• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

किती काळ ‘बुमरा’वलंबी राहणार?

प्रशांत केणी खेळियाड

Marmik Team by Marmik Team
July 31, 2026
in खेळियाड
0
किती काळ ‘बुमरा’वलंबी राहणार?

आयर्लंड, इंग्लंडविरुद्धच्या पराभवांत गोलंदाजांचे अपयश प्रकर्षाने दिसून येते. जसप्रीत बुमरा हा एकाकी शिलेदार; पण त्याला सहाय्यक् ठरेल किंवा त्याच्या अनुपस्थितीत धुरा सांभाळेल, असे नियोजन का केले जात नाही? भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव यांचे काय चुकले? देशात गोलंदाजीची अमर्यादित गुणवत्ता असतानाही मर्यादा का येतायत?

 

‘आयपीएल’नंतर भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्ध मायदेशात निर्भेळ यश मिळवले. मग मात्र धक्क्यांवर धक्के बसले. पहिला धक्का म्हणजे ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भारत आयर्लंडकडून ०-२ आणि इंग्लंडकडून ०-४ असा हरला. सूर्यकुमार यादवला नारळ देऊन त्याच्याच मुंबईच्या श्रेयस अय्यरला दिलेले कर्णधारपद कमालीचे निष्फळ ठरले. किमान एकदिवसीय मालिकेत इंग्लंडविरुद्ध पहिला सामना जिंकून दाखवला. पण पुढे पुन्हा तीच कहाणी. तीन सामन्यांची ही मालिका १-२ अशा फरकाने गमावली. रोहित शर्माची निवृत्ती तूर्तास टळली, हाच काय तो दिलासा म्हणता येईल. तूर्तास भारताने झिम्बाब्वेत मालिका जिंकली आहे; पण या दुबळ्या संघाविरुद्ध वर्चस्व दाखवण्यात कसली मर्दुमकी? त्याआधीच्या मालिकांमधील अपयशाची मीमांसा करणे अधिक महत्त्वाचे ठरते. यात फलंदाजीपेक्षा गोलंदाजीचे अपयश प्रकर्षाने दिसून येते. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या तोडीचा दुसरा गोलंदाज आपल्याकडे नाही, हेही सिद्ध होते. ‘आयपीएल’मध्ये जोपासलेली अमर्यादित गुणवत्ता आजमावण्याची घाई अडचणीत आणते. मग प्रश्न पडतो की, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी यांचे काय चुकले? ह्या अनुभवाची शिदोरी उपयुक्त ठरली नसती का? फिरकी गोलंदाज कुलदीप यादवची निवड करूनही त्याला संघात स्थान का दिले जात नाही? वर्षभराने दक्षिण आप्रिâकेत होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेकडे वाटचाल करताना भारताच्या तयारीचे वाभाडे निघत असतानाही राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे प्रयोग सुरूच आहेत.

बुमरा हा जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याच्यावर विसंबून राहता येते. भेदक यॉर्करचा टिच्चून मारा करणार्‍या ह्या गोलंदाजाच्या बळावर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताला जिंकता येते. तो विश्वचषकात आवश्यक असतो, इतकेच नव्हे तर ‘आयपीएल’मध्येही तो खेळायला हवा. यात वेगवान गोलंदाजांना शाप ठरणारा दुखापतींचा ससेमिरा त्याच्यामागेही लागलाय. तो दुखापतग्रस्त नसेल, ते वर्ष म्हणजे भारतासाठी दिवाळी-दसराच. मग बुमरासाठी वापरावे लागते, ते कार्यभार नियोजन म्हणजे वर्कलोड मॅनेजमेंट. अर्थात तो असतानाही त्याला साथ देऊ शकेल, असे तोलामोलाचे गोलंदाज संघात नसतात. म्हणून भारतीय गोलंदाजी झगडायला लागते. इंग्लंडविरुद्धच्या दोन एकदिवसीय सामन्यांत तो खेळला. त्याच्यामुळे गेल्या काही महिन्यांत प्रथमच भारतीय गोलंदाजीचे सामर्थ्य मैदानावर दिसले. पण तिसर्‍या आणि निर्णायक सामन्यात त्याची सर्वाधिक गरज असताना दुखापतीमुळे माघार घेतली. याचा फायदा घेत इंग्लिश फलंदाजांनी ३ बाद ३८७ ही अजस्त्र धावसंख्या उभारली. भारताने रोहित शर्माच्या झंझावाती खेळीमुळे ७ बाद ३६० असे जोरदार प्रत्युत्तर दिले. पण पराभवाचे २७ धावांचे अंतर हे खराब गोलंदाजीचे आहे. अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार आणि अक्षर पटेल या पाचही गोलंदाजांना इंग्लंडच्या फलंदाजांनी चोप दिला. गुरनूरने १० षटकांत तब्बल ९७ धावा दिल्या. जिथे इंग्लंडने कामचलाऊ फिरकी गोलंदाज जेकॉब बेथेलचा खुबीने वापर केला. तिथे भारताने कुलदीपला विश्रांती देण्यातच धन्यता मानली. कुलदीपने अशी कोणती चूक केली आहे, जिचा फटका त्याला बसतो आहे.

इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारताची पाटी कोरी राहिली. अर्शदीप, हर्षित राणा, प्रिन्स, प्रसिध, अक्षर आणि वरुण चक्रवर्ती असा गोलंदाजीचा ताफा होता. पण हॅरी ब्रुक, जॉस बटलर, फिल सॉल्ट यांच्या धडाकेबाज फलंदाजीपुढे त्यांची डाळ शिजली नाही. त्याआधी आयर्लंडमध्ये गमावलेली मालिका अनपेक्षित, म्हणूनच अधिक जिव्हारी लागली. या दौर्‍यातही अर्शदीप, हर्षित, प्रिन्स, अक्षर आणि शिवम दुबेचा गोलंदाजीच्या मार्‍यात समावेश होता. इथे प्रथमच संधी मिळालेल्या प्रिन्सने २४ धावांत ३ बळी घेत छाप पाडली. पण अन्य गोलंदाजांनी निराशा केली. रवी बिश्णोई दुसर्‍या टी-२० सामन्यात अत्यंत महागडा (६० धावा) ठरला. त्यामुळे आयर्लंड आणि इंग्लंडमध्ये भारतीय संघात दिसला नाही. त्याच्या गोलंदाजीच्या शैलीशी तो संघर्ष करतो आहे.

भारताला गेल्या काही महिन्यांत तीव्र उणीव भासली, ती अष्टपैलू हार्दिक पंड्याची. हार्दिक यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये जेमतेम १० सामने खेळला. पण त्याचे नेतृत्व आणि कर्तृत्व कुठेच दिसले नाही. मुंबई इंडियन्सचे फसलेले गणित सामोरी आल्यामुळे परिणामी पुढील हंगामात हार्दिक ह्या संघात नसेल, हे स्पष्ट झाले आहे. हार्दिक ‘आयपीएल’ खेळतो, ट्वेंटी-२० विश्वचषक खेळतो, एकदिवसीय विश्वचषक उपलब्ध असल्यास खेळतो आणि प्रक्षेपणासाठी उत्तम अशी पाकिस्तानचा समावेश असलेली आशिया चषक स्पर्धा खेळतो. सर्वाधिक दुखापतग्रस्त व्रिâकेटपटू ही त्याची ओळख झाली आहे. त्यामुळे त्यातून सावरण्यासाठी घरापेक्षा अधिक काळ तो बेंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या पुनर्वसन केंद्रात घालवतो. काही महिन्यांपूर्वी त्याने तिथे घरच खरेदी केले आहे. हे झाले नकारात्मक; पण हार्दिकबाबत सकारात्मक सांगायचे तर त्याची जागा घेऊ शकेल असा अष्टपैलू गोलंदाज गेल्या काही वर्षांत झालाच नाही. नितीश कुमार रेड्डी आणि शिवम दुबे हे पर्याय असले तरी त्यांच्यात हार्दिकइतकी धमक नाही. अधूनमधून हर्षितही काही फटके खेळून आपण अष्टपैलू असल्याचा दावा करतो. पण तो फोल ठरायला फार वेळ लागत नाही. हार्दिक तंदुरुस्त नसल्यामुळे संघाबाहेर आहे. रवींद्र जडेजाची स्थिती तशी नाही, तरीही ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार्‍या ह्या अष्टपैलू खेळाडूची भारतीय निवड समितीला ना अफगाणिस्तानविरुद्ध आठवण झाली, ना इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेत. युवा खेळाडूंकडे लक्ष केंद्रित करताना जडेजाला जाणीवपूर्वक विसरणे धोकादायक ठरू शकते. अफगाणिस्तानविरुद्ध मानव सुतारला संधी देण्यात आली. जडेजा यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये तो संघात असतानाही पुरेसा वापरला गेला नाही. दुखापत, संघव्यवस्थापनाचा निर्णय की त्याचा स्वत:चा हे मात्र गुलदस्त्यातच राहिले. त्यामुळे आता आगामी श्रीलंका दौर्‍यावरील कसोटी मालिकेत तरी त्याला संधी मिळते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. ‘आयपीएल’नंतरच्या तिन्ही प्रकारच्या मालिकांचे जे संघ जाहीर झाले, त्यात वॉशिंग्टन सुंदर हे नाव प्रत्येक ठिकाणी होते. हा तसा कामचलाऊ, पण अष्टपैलूच्या निकषांत बसणारा. या दोन महिन्यांत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत अर्धशतक आणि ५ बळी तसेच इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात नाबाद अर्धशतक त्याचे साकारले. पण तो संघात हवा असतो.

आता २०२७ चा आफ्रिकेत होणारा एकदिवसीय विश्वचषक आणि २०२८मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड येथे होणार्‍या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने प्रयोग करण्यापेक्षा अनुभवी गोलंदाजसुद्धा दिमतीला हवे आहेत. ह्यासाठी भुवनेश्वर, सिराज आणि शमी हे तिघेजण कडवी दावेदारी करतात. भुवनेश्वर हा रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या सलग दुसर्‍या ‘आयपीएल’ जेतेपदाचा शिल्पकार ठरला. त्याने १६ सामन्यांत २८ बळी मिळवले. याशिवाय मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही त्याच्या खात्यावर ७ सामन्यांत ८ बळी आहेत. वयाच्या ३६व्या वर्षी त्याने राखलेली तंदुरुस्ती ही वाखाणण्याजोगी आहे. पस्तीशीचा शमीसुद्धा ऐन भरात असून सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर आपली दावेदारी करतो आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या शमीने ‘आयपीएल’मध्ये १३ सामन्यांत १२ बळी घेतले. याशिवाय बंगालकडून खेळताना मुश्ताक अली स्पर्धेत १३ सामन्यांत १२ बळी, विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत ७ सामन्यांत १५ बळी आणि रणजी क्रिकेटमध्ये ७ सामन्यांत ३७ बळी ही त्याची भेदक कामगिरी. पण ती निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी पुरेशी नाही. तिसरा क्रमांक सिराजचा. ट्वेंटी-२० विश्वचषकात बुमराच्या अनुपस्थितीत भारताच्या अमेरिकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने २९ धावांत ३ बळी मिळवत छाप पडली. पण बुमरा परतताच त्याची गरज संपली. गतवर्षी भारताने इंग्लंडमध्ये जाऊन तेथील मालिकेत २-२ अशी बरोबरी राखण्याचा पराक्रम दाखवला. जिथे बुमरा आणि आकाश दीपसारखे गोलंदाज तंदुरुस्तीमुळे प्रत्येकी तीन सामने खेळले. तिथे हा पठ्ठ्या पाचही सामने खेळला. इतकेच नव्हे, तर मालिकेतील सर्वाधिक २३ बळी त्याच्या खात्यावर होते. ३२ वर्षांच्या सिराजने यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये गुजरात टायटन्सकडून खेळताना १७ सामन्यांत १९ बळी मिळवले. याचप्रमाणे मुश्ताक अली स्पर्धेत ४ सामन्यांत ७ बळी आणि विजय हजारे स्पर्धेत ३ सामन्यांत ७ बळी अशी कामगिरी बजावली.

आगरकरचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सप्टेंबरला संपतो आहे, तर गंभीर २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत पदावर असेल. आगरकर जर भविष्यात सोबत नसणारच आहे, तर हे उत्तरार्धातील युवा प्रयोग कशासाठी करतो आहे? तूर्तास, युवकांची मोट बांधताना अनुभवाचीही त्यात भर घालण्याची सुबुद्धी त्यांना मिळो, यासाठी शुभेच्छा आणि झिम्बाब्वेसारख्या ‘पोपटवाडी’ संघाविरुद्ध विजय मिळवल्याबद्दल निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधाराचे अभिनंदन!

Previous Post

डीप स्टेट

Next Post

निसर्गाचे अदृश्य कामगार हरवत चाललेत…

Next Post
निसर्गाचे अदृश्य कामगार हरवत चाललेत…

निसर्गाचे अदृश्य कामगार हरवत चाललेत...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.