ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांच्या आकस्मिक निधनामुळे महाराष्ट्राने नेमकं काय गमावलं? कोणी म्हणेल, अव्वल अभिनेता, नटसम्राट गमावला. पण त्या अभिधानाला पात्र असलेले अनेक अभिनेते होते आणि आहेत. कोणी म्हणेल, मराठीचा डंका हिंदीत वाजवणारा स्टार गेला. ते खरंच आहे, पण तेवढ्याच उंचीचं स्टारडम अमोल पालेकरांनीही मिळवलं होतंच. कोणी म्हणेल, राजकीय समज आणि समाजभान असलेला, समाजासाठी कळवळणारा, काम करणारा, परखड बोलणारा एक कलावंत गेला. हेही खरं आहे, पण आपापल्या पातळीवर सामाजिक भान जपणारे आणि अनेकदा नानांपेक्षा परखड भूमिका घेणारे अनेक कलावंत आसपास आहेतच…
नानांच्या जाण्याने महाराष्ट्राने नेमकं काय गमावलं हे तपासायचं असेल, तर त्यांचे नाटक-सिनेमातले सहकारी, प्रसारमाध्यमांच्या जगतातले नानांचे मित्र, विविध पक्षांमधले राजकारणी, निव्वळ प्रेक्षक म्हणूनच नानांकडे पाहणारे चाहते किंवा त्यांच्या नाम फाऊंडेशनच्या कार्याचे लाभार्थी शेतकरी यांच्या प्रतिक्रिया पाहून चालणार नाही. नानांशी याच्यापलीकडचं नातं असलेला एक वर्ग आहे, तो एक अभिनेता, एक कार्यकर्ता, एक सेलिब्रिटी हरपला म्हणून हळहळत नव्हता… जो बोट पकडून आयुष्याची वाटचाल कशी करायची याचं, प्रसंगी अतिसुलभ किंवा अतिभाबडं वाटणारं मार्गदर्शन करत होता, असा ‘आपला माणूस’ या वर्गाने गमावला आहे नानांच्या जाण्याने. महाराष्ट्राच्या सामाजिक भावजीवनात नानांच्या जाण्याने निर्माण होणारी ही सर्वात मोठी पोकळी असेल. ती सहज भरून निघणारी नाही.
हिंदी सिनेमाला पहिल्यापासून लाभलं ते ग्लॅमर मराठी सिनेमाला कधीच लाभलं नाही, तो महाराष्ट्राचा पिंडही नाही. त्यामुळे, अप्राप्य तार्यासारखे चमचमणारे सितारे मराठीत पाहायला मिळत नाहीत. त्या अर्थाने महाराष्ट्रात कोणी सुपरस्टार नव्हता. मात्र, दक्षिणेत एमजी रामचंद्रन, एनटी रामाराव यांच्यापासून रजनीकांत, कमल हासन, चिरंजीवी, डॉ. राजकुमार आणि अगदी अलीकडचा जोसेफ विजय हे जसे त्या त्या राज्याच्या मातीत रुजलेले सुपरस्टार आहेत, त्या अर्थाने महाराष्ट्राने पाहिलेला एकमेव सुपरस्टार म्हणजे नाना पाटेकर. दक्षिणेतले सुपरस्टार जनतेशी जोडलेले असतात, जनता त्यांच्यात आपलं प्रतिबिंब पाहते. ते प्रसंगी जनतेला फटकारतात, जनता एका दिशेने जात असताना विरोधी दिशेला बोट दाखवतात, त्यातून जनतेचा रोषही पत्करतात, पण त्यांच्याविषयी त्या राज्याच्या लोकांच्या मनात एक प्रेम, एक माया असते- तशा प्रकारचं महाराष्ट्राचं इतक्या मोठ्या तीव्रतेचं लव्ह-हेट नातं दुसर्या कोणाही अभिनेत्याशी जुळलं नाही.
नानांनी हिंदी सिनेमात मराठीचा झेंडा, शिवसेनाप्रमुखांच्या भाषेत, कडवटपणे रोवला. संपूर्ण मराठी बाण्यासकट ते हिंदीत झोकात वावरले आणि त्यांनी मराठी माणसाचा दबदबा काय असतो ते दाखवून दिलं. हा दबदबा फक्त व्यावसायिक नव्हता. सिनेमाचं जग हे धंद्याचं जग आहे, ज्याची चलती असेल, त्याच्यासमोर सगळेच झुकतात. पण, मराठीतला सुपरस्टारही हिंदीत नायकाचा मित्र किंवा नोकर दाखवण्याची हिंदीची वृत्ती आहे. नानांनी मुंबईमध्ये व्यवसाय करताना मराठी माणसाला गृहीत धरायचं नाही, मुंबई तुमची भांडी घासा आमची अशा तुच्छतेने वागवायचं नाही, मराठी माणूस तडकला की वाट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची एक आक्रमक ओळख हिंदीत निर्माण केली. त्याचा प्रचंड मोठा फायदा त्यांच्या मागोमाग हिंदीत गेलेल्या मराठी कलावंतांना झाला, हे त्यांचं योगदान अनेकदा लक्षात घेतलं जात नाही.
नाना ज्या काळात हिंदीतले सुपरस्टार होते, त्या काळात त्यांनी फक्त आपलाच फायदा करून घेतला नाही, तर छोट्या मोठ्या भूमिकांमध्ये किंवा काही वेळा अगदी समकक्ष सहाय्यक भूमिकांमध्येही मराठी कलावंतच असतील, यासाठी आग्रह धरला आणि अनेकांना हिंदीत नेलं. रंगभूमीवरून आलेले असल्याने मराठी कलावंत कसे भारीच असतात, असं आज अनेक हिंदी कलावंत म्हणतात, त्याला कारण नानांनी या चित्रपटसृष्टीला मराठी कलावंतांचा आदर करायला शिकवलं आहे, तेही स्वत:चं नाणं चोख वाजवून.
नानांनी वेगवेगळ्या काळात थेट राजकीय भूमिका घेण्याचं धारिष्ट्य दाखवलं. त्या सगळ्याच सगळ्यांना पटण्यासारख्या नव्हत्या. अलीकडच्या काळात तर ते सत्ताधार्यांच्या इतके का प्रेमात आहेत, देशात, राज्यात या गद्दारांच्या विरोधात उसळणारा असंतोष त्यांना जाणवत नाही का, असा प्रश्न पडायचा. तरीही, अत्यंत संवेदनशील अशा दंगलीच्या काळात मनस्वीपणे उघड्या जीपमधून दंगलग्रस्त विभागात फिरणारा नाना, कसलीही जाहिरातबाजी न करता कारगिल युद्धात सहभागी होणारा नाना, हिंदी सिनेमावाल्यांकडून वाजवून कोटींमध्ये मानधन घेणारा आणि त्याचा मोठा हिस्सा गाजावाजा न करता समाजात वाटून टाकणारा नाना, सार्वजनिक मंचावर कधी कठोर, तर कधी हळवा होणारा नाना, हक्काने दटावणारा, प्रसंगी शिवी घालणारा, पण राग ओसरल्यावर मायेने मिठीत घेणारा नाना, अशी त्यांची असंख्य रूपं महाराष्ट्राने कायम अनुभवली, डोळ्यांत, मनात साठवली.
वयाच्या आणि परिपक्वतेच्या एका टप्प्यानंतर माणसाला मृत्यू या अंतिम, अपरिहार्य सत्याची जाणीव होते आणि त्याचं हसत स्वागत करण्यासाठी माणूस सज्ज होतो. नाना त्या टप्प्यावर पोहोचले होते, साक्षीभावाने, तृप्तीने आणि त्यांच्या स्वभावाला साजेशा असोशीने आयुष्य जगत होते. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते मुलाखतींमधून अतिशय सोप्या भाषेत जीवनविषयक विचार सूत्ररूपाने मांडायचे, ते सर्वसामान्यांना भावायचे. त्यांच्या निधनानंतर सर्वाधिक प्रमाणात देवाणघेवाण झाली ती नानांच्या या अकृत्रिम विचारधनाची.
जबरदस्त अभिनेता, निरलस कार्यकर्ता, कलंदर मनस्वी कलावंत, या सगळ्या उपाध्यांच्या पलीकडच्या एका स्थानावर नाना पोहोचले होते… तिथे ते ध्रुवतार्यासारखे अढळ राहतील.
