
सध्याचं सकाळचं फिरणं सर्वार्थाने सुगंधी झालंय! आमच्या सोसायटीतील जागोजागचा मोगरा बहरलाय, तसेच इतर मोगरावर्गीय झाडंपण फुलताहेत. मी जातो त्यावेळी अंधारामुळे पानांआड दडलेली फुलं काहीवेळा दिसली नाहीत तरी सुगंधानी आपापली वर्णी जरूर लावतात. हवेतच एक सुखद गारवा व तजेला असतो. ह्यातच भर पडलीये ती एका बाजूला सर्वांगी बहरलेल्या रातराणीच्या झुडुपाची. अंगभर सुगंधी चांदणगोंदण मिरवणारी ही एक लाडकी लेकच की. अतिशय मधुर असा रातराणीचा गंध रोज नव्याने भुरळ घालतोय सध्या! पावलं थबकलीच पाहिजेत त्या झाडाजवळून जाताना!
अनेक कथाकवितांमध्ये वर्णी लागलेली, रात्रीच्या प्रहरी फुलणारी, अनेक प्रणयकल्पनांमध्ये डोकावणारी रातराणी आणि तिचा गंध न आवडणारा विरळाच असेल. मला ह्या सुगंधाचा एक वेगळा पैलू जास्त भावला, सायंकाळी उमलणारी बाकीची फुलं गंधाबरोबरच आपल्या पांढर्यास्वच्छ रंगामुळे कीटकांना चटकन् दिसतात. रातराणीचा रंग तसा पांढरा नाही, मात्र तो गंधच एवढा प्रबळ असतो की दृष्टीची गरजच नाही- केवळ गंधज्ञानाने तिचा माग लागतो! रात्री म्हणजे अंधाराच्या वेळी फुलून न दिसताही सोबतीची सुखावह जाणीव देणारी ही गंधवती म्हणूनच मला सच्च्या मैत्रीची दूत वाटते.
दरवेळी भेटत नसलो, सतत समोर दिसत नसलो तरी अडीअडचणीला सर्वात आधी एकमेकांचीच आठवण येते… गेल्याच आठवड्यात अलिबागला एका परिचित मायलेकींना मयूर आणि मी सांगत होतो. आपापल्या व्यापात असतांना दोघेही पुण्यात असूनही वेळोवेळी भेटणंच काय, फोनवर बोलणंही दुरापास्त झालंय. मात्र जेव्हा कधी गरज पडते तेव्हा हक्काने एकमेकांना हाक मारताना नंतरच्या सकारात्मक प्रतिसादाची पूर्ण खात्री असतेच.
मैत्री आणि मित्र हा माझ्या आयुष्यातील खजिनाच! वयाच्या त्या त्या टप्प्यावर भेटत गेलेले सवंगडी असोत, नात्यातील नात्यापलीकडची मैत्री जपणारी मंडळी असोत, मठामुळे संपर्कात आलेली अनेक कुटुंबं असोत, वा ओंकार-स्वरूप यांच्यासारखी तरुण स्वयंसेवक मंडळी असोत… कामाच्या जागी जुळलेले हिरेशसारखे पक्के बंध असोत, कायमच ह्या मैत्राने समृद्ध केलेय हे नक्की. जवळपास तीस वर्षांनी अचानक भेटलेली बालमैत्रीण शिल्पाही ह्या निखळ मैत्रीच्या पायावरच सहज माझ्या पूर्ण कुटुंबाशी अगदी नव्याने अगदी सहज जुळली गेली…
सगळं आलबेल असताना तर कोणीही सहज साथ देतं, पण अडीअडचणींतच खरा मित्र कामी येतो. अडचणींची व्याख्या काही अंशी बदलली आहे, असे वाटते मला, आजकाल भौतिक सुबत्ता सर्वसाधारणपणे सर्वत्र आढळते, मात्र ताणतणावयुक्त आयुष्यात रातराणीच्या मधुर गंधाप्रमाणेच तजेला आणते ती एकमेकांना देऊ केलेली सकारात्मकता! पैशाने बाजारात सगळं काही मिळतं तरी ही सकारात्मकता, ते निरपेक्ष प्रेम मिळायला मात्र ही जिवाभावाची मैत्रीची नातीच कामी येतात. एकमेकांच्या गुणावगुणांची जाण असली तरी त्याचा कोणताही गैरफायदा न घेता आपल्यापेक्षा समोरच्याचा जास्त विचार करायला लावणारी ही सुखद मैत्री!
स्वतःचे शंभर बंधुभगिनी असले तरी प्रत्येक प्रसंगी सावलीसारखा वावरणारा कर्ण जसा दुर्योधनाला प्राणप्रिय होता, तसाच द्रौपदीसह पाचही पांडवांचा सखा होता श्रीकृष्ण. अर्जुनाचे सारथ्य करता करता सगळ्या जगालाच गीता सांगणारा तो मार्गदर्शक सखा! अर्जुनाची केवळ स्तुती नाही तर त्याला कर्तव्याची जाणीव व त्याचं या भ्याडपणाचा जाहीर निषेधही करताना तो कचरत नाही! त्याच श्रीकृष्णाच्या मैत्रीचा दुसरा अध्याय म्हणजे सुदामा… त्या लौकिकार्थाने गरीब असलेल्या सुदाम्याला न मागताच भरभराट देणारा तो परमसखा तुमच्या-माझ्यातच दडलेला असतोच, नाही का?
निखळ मैत्रीचे किती व कोणकोणते दाखले द्यावे… कुबेराचेच भांडार ते. कितीही रत्नं वेचली तरी त्या भांडाराला काही कमी नाही पडायचे. श्री रामकृष्णांचे अंतरंग शिष्य ज्या अतूट गुरूबंधुभावाने व निखळ मैत्रीच्या नात्याने जोडले गेले होते नं की त्याच्या किती कथा ऐकाव्या नी सांगाव्या… एवढे नक्की की ठाकुरांच्या पश्चात संघ उभा करणे, तो वाढवणे नी तो आजवर टिकून राहणे ह्याचा पाया ती पहिली पिढी आणि त्यांच्यातील सामंजस्य सलोखा हाच आहे. एकमेकांच्या कमीअधिकतेचे भांडवल न करता प्राप्त परिस्थितीतून पुढे आली ती मंडळी, अर्थातच कृपेबरोबरच ह्या मैत्रीच्या जोरावर.
आयुष्याच्या चढउतारांत, अंधारात पटकन न दिसणार्या पण सुगंधाने आपल्या अस्तित्वाची ठळक जाणीव देणार्या रातराणीसारखेच मैत्र सर्वांनाच लाभो… माऊलींच्या शब्दांत विनवायचे तर. जे खळांची बंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो… भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे…
