• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

तरुणाईचा बांध फुटतो तेव्हा…

गौरव सर्जेराव जंतर मंतर लाइव्ह

Marmik Team by Marmik Team
July 31, 2026
in विशेष लेख
0
तरुणाईचा बांध फुटतो तेव्हा…

हळूहळू सगळ्याच उपस्थितांमध्ये कुजबुज वाढली आणि चलो संसद…संसद…संसद…असे नारे लागायला सुरुवात झाली… आणि एक तरुणांचा मोठा जत्था संसदेकडे कूच करू लागला…मीही त्याच वाटेवर होतो…त्या गटाचा भाग होऊन जोरदार घोषणाबाजी करत पुढे सरकू लागलो… यात सर्वात मोठी घोषणा ‘जय भीम’ ही होती! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे, महात्मा गांधींचे, भगत सिंगांचे फोटो अनेकांच्या हातात होते…संविधानाच्या प्रती होत्या…’जब जब मोदी डरता है… पुलिस को आगे करता है!’ ‘धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो!’ ‘इन्कलाब झिंदाबाद’ हे नारे देताना अचानक आपण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतच सामील झालोय असं वाटू लागलं होतं… माझं रक्त सळसळत होतं… माझ्यातली उरलीसुरली भीती मेली होती!…
हा साक्षात्कारी क्षण होता २० जुलै २०२६चा.
त्या दिवशी मी दिल्लीत जंतरमंतरवर जे पाहिलं, जे अनुभवलं, ते आयुष्यात कधीही विसरलं जाणार नाही, इतकं अविस्मरणीय होतं… आपल्या देशातल्या एका मोठ्या बदलाचा आणि क्रांतीचा भाग झाल्यासारखं कृतकृत्य वाटलं… पण इथवर येऊन पोहोचण्याची सुरुवात खूप आधीपासूनच झाली होती…
देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हणजे झुरळं म्हणून संबोधलं, तेव्हा सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवण्यात आली…साप्ताहिक मार्मिकसाठी त्यावर मुखपृष्ठचित्रही केलं… तरुणांवरच्या या हिणकस शेरेबाजीवर यापलीकडे काही होईल, असं तेव्हा वाटलंही नव्हतं…मात्र, त्याच काळात कोणा अभिजित दिपके या अमेरिकेत शिकायला गेलेल्या युवकाने कॉक्रोच जनता पार्टी हे पॅरडी अकाउंट बनवलं आणि संतप्त aतरुणांच्या रोषाला जणू वाटच मिळाली…या टिपिकल जेन झी स्टाइल टिंगलटवाळीसाठी बनवलेल्या अकाऊंटला काही दिवसांत करोडो फॉलोवर्स मिळाले… हळुहळू प्रकरण गंभीर व्हायला लागलं… कॉक्रोच जनता पार्टीने नीट परीक्षेमध्ये झालेला घोटाळा आणि २१ विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचा विषय आता गांभीर्याने उचलून धरला… मी पेशाने, वृत्तीने एक व्यंगचित्रकार असल्यामुळे आजूबाजूला जे काही अन्यायकारक घडते, त्यावर उत्स्फूर्तपणे व्यंगचित्र रेखाटत असतोच सतत… साहजिकच याही विषयावर झपाझप व्यंगचित्रं रेखाटायला सुरुवात केली आणि त्यांना सोशल मीडियावर तुफान प्रतिसाद मिळू लागला… सुखद आश्चर्याची गोष्ट म्हणजे अभिजित दिपकेने ही व्यंगचित्रे पाहून माझा नंबर मिळवून कॉल केला आणि त्याने थेट विचारलं की आपण सोबत काम करूया का? पण, माझ्याकडे या कामाचं मानधन म्हणून देण्यासाठी पैसे नाहीत… मी त्याला म्हटलं, अभिजित, मला माहितेय की तू हे तळमळीने करतोय आणि यात तुझा स्वार्थ दिसत नाही… मला पैसे नकोत… आपण नक्कीच एकत्र काम करू! मग २० जूनला ‘चलो जंतर मंतर’ची हाक दिली गेली, तेव्हापासून मी कॉक्रोच जनता पार्टीसाठी अधिकृतरीत्या व्यंगचित्रं रेखाटायला सुरुवात केली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या घटनांच्या फोटोंना या आंदोलनाशी जोडण्याची माझी कल्पना अभिजीतच्या पसंतीस पडली.एक कॉक्रोच (स्वातंत्र्यलढ्यातील एका प्रसिद्ध फोटोप्रमाणे) गांधीजींची काठी पकडून त्यांचा वारसा पुढे घेऊन चाललाय हे त्यापैकीच एक व्यंगचित्र… या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर मी व्यंगचित्रामधून व्यक्त होत होतो… पण मन आतून खात होतं… आपला सहभाग तर आहे आंदोलनात, पण तो ‘प्रत्यक्ष’ नाही, आपण असं पडद्यामागून किती काळ काम करणार? प्रत्यक्ष लढाईत कधी उतरणार?…
अखेर ज्येष्ठ पर्यावरणवादी शिक्षक, वैज्ञानिक सोनम वांगचुक यांनी उपोषण सुरू केलं आणि माझाही बांध फुटला. आता इथे थांबायचं नाही, दिल्लीत पोहोचायचं, हे ठरवून त्यांच्या उपोषणाच्या पाचव्या दिवशी तात्काळ विमानाने दिल्लीला पोहोचलो… याआधी मी दिल्लीचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. तरीही विचारत विचारत मी आंदोलनाच्या स्थळी पोहोचलो. त्यावेळी तिथे म्हणावी तशी गर्दी नव्हती. अनेक तरुण-तरुणी घोळक्याने बसून सरकारविरोधी गाणी गात होते… आणि बाकी बरीचशी गर्दी सोनम वांगचूक यांना बघण्यासाठी आली होती… एका दिल्लीतल्या चित्रकार मित्राला भेटलो. त्याने खूप मदत केली. पुढे तीन दिवस तिथे होतो. अभिजितला आणि सोनम सरांना भेटलो… सोनम सरांनी व्यंगचित्रांचं कौतुक केलं, त्यांना मार्मिकची आधीची मुखपृष्ठंही आवडली… त्यांच्या बाजूला बसून सीजेपीसाठी दोन व्यंगचित्रे रेखाटली… मला स्टेजवर बोलण्याची संधीही मिळाली… एका व्यंगचित्रकाराचे काय कर्तव्य असते आणि कलाकारांनी आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे की नाही, यावर मी मते मांडली… मग अभिजीतचा निरोप घेऊन पुन्हा मुंबईत ट्रेनने परतलो.

मुंबईला घरी आलो खरा, पण स्वस्थ बसू शकत नव्हतो. दिल्ली, आंदोलन हे डोक्यातून जात नव्हतं. सतत काही ना काही रेखाटत होतो… सोनम सरांची दीर्घ उपोषणामुळे झालेली अवस्था इतरांप्रमाणे मलाही बघवत नव्हती… परत दिल्लीला जाण्याचे वेध लागले होते. तितक्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सरांची, ते दिल्लीला जात असल्याचे जाहीर करणारी, पोस्ट पाहिली आणि त्यांना मेसेज पाठवला, सर, मी तुमच्यासोबत येऊ का? सरांनी तात्काळ होकार देऊन आम्ाची दोघांची येण्याजाण्याची तिकिटे बुक केली. १८ तारखेला आम्ही दिल्लीत पोहोचलो आणि निष्ठुर, क्रूर मोदी सरकारने त्याच दिवशी सकाळी सोनम सरांना, एखादं प्रेत न्यावं त्याप्रमाणे पांढर्‍या कापडात गुंडाळून उचलून नेण्याची दांडगाई केली… हे बघून सगळ्यांच्याच डोक्यात तिडीक गेली…
निखिल सर आणि मी साडे तीन वाजता इंदिरा गांधी विमानतळावर उतरलो आणि अर्ध्या तासात महाराष्ट्र सदनात बॅगा टाकून जंतर मंतरला पोहोचलो… आमच्यासोबत बीबीसी मराठीचे संपादक अभिजित कांबळे सर देखील होते. गर्दीतून वाट काढत अभिजितपर्यंत पोहोचलो. अभिजित खूप थकल्यासारखा वाटत होता, कारण तो उपोषण करत होता, सोबत इतरही सगळ्या गोष्टी मॅनेज करत होता. त्याचे हात त्याच्यावर झालेल्या शाईफेकीमुळे निळे झाले होते… मी काही मिनिटे त्याचा हात धरून उभा होतो… सोनम सरांना अशा नीच पद्धतीने उचलून नेल्यामुळे तो खचला होता… पण ताकदीने उभा होता… निखिल सरांनी त्याला धीर दिला…
त्यानंतर दिवसभर त्या आंदोलनातल्या मराठी मंडळींशी बोलत होतो… अनेक जण तर पहिल्या दिवसापासून तिथे उपस्थित होते. निखिल सरांनी अनेक मुलाखती घेतल्या… ऋषिकेश मोरे हा आमचा फोटोजर्नलिस्ट मित्र सगळं काही शूट करत होता. आधी आलो होतो, त्यापेक्षा हे आंदोलन आता कितीतरी मोठं झालं होतं… १९ तारखेला तर तिथे उभं रहायला जागा नव्हती… निखिल सरांनी अभिजीतची मुलाखत घेतली तेव्हा मी तिथे होतो. त्याला म्हटलं की लोक मलासुद्धा कॉल करून सोनम सरांना उपोषण सोडण्यासाठी विनंती करावी, असे म्हणत होते… आणि मी लोकांना सांगत होतो की यापेक्षा तुम्ही त्यांची मागणी मान्य व्हावी यासाठी सरकारवर दबाव टाका… पुढील रणनीती काय असेल यावर थोडी चर्चा केली आणि खाली आलोट गर्दी वाढत होती… आणि उद्या काय होणार याची चिंता सगळ्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती… पण मागे हटायला कुणी तयार नव्हतं.


पोलिसांची संख्या वाढू लागली… वेगवेगळ्या राज्यातून पोलीस बोलावले होते… त्यात गोरखा देखील होते… आंदोलनस्थळी दीड तास बसलो होतो, आत जाणार्‍यांची रांग संपतच नव्हती… सगळे तरुण होते… टीनेजर आणि विशीतले होते… यावरून कळत होतं की, उद्या प्रचंड गर्दी होणार… त्यामुळे लवकर पोहोचलं पाहिजे… मी १९च्या रात्रीही पत्रकार युवराज मोहिते यांच्यासोबत तिथे गेलो, तेव्हा सगळं वातावरण भारून गेलं होतं… एक आई आपल्या सहासात वर्षांच्या लहान मुलाला जे काही चाललंय ते समजावत होती… राजकीय गोष्टींवर जनसामान्य व्यक्त होऊ लागलेले पाहून आनंद झाला… आता प्रतीक्षा होती २० जुलैची!
२० जुलै उजाडला… आम्ही आठ वाजता आंदोलन स्थळाकडे निघालो… जिकडे बघू तिकडे तरुणांचे घोळके तिथे निघाले होते… पोलिसांनी अनेक गाड्या अडवल्या… जनपथ स्टेशनकडे जाणार्‍या मेट्रो बंद केल्या… ट्रेन मुद्दाम लेट केल्या… तरीही लोक येतच होते… जंतर मंतर तुडुंब भरलं होतं… निखिल सर आणि युवराज सर वाट काढत स्टेजकडे गेले आणि मी गर्दीत लोकांशी चर्चा करू लागलो… आणि मग सगळा जथा संसदेकडे निघाला…
जसजसे आम्ही पुढे जात होतो, तसतसा जणू मी सर्व निराशेतून, भीतीमधून मुक्त होत होतो आणि खरं सांगतो, खूप दिवसांनी, खरंतर खूप वर्षांनी खूप खुश होतो… गेली १० वर्ष मी या सरकारच्या विरोधात हातातल्या प्रत्येक माध्यमाचा वापर करून लढतोय… लोक यावर बोलत नाहीत, माझ्या वयाची मंडळी ऐकत नाहीत… फक्त सोशल मीडियावर फालतू व्हिडिओ बघतात… रील्स बघतात, याबद्दल मनात जो राग होता तो हळुहळू पूर्णपणे शांत होत गेला. खूप खूप आनंद झाला. माझ्यासारखा विचार करणारी मुलेमुली हजारोंच्या संख्येने आजूबाजूला होती… भरभरून बोलत होती… या सरकारने केलेल्या अन्यायामुळे त्यांच्या मनात साठलेल्या रागाचा बांध फुटला होता!
अरुणाचल प्रदेशावरून आलेली कित्येक मुलं भेटली… तडाक नालो हा त्यांचा लीडर होता, जो यूपीएससीची तयारी करतोय… आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये तो जेलमध्येही जाऊन आला होता… युपी बिहारची मुलं तर भरभरून आली होती… एका तरुणाशी बोललो… विवेक कुमार त्यांचं नाव… तो कामावर जातो सांगून इकडे आला होता… लिफ्ट रिपेअरचं काम करतो… त्या ़कंपनीचं टी शर्ट त्याच्या अंगावर होतं… त्यांचं म्हणणं होतं की जर मुली न घाबरता या आंदोलनात येऊ शकतात तर मी का घरात बसू? फारच बरोबर होतं हे… कारण या मोर्चात ३०-४० टक्के मुलीचं होत्या… त्या बिनधास्त होत्या… भारताच्या इतिहासात मुलींचा इतका मोठा सहभाग आतापर्यंत झालेल्या कुठल्याच मोर्चात बघायला मिळाला नसेल… श्रीमंत, उच्च मध्यमवर्ग, मध्यमवर्ग, गरीब या सगळ्याचं वर्गातले विद्यार्थी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. प्रचंड जोश ओसंडून वाहत होता. भारत माता की जय आणि वंदे मातरमचा घोष सुरू होता… खूप कल्पक पद्धतीने तरुणाईने या आंदोलनात भाग घेतला होता… एकाने तर जिवंत झुरळ हातावर आणलं होतं… हट के पद्धतीचे बॅनर आणि मिम्स, बोर्ड पोरांनी बनवून आणले होते, ज्यातून त्यांची निर्भीडता कळत होती… स्प्रे पेंटने भिंतीवर स्लोगन लिहून काहींनी मोदींच्या सुरवारीलाच हात घातला होता! हे आंदोलन कव्हर करण्याच्या नावाखाली त्याची बदनामी करण्यासाठी आलेल्या गोदी मीडियाला आंदोलक हूट आउट करत होते… गोदी मीडिया हाय हायच्या घोषणा दिल्या जात होत्या… आंदोलकांना रोखण्यासाठी तैनात पोलिसांना काही निर्भीड आंदोलक मुली विचारत होत्या, आमच्या जागी तुमची मुलं असती तर हेच करणार होतात का? असेच वागणार होतात का? पोलिसांकडे त्याचं उत्तर नव्हतं. ते चेहरे पाडून उभे राहात होते.

पुढचे दोन तास सगळे एका जागेवर होते… सरकारने आधीचं संसदेकडे जाण्याची परवानगी नाकारली होती… हळूहळू सगळ्यांमध्ये कुजबुज वाढली तरुणांचा मोठा जत्था संसदेकडे कूच करू लागला… पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावले होते जे पोरांनी ताकद लावून खाली पाडले… आम्ही त्यावर चढून पुढच्या दिशेने जात होतो… बॅरिकेड्स पूर्ण वाकले होते… पुढे एका जरा चिंचोळ्या रस्त्यावर एक आडवी बस पोलिसांनी उभी केली होती… आणि बाजूने
बॅरिकेड्स लावले होते… तिथले बॅरिकेड्स पाडून बाजूच्या छोट्या सुशोभीकरण केलेली जागा तुडवत परत पुढे सरकलो… पण पुढे आता जाणं अवघड होतं… कारण ९-१० फुटांचे मोठे बॅरिकेड लावले होते जे वेल्डिंग केले जात होते… पोरं त्यावर चढली आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागली… संसद आता फक्त एका वळणावर होती…
तेवढ्यात मोठ्ठा आवाज झाला… हवेत उडून एक अश्रुधुराची नळकांडी येऊन फुटली… एकामागोमाग अनेक आल्या आणि त्यामुळे धावपळ सुरू झाली… चेंगराचेंगरी झालीचं असती… पण काही जणांनी न धावता चालत मागे जायला सांगितलं… अश्रूधूर नाकातोंडात डोळ्यात गेला आणि मला समोरचं दिसायचं बंद झालं… तो खूप तिखट होता… डोळ्यातून पाणी येत होतं… मागे आलो तिथे एका गल्लीत लोक वाट अडवून उभे होते… त्यांना पोलिसांची भीती होती… गरीब कुटुंब होती… तिथे एका हापशातून पाणी काढून तोंडावर मारलं… ते लोकसुद्धा मदत करत होते…
थोडी शांतता झाल्यावर पुन्हा त्या उभ्या केलेल्या बसच्या अलीकडे आलो. मोबाईल स्विच ऑफ झाला होता आणि पाकिटात
कॅश नव्हती… तहानेने व्याकुळ झालो होतो… पाण्याची व्यवस्था दिसत नव्हती… एका मोकळ्या जागेत उभा होतो… थोडा श्वास घेतला… एका यूपीवाल्याने थोडं पाणी दिलं… अचानक गर्दीतून वाट काढत जाणार्‍या अभिनेत्री चिन्मयी सुमीत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे दिसले… ओळखीचं कुणीतरी दिसलं म्हणून धावत त्यांच्याकडे गेलो… चिन्मयीजींशी ओळख होती… त्यांनी पाणी दिलं… त्यांच्यासोबत त्यांची मुलंही आली होती… त्यांनी सांगितलं की अभिजित दिपके आणि इतर मंडळी ज्या ट्रकवरून संसदेकडे येत होती तो पोलिसांनी अडवला होता… हे मला माहीत असण्याचं कारण नव्हतं… कारण त्या संपूर्ण भागात इंटरनेट बंद होतं… कुणाला कॉल करणंही अवघड होतं… मग त्यांच्यासोबत त्या ठिकाणापर्यंत पोहोचलो… तिथे खूप गोंधळ चालू होता… ट्रक ज्या दिशेने येत होता, तिथे १० फुटी बॅरिकेड्स लावले होते… त्यातून एक फट होती जिथून आम्ही आत शिरलो… ट्रकवर अभिजित, अभिनेते प्रकाश राज, शबाना आजमी आणि इतर बरीच मंडळी होती… पोलिसांनी ट्रकचे टायर पंक्चर करून टाकले… गर्दीला बाहेर ढकललं आणि मी सुद्धा बॅरिकेडच्या बाहेर ढकलला गेलो… त्यांनी बॅरिकेड बंद केले…

आता दोन बाजूला लोक विभागले गेले… पोलिसांच्या लाठ्या घेतलेल्या दोन तुकड्या दोन्ही बाजूने लोकांना अडवत होत्या… एकाच्याही छातीवर नेम प्लेट नव्हती… त्यांची या विद्यार्थ्यांशी जुनी दुश्मनी असावी..अशा त्वेषात त्यांनी गुरं बडवावी तसं सगळ्यांना लाठीने बडवायला सुरुवात केली… हे पोलीस नव्हतेच… ही माणसं नव्हतीच… हे गुंडांप्रमाणे वागत होते… लाठीचार्ज सुरू झाला की सगळेजण थोडे मागे जायचो… परत पुढे जायचो… हे चालू होतं…घोषणाबाजीने केरला हाऊसजवळचा परिसर दुमदुमत होता…लाठ्यांचा मार इतका भयंकर होता की काही जणांची डोकी फुटली… हातापायांना गंभीर दुखापती झाल्या… आम्ही त्यांना मदत करत होतो… अ‍ॅम्ब्युलन्सना वाट मोकळी करून देत होतो…
तिथे काही मुंबईतून आलेले छात्र भारतीचे कार्यकर्ते भेटले… एआयएसएफचे तर बरेच लोक होते… वेगवेगळ्या संस्थांचे विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते… बर्‍याच वेळापासून न भेटलेला आमचा ऋषिकेश मोरे भेटला… एका झाडाजवळ कॅमेरा घेऊन उभा होता… त्याच्या पोटात पोलिसांनी उभा दांडा मारला होता ज्याचा व्रण उठला होता… हातावर, बॅगेवर काठ्या पडल्या होत्या… तो प्रेसवाला आहे हे सांगूनही पोलिसांनी त्याला मारहाण केली होती… त्याची लॅपटॉपची बॅग माझ्याजवळ घेतली आणि हा परत फोटो काढण्यासाठी घुसला… गर्दीत अध्येमध्ये आमची भेट व्हायची, तो परत गायब व्हायचा… एका ठिकाणी थकून बसलो… परत एका भल्या माणसानं पाणी दिले… एका पत्रकाराने छोटी मुलाखत घेतली… समोरून एका महिला पोलिसाला चक्कर आल्यानं उचलून घेऊन जात होते आणि ज्यांच्यावर लाठ्या चालवल्या ती मुलं तिला मदत करत होती…

अचानक बराच गदारोळ सुरू झाला आणि एखाद्या फिल्मी नायकाच्या थाटात करत खासदार चंद्रशेखर आझाद जमावासकट तिथे आले आणि ठाण मांडून बॅरिकेड्स समोर बसले… त्यामुळे पोलीस शांत झाले… पाऊस सुरू झाला… वातावरण थोडं शांत झाल्यासारखं वाटत होतं… पण, ट्रकच्या पलीकडे पोलीस लाठीचार्ज सुरू होता… ट्रकवर चढून पोलिसांनी सगळ्यांना मारहाण केली… या काळात पोलिसांना ती जागा रिकामी करून गाड्यांसाठी जागा करण्याचा आदेश मिळाला आणि त्यांनी तीन बाजूंनी सगळ्यांवर अश्रुधूरच्या नळकांड्या फेकायला आणि लाठीचार्ज करायला सुरुवात केली… कुठे जावं हे कुणालाचं काही समजत नव्हतं… अक्षरश: आम्हाला ट्रॅप करून मारत होते… माझ्या डाव्या हातावर लाठीचा फटका पडला… अश्रुधूर जवळ फुटला त्यामुळे संपूर्ण चेहर्‍याची आग होऊ लागली… चेहरा झाकायला काही नव्हतं… पुढे पोलिसांनी तीन रस्ते ब्लॉक करून एका गल्लीमध्ये सगळ्यांना जायला भाग पाडलं… तिथून मग चालत चालत पुन्हा एका मेन रोडवर आलो… तिथे दगडांचा खच पडला होता… पोलिसांना बँडेज लावले होते… असं काहीतरी केलं जाणार हे माहीत होतं, कारण तिथे आदल्या रात्री पोलिसांनी एक ट्रक भरून दगड आणि एक फुटलेली गाडी ठेवली होती… पोरांनी पोलिसांवर आधी हात उचलला नव्हता… बॅरिकेड पाडले तेव्हाही त्यांनी कुठल्याच पोलिसाला हात लावला नव्हता… पुन्हा मेन रोडवर पोलिसांनी एका रस्त्यावर लाठीचार्ज करत सगळ्यांना दाबलं… मी मग विचारत विचारत दोनतीन किमी चालत महाराष्ट्र सदनापर्यंत सायंकाळी ६ वाजता पोहोचलो… मोबाइल स्विच ऑफ झाल्यानं कुणाशीच
कॉन्टॅक्ट होत नव्हता… थकलो होतो… मार सोडून काही खाल्लं नव्हतं…
जे पाहिलं…अनुभवलं… त्याने नक्कीच आधी घाबरलो होतो… पण एक जेन झी असल्याचा मला अभिमान वाटत होता… ही पिढी मागे हटणारी नाही… विचार करणारी आहे… अन्यायावर तोंड उघडून जाब विचारणारी आहे… लाठ्याकाठ्या सोसून पुन्हा उभी राहणारी देशप्रेमी पिढी आहे… आता आम्ही राख झटकली आहे… अंगार पुन्हा पेटलाय… सत्ताधार्‍यांची भीती संपली आहे… इथून पुढे कुठल्याही प्रश्नावर ही पिढी इतक्याच जोमाने रस्त्यावर येईल… कारण आता आम्हाला संघर्षाची सवय लागली आहे! जय भीम!

Previous Post

शहाणे असाल तर वेळेत सुधारा!

Next Post

लाडकी बहीण योजना युतीच्या लुटीचा खजिना

Next Post
लाडकी बहीण योजना युतीच्या लुटीचा खजिना

लाडकी बहीण योजना युतीच्या लुटीचा खजिना

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.