
मोह ही गोष्ट अशी आहे की, तिच्यामुळे कोणताही सारासार विचार न करता माणूस निर्णय घेतो. जेव्हा एखादी आकर्षक संधी, झटपट मिळणारा फायदा, कमी कष्टात मोठे उत्पन्न मिळण्याचे आमिष दिसले की माणूस त्यामागे धावतो. मात्र, सायबर विश्वात हाच मोह घातक ठरतो. माणसाची ही मानसिकता सायबर गुन्हेगारांना चांगलीच माहिती असल्याने आधी छोट्या कामाच्या बदल्यात थोडे पैसे देत समोरच्या व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल विश्वास निर्माण करतात आणि त्यानंतर मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवतात. एकदा ती व्यक्ती जाळ्यात अडकली की प्रत्येक टप्प्यावर नवी कारणे सांगून पैसे उकळले जातात.
कल्पना मधुकर यांच्याबाबतीत नेमके असेच घडले. घरबसल्या पैसे कमावण्याच्या एका साध्या ऑफरपासून सुरू झालेला हा प्रवास लाखो रुपयांच्या फसवणुकीपर्यंत पोहोचला. मॅनेजमेंट स्कूलमधून एमबीएचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कल्पना यांना एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. कंपनीचे कार्यालय चेन्नई येथे असल्यामुळे मूळच्या कानपूरच्या असलेल्या कल्पना तिथेच स्थायिक झाल्या. कंपनी उत्तम होती, सोयीसुविधा उत्तम दर्जाच्या, त्यामुळे त्याच कंपनीमध्ये त्यांनी शेवटपर्यंत नोकरी केली. मोठ्या पदावर काम केलेले असल्यानं त्यांचं आर्थिक उत्पन्नही उत्तम होतं. ५८व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर त्यांना कंपनीकडून सुमारे ६५ ते ७० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. आता या पैशांची सुरक्षित आणि योग्य प्रकारे गुंतवणूक कशी करायची याचाच विचार कल्पना यांच्या डोक्यात सतत सुरू होता. निवृत्तीनंतरच्या भविष्यासाठी या पैशांचा चांगला उपयोग व्हावा, अशी त्यांची इच्छा होती.
एका शनिवारी कल्पना यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यामध्ये नोकरी किंवा व्यवसायाव्यतिरिक्त घरबसल्या अतिरिक्त पैसे कमावण्याची संधी असल्याचे सांगण्यात आले होते. एका लिंकवर क्लिक करून विविध वस्तू किंवा सेवांचे रिव्ह्यू लिहायचे आणि प्रत्येक रिव्ह्यूसाठी ५० रुपये मिळणार असल्याचे सांगण्यात आले. दिवसाला २५ ते ३० रिव्ह्यू लिहिले तर चांगली कमाई होईल, असेही त्यात नमूद केले होते. निवृत्तीनंतर भरपूर वेळ असल्यामुळे कल्पना यांनी कोणतीही शहानिशा न करता त्या लिंकवर क्लिक केले. लिंक उघडल्यानंतर त्यांना स्वागताचा संदेश आला आणि त्यानंतर बँक खात्याशी संबंधित माहिती भरण्यास सांगण्यात आले. त्याप्रमाणे त्यांनी मागितलेली माहिती भरली. त्यानंतर थोड्याच वेळात कल्पना यांना रिव्ह्यू लिहिण्यासाठी संदेश येऊ लागले. त्या दिवशी त्यांनी सुमारे ३० रिव्ह्यू पूर्ण केले. संध्याकाळी त्यांच्या खात्यात १,५०० रुपये जमा झाले. यामुळे त्यांचा या कामावर विश्वास बसला. पुढील दोन-तीन दिवसही हे काम सुरू राहिले. त्या रिव्ह्यू लिहित होत्या आणि त्याबदल्यात त्यांना पैसे देखील मिळत होते.
सायबर ठगांची आपली पहिली चाल यशस्वी झाली होती… आणि कल्पना यांच्या मनात देखील त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला होता.
तिसर्या दिवशी अचानक कल्पना यांना अनुपकुमार नावाच्या व्यक्तीचा फोन आला. तो म्हणाला, ‘कल्पनाजी, आपण खूप चांगले काम करत आहात. आपल्यासाठी एक विशेष बिझनेस प्रपोजल आहे.’ अनुपकुमारने त्यांना एका कथित ‘सब्स्क्रिप्शन मॉडेल’ची माहिती दिली. ‘तुम्ही १० हजार रुपये गुंतवले तर त्यापेक्षा जास्त रक्कम परत मिळेल. तुमची गुंतवणूक जितकी मोठी, तितका फायदा जास्त,’ असे सांगण्यात आले. कल्पना यांनी विश्वासाने सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवले. दुसर्या दिवशी त्यांच्या बँक खात्यात २० हजार रुपये जमा झाले. यामुळे कल्पना यांचा विश्वास आणखीनचा वाढला.
दुसर्या दिवशी पुन्हा अनुपकुमारचा फोन आला. यावेळी त्याने आणखी मोठ्या ‘इन्सेन्टिव्ह स्कीम’चे आमिष कल्पना यांना दाखवले. ‘तुम्ही एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला तीन लाख रुपयांपर्यंत फायदा मिळेल. हा फायदा तुमच्या ऑनलाइन
वॉलेटमध्ये जमा होईल,’ असे त्याने सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपयांवर २० हजार रुपये मिळाल्याचा अनुभव कल्पनांच्या डोळ्यासमोर असल्यानं त्यांनी फारसा विचार केला नाही. हळूहळू कल्पना त्या माणसांच्या सांगण्यावरून अधिक अधिक पैसे गुंतवत गेल्या. सायबर ठगांनी त्यांच्या वॉलेटमध्ये वाढती रक्कम दाखवायला सुरुवात केली. स्क्रीनवर नफा वाढत असल्याचे कल्पना यांना दिसत होते. त्यामुळे त्या खूपच खूष झाल्या होत्या.
पुढच्या टप्प्यात कल्पना यांनी पाच लाख रुपये गुंतवले. यानंतर त्यांच्या ऑनलाइन वॉलेटमध्ये ही रक्कम वाढून २० लाख रुपये झाल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात उपलब्ध नव्हती. ती सायबर ठगांनी नियंत्रित केलेल्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दिसणारी कथित शिल्लक होती. स्क्रीनवर वाढणारी रक्कम पाहून कल्पनांचा विश्वास अधिकच दृढ झाला. यानंतर त्यांनी निवृत्तीच्या रकमेतून आणखी मोठी रक्कम सायबर ठगांनी सांगितलेल्या कथित योजनेत गुंतवली. हळुहळू त्यांच्या गुंतवणुकीची एकूण रक्कम ४० ते ५० लाख रुपयांच्या आसपास गेली. एका टप्प्यावर कल्पना यांनी गुंतवलेली रक्कम सव्वा कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याचे त्यांना दिसले.
आता कल्पना यांना ही रक्कम काढून घ्यायची होती. ‘मला पैशांची गरज आहे. माझी रक्कम मला वâाढायची आहे,’ असं कल्पना यांनी अनुपकुमारला सांगितलं. तेव्हा अनुपकुमारने सांगितले की काही कालावधी पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पैसे काढता येणार नाही. कल्पना यांनी त्याला आपल्याला पैशांची खरोखरच गरज असल्याचं सांगितले. यावर काही मार्ग काढता येतो का हे दुसर्या दिवशी सांगतो असं आश्वासन अनुपकुमारने कल्पना यांना दिले. दुसर्या दिवशी अनुपकुमारने कल्पना यांना फोन करून सांगितले की, ‘तुम्हाला रक्कम काढायची असेल तर नवीन केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यासाठी आधी ३० लाख रुपये अॅडव्हान्स टीडीएस म्हणून भरावे लागतील. ही रक्कम भरल्यानंतर तुम्हाला एका तासात पैसे काढता येतील.’ कल्पना यांनी कोणतीही शहानिशा न करता अनुपकुमारने दिलेल्या बँक खात्यात ३० लाख रुपये जमा केले. एक तास उलटल्यानंतर कल्पना यांनी अनुपकुमारला फोन केला. ‘आता माझे पैसे काढता येतील ना?’ त्यावर अनुपकुमार म्हणाला, मॅडम तुम्हाला अजून २० लाख रुपये ट्रान्झॅक्शन टॅक्स म्हणून भरावे लागतील. त्यानंतरच रक्कम काढता येईल.’ पैसे काढण्यासाठी एकामागून एक नवी कारणे सांगितली जात होती. पहिले गुंतवणूक, मग टीडीएस, त्यानंतर ट्रान्झॅक्शन टॅक्स… आणि प्रत्येक वेळी कल्पनांकडून आणखी पैसे मागितले जात होते. हे संभाषण कल्पना यांची मैत्रीण संध्या ऐकत होती. तिने विचारले, ‘कल्पना, तू नेमके कसले पैसे भरते आहेस?’
कल्पनांनी सुरुवातीपासूनचा सगळा घटनाक्रम तिला सांगितला, ते सगळे ऐकल्यानंतर संध्या तिला म्हणाली, ‘कल्पना, तू सायबर फसवणुकीची बळी ठरली आहेस. या प्रकाराची पोलिसात तक्रार कर.’ फसवणूक झाल्याचे कळल्यावर कल्पना गर्भगळीत झाल्या. मात्र, त्यांनी लगेच पोलिसात याची तक्रार केली. काही दिवसांनी त्यांना पुन्हा फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकारी म्हणून करून दिली. तो म्हणाला, ‘तुमच्या बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाले आहेत. तुमच्या नावावर अटक वॉरंट आहे.’ हे ऐकून कल्पना घाबरल्या. फोनवरील बनावट अधिकार्याने त्यांच्यावर आणखी दबाव आणला. ‘फोन बंद करू नका. कोणाशीही बोलू नका. घराबाहेर पडू नका. तुम्ही आता डिजिटल अरेस्टमध्ये आहात.’ फोनवर बोलताना कल्पना मोठ्याने ओरडत होत्या. त्यांचा आवाज शेजार्यांच्या कानावर पडला. शेजार्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र, फोनवरील बनावट अधिकार्याच्या धमक्यांमुळे कल्पना अत्यंत घाबरल्या होत्या. शेजार्याला परिस्थिती संशयास्पद वाटली. त्याने विलंब न करता पोलिसांना माहिती दिली. पोलिस काही वेळात घटनास्थळी पोहोचले आणि कल्पनांना सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या समोर पोलीस असल्याचे पाहताच फोनवरील बनावट अधिकार्याने फोन बंद केला.
एका सजग शेजार्याच्या तत्परतेमुळे कल्पना आणखी एका गंभीर फसवणुकीपासून वाचल्या. या संपूर्ण घटनेत कल्पनांना मोठा आर्थिक आणि मानसिक धक्का बसला.
अशी घ्या काळजी –
- छोटा फायदा मिळाला म्हणून संपूर्ण योजना खरी आहे असे समजू नका.
- कमी गुंतवणुकीत मोठा आणि हमखास परतावा देणार्या योजनांपासून सावध राहा.
- पैसे काढण्यासाठी आधी टीडीएस,
- टॅक्स, प्रोसेसिंग फी किंवा अन्य शुल्क भरण्यास सांगितले तर तातडीने थांबा आणि स्वतंत्रपणे पडताळणी करा.
- ऑनलाइन वॉलेट किंवा अॅपवर दिसणारी रक्कम म्हणजे ती प्रत्यक्षात आपल्या मालकीची किंवा खात्यात उपलब्ध रक्कम असेलच असे नाही.
- अनोळखी लिंकवर क्लिक करून बँकिंग किंवा वैयक्तिक माहिती देऊ नका.
- ओटीपी, युपीआय, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही किंवा अन्य गोपनीय बँकिंग माहिती कोणालाही देऊ नका.
- ‘डिजिटल अरेस्ट’च्या धमकीला घाबरू नका.
- कोणी स्वतःला पोलीस, सीबीआय, ईडी किंवा अन्य सरकारी अधिकारी सांगून फोनवर अटक करण्याची धमकी देत असेल, तर संभाषण थांबवा आणि अधिकृत माध्यमातून संबंधित विभागाशी स्वतंत्रपणे पडताळणी करा.
- आर्थिक फसवणूक झाल्यास आणखी पैसे देऊन नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करू नका. तातडीने बँकेशी आणि पोलिसांशी संपर्क साधा.
- सायबर गुन्हेगार आपल्या पैशांवर थेट हल्ला करत नाहीत; ते आधी आपल्या मनावर हल्ला करतात. कधी मोह दाखवून, कधी नफ्याचे स्वप्न दाखवून, तर कधी भीती निर्माण करून ते आपल्याकडून निर्णय करून घेतात.
- आकर्षक ऑफर दिसली की थांबा. मोठा परतावा ऐकला की विचार करा. पैसे मागितले की पडताळणी करा. आणि अधिकारी असल्याचे सांगून कोणी घाबरवत असेल तर तातडीने स्वतंत्र अधिकृत मदत घ्या.

