रात्री उशिरापर्यंत खूप गप्पा मारल्यानंतर माझी गर्लफ्रेंड मला शेवटचा, गुडनाईटचा मेसेज पाठवते आणि त्यानंतरही खूप वेळ
ऑनलाइन दिसते हो! याचा अर्थ काय समजायचा?- संदीप पवार, वाकडं
तिच्याबरोबर फिरायला लोहगडावर जायचं नाही… हा क्रूर विनोद वाटला, तरी हाच अर्थ घ्या, नाही तर अनर्थ होईल.
संतोषराव, गुड न्यूज ऐकलीत की नाही? आपले गडकरी साहेब आता उडती बस आणणार आहेत. ही १०० टक्के इथेनॉलवर चालणारी बस असेल का? काय वाटतं तुम्हाला?- संकेत घाटगे, इचलकरंजी
आता हवेतल्या गोष्टीवर आपण बोलायचं का? तो अधिकार त्यांचाच आहे? आणि हवेतल्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा की नाही हे ज्याने त्याने आपापलं ठरवावं… (उडणारी बस हवेतच उडणार ना? म्हणून हवेतली गोष्ट असं म्हटलं… हे मुद्दाम वेगळं क्लियर केलं… कारण बदनामी केली म्हणून बिचार्या कोर्टाला अजून एक केस दाखल करून घ्यावी लागायची.)
मंदिरातल्या घोटाळ्याचा हिशोब मागितला म्हणून भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याने एका साधूच्या मुस्काटात मारली, तीही टीव्हीवरच्या एका कार्यक्रमात. इतका माज कुठून येत असेल यांच्यामध्ये?- मंदार आंबेकर, मिरा रोड
मारणारे जे कोणी आहेत ते, आपण कोण आहोत हे इतकी वर्षं ‘गर्वाने’ सांगतायत, तरी मार खाणारे त्यांना हिशोब विचारतात, हा माज कुठून येतो असं विचारा? माज किंवा गर्व करण्याचा अधिकार हिशोब विचारणार्यांना कोणी दिला? आणि मुस्काटात मारली असं न बोलता तिला पाद्यपूजा म्हणा… आणि खेटराने पूजा नाही केली हे नशीब समजा! आणि पाद्यपूजा मुद्दाम टीव्हीवर केली जाते, ती परत कोणीही हिशोब विचारण्याचा धर्मद्रोहीपणा करू नये म्हणून… हे समजून घ्या आणि इथे प्रश्न विचारलात तसा प्रश्न टीव्हीवरच्या कार्यक्रमात विचारू नका.
‘सीतेच्या पतीचं नाव घेऊन प्रत्यक्षात नीताच्या पतीचं काम करणारे लोक’ असं भारतीय जनता पक्षाच्या सरकारचं वर्णन कुणाल कामरा या स्टँड अप कॉमेडियनने केल्यामुळे भाजपवाल्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत म्हणे! यांनी नेमलेल्या लुटारूंनी राम मंदिरातलं दान लुटलं तेव्हा यांच्या भावनाताई फिरायला गेल्या होत्या का बागेत? – सुमन काळे, कल्याण
अहो सियाच्या बिचार्या पतीचा विषय अजेंड्यावर घेतलेला असून सुद्धा, जो विषय लोकांनी विसरायला पाहिजे तो विषय लोक विसरत नसतील, तर, सीतेच्या पतीच्या विषयावर जे आपली पोळी भाजतात ते, आणि जे नीताच्या पतीची पोळी खातात ते, ‘ज्याची खावी पोळी.. त्याची वाजवावी टाळी’ ही आपली संस्कृतीच जपतायत. त्यातलं मर्म ओळखा. उगाच त्यांच्या वर्मावर बोट ठेवू नका.
सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे, अभिजीत दीपके यांच्या आंदोलनामुळे देशातली तरुणाई जागृत होईल की सत्ताधार्यांनी पुन्हा धर्माची अफू पाजल्यावर झोपी जाईल?- बाळासाहेब थिटे, अहिल्यानगर
काहीही होऊ देत… आपल्याला काय फक्त चर्चाच करायची आहे… बाकी आपल्याला कृती कुठे काय करायचीय? आणि चर्चाही करायची नसेल तर त्या गावाला जायचंच कशाला?
गाढवापुढे वाचली गीता, गाढव म्हणतं कालचा गोंधळ बरा होता… पण, मला सांगा, गाढवापुढे गीता वाचण्याचा गाढवपणा करणारा कोण होता? – राजाराम शिंदे, सावर्डे
राजारामराव जमाना बदललाय. आता गाढवं लोकांना उपदेश करायला लागलीयत… आणि लोकांना गाढव खरे आणि गोंधळ बरे वाटायला लागलेयत. त्यामुळे लोक त्यांचे प्रश्न विसरायला लागलेयत. तुम्ही अशा गाढवांना अटेंड करा… तुम्ही तुमचा प्रश्न विसराल… (नसेल उत्तर कळलं तर सत्संगाला जा… तिथल्या बाबांना, महाराजांना प्रश्न विचारा, ते तुम्हाला योग्य उत्तर देतील…)
हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच देशांमध्ये गांभीर्याने खेळल्या जाणार्या क्रिकेटमध्येच भारत हीरो आहे. दीडशेपेक्षा जास्त देशांत खेळल्या जाणार्या फुटबॉलमध्ये मात्र आपण झीरो! असं का? – शुभम पांचाळ, अंधेरी
यालाच तर डंका म्हणतात… तो विश्वामध्ये वाजतोय ना? ते महत्त्वाचं आहे. फुटबॉलमध्ये झिरो असलो तरी फुटबॉल खेळणार्या देशांत तर हिरो ‘बनतोय’ ना आपण… त्या देशांची मेडल्स फक्त आपल्यालाच मिळतायत ना, दुसर्या कोणाला ती मिळतात का? पण तुमच्यासारख्या लोकांच कसं असतं, आपल्याला कप मिळाला, तर मेडल्स का मिळत नाहीत? आणि मेडल्स मिळाले तर कप का मिळत नाही? आणि मेडल्स ‘मिळवली’ तर… ती कशात मिळाली? कोणी दिली? कशी मिळवली? असे प्रश्न तुम्हाला पडतात. पण असे प्रश्न जगातल्या डंक्यापुढे गौण ठरवले जातात हे लक्षात घ्या.

