अर्ध्या सकाळी उठला. रात्रभर कानात ठेवलेले कापसाचे बोळे त्यानं काढले. रात्रीच्या दणदणाटानंतर अर्ध्या कानात बोळे घालून झोपला होता. कारण झुंडीचा उन्माद! त्यांच्यासमोर कोण जाईल?
अर्ध्याने सकाळची कामं आवरली. चौकात आला. तिथे नम्या मोटारसायकल घेऊन उभा दिसला. बहुतेक किराणा दुकानात काही घ्यायला आला असावा.
‘काय करतोय इकडे?’ अर्ध्यानं त्याला हटकलं.
‘हा यानं फोन केला, मग आलो होतो. हिशेब बघायला. बोल काय म्हणतो?’ नम्यानं उत्तर दिलं. आता दोघांनाही माहीत की ही फिरायची, गावभर चक्कर मारायची वेळ आहे म्हणून. अर्ध्या उत्तर न देता नम्याच्या खांद्यावर हात ठेवून मोटारसायकलवर बसला. नम्यानं गाडी काढली, चौफुलीवर गेले. पलीकडं फुटपाथच्या मागं पिंपळाच्या पारावर ऊनपाळ्या घेत सकाळचा पेपर वाचत एक सत्तरीतला वृद्ध बाबा गांधी टोपी सावरत धोतर आणि नेहरू शर्ट, डोळ्याला भिंगाचा चष्मा लावून बसलेला. नम्यानं गाडी त्याच्यापुढं थांबवली.
‘काय बाबा? आज काय बातमी?’ अर्ध्यानं बाबाला हटकलं.
‘आता काही बातम्या येतात का? आता पेपरं बातमी देण्याच्या ऐवजी डायरेक स्वतःचं मत बनवून देतात. गोम्यानं काही दावे केले तर पेपर बातमी देणार, गोम्याचे आरोप बिनबुडाचे आणि कोपर्यात लिहिणार की असं सोम्या म्हणाला. पण तथ्य काय, हे मात्र स्वत: शोधून सांगणार नाही. आधी पेपरात आकडे यायचे. आता सर्व आकडे गहाळ झाले. वरून आदेश आला, दोन अधिक दोन पाच छापा! हे छापणार!’ बाबा त्याच्याच लहेजात बोलला. जुनी म्हातारी भारी बोलतात. फक्त काही! ज्यांच्यापर्यंत व्हाट्सअपचा रोग पोहोचला नाही अशी!
‘मग वाचता कश्याला हे पेपरं?’ नम्यानं तसा थेट सवाल केला. अर्ध्या मोटारसायकलवरून उतरला अन् बाबाशेजारी जाऊन बसला, पेपरात डोकवत.
‘तुम्ही वाचला नाही तर त्यांचा खप डायरेक घटंल!’ अर्ध्याचा भाबडेपणा!
‘असं थोडंच आहे? ते सौभाग्याचं कुंकू, बाबा-बुवांचे धागेदोरे, गेला बाजार भविष्य तरी विकतीलच की! पेपरात बांधून!’ बाबानं मार्मिक टिप्पणी केली. तसे अर्ध्या आणि नम्या खळखळून हसले.
‘ओ मेंबर!’ रस्त्यानं बुलेटवर फडफड आवाज घुमवीत चाललेल्या एक ढवळ्या बगळ्याला अर्ध्यानं आवाज दिला!
‘साहेब म्हण!’ त्यानं बुलेट नम्या जवळ थांबवत वर अर्ध्याला दम भरला.
‘ऐ बाबा! साहेब म्हण त्याला! आजकाल शिपाईपण साहेबाच्या वरचढ झालाय! ते तर इलेक्टेड मेंबर आहेत.’ बाबानं शालजोडीतून समाचार घेतला.
‘अहो, मेंबर साहेब! तुमच्या मंडळानं रात्री लै धांगडधिंगा घातला हो! कानात बोळे घालून झोपायची वेळ आली मला!’ अर्ध्यानं तक्रार ऐकवली.
‘आमच्या गल्लीत रस्त्यावरचे सगळे बल्ब उडालेत आणि सिमेंट उखडलं बी! रस्त्याचं! गज वर निघालेत. नवं कुणी आलं ना तर गज लागून मरंल!’ पाठोपाठ नम्यानं मोटारसायकल पाराजवळ लावत तक्रारीचा पाढा वाचला.
‘काय रे अर्ध्या? त्या उत्तरेकडच्या गल्लीत ते हिरवे झेंडे घेऊन गाणी वाजली त्या दिवशी! तुझे डोळे फुटले होते का? ह्या जयंत्या-मयंत्या येतात. तेव्हा रात्रभर डीजे वाजतो. तेव्हा कुठे जातो तू? फक्त आपल्याच सणाचा त्रास होतो का तुला? आं?’ मेंबरनं नम्याकडं पूर्ण दुर्लक्ष करत केवळ अर्ध्यालाच उत्तर दिलं.
‘पण ते माझ्या गल्लीत येत नाहीत ना वाजवायला? त्यांनी माझ्या गल्लीत वाजवलं तर त्याच्यावर मी बोलंल ना? बाकीच्या घातक गोष्टींवर बोलायला, पूर्ण गावासाठी निर्णय घ्यायला तर आम्ही तुम्हाला निवडून दिलंय ना?’ अर्ध्या न डगमगता बोलला.
‘तुमच्यासारखी लोकं खरं धर्मद्रोही आहेत. जाऊ दे!’ मेंबर किक मारू लागला गाडीला.
‘अहो, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही..? हॅलो..!’ नम्यानं मेंबरचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
‘आता दुष्काळ जाहीर झालाय. नव्यानं निधी मिळणार नाही! आता पुढल्या सालच्या बजेटमधी होईल ते! आणि असं रस्त्यात थांबवत जाऊ नका! मिटींगा असत्या मला! उगाच नाट लावित्या काही!’ मेंबर डोळ्याला काळा गॉगल लावून बुलेट चालू करून निघून गेला.
‘बाबा, हा मेंबर मुख्यमंत्री झाला तर काय तोर्यात बोलेल हो?’ नम्यानं पारावर बसत विचारलं.
‘लोकं वेडे असतात बाबा! थोडं काही झालं का, त्यांना साहेब साहेब म्हणतात. त्यामुळे हुरळून जातात ती! इलेक्शन हारेपर्यंत राहतात हवेत!’ बाबानं पेपरचं पान उलटलं.
‘पण आधी नव्हता हो हा असा! अगदी वाकून जे बोलाल ते ऐकायचा!’ अर्ध्यानं इतिहास खंगळला.
‘असंच असतं बाबा! भुसार्यातलं पसार्यात निघालं का! त्याच्यात लोकमत आपलं काही बिघडवू शकत नाही, याची खात्री वाटायला लागली, की मग अधिकच..!’ बाबा मंद हसत बोलला.
‘बाबा, लई दिवस झाले बघा! तुम्ही गोष्ट नाही सांगितली. सांगा ना!’ नम्याला काही वेगळंच आठवलं.
‘आता रे? ह्या वेळेला?’ बाबा आश्चर्यानं विचारायला लागला.
‘हो, बाबा! तुमच्या बर्याच दिवसापासून गोष्टी ऐकल्या नाहीत. सांगा ना!’ अर्ध्या पण नम्याच्या हट्टात सामील झाला.
बाबा कोड्यात पडला. पूर्वी सांगितल्या असतील गोष्टी, पण संध्याकाळी निवांतपणे! पण आज ही दोन्ही पोरं ऐन सकाळी गोष्ट सांगायचा हट्ट करतात म्हणजे..?
‘कोणती सांगू?’ बाबानं विचार करत प्रश्न केला.
‘कोणतीही सांगा! फक्त न ऐकलेली सांगा!’ दोघं एकसुरात बोलले.
‘एक आटपाट नगर होतं…’ बाबानं सुरुवात केली. ‘तिथं एक राजा राज्य करत होता.’ बाबा सांगायला लागला.
‘त्या नको! एक राजा होता, त्याला दोन राण्या होत्या. एक नावडती होती, एक आवडती होती. हे ऐकून झालंय. दुसरं काही सांगा.’ अर्ध्यानं वेगळी मागणी केली.
‘दुसरी सांगू म्हणतो? बरं!’ बाबानं गोष्ट बदलली. ‘पूर्वी काही गणराज्य असायची. बव्हंशी उत्तरेत लहान लहान गणराज्य होती. त्यात त्या गणांत एक गणप्रमुख निवडला जाई. त्याला भागपरत्वे विविध संबोधनं असायची. असंच एक छोटं पस्तीस गावांचं एक गणराज्य होतं. सरस्वती नदीच्या काठावर! त्या काळी ती नदी बारमाही वाहायची. त्यामुळे तिथे सुपीकता होती. लोकं कामसू असल्याने उद्योग देखील भरभराटीला आलेले होते. सर्वसंपन्न असं ते गणराज्य होतं.’ बाबा गोष्टीत रमत चालला.
‘मग तिथे बाहेरून कुणा गनिमाने हल्ला केला, घनघोर युद्ध झालं नि त्यात कसाबसा गणराज्याने विजय मिळवला. असे असेल तर पुढे सांगू नका.’ नम्यानं मध्येच त्याच त्याच युद्धकथा ऐकण्याला नापसंती दर्शवली.
‘दरवेळी संकट बाहेरून येत नाही, नमित! लोकं आपणहून संकट निर्माण करतात.’ बाबा नम्याला समजावू लागला.
‘बाबा, कन्टीन्यू करा ना! प्लीज!’ अर्ध्यानं आर्जव केलं.
‘तर एकेदिवशी सगळं सुरळीत असताना एक टोळी उठली. ती म्हणाली की एक गावचा प्रमुख नगरकार जो आहे, तो गणप्रमुख व्हायला हवा. सद्य गणप्रमुख प्रचंड भ्रष्ट आळशी आणि नेभळट आहे. त्यामुळे गणराज्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. ते ऐकून गणप्रमुखाने चाचपणी केली. त्याला सर्व गावांत त्याच्याविषयी अपसमज पसरवला गेला आहे, हे ध्यानी आलं. त्यासरशी त्या भल्या माणसाने पद सोडून वानप्रस्थाश्रम स्वीकारला. त्यामुळे नगरकार गणप्रमुख होण्याचा मार्ग मोकळा झाला. पण हे सहजासहजी होणं शक्य नव्हतं. त्या गणात प्रत्येक निर्णय हा एक ज्येष्ठ आणि तपस्वी माणसाचा कौल घेतल्याशिवाय होत नव्हता. त्यामुळे सर्व जण नगराच्या बाहेर असलेल्या कुटीपुढे जमले आणि त्यांनी आपली संमती त्या तपस्वीला कळवली. त्यानं बहुमताच्या बाजूने लागलीच कौल दिला. लोकांना अत्यानंद झाला. एक चांगला व्यक्ती गणप्रमुख होईल आणि गणराज्याची आणखी भरभराट होईल, ह्या भाबड्या आशेने लोकांनी उत्सव साजरा केला. त्या उत्सवात नव्या गणप्रमुखाने स्वतःला व पदाला सेवकाचा दर्जा घोषित केला.’ बाबा रंगवून सांगत आहे, तर अर्ध्या आणि नम्या कान देऊन ऐकत आहेत.
‘संपली गोष्ट?’ अर्ध्याला प्रश्न पडला.
‘नाही, इथं अर्धी झालीय. पुढे त्या कथित सेवकाने काम हाती घेतल्यावर उद्योग डबघाईला आले, उरलेले सगेसोयर्यांना आंदण दिले. सुपीक जमिनी आपल्याच चेलेचपाट्यांना वाटून दिल्या. खजिन्यातील धनदौलत स्वतःवर खर्च केली. त्यातून स्वतःचे सर्व शौक पूर्ण केले.’ बाबा पुढे सांगू लागले.
‘मग त्याला कुणी थांबवलं नाही?’ नम्यानं प्रश्न विचारला.
‘हो, लोकांना हळूहळू ते ध्यानी येऊ लागलं. लोकं विचारू लागली. पण ऐन कौल घ्यायच्या वेळेला कौल विरोधात जायचा. त्यामुळं सेवकपदावर तो अनभिषिक्त सम्राटासारखा बसू लागला. पण हे दरवेळी घडत राहिलं. कुणीही विरोधात उभं राहिलं तरीही कौल मात्र सेवकाच्या बाजूनेच लागायचा. तपस्वी सेवकाच्या पारड्यात आपलं मत टाकायचा. त्यामुळे लोकांचा हिरमोड व्हायचा.’ बाबानं कथा पुढं नेली.
‘मग लोकांनी जाब विचारायचा ना? तपस्वीला?’ अर्ध्या रागानं बोलला.
‘नाही, तपस्वीला प्रश्न विचारणं त्या गणराज्यात गैर मानलं जाई! पण तपस्वीचे निर्णय, कौल सेवकाच्या बाजूनेच का येतात, याचा काही नागरिक शोध घेऊ लागले. अंती त्यांना सत्य सापडलं.’ इति बाबा.
‘काय?’ अर्ध्या आणि नम्यानं अधीरतेने विचारलं.
‘हेच की तपस्वीचं मधल्या काळात निधन झालं आहे आणि त्याच्या आश्रमाचा कब्जा कुणा बहुरूप्याने घेतला आहे, जो मूळतः सेवकाचाच घरगडी आहे. हे लोकांना कळून आलं. त्यांनी ते पूर्ण गणात जाहीर केलं.’ बाबा कथेच्या शेवटाकडे आला.
‘आणि लोकांनी सेवकाला हाकलून दिलं, कौल निष्पक्ष पद्धतीने लावला जाईल याची वेगळी यंत्रणा उभारली आणि नवीन गणप्रमुख निवडला. आणि सगळे सुखी झाले! असंच ना?’ नम्यानं स्वतःच शेवट ठरवला.
‘पण बाबा? लोकांची मतं विरोधात असताना देखील एकच एक व्यक्ती घोळ करून वा फसवून पुनः पुन्हा कौल जिंकत असेल? तर याचा छडा का लावायचा कसा? ओळखायचं कसं?’ अर्ध्याला काही विचारावं वाटलं.
‘तो गेला ना? त्या मेंबरसारखं सत्ता मग्रूर झाली, निरंकुश झाली की समजावं. त्यांनी लोकांच्या मताला बायपास शोधला आहे. त्यांना तुमची-आमची गरज उरली नाही. त्यामुळे त्यांना तुमच्या आमच्या मताची आता फिकीर नाही.’ बाबानं बोध ऐकवला.

