• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

कलथून चौथा खांबही गेला!

सॅबी परेरा (विशेष लेख)

marmik by marmik
May 18, 2026
in भाष्य, विनोदी लेख, विशेष लेख
0
कलथून चौथा खांबही गेला!

महाराष्ट्रात प्रकाशित होणार्‍या एका आघाडीच्या प्रातःकालीन दैनिकाने संपादकीय पानावर अग्रलेख छापणे बंद करण्याचा निर्णय घेऊन तो लागलीच अंमलात देखील आणला आहे. वर्तमानपत्रांचा एक नियमित वाचक या नात्याने प्रथमदर्शनी मला हा निर्णय अजिबात पटला नाही. अग्रलेखाशिवाय वर्तमानपत्र म्हणजे सुबोध भावेशिवाय मराठी बायोपिक काढण्यासारखे आहे, असं माझं प्राथमिक मत झालं. पण इतकी वर्षे विविध दैनिकांतील अग्रलेखांनी माझ्यावर जे संस्कार केलेले आहेत, त्या संस्कारांनी मला कुठल्याही निष्कर्षाप्रत येण्याआधी या विषयावर साधकबाधक विचार करण्यास प्रवृत्त केले.

बिन-अग्रलेखाचा पेपर आजवर कधी निघालाच नाही असे नव्हे. आणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील सरकारी दडपशाहीच्या निषेधार्थ काही वर्तमानपत्रांनी अग्रलेखांची जागा कोरी सोडल्याच्या, कधीतरी छोटीमोठी वर्तमानपत्रे चालविणार्‍या ध्येयवादी किंवा सणकी संपादकांनी कसला तरी निषेध म्हणून अग्रलेखाची जागा काळ्या रंगात रंगविल्याच्या, कधी कुणाला अग्रलेखातील मतांबद्दल माफी मागावी लागल्याच्या, कधी कुणाला अग्रलेख मागे घ्यावा लागल्याच्या, तर कधी एखाद्या संपादकाने माफी न मागता शारीरिक मार खाणे पसंत केल्याच्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. परंतु किराणा दुकानात ‘गूळ संपला आहे’ अशी पाटी लावावी त्या थाटात ‘यापुढे आमच्या पेपरात अग्रलेख छापला जाणार नाही’ अशी घोषणा मात्र पहिल्यांदाच ऐकायला, वाचायला मिळते आहे.

यापुढे अग्रलेख न छापण्याचा निर्णय घेण्यामागे त्या माध्यमाच्या व्यवस्थापनाचा काय विचार असेल यावर मनन केल्यावर माझ्या डोक्यात काही शक्यता येतात त्या अशा :

‘कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही’ ही जुनी मराठी म्हण मालकांनी एखाद्या रीलमध्ये पाहिली असेल आणि त्यावरूनच त्यांना, अग्रलेख छापला नाही तरी तांबडं फुटून सकाळ व्हायची राहत नाही, असा साक्षात्कार झाला असावा.
आजच्या ब्रेकिंग न्यूजच्या युगात लोकांना तीस सेकंदात मत हवं असतं. संपादकीय मात्र सांगतं, ‘थांबा, साधकबाधक विचार करूया.’ पण, आजच्या वाचकाला संपादकांचं वैयक्तिक रडगाणं ऐकण्यात रस नाहीये; इतकंच नव्हे तर, विचार करणारे आणि विचार करायला सांगणारे या दोन्ही प्रकारच्या लोकांबद्दल जनमानसात संशयाचं वातावरण आहे.

व्हॉटसअ‍ॅप युनिव्हर्सिटीकडून मिळणार्‍या रेडिमेड मतांच्या प्रोटीनवर वाढणार्‍या या पिढीला माहिती, विचार, निष्कर्ष आणि मग मत हा लांबचा प्रवास झेपत नाहीये. भारताच्या पंतप्रधानांपासून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापर्यंत सर्वांनी काय बोललं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे याबद्दल उपदेशाचे डोस पाजणार्‍या संपादकाला त्याची बायकापोरे देखील गंभीरपणे घेत नसतील तर वाचकांनी, आणि माध्यम-मालकांनी तरी त्याच्या मतांची पत्रास का ठेवावी?

अग्रलेख किंवा संपादकीय म्हणजे वर्तमानपत्राचा असा भाग, जो सर्वात आधी, ‘नंतर वाचू’ म्हणून बाजूला ठेवला जातो आणि न वाचताच रद्दीत जातो. आजकाल लोक संपादकीय वाचत नाहीत आणि एखाद्या घटनेवरील मत बनविण्यासाठी त्यांना संपादकीय वाचणे गरजेचे वाटत नाही. फक्त फोटोखालील ‘नेटिझन्सनी व्यक्त केला संताप ’ही कॅप्शन त्यांना आपलं मत बनविण्यासाठी पुरेशी असते.
वाचकांच्या पत्रव्यवहारात पत्र लिहून संपादकीयातील मुद्द्यांचा प्रतिवाद करण्याचा रिवाजही हळूहळू मागे पडत आहे. सोशल मीडियावर ट्वीट करून किंवा थेट संपादकाला टॅग करून, ‘तुला एवढं सगळं कळतं तर देश चालवायला का जात नाही?’, किंवा ‘तू काय स्वतःला पंतप्रधानांपेक्षा शहाणा समजतो काय?’ अशी संपादकांची व्हर्चुअल कॉलर पकडायलाही लोक कमी करत नाहीत. अग्रलेख न छापण्याच्या निर्णयाने मालकांनी आपल्या संपादकांची कॉलर वाचकांच्या हातून सोडवून घेतली असावी.

वाचकांना आता एखाद्या घटनेचं विश्लेषण आणि पृथ:करण नकोय. दोन बाजूंपैकी ‘देशप्रेमी कोण अन देशद्रोही कोण? हे एका वाक्यात सांगा’ इतकीच वाचकांची अपेक्षा असते.MPSC, UPSC परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि वाचकांच्या पत्रव्यवहारात आपलं नाव आलंय का? हे पाहणारे निवृत्त काका याव्यतिरिक्त आता कुणी पेपरची आणि त्यातील संपादकीयाची वाट पाहत नाहीत हे कटू सत्य त्यांना एखाद्या सर्व्हेत गवसलं असेल…

एक काळ असा होता की संपादकीयाचा वाचकांवर, शासनावर आणि प्रशासनावर वचक असायचा. संपादकीय जनमानस घडवायचं. आता लोकांची मते आधीच इतकी ठाम आणि कट्टर झालेली आहेत की, संपादकीयामुळे वाचकांचा फक्त रक्तदाब वाढतो. संपादकाने कुठल्याही व्यक्तीच्या, राजकीय पक्षाच्या, बाजूचे नसावे तर जनतेच्या हिताचा विचार मांडावा ही सुरुवातीच्या काळातील अपेक्षा मध्यंतरी कुठेतरी लुप्त झाली आणि ‘संपादकाने निष्पक्ष असावे’ असे नवेच फॅड निघाले. ह्यालाही खूश ठेवावे, त्यालाही आनंदी ठेवावे. ह्यालाही छान म्हणावे, त्यालाही चांगले म्हणावे. ह्याचं बरोबर आहे पण त्याचंही चूक नाही म्हणावे… अशी संतुलितपणाची कसरत करता-करता अग्रलेखाच्या भाषेचा पाटेकरी खुळखुळा झालाय.

वाचकांना आता संपादकीय वाचून तथ्य जाणून घेण्यात स्वारस्य नाहीये. त्यांना घटनेचा कार्यकारणभाव नकोय,  विश्लेषण नकोय. त्यांना त्यांनी आधीच बनविलेल्या मतांना पुष्टी देणारा स्क्रीनशॉट हवाय. पेपरमधील संपादकीय हे विमा पॉलिसीच्या ‘Terms & Conditions’हे’सारखं झालंय. ते महत्त्वाचं आहे हे सगळ्यांना माहित आहे, पण वाचत कुणीच नाही. स्वतःच संपादक बनून दिवसाला वाट्टेल तितक्या वेळा आपल्या मतांची पिंक सोशल मीडियावर टाकता येत असताना लोकांना अग्रलेखांचे अप्रूप तरी का वाटेल? चार ओळींची पोस्ट आणि तीस सेकंदांची रील याहून अधिक विचारांचा व्यायाम झेपणारी पिढीच हळूहळू नामशेष होत असताना पेपरवाल्यांनी संपादकीयाचं गुर्‍हाळ तरी कुणासाठी सुरू ठेवायचं?

सगळ्याच महत्त्वाच्या माध्यम संस्थांच्या ई-आवृत्या टीव्हीवरील डेली सोप मालिकांशी स्पर्धा करीत असताना कागदी आवृत्तीने तरी कागदी वाघ बनून, एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा करून, गुरकावत किती दिवस आणि का मागे राहावे? असा प्रश्न आजच्या गळेपडू आणि गळेकापू स्पर्धेच्या युगात पडणे साहजिकच आहे.

कुणी राजकीय साठमारीच्या खमंग बातम्या वाचण्यासाठी, कुणी छोट्या जाहिराती वाचण्यासाठी, कुणी नाटकांच्या जाहिरातीसाठी, कुणी टेंडर नोटिसा पाहण्यासाठी, कुणी वार्ताहराला चहापाणी पाजून दिलेली आपल्या संस्थेची सचित्र बातमी लागली आहे की नाही हे पाहण्यासाठी तर बरेच लोक पेपरच्या वार्षिक वर्गणीपेक्षा रद्दीचे पैसे जास्त येतात म्हणून पेपर विकत घेतात. उशिरा का होईना, संपादकीय वाचण्यासाठी म्हणून कुणीच पेपर घेत नाहीत, ही बाब त्या पेपरच्या मालकाच्या अभिजात डोक्यात आली असणार.
कुणी केलेल्या मारहाणीसाठी ‘सौम्य धक्काबुक्की’चा मथळा द्यायचा अन कुणी केलेल्या मारहाणीसाठी ‘अमानुष मारहाण’ म्हणायचं?, कुणाच्या वक्तव्याला, ‘अनवधानाने बोलून गेले’ म्हणायचं अन कुणाच्या वक्तव्याला, ‘जीभ घसरली’ म्हणायचं?, कुणाच्या राजकीय डावपेचाला ‘धोबीपछाड’ म्हणायचं अन कुणाच्या डावपेचाला ‘खंजीर खुपसला’ म्हणायचं? ‘स्वाभिमान’ आणि ‘गद्दारी’ हे शब्द कधी आणि कुणासाठी वापरायचे? कोणत्या जाती-धर्माच्या गुन्हेगारांची नावे आवर्जून छापायची अन कोणत्या जाती-धर्माच्या गुन्हेगारांची नावे बातमीत लिहिणे टाळायची? ही महत्त्वाचं कामं जर संपादक, मालकाच्या मर्जीप्रमाणे व्यवस्थित करीत असेल तर त्याला आणखी अग्रलेख लिहायला लावून ओव्हरलोड करू नये असा एम्प्लॉयी-फ्रेंडली विचार देखील या निर्णयामागे असण्याची शक्यता आहे. किंवा समाज रसातळाला जाणारच असेल तर उगीच समाजाला दिशा आणि एक्सलरेटर दिल्याचे पातक आपल्या डोक्यावर येऊ नये असा दीर्घकालीन सुज्ञ विचार या निर्णयामागे असणार.

वर्तमानपत्रात वर्तमान असायला हवे. वृत्तपत्रात वृत्त असायला हवे. उगीच संपादकीय लिहून आपल्या वृत्तपत्राचे मतपत्र होऊ देऊ नये असे त्या मालकांचे म्हणणे असू शकते. वृत्तपत्राने राजकारणातील एखाद्या निर्णयावर भाष्य करण्यापेक्षा आज मंडईत कांद्या-बटाट्यांचे भाव काय आहेत? बॉयलर चिकनचा किलोचा दर काय आहे? आजचे राशिभविष्य काय आहे? मटक्यासाठी शुभ आकडा काय आहे? हे वाचकांपर्यंत पोहोचवणे, हे पेपरच्या मालकाला अधिक महत्त्वाचे वाटले असावे.
रोजच्या रोज प्रत्येक राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि (सर्वात जास्त चलती असलेल्या) धार्मिक विषयावर संपादकाने माहिती घेणे, त्यावर विचारमंथन करून आपले मत बनविणे; मग, बनविलेले मत आपल्या मालकाला आणि मालकांच्या मालकांना पसंत पडेल, त्यांच्या आर्थिक, राजकीय, सामाजिक हितसंबंधांच्या आड येणार नाही ह्याची दक्षता घेणे आणि मग ते मत शब्दांचा पिसारा फुलवून आपली विद्वत्ता दिसेल अन वाचकांना निष्पक्ष वाटेल अशा प्रकारे लिहिणे हे खूपच जिकिरीचे काम होते. या पाटी टाकण्याच्या कामातून सुटका झाल्याबद्दल खूश होऊन संपादक महाशय देखील घरी जाताना बायकोसाठी गजरा आणि पोरांसाठी अर्धा डझन हापूस आंबे घेऊन गेले असतील असा माझा कयास आहे.

आज भारताचे सगळे नागरिक दोन स्पष्ट गटांत विभागले गेले आहेत. देशात जे जे काही चालले आहे, होत आहे ते सर्व न भूतो न भविष्यति इतके चांगले आहे असे वाटणारे देशभक्त लोक आणि देशात जे जे काही घडत आहे ते वाईट असून देशाला गाळात नेणारे आहे अशी खात्री असलेले देशद्रोही लोक. हे दोन्ही गट आपापल्या मतांवर ठाम असून दुसर्‍या गटाची बाजू समजून घेण्याची त्यांची इच्च्छाच नाही. त्यामुळे अशा लोकांना काही पटवून देण्यासाठी किंवा त्यांचे मतपरिवर्तन करण्यासाठी संपादकपदावर बसलेल्या शहाण्यासुरत्या व्यक्तीने आपला आधीच बारका असलेला मेंदू झिजवून त्याचा आकार काही

कॉलम-सेंटीमीटर कमी करण्यापेक्षा त्या जागेत एखादी पेड न्यूज किंवा सरकारी विकासाची एखादी रंगीत जाहिरात बसवली तर त्यात वावगे काय आहे?

लवकरात लवकर इतर मीडियासम्राटांनी देखील आपापल्या पेपरमध्ये अग्रलेख छापण्याचा कालबाह्य प्रकार बंद करण्याचा हा प्रातःकाळच्या पेपरचा कित्ता गिरवावा. किंबहुना ट्रम्प, पुतीन, नेत्यान्याहू आणि जिनपिंग ह्यांनी युनोवर दबाव आणून जगभरातील कुठल्याच दैनिकाने, नियतकालिकाने अग्रलेख छापूच नये असा फतवा युनोकडून काढून घ्यावा, या आशयाचा एक अग्रलेख मी आमच्या गावच्या ‘नानभाट बुद्रुक समाचार’ या नियतकालिकासाठी लिहायला घेतला आहे.

Previous Post

डबल ढोलकी!

Next Post

रीलस्टार समाजसेवक

Next Post
रीलस्टार समाजसेवक

रीलस्टार समाजसेवक

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.