• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

ज्ञानू, चल ना घर चलते हैं…

मर्मभेद

Marmik Team by Marmik Team
October 8, 2026
in मर्मभेद
0
ज्ञानू, चल ना घर चलते हैं…

खरंतर कोणाचाही एकेरी उल्लेख करणे निषेधार्ह आहे. सध्या सगळ्या तरुणाईच्या तोंडी असलेल्या ‘ज्ञानू, इट्स डन ब्रो’ या पालुपदाचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांचा असा, अरेतुरेतला मित्र असल्यासारखा उल्लेख करायचा आणि ‘तुझा विषय आता संपलेला आहे, पतली गली से कट ले,’ असं सांगितल्यासारखं त्यांना झटकून लावायचं, हे काही बरोबर नाही. हा माणूस कधी आदरणीय नव्हता आणि नाहीच, त्याची कृत्यंही त्याच्या पदाच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारीच आहेत, पण त्या घटनात्मक पदाची आपण जनतेने तरी काही मुर्वत ठेवायची!

‘जानू, चल ना कुछ करते हैं’च्या चालीवर त्यांना उद्देशून ‘ज्ञानू, चल ना घर चलते हैं’ असं टपोरी पद्धतीने म्हणणं, ही काही आपली भाषा नव्हे, आपली संस्कृती नव्हे. आपण भारतीय लोक कोणाच्याही वयाचा आणि त्यातून येणाऱ्या अनुभवाचा आदर करतो. मोठ्या वयाच्या माणसांना, मोठ्या पदावरच्या माणसांना आदराने अहो जाहो करतो, काही लोक तर त्यांच्यापुढे लोटांगणंही घेतात. मोठ्या माणसांची प्रतिष्ठा राखणं हे आपण आपलं कर्तव्य मानतो. पण, अति झालं की माती होतेच. मोठ्या पदांवरची माणसं जेव्हा कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळतात आणि आपल्या वयाला, पदाला न शोभणारी वक्तव्यं आणि कृत्यं करतात, तेव्हा ती अनादर ओढवून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असोत की देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार असोत- महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या या सर्व महानुभावांनी आपल्या (कु)कर्मांनी तरुण पिढीचाच नव्हे, तर संपूर्ण देशाचा अनादर ओढवून घेतला आहे, असे खेदपूर्वक नमूद करावे लागते.

नाहीतर आज देशात जे चित्र दिसतंय, ते चित्र पुढच्या ५० वर्षांत दिसणार नाही, याची खात्री अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांना जेवढी वाटत होती, तेवढीच त्यांच्या विचारांच्या विरोधकांनाही वाटत होतीच. आपण अजेय आहोत, या गैरसमजुतीच्या नशेचा हँगओव्हर या मंडळींच्या मनावर आजही इतका अंमल गाजवतो आहे की २०२६मध्ये तबाही माजत चाललेली असताना हे २०४७मध्ये काय होईल, याच्या अजून गमजा मारताहेत. २०४७मध्ये बाकी काही होवो ना होवो, आपण जिथे आहोत तिथे नसणार आणि जिथे कुठे असू तिथे आपलाही ‘आडवाणी’ केला गेला असणार, एवढं तरी लक्षात घ्यायला हवं. पण, सत्ताधारी दिल्लीतले असोत की महाराष्ट्रातले- जनमानसाचा कल बदलला आहे, हे मानायलाच ते तयार नाहीत. आसपास वादळ घोंघावत असताना वाळूत डोकं खुपसून सगळं काही आलबेल असल्याचा अभिनय करत आहेत.

भारतीय जनता पक्षाने देशाची, लोकशाहीची, लोकशाहीच्या स्तंभांची, स्वायत्त यंत्रणांची, संविधानाची आणि विविध संवैधानिक पदांची गेल्या १२ वर्षांच्या एकहाती वाट लावून टाकली, देशातल्या सर्व महत्त्वाच्या पदांवर अपात्र आणि सुमार कुवतीचे (त्यांचाही नाईलाज आहे म्हणा, पात्र लोक आणतील कुठून?) लोक बसवून त्या पदांची प्रतिष्ठाच संपवून टाकली. ते काम केंद्रीय निवडणूक आयोगासारख्या अत्यंत संवेदनशील आणि लोकशाहीसाठी सर्वोच्च महत्त्वाच्या यंत्रणेच्या बाबतीत ज्ञानेश कुमार गुप्ता यांनी करून टाकलं. या बाबतीत ‘राजीव कुमारे रचिला पाया, ज्ञानेश झालासे कळस’ असा प्रकार आहे. आधीचे आयुक्त राजीव कुमार यांनी २०२४च्या निवडणुकांमध्ये, भाजपला निवडून आणण्यासाठीच आपली नेमणूक आहे, अशा थाटात निवडणूक प्रक्रिया राबवली. २०२५मध्ये त्यांच्याकडून सूत्रे घेतलेल्या आणि अमित शहांच्या मर्जीतला माणूस हीच एकमेव पात्रता असलेल्या ज्ञानेश कुमारांनी संपूर्ण निवडणूक आयोग नेऊन भाजपच्या गोठ्यात बांधण्याचं काम पूर्ण करून टाकलं आणि मोदी शहा सांगतील त्यावर बुगूबुगू मान डोलावण्याचं धोरण ठेवलं. त्यातून आता त्यांच्यावर आणि त्यांना ‘औंदाही आम्हीच निवडून येणार ना’ असा सवाल विचारणाऱ्या मोदी-शहांवर जनतेच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ आली आहे.

एखाद्या भुरट्या चोराला जेव्हा फौजदाराचीच साथ मिळते आणि सेनापतीपर्यंत हप्ते बांधले जातात, त्यानंतर तो दरोडे घालण्यापर्यंत ‘प्रगती’ करतो, तसाच प्रकार निवडणूक आयोगाच्या बाबतीत झालेला आहे ज्ञानेश कुमारांच्या नेतृत्त्वात. पक्ष फोडणे, लोकप्रतिनिधी पळवणे, योग्य पक्षप्रमुखांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह काढून घेऊन ते भुरट्या गद्दारांकडे सोपवणे असल्या किरकोळ चोऱ्यामाऱ्या करता करता ज्ञानेश कुमारांचं डेअरिंग इतकं वाढलं की त्यांनी देशातल्या नागरिकांच्या मतदानाच्या अधिकारावरच दरोडा घालायचं ठरवलं. एसआयआरच्या नावाखाली भाजपधार्जिणे मतदार यादीत ठेवून भाजपला मतदान करणार नाहीत, ते वगळून यादीबाहेर काढणे, हा कार्यक्रम त्यांनी राबवला. त्याद्वारे महाराष्ट्रात लोकसभेत चारीमुंड्या चीत झालेल्या भाजप आघाडीला विधानसभेत अभूतपूर्व संख्याबळाने सत्तेत बसवण्याचा पराक्रम गाजवला गेला. त्याने भीड चेपल्यावर प. बंगालमध्ये गद्दार सुवेंदूला अधिकारी म्हणून बसवले गेले. आतापर्यंत या सगळ्यात चिडीचूपपणे साथ देणाऱ्या दोन आयुक्तांना कसा कोण जाणे, अचानक कंठ फुटला, त्यांनी ज्ञानेश कुमारांच्या पापाचा पाढा वाचला आणि परिणामी रामाच्या मंदिरातही डाका घालणाऱ्या भामट्यांच्या डोक्यात वज्ररूपी महारुद्राची गदा बसायची वेळ आली.

ये एनडीए हैं, यहां इस्तीफे नहीं होते, ही मस्तवाल मिजास ज्या जेन झी पोरांनी हसत खेळत मोडून काढली आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र कुमार यांना ‘इट्स डन ब्रो’ म्हणून घरच्या वाटेला लावलं, तीच तरुणाई आता ‘ज्ञानू’च्या मागे हात धुवून लागली आहे. देशात १२ वर्षांत विरोधी पक्ष गलितगात्र झाले होते, कारण जनतेची म्हणावी अशी साथ नव्हती. आता विरोधी पक्षांनी हाक देताच रस्ते ओसंडून वाहू लागले आहेत. अभिजित दीपके, नेहा बोरा यांच्या रूपाने तरुणाईचं नेतृत्त्व बहरू लागलं आहे. खाकी पँटच्या आत ‘संघाची निकर’ घातलेल्या दिल्लीतल्या अमानुष पोलिसांचे वाभाडे निघत आहेत. संघर्ष अटळ आहे.

इमानी आज्ञाधारक ज्ञानू आणि त्यांचे मालक यांच्या घरवापसीची वेळ आली आहे!

Previous Post

मोहजाळ्यातून ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये!

Next Post

पीएचडीचे पंचरत्न!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.