. आजचा बोलशेविकांचा कम्युनिष्टी समाज समता-बाद म्हणजे गीतेच्या समत्वयोगाची उष्टी नक्कलच म्हटल्यास काही हरकत नाही. रशियन बोलशेबिझम् सार्या जगातल्या इम्पिरियालिझम् (झब्बूशाही) विरुद्ध टक्कर देण्यासाठी मस्तकांच्या कवट्याना कणखर बनवीत आहे; गीतेचाहि प्रकार थेट तोच. कौरवांच्या इम्पिरिअलिस्टिक सत्ताबाजीला नेस्तनाबूत करून अखिल जगात समतेचा योग प्रस्थापन करण्यासाठीच, अर्जुनाला गीतोपदेश करून, युद्धाला प्रवृत्त केले. केवळ समत्व योगाच्या प्रसारासाठी श्रीकृष्णाने केलेल्या आटारेट्याचे प्रचण्ड महाभारत बनले. यावरून श्रीकृष्ण हाच पहिला मोठा कम्युनिष्ट कसा नव्हे? समाज समतेसाठी श्रमणारी मण्डळी आणि त्यांचे प्रयत्न जर कम्युनिष्टी म्हणजे निंद्य मानायचे, तर हिन्दुस्थानातली सगळी संतसेना आणि सुधारक लोक रक्तपित्याइतकेच त्याज्य समजून फाशी द्यावे लागतील. समाज-समतेच्या आटारेट्यासाठी हिन्दु तत्वज्ञानाने इतके जंगजंग पछाडले आहेत, कीं त्यांपुढे बोलशेविकांची धडपड आणि बटवट दर्यामे खसखसच ठरेल. पण इतके होऊनहि हिन्दुस्थान आणि हिन्दु समाज म्हणजे विषमतेचा उकीरडा कायम तो कायमच. समत्व योगाची तुतारी फुंकणार्या श्रीकृष्णालाच जेथे जन्मप्राप्त चातुर्वण्याची नीळकण्ठी भोवली, तेथे भागवतधर्माच्या जोरावर अखिल हिन्दवी समाज भेदातीत करण्याचे हिन्दु मुसलमान सन्तांचे प्रयत्न वांझोटे का न ठरावे?
चार वर्णांच्या चार लाख जाती सहज लीलने प्रसविणार्या नीळकण्ठीझमचा पराक्रम नीट विचारात घेतला की, कम्युनिझमचा धौशा म्हणजे वाहत्या वार्याची एक लाट किंवा धावत्या काळाचा धावरा देखावा, यापेक्षा त्याची विशेष दाखल करण्याचे काहीच कारण नाही. हिन्दवी नीळकण्ठीझमने मुके आंधळे पांगळे आणि थोटे बनवून ठेवलेल्या दुर्बळाना रशिया कसले मोठे साह्य करणार?

