• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

गांधीजी आणि जेन झी!

गांधीजी आणि जेन झी!

Marmik Team by Marmik Team
October 3, 2026
in विशेष लेख
0
गांधीजी आणि जेन झी!

अलीकडच्या काळात देशात जेन झी या तरुणाईच्या पिढीने सगळयांचे लक्ष स्वतःकडे आकर्षून घेतलेले आहे. जुलै महिन्यातील दिल्लीतील जंतर-मंतरवरील त्यांचे आंदोलन जगभर गाजले. या आंदोलनापुढे मोदी सरकार झुकले. धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रीपदाचा राजीनामा देणे भाग पडले. सर्वोच्च न्यायालयाच्या असंवेदनशील टिप्पणीतून झुरळ पक्षाचा आणि या आंदोलनाचा जन्म झाला होता, पण, या आंदोलनात सरकारने द्वेषबुद्धीने जेन झीविरुद्ध जितके गुन्हे दाखल केले होते, ते सर्व मागे घेण्याचा आदेश त्याच सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिला. हा आदेश केवळ जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी झालेल्या जेन झीबाबत नव्हता. संपूर्ण भारतभर गुन्हे दाखल झाले होते. ते सर्व गुन्हे मागे घेण्यास सरकारला भाग पाडले. थोडक्यात जेन झीने मोदी सरकारला नमवून दाखवले. १२ वर्षे जे अशक्यप्राय वाटत होते, ते या तरुण मुलांनी अहिंसक मार्गांनी शक्य करून दाखवले.

जेन झीचे आंदोलन दोन महापुरुषांच्या आदर्शानुसार चालविण्यात आलेले होते. महात्मा गांधींचा अहिंसावाद आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर निष्ठा यांच्या बळावर जेन झीने हा विजय मिळविला होता. अहिंसावादातून मिळालेल्या या यशाचे जनक महात्मा गांधी होते. गांधींची स्फूर्तीदायक कहाणी त्यांच्या वयाच्या त्याच टप्प्यात होती, ज्या वयात आज ही जेन झी पिढी आहे, हे मात्र बर्‍याच जणांना ठाऊक नाही. वयाच्या २२व्या वर्षापासून ३३व्या वर्षापर्यंत गांधींचा जीवन प्रवास (आताच्या भाषेत जेन झी असतानाचा जीवनप्रवास) पाहिला तर थक्क व्हायला होते.

गांधी २२व्या वर्षी बॅरिस्टर होऊन भारतात परतले. मुंबईत त्यांनी वकिलीला सुरुवात केली. सुरुवातीला न्यायालयात उभे राहण्यास त्यांना भीती वाटत असे. त्यांची जीभ चाचरत असे. त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नसत. तेथून सुरू झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. २४व्या वर्षी गांधी दक्षिण आप्रिâकेमध्ये वकिली करण्यास गेले. त्यांचे वकिलीचे स्वरूप वेगळे होते. दोन्ही पक्षकारांना ते एकत्र बसवीत, त्यांच्यामध्ये समेटाची बोलणी घडवून आणत. यासाठी तासन्तास खर्च करीत. अखेरीस ते दोन्ही पक्षकारांमध्ये समेट घडवून आणत. २४-२५ वर्षांच्या या मुलाचे दोन्ही पक्षकार ऐकत. त्यामुळे बघता बघता गांधी अत्यंत यशस्वी झाले. समेटाच्या या संकल्पनेच्या पुढे जगाने स्वीकार केला. विकसित देशांमध्ये थेट खटले दाखल होत नाहीत. त्याआधी तेथे दोन्ही पक्षकार आणि त्यांचे वकील एकत्र बसतात. बहुतेक वेळा त्यांच्यात समेट घडून येतो. त्यामुळे पक्षकारांना न्यायालयात खटला दाखल करण्याची गरज भासत नाही. त्यांच्यातल्या समेटावर न्यायालय शिक्कामोर्तब करते. भारतातही गेली काही वर्षे या संकल्पनेचा स्वीकार झालेला आहे. त्यासाठी लोकन्यायालयांची निर्मिती झालेली आहे. या न्यायालयात पक्षकार, वकील आणि न्यायाधीश एकत्र येऊन समेट घडवून आणतात. त्यामुळे वेळेचा आणि खर्चाचा प्रचंड अपव्यय टळतो. दोन्ही पक्षकारांना यश मिळाल्यासारखे वाटते. महात्मा गांधींनी जगाला दिलेली ही देणगी आहे.

अहिंसेच्या तत्त्वज्ञानाचा जन्म
दक्षिण आप्रिâकेमध्ये गांधी वर्णद्वेषाचे शिकार झाले. गांधी ट्रेनमधून ट्रान्सवाल येथे जात असताना प्रथम श्रेणीच्या डब्यात बसले होते. त्यांना तृतीय श्रेणीच्या डब्यात जा असे सांगितले असता त्यांनी त्यास नकार दिला. त्यांना धक्का मारून बाहेर काढले. त्यांचे सामान बाहेर फेकण्यात आले. बाहेर कडाक्याची थंडी होती. गांधींना रात्र कुडकुडत काढावी लागली. गांधी एकदा बग्गीतून प्रवास करत होते. कोचवानने गांधींना उठवले आणि पाठीमागे जाऊन बसण्यास फर्माविले. गांधींनी त्यास नकार दिला. त्यावेळी त्या कोचवानने त्यांना प्रचंड मारहाण केली. एकदा व्हिक्टोरियाच्या अध्यक्षांच्या बंगल्यासमोरून जात असताना एका पोलिसाने गांधींवर हल्ला चढवला. त्यांना बेदम मारहाण केली. गांधींनी कोणाहीविरुद्ध तक्रारी दाखल केल्या नाहीत. सगळयांना उदार मनाने क्षमा केली. गांधी तेव्हा फक्त २५ वर्षांचे होते. अहिंसेचा जन्म तेथे झाला. पुढे हा अहिंसेचा लढा गांधींनी सर्वव्यापी बनवला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात गांधींनी अहिंसेला सर्वोच्च स्थान प्राप्त करून दिले.

गांधी २५ वर्षाचे असताना दक्षिण आप्रिâकेतील सरकारने तेथे राहणार्‍या भारतीयांचे मतदानाचे हक्क काढून टाकले होते. तोपर्यंत गांधींची कीर्ती दक्षिण आप्रिâकेतील सगळया भारतीयांपर्यत पोहोचली होती. त्यांनी गांधींना नेतृत्व स्वीकारण्याची विनंती केली. गांधींनी नेतृत्व स्वीकारले. बिलाच्या विरोधात हजारो भारतीयांच्या सह्या मिळविल्या. ते निवेदन भारतातील व्हाईसरॉयला पाठवून दिले. निषेधाच्या हजारो प्रती काढल्या. त्या इंग्लंडमध्ये आणि भारतामध्ये वितरित करण्याची व्यवस्था केली. दक्षिण आप्रिâकेच्या सरकारची त्यामुळे नाचक्की झाली. त्या सरकारने भारतीयांचे मतदानाचे हक्क काढणारे बिल मागे घेतले.

गांधींनी २६व्या वर्षी उच्चभ्रू जीवनशैली सोडून दिली. त्यामुळे अनेकांच्या थट्टेला त्यांना तोंड द्यावे लागले. गांधी २७व्या वर्षी भारतात परतले. लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, विनोद शाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आदि थोर पुरुषांची त्यांनी भेट घेतली. ही भेट दक्षिण आप्रिâकेतील भारतीय मजुरांच्या दयनीय परिस्थितीबाबत होती. त्यांनी एक पत्रिका काढून त्याच्या २० हजार प्रती सर्वत्र वितरित केल्या. अनेक ठिकाणी भाषणे केली. हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर नेला. त्यामुळे गांधींच्या नावाचा बोलबाला भारतभर झाला.

गोर्‍या गुंडांचा हल्ला
गांधी दक्षिण आप्रिâकेत परतण्यास निघाले. चार महिने त्यांची बोट दक्षिण आप्रिâकेच्या सरकारने बंदराला लावून दिली नाही. त्यांच्या पत्रिकेमुळे दक्षिण आप्रिâकेच्या सरकारची आणि गोर्‍या लोकांची नाचक्की झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी चार महिने गोर्‍या गुंडांनी पाळत ठेवली होती. ज्या दिवशी गांधींनी दक्षिण आप्रिâकेच्या भूमीवर पाऊल ठेवले, त्या दिवशी गोर्‍या गुडांनी गांधींवर हल्ला केला. त्यांना मारून रक्तबंबाळ केले. त्यांच्यावर दगडांचा, विटांचा आणि अंड्यांचा मारा केला. गांधी बेशुद्ध होऊन पडले होते. एका गोर्‍या बाईने मध्ये पडून गांधीचा जीव वाचविला. त्यावेळी गांधी फक्त २८ वर्षांचे होते. या घटनेनंतर हल्लेखोरांपैकी अनेकांचे हृदयपरिवर्तन झाले. त्यांनी गांधींना जन्मभर आपले मानले. मानवी हृदय बदलण्याचा चमत्कार गांधींनी करून दाखवला. २९व्या वर्षी गांधींनी एका कुष्ठरोग्याला आपल्या घरी आश्रय दिला. त्याच्या जखमा धुतल्या. त्याची काळजी घेतली. त्याच्यासाठी त्यांनी स्वतः नर्सिंगचे शिक्षण घेतले.
गांधी आपल्या गोतावळ्यासह दक्षिण आप्रिâकेत गेले होते. एकट्याच्या हिंमतीवर गांधींनी या सगळया गोतावळ्याचे पोषण केले होते. पुढे इतर भारतीयांचा देखील त्यांनी या गोतावळ्यात समावेश केला. त्यावेळी गांधी इतके नम्र होते की त्यांची स्वच्छतागृहे आनंदाने स्वतः स्वच्छ करत होते. कस्तुरबाही त्यावेळी तरुणच होत्या. त्यांना या कामाचा तिटकारा होता. गांधींनी त्यांनाही या कामासाठी तयार केले.

भेटवस्तूंमधून ट्रस्ट
३२ व्या वर्षी गांधी भारतात परतण्यास निघाले. त्यावेळी दक्षिण आप्रिâकेमधील भारतीयांनी त्यांचा फार मोठा सत्कार केला. सत्कारादाखल सोन्याचे मानचिन्ह त्यांना अर्पिण्यात आले. त्यांच्यावर सोन्याची घड्याळे आणि सोन्याच्या अंगठ्यांचा वर्षाव करण्यात आला. कस्तुरबांसाठी खास सोन्याचा नेकलेस बहाल करण्यांत आला. त्या रात्री गांधी झोपले नाहीत. आपले आयुष्य साधेपणासाठी वाहिले असताना हे जडजवाहीर, हिरे कशाला असा प्रश्न त्यांच्या मनाला पडला. सकाळी त्यांनी त्यांचा विचार कस्तुरबांना बोलून दाखवला. कस्तुरबांचे मन स्त्रीचे होते. सोन्याला नाही कशी बोलणार. गांधींनी तिचे मन वळविले. त्यानंतर गांधींनी या सगळया वस्तू विकल्या. विक्रीतून आलेल्या पैशाने ट्रस्ट स्थापन केला. त्यामागे दक्षिण आप्रिâकेतील भारतीयांचे जीवनमान उंचाविले जावे असा गांधींचा मानस होता.

तिसर्‍या वर्गातून भारतयात्रा
३३ व्या वर्षी गांधी भारतात परतले. संपूर्ण भारत उभा आडवा फिरले. रेल्वेच्या तृतीय श्रेणीच्या डब्यातून प्रवास केला. दुबळया, गरीब भारतीयांची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवावी हा त्यामागे खटाटोप होता. तोपर्यत जगभर नाव कमावलेल्या गांधींनी त्या वर्षी भरलेल्या कलकत्ता येथील्या काँग्रेस अधिवेशनात स्वयंसेवकाचे काम केले. तेथील स्वच्छतागृह स्वतः धुतली. तेथे गांधींना फक्त ३ मिनिटे भाषण करण्याची संधी मिळाली. काँग्रेस अधिवेशनातील नेत्यांचा भपका पाहून, कार्यकर्त्यांमधील जातीभेद पाहून गरीबांविषयी उपस्थितांमध्ये कणव नसल्याचे पाहून गांधींचे मन द्रवले. व्यथित मनाने त्यांनी अधिवेशनाचा निरोप घेतला.

गांधीजींचा काळ वेगळा होता. तेव्हाचे सत्ताधीश वेगळे होते. तेव्हाचा भारतीय समाजही वेगळा होता. हिटलरचा आदर्श ठेवणार्‍या आणि नरसंहारी, रक्तपिपासू इस्रायलला पितृभूमी मानणार्‍या आजच्या नृशंस सत्ताधार्‍यांसमोर गांधीमार्गाचा कितपत टिकाव लागणार, अशी आशंका व्यक्त होत असताना कॉक्रोच जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये उतरत असलेल्या जेन झीने गांधीमार्गाला नव्या युगाचा टच दिलेला आहे. कितीही गोळ्या झाडा, गांधी मरत नाहीत, या वास्तवाचे हे दर्शन गांधीवाद्यांना सुखावणारे आहे.

Previous Post

नीरो खंजिरी वाजवत होता…

Next Post

बायपास

Next Post
बायपास

बायपास

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.