• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

चोरांच्या उलट्या बोंबा!

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
May 8, 2026
in भाष्य, विशेष लेख
0
चोरांच्या उलट्या बोंबा!

एआय

नारीशक्ती वंदन विधेयक लोकसभेत फेटाळले गेल्यावर गलितगात्र झालेले भाजपचे सर्व नेते, त्यांचे पक्षातले आणि मंत्रिमंडळातील चमचे यांच्या मायंदाळ प्रतिक्रिया आल्या, याचे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या याला फारसे आश्चर्य वाटले नाही़ अजूनही ते गुर्‍हाळ चालू आहे आणि तीन राज्यांतल्या निवडणुका पार पडल्या, निकाल लागले तरी ते अखंड चालू राहणार आहे, याची कल्पना पोक्याला आहे. महिलांवरील अन्याय सहन करणार नाही, त्याचा बदला घेतला जाईल, अशा ढोंगी, पोकळ घोषणा करून जनतेला मूर्ख बनवणार्‍या नेत्याला सारा देश पाहतो आहे. राक्षसी महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या आणि हिटलरगिरी करणार्‍या नेत्यांची ही भंपकगिरी देशातील जनतेला समजत नाही, असे नाही. सोशल मीडियावर सगळ्याच नेत्यांची अंडीपिल्ली बाहेर पडत असतात. दुष्कृत्य करणार्‍या भोंदू खरातची लफडी बाहेर पडली आणि अनेक नेत्यांची तंतरली. तशीच पाळी पक्षीय स्वार्थासाठी नारीशक्तीचा उदोउदो करणार्‍या बेगडी नेत्यांवर येणार आहे. महिला विधेयक पुढे नाचवत त्यापाठी चाललेले यांचे स्वार्थी कारस्थान जनतेने ओळखले आहे. ज्यांना स्वतःच्या पत्नीवरचा अन्याय दूर करता येत नाही, त्यांनी देशातील महिलांची चिंता अजिबात करू नये, असे पोक्या म्हणतो. पहेलगाम हल्ल्यात सरकारी सुरक्षेच्या गाफीलपणामुळे निष्पाप पर्यटकांचा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी गोळ्या घालून जीव घेतल्यावर त्यांच्या पत्नीच्या कपाळावरील सिंदूरही पुसला गेलेला नसताना भाजप सरकारने भारतीय संघाला पाकिस्तानशी क्रिकेट सामने खेळायला भाग पाडले होते. या सरकारमध्ये खरोखरच स्वाभिमान शिल्लक असता तर त्याने खड्ड्यात गेले ते उत्पन्न म्हणून ते सामने लाथडले असते. पण पाकिस्तानशी सामने खेळायचे आणि मैदानावर त्या संघाशी हस्तांदोलन करण्याचे टाळायचे, अशी नाटके करणार्‍या पैशांसाठी लाचार असलेल्या नेत्यांना त्यांचे सोयरसुतक नाही. पक्षीय स्वार्थासाठी महिलांची ढाल पुढे करणार्‍या आणि स्वतःबरोबर पक्षालाही अंध:काराच्या खाईत लोटणार्‍या अशा नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे भवितव्य किती उज्ज्वल असेल याची कल्पनाच केलेली बरी, असे पोक्या म्हणतो. विरोधकांमुळे महिला विधेयक नामंजूर झाले, असा आक्रोश करणार्‍या भाजपेयींच्या कोलांट्या आणि स्वार्थासाठी त्यांनी पोक्याला कशा चित्रविचित्र मुलाखती दिल्या आहेत ते एकदा पाहा-

मुख्यमंत्री फडणवीस : नारीशक्ती वंदन विधेयक दोन तृतीयांश बहुमताअभावी नामंजूर झाले ते विरोधकांच्या महिलाविरोधी भूमिकेमुळे. याचा जाब त्यांना विचारण्यासाठी देशभरातील महिलांच्या एक कोटी सह्या आम्ही गोळा केल्या आहेत आणि यापुढे आणखीन नव्याण्णव कोटी सह्या गोळा करण्याचा आमचा संकल्प आहे. महिलांच्या भल्यासाठी आम्ही काय वाट्टेल ते करू. वंदनीय मोदीजींना महिलांविषयी किती आदर आहे, हे वेळोवेळी दाखवून दिले आहे. महिलांना ते देवीस्वरूप मानतात. संसदेतील भाजपा महिला मंत्री आणि खासदार तुम्हाला त्याची खात्री देतील. त्या वसुंधराराजे भोसलेंचे तुम्ही काहीही ऐकू नका. पक्षातील किती महिलांचे भले झाले आहे, ते पाहा. महाराष्ट्र राज्यात एका तरी महिलेवर अन्याय, अत्याचार झालाय का? सरपंच देशमुखांची निर्घृण हत्या करून त्यांच्या बायकामुलांना उघड्यावर पाडणार्‍या वाल्मिक कराडला अद्याप का फाशी दिली जात नाही, असे मूर्खासारखे प्रश्न विचारू नका. भोंदूबाबा खरातने अब्रू लुटलेल्या बायांना आणि खरातची पाठराखण करणार्‍या एका बाईमुळे अडचणीत आलेल्या महिलांना अद्याप का न्याय मिळाला नाही असा सवालही करू नका. प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. राज्यातील महिला अजिबात असुरक्षित नाहीत. कोण म्हणतो, राज्यात महिलांवरील अत्याचार बलात्कार, खुनाखुनीचे प्रकार वाढले आहेत म्हणून! कोण म्हणतो पोलिसांचा, कायद्याचा धाक उरला नाही म्हणून! राज्यातील महिला सुरक्षितच आहेत. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी घाबरण्याचे कारण नाही.

चित्र-एआय

एकनाथ शिंदे : विश्वगुरू आदरणीय मोदीजी पंतप्रधान असेपर्यंत प्रत्येक घरातील महिलेला सन्मानानेच वागवले जाईल. ते महिलांचा किती आदर करतात आणि महिला त्यांचा किती आदर करतात हे मी स्वतः त्यांच्या गुजरातच्या घरी जाऊन पाहिले आहे. असे पंतप्रधान मिळायला भाग्य लागते. मी महिला नसून मला ते लाभले, मग महिलांवर धनवर्षाव झाल्यावर महिलांना ते किती मोठ्या प्रमाणात लाभले असेल याची कल्पना महिलांच्या विधेयकाला विरोध करणार्‍या विरोधकांना यायला हवी. मोदीजी, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है।

पंकजा मुंडे : फडणवीस साहेब मला पाण्यात पाहत असताना केवळ वंदनीय मोदीजींच्या आशीर्वादाने माझे आणि माझा भाऊ धनंजयचे किती भले झाले ते तुम्ही जाणताच. वाल्मिक कराडच्या मैत्रीमुळे धनंजयच्या मंत्रिपदाला फटका बसला हे खरे असले तरी भविष्यकाळात फडणवीस साहेब दिल्लीत गेल्यावर आम्हा दोघा भावंडांची मोदीजींच्या कृपेमुळे कशी चांदी होईल ते तुम्हाला दिसेलच.

चित्रा वाघ : माझ्यासारख्या अडगळीत पडलेल्या महिलेला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या महिलाविषयक विशाल उदार धोरणामुळे न्याय मिळाला हे मी कधीच विसरू शकणार नाही. आज ते विधेयक पास झाले असते तर असंख्य महिलांना राजकारणात पन्नास टक्क्यांहून अधिक जागा मोदीसाहेबांनी दिल्या असत्या. दुर्दैव त्या महिलांचे.

नीलम गोर्‍हे : पोटभरे तिथे गोर्‍हे असे विरोधक म्हणत असले तरी तो माझा न्याय्य हक्क आहे, असे मी समजते. आज ते विधेयक फेटाळले गेले नसते तर माझ्यासारख्या वंचित, उपेक्षित महिलांना राजकारणात बिनधास्तपणे बस्तान बसविता आले असते. मी सुद्धा विधान परिषदेवर पुन्हा गेले असते!

Previous Post

राशीभविष्य ( २ ते ८ मे २०२६)

Next Post

नाय नो नेव्हर

Next Post
नाय नो नेव्हर

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.