
शहरी मध्यमवर्गाच्या उठावाने स्वराज्य काही मिळणार नाही. त्यासाठी शेतकर्यांनी क्रांती करायला हवी, असं प्रबोधनकार शेतकर्यांचे स्वराज्य या पुस्तकात सांगतात. शेतकर्यांशी घेणंदेणं नसलेले शहरी विद्वान त्यांच्या भल्याचा विचार मांडू शकत नाहीत. असं सांगताना प्रबोधनकार त्यांना जाकीटशास्त्री म्हणतात. आजही असे बांडगुळे जाकीटशास्त्री व्याख्यानं देताना, न्यूज चॅनलवर आणि सोशल मीडियावर भेटतातच.
शेतकर्यांचे स्वराज्य हे प्रबोधनकारांचं एक महत्त्वाचं पुस्तक. नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरचं असलं तरी प्रबोधनकारांची मांडणी सामाजिक आणि ऐतिहासिक अंगानेच जाते. प्रबोधनकारांची शैली थेट आहेच. पण ते वाचकांना कधीच थेट विषयात घेऊन जात नाहीत. एखाद्या आकर्षक आणि लक्षवेधी मुद्द्याने ते सुरुवात करतात. त्यात त्यांच्या रसाळ शैलीची फोडणी असते. यामुळे वाचक विषयाकडे ओढला गेलाय हे लक्षात येताच ते त्याच्या धारणांवर हल्ला करतात. वाचकांच्या डोक्यात बसलेल्या नेहमीच्या गृहितकांना धक्का देत हळूहळू नवी मांडणी करतात.
या पुस्तकातही तेच घडलंय. ब्रिटिश कवी ऑलिवर गोल्डस्मिथ याच्या डेझर्टेड विलेज या कवितेपासून ते सुरुवात करतात. कवितेतून ते भारतीय शेतकर्यांच्या दुर्देशंचं चित्र उभं करतात. ब्रिटिशांनी भारतीय ग्रामीण अर्थव्यवस्थेचं केलेलं शोषण याला कशा प्रकारे कारणीभूत आहेत, हे समजावतातच, पण त्याच बरोबर ब्राह्मणांच्या सांस्कृतिक वर्चस्ववादातूनही हे कसं घडलंय, याचंही दर्शन घडवतात. शहरी नवमध्यमवर्ग हा शेतकर्यांच्या शोषणावर पोसलेला बांडगुळी समाज आहे. त्याच्या चळवळींनी शेतकर्यांचं भलं होणं शक्य नाही. ग्रामीण शेतकर्याला स्वातंत्र्य चळवळीशी जोडून घेणार्या महात्मा गांधींनी या मध्यमवर्गांच्या हितसंबंधांना धक्का दिला. पण त्याची खरी सुरुवात महात्मा जोतिराव फुलेंच्या सत्यशोधक चळवळीपासून झाली, अशी मांडणी प्रबोधनकारांनी केलीय.
महात्मा फुलेंच्या विचारांमध्येच शेतकर्यांच्या स्वराज्याची गुरुकिल्ली आहे, यावर प्रबोधनकारांचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणांमध्येही त्याच अंगाने मांडणी आहे. त्यातलं चौथं प्रकरण महायुद्धापूर्वी आणि नंतर हे आधीच्या तिसर्या प्रकरणाचाच विस्तार आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरांमधला मध्यमवर्ग हा पहिल्या महायुद्धाच्या आधी जन्माला आला, स्थिरावला आणि प्रभावीही झाला. या काळात मुंबईत आलेल्या जगभरातल्या कंपन्यांनी त्याला नोकर्या देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं. नंतर तोच भारतीयांचं प्रतिनिधित्व करू लागला. त्यामुळे खर्या भारताचं म्हणजे शेतकर्याचं दुःख समोर आलंच नाही. या विद्वानांना शेतकर्यांचं दुखणं कळलंच नाही. अशा `जॅकेटशास्त्रीं`चं नेमकं वर्णन प्रबोधनकारांनी केलंय –
परंपरादत्त बुद्धिकौशल्याचे कोड पुरविण्यासाठी, फावल्या वेळांत, इकडेतिकडे थोडी दिवाणखानी आणि वृत्तपत्री देशहिताची चळवळ हे बाण्डगुळे करीत. त्यात मनाच्या विरंगुळ्यापेक्षा मात्र अधिक काहीहि नसे. खुंटीला काळीजे अडकवून बदामाचे केशरी शिरे खात खात, देशाच्या दुष्काळाच्या किंवा रोगराईच्या आधीव्याधी हृदयद्रावक भाषेत नटविणारे `जॅकेटशास्त्री जसे बोकाळले होते, तसे शेतकर्यांचे तोंड जन्मात एकदाहि न पाहिलेले बाळपंडित शेतकर्यांच्या वतीनें सरकारशी तोंडपाटीलकीचा लढा लढविण्यात गर्क असत.`
आजही जाकिटं घालणारे पण जमिनीपासून दुरावलेले पक्षांचे प्रवक्ते, सामाजिक व्याख्याते, पॉडकास्टवाले आणि अकॅडमिशियन पाहिले की प्रबोधनकारांनी केलेलं वर्णन आजच्या काळालाही किती लागून होतं, हे लक्षात येऊ शकतं. त्यातही त्यांनी वापरलेला जॅकेटशास्त्री हा शब्द तर शंभर वर्षांना भेदूत समकालीन ठरतो. ते रवींद्रनाथ टागोरांच्या सत्याची हाक या लेखातील काही परिच्छेद या पुस्तकात वारंवार देतात. त्यातलं वर्णन तर आपल्याला आजच्या संदर्भात विचार करायला लावतं- हिन्दुस्थानातील परकीय राज्यसत्ता ही केवळ रंग बदलणार्या सरड्यांप्रमाणे आहे. आज ती इंग्रेजाच्या वेषात आली आहे, उद्या दुसर्या एखाद्या परस्थाच्या वेषात येईल, तर परवा, अगदी तेवढ्याच तीव्रपणाने, ती कदाचित आपल्याच देशबांधवांच्या रूपाने प्रकट होईल! प्राणघातक शस्त्रास्त्रांच्या योगाने या परसत्ता – पिशाचाचा पिच्छा पुरवून त्याचा नायनाट करण्याचा आपण केवढाही दांडगा प्रयत्न केला, तरी तो निष्फळ होईल. कारण, वरचेवर रंग पालटण्यात तिचा हातखंडा असल्यामुळे, तिला आपल्या हातावर तुरी देऊन निसटून जाणे केव्हा अवघड नाही.
पहिल्या महायुद्धाने महाराष्ट्रातल्या या शहरी मध्यमवर्गाला धक्का दिला. व्यापार बंद पडल्यामुळे तो बेरोजगार झाला. परिणामी त्याला भारत देश हा फक्त शहरांमधेच नाही, तर खर्या अर्थाने त्यापलीकडे गावांमध्येच वसल्याचं लक्षात आलं. पण ते फक्त कळलं, वळलं मात्र नाही. कारण त्यांचे हितसंबंध शेतकर्यांच्या शोषणावरच अवलंबून होते. प्रबोधनकारांच्या शब्दांत, पोटासाठी हवे ते उलटसुलट उत्पात करणार्या मध्यमवर्गांकडून देशोद्धाराची अपेक्षा करणे, म्हणजे वेश्येकडून पातिव्रत्याची आशा करण्याइतकेच धाडसाचे आहे. विचारक्रान्तीने बाण्डगुळ्या कितीहि देशभक्ताळला, तरी त्याचा पिण्डच गोर्या सरकारच्या आणि व्यापार्यांच्या गोर्या मेहेरबानीचा असल्यामुळे, त्याला गोर्या कातडीला मोह मुळीच आवरत नाही.
मध्यमवर्गीय चळवळींच्या मर्यादांची लक्तरं वेशीवर मांडून प्रबोधनकार जनार्दनाचा नवावतार या महत्त्वाच्या प्रकरणाकडे येतात. त्यात त्यांनी विसाव्या शतकातल्या बदलत्या सामाजिक परिस्थितीचं चित्रण केलंय. ते फार महत्त्वाचं आहे. त्यातही ते सुरुवातीलाच महात्मा फुलेंच्या चळवळींचं महत्त्व अधोरेखित करतात, नॅशनल काँग्रेस, सामाजिक सुधारणांच्या परिषदा, औद्योगिक प्रदर्शने वगैरे शहरी बाण्डगुळ्यांच्या शहरी घडपडी नाटकी, बिनकाळजाच्या आणि केवळ हंगामी विरंगुळ्याच्या आहेत. त्यात मूठभर शहरी शहाण्यांशिवाय बहुजन समाजाचा मुळीच काही संबंध येत नाही. त्याला कोणी विचारीत नाही. त्याच्या हिताहिताची कोणाला जाणीव नाही, कल्पना नाही. म्हणून सत्यशोधक समाज स्थापन करून जोतिराव फुले यांनी मागासलेल्या वर्गातील काही थोड्या अनुयायांसह मोठी चळवळ सुरू केली. आजचे भटी बाण्डगुळ्ये ज्या ज्या निरनिराळ्या चळवळी `स्वकल्पित भव्य कल्पने`च्या आत्मप्रौढीने चालवीत आहेत, त्या सर्व कल्पनांचा बाप जोतिराव फुलेच होय.
पण ब्राह्मणी व्यवस्थेने जोतिबांच्या चळवळीची कोंडी केली. त्याचंही वर्णन प्रबोधनकार करतात, मागासलेल्या भटेतर जनतेच्या रक्तावर जगणार्या एकजात भटभटेतर बांडगुळ्यांनी जोतिरावचा कोंडमारा करून त्यांची चळवळ घायाळ केली. गोरगरीब रयतेच्या प्रत्यक्ष हिताची चळवळ हाती घेणार्या प्रत्येक भटेतर नवमतवाद्याचा पाणउतारा करून त्याची चळवळ ठार मारण्यासाठीच भट हा प्राणी ब्रह्मदेवाच्या खास अकलेतून निर्माण झालेला आहे. भटवर्ग बुद्धीने अचकट पण संख्येने कुजकट असला, तरी त्याच्या कळकट पायतणाला खिळ्याप्रमाणे, किंवा त्याच्या पिळवट नाकाला शेंबडाप्रमाणे चिकटणार्या भटेतर बांडगुळ्या जाती बर्याच असल्यामुळे, भटवर्गाला हवे ते उत्पात स्वतः नामानिराळे राहून सफाईत घडवून आणता येतात.
महात्मा फुलेंच्या या चळवळीला नवी झळाळी देण्याचं काम छत्रपती शाहू महाराजांनी केलं.- राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाची गुरुकिल्ली शेतकर्याच्या नांगराच्या फाळात आहे आणि हव्या त्या भपकेबाज साम्राज्य-सत्तेचा मृत्यू शेतकर्यांच्या हालात आहे, हा सनातन सिद्धांत बिनचूक ओळखणारा महाराष्ट्राचा पहिला आणि शेवटचा छत्रपति फक्त करवीरकर शाहूच होय… शाहू छत्रपतींनी आपल्या कुळधर्माला व कर्तव्यनिष्ठेला स्मरून `ब्राह्मणेतर चळवळीच्या पुनरुज्जीवनाचा इतक्या जोराने उठाव केला की, गौतम बुद्धाच्या धर्माला हद्दपार करणारी भिक्षुकशाही अवघ्या सहा महिन्यांत गलितगात्र होऊन त्राहि माम्चा शंखध्वनि कोकलू लागली.
छत्रपती शाहूंच्या चळवळीमुळे गावोगाव भट बहिष्काराची चळवळ फोफावली. सत्यशोधक जलशांच्या रूपाने ती मुंबई इलाख्यातल्या प्रत्येक गावात जाऊन भिडली. त्यामुळे शेतकर्यांना भट बांडगुळ्यांची कारस्थाने समजू लागली. शत्रू कोण, मित्र कोण, याची पारख झाली. त्यातून ब्राह्मणेतर चळवळीची मुखपत्रं असणारी वर्तमानपत्रं सुरू झाली. त्यांनी टोल्याला टोला आणि जोड्याला जोडा हाणला. त्यातून काय घडलं ते प्रबोधनकारांच्या शब्दांत असं- शेतकर्यांचे यजमान आणि दरोबस्त खेड्यापाड्यांचे राजे आम्ही. आम्ही म्हणू ती पूर्वदिशा, लागेल तो फंड हवा तेव्हा आणू, शेतकर्यांचे खरे प्रतिनिधी वकील ते आम्हीच, इत्यादि गर्वोक्तीचा भार वाहणारे सर्व भारवाहक भटलोक आता दीनवाणीने रडू लागले आहेत की, शहरांत आमच्या प्रतिष्ठेची पाचवी कशीबशी पुजली जाते. पण पूर्वी ज्या खेड्यात आम्ही वाटेल त्या वेळी, वाटेल त्या सबबीखाली, वाटेल त्याच्या खर्याखोट्या बारशाच्या घुगर्या खाल्ल्या, त्याच खेड्यात आम्ही पाऊल ठेवताच आमच्या हातूनच आमचे तेरावे घालण्याचे प्रसंग आज नित्य येत आहेत. प्रत्यक्ष काळसुद्धा ज्या बाण्डगुळ्या भटांचा मुर्दाडपणा चेचताना चकला, तोच मुर्दाडपणा ब्राह्मणेतर चळवळीने शेतकरी जागा होतांच, ठिकच्या ठिकाणी गारठून पडला. खेडवळ शेतकरी जनतेचे प्रबोधन ही केवढी विलक्षण शक्ती आहे, याचा प्रयोग शाहू महाराजांनी प्रत्यक्ष करून, शहरी बाण्डगुळ्यांच्या सर्व चळवळींचा फोलकटपणा स्पष्ट सिद्ध करून दाखविला. याची त्यांना बक्षिसी काय? तर त्यांना भटी बाण्डगुळ्या देशभक्षकांनी स्वराज्यद्रोही छत्रपति अशी कचकचीत शिवी हासडली.`
छत्रपती शाहूंच्या मृत्यूनंतर ही चळवळ मरेल हा कयास भास्करराव जाधवांसारख्या नेत्यांमुळे खोटा ठरला, असं प्रबोधनकार सांगतात. पण त्यात मराठा–मराठेतर यादवी झाली. बांडगुळ्यांनी त्यांना गुंड ठरवून बदनाम केलं. हा इतिहास सांगताना प्रबोधनकार मुंबईत आलेल्या दाक्षिणात्य कारकुनांच्या टोळधाडीचाही वृत्तांत सांगतात. मद्रास इलाख्यात ब्राम्हणेतर चळवळीमुळे तिकडचे ब्राह्मण मिळेल ती संधी पटकावण्यासाठी मुंबईत आले. खरंतर पूर्ण देशभर पसरले. प्रबोधनकार सांगतात, महाराष्ट्रात दाक्षिणात्य कारकून पहिल्यांदा १८९६ साली जीआयपी रेल्वेच्या तारमास्तरांच्या संपात आले. रेल्वे कंपनीनेच त्यांना आणून स्थानिकांचा संप ठेचून काढला. त्याआधी पेशवाईच्या काळात तेलंगे ब्राह्मण पुण्यात आले, असंही ते सांगतात. दाक्षिणात्यांच्या या स्वारीचं वर्णन ते असं करतात–
मुंबईवर मद्राशी बाण्डगुळाची स्वारी होताच, त्यांनी निरनिराळ्या शिलेदारी नोकर्यांचे भाव फटाफट खाली पाडले. हवा तो भाव, पण नोकरी लाव; यापेक्षा खोल भानगडीत तो कधीच पडत नाही. सारम् भातम् सुटले की सूर्योदयापासून सूयोदयापर्यंतही नोकरीची ज्याची तयारी, त्या दिव्य महात्म्यांपुढे पोषाखी पांढरपेश्ये कचाकच कच खाऊन नामोहरण झाले, तर यात आश्चर्य कशाचे आणि कोणी करायचे? लक्षावधि दखन्ये बांडगुळे मद्रासी बांडगुळ्यांनी घरोघर रिकामे बसविले, मध्यम वर्गात बेरोजगारी वाढली म्हणून श्रीयुती कुरबूर शहरी पत्रांतून टुरटुरू लागली. पण हे दखनी पांढरपेशे इतके पचपचीत शेळपट, की स्वतःच्या पोटाला मद्राशी कोळशाने आग लावली, हे सिद्ध सत्य धडाडीने उघड बोलून, लिहून दाखवायचीहि यांना हिंमत नाही! आणि म्हणे आम्हाला स्वराज्य पाहिजे!`
यामुळे बेरोजगार मध्यमवर्गाला पहिल्यांदा देशाच्या गरिबीची बाजू घ्यावीशी वाटली. त्यांना गिरणीतल्या कामगारांचा पुळका आला. पण गिरण्यांतला कामगार गावाशी जोडलेला असल्यामुळे पुन्हा गावी जाऊन शेती करू लागला. प्रबोधनकार सांगतात- शेती हेच त्याच्या स्वावलंबनाचे मूळक्षेत्र. बाकीचे हंगामी धंदे तो अळवावरचे पाणीच समजत असतो. संप सुरू होताच, शहरातला खर्च मागे ना, म्हणून चट्कन पडशी खांद्यावर टाकून तो `गावी निघून जातो. याच्या उलट पांढरपेशे लोक पहा. शहरात नोकरीचे टिंपाड वाजले तरी तेथेच पडून असतात आणि सर्व उपाय हरले की वैतागून एक दिवस आत्महत्या करतात! हा नामर्दाचा मार्ग शेतकरी कामगार कधीच पत्करणार नाही. त्याचा आपल्या मनगटाच्या आणि नांगराच्या दांड्यावर भरंसा फार. त्याचा निर्वाणीचा दाता पाण्डुरंग नसून त्याच्या नांगराचा दाण्डुरंगच होय. तोच त्याची आत्मशक्ति. तिच्याच जोरावर तो लवकरच शेतकर्यांचे स्वराज्य निर्माण करील.`
शेतकर्यांची आत्मशक्ती ही खर्या अर्थाने राष्ट्रशक्ती असते, असा आशावाद प्रबोधनकारांनी या प्रकरणाच्या शेवटी व्यक्त केलाय. त्यासाठी त्यांनी त्यांच्या आवडत्या ऑलिवर गोल्डस्मिथच्या कवितेचाही हवाला दिलाय. पण आज स्वतःला शेतकर्यांची मुलं म्हणवणारे सत्तेवर असतानाही शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. स्वातंत्र्य मिळालं, पण प्रबोधनकारांच्या स्वप्नातलं शेतकर्यांचं स्वराज्य काही आलेलं नाही.

