गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला डोंबिवलीचा धनाढ्य नगरसेवक रुग्णालयातील डॉक्टरांना बेदम मारहाण करूनही आजारी असल्याचे कारण दाखवत फक्त ५० हजार रुपयांच्या जामीनावर सुटतो, या घटनेमुळे संतप्त झालेला माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या अजून शांत झालेला नाही. या गुंड नगरसेवकाने डॉक्टरांना निर्दयपणे बेदम मारहाण केली होतीच, पण नर्सेसच्या अंगावरही धावून जात त्यांनाही आई-बहिणींवरून शिवीगाळ केली होती.
त्यात त्याचे निर्ढावलेले सहकारीही सामील होते. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात हा रमेश म्हात्रे आणि त्याचे साथीदार रमेश पवार, प्रमोद निकम आणि अक्षय कारंडे यांनी जो हैदोस घातला त्याचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जनतेत उसळलेली संतापाची लाट अद्याप ओसरलेली नाही. या गुंडांना न्यायालय कठोर शिक्षा देत नाही, तोपर्यंत ती ओसरणारही नाही. तीन दिवसांची पोलीस कोठडी आणि तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीची हवा खाल्ल्यानंतर तब्येत बिघडल्याची सबब देत त्याला रुग्णालयात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर, न्यायालयीन कोठडीत व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी करून जामीन देऊन पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व पाहिल्यावर पोक्या अतिशय बैचेन झाला आणि म्हणाला, टोक्या, हा रमेश म्हात्रे असा कोण मोठा लागून गेला की त्याचे सर्व लाड पुरवले जाताहेत. नेहमी सुखासीन आणि मौजमजेचे जीवन जगणार्या गुंडाचे ब्लडप्रेशर पोलीस कोठडीत वाढणारच. शुगरही वाढणारच. अशा रोगाचे परिणाम किडनीवर होतच असतात. असे कितीतरी कैदी पोलीस कोठडीत आणि तुरुंगात सडत असतात. त्यांची अशी काळजी घेतली जात नाही. डॉक्टरांना बेदम मारहाण करताना आणि नर्सेसना धमकावताना या म्हात्रेला त्याच्या तब्येतीवर काय परिणाम होईल याची पर्वा वाटली नाही. ज्यांच्या जिवावर हा मजा मारतो त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर संजय गायकवाडपासून दिना बामा पाटलांच्या खासदार पोरापर्यंत मारकुट्या नेत्याची फौजच आहे. वेळोवेळी ते बाहुबळाचे प्रदर्शन करीतच असतात. ज्याचा पुत्र खुनाच्या आरोपाखाली शिक्षा होईल म्हणून वर्षभर फरारी आहे, ज्याची संपत्ती पंचवीस करोडच्यावर असून पत्नी आणि त्याच्याकडे पन्नास तोळे सोने आहे, ज्याच्या दोन आलिशान कार आहेत आणि इतर सटरफटर लाखो रुपयांची मालमत्ता आहे, त्या रमेश सुकर्या म्हात्रेला सज्जड दम देऊन पक्षाबाहेर हाकलण्याची हिंमत ज्यांच्यात नाही त्या शिंदे यांचा बोटचेपेपणा पाहिला की तेही या गावगुंडाला घाबरतात की काय असा संशय पोक्याने व्यक्त करताच मी त्याला त्यांची मुलाखत घेण्याचा सल्ला दिला. तीच ही मुलाखत –
-मी काय विचारायला आलोय, हे माहीत असेलच.
-हे बघ पोक्या, म्हात्रेला जामीन मिळाला यात माझा काडीमात्र हात नाही. अरे त्याची तब्बेत किती नाजुक झाली होती याची कल्पना नाही तुला. आणि कोर्टाने दिलेला न्याय होता तो, त्याचं पालन केलंच पाहिजे. नाहीतर कोर्टाचा अवमान नाही का होणार?
-शिंदेसाहेब, म्हात्रेने डॉक्टरांना बेदम मारहाण केल्यानंतर तुम्ही एकदाही त्याच्या या अमानुष कृत्याची निर्भत्सना केली नाहीत. अशा माजलेल्या गुंडाला सांभाळून घेणं हे तुम्हाला जास्त महत्त्वाचं वाटलं का?
-माझा तसा हेतू नव्हता आणि असणारही नाही. उलट, त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, त्याला पाठीशी घालणार नाही, असं माझ्या लाडक्या डॉक्टर पुत्राने सांगितलं होतं.
-कशाला स्वत:च्या पुत्राला पुढे करून स्वत: पळपुटेपणा करता? उलट ज्यांचे मीठ खाऊन ज्यांच्यामुळे मोठे झालात त्यांना उठसूट धमक्या देत असता, त्यांची टिंगलटवाळी करीत असता, मग या गुंडाला सज्जड दम द्यायला का घाबरता? कशावरून कोर्टालासुद्धा त्याची दहशत वाटली नसेल! जामीनावर उपचारासाठी मोकाट सुटलेला वैâदी बदला घेतल्याशिवाय राहील का?
-म्हात्रे तसं करणार नाही. तो माझ्या शब्दाबाहेर नाही.
-तुमचे सगळेच सहकारी तुमच्या शब्दाच्या आत का असतात हे सर्वांना माहीत आहे.
-काय वाटेल ते बोलू नकोस. पक्ष म्हटला की या गोष्टी येतातच.
-असले गावगुंड जमवून पक्ष मोठा होत नसतो. या म्हात्रेला वाचवण्यासाठी तुमच्या पक्षातले जे कोणी आमदार, खासदार, नेते आणि तथाकथित कार्यकर्ते पुढे आलेत ना, त्यांना त्या डॉक्टर आणि नर्सची मानसिक अवस्था मनोरुग्णासारखी झालीय, ते दिसत नाही का? या पापाची शिक्षा त्या तुमच्या पाळलेल्या गावगुंडांना मिळायलाच हवी होती. पण दुर्दैवाने तशी आशा दिसत नाही. देशाचं आणि महाराष्ट्राचं गृहखातं तर पार रसातळालाच गेलेलं दिसतंय, कोयता गँग काय, दिवसाढवळ्या होणारे खून काय, बलात्कार आणि अत्याचार काय, आहे कुठे गृहखाते?
-तो प्रश्न माझ्या कक्षेत येत नाही, हे मी मागेच सांगितलंय. माझा पक्ष मोठा करणं एवढंच माझं काम आहे. आमच्यावरील प्रेमामुळे आणि फडणवीसांनी घातलेल्या गोंधळामुळे मोदींना आणि अमितजींना मला घोड्यावर बसविल्याविना दुसरा पर्याय नाही. त्यांना आमची मसल पॉवरही आवडते. तीच वृद्धिंगत करण्याचा माझा विचार आहे. मला मुख्यमंत्री केल्यावर राज्यात गृहखाते हवंच कशाला? आमचे प्रख्यात मुष्टीबाज, ठोकेबाज, रट्टेबाज, धोपटवीर यांची एक फौजच तयार करणार आहोत आम्ही. ज्याच्यावर अन्याय होईल त्याला पहिले सरळ करतील ते. अन्याय झाल्याची तक्रार करणार्यांना मग अन्याय झाला म्हणून बोंबलण्याची हिंमत होणार नाही. सगळे खटले आम्ही ठाण्याच्या फास्ट ट्रॅकवर एका झटक्यात निकालात काढू आणि न्यायव्यवस्थेपुढे आदर्श घालून देऊ. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलीच पाहिजे हे आमचे स्वप्न आहे. डोंबिवलीचे मारहाण प्रकरण उगाच निष्कारण उगाळत बसू नका. ती तर फक्त झाकी है। सच्ची शिंदेशाही बाकी है।

