• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डबल ढोलकी!

टोक्या टोचणकर (टोचन)

marmik by marmik
May 16, 2026
in टोचन
0
डबल ढोलकी!

महाराष्ट्रातील अमराठी टॅक्सी-रिक्षा चालकांना १५ ऑगस्टपर्यंत फाड फाड मराठी बोलण्यास शिकवले नाही, तर मंत्रीपदाचा राजीनामा देईन, अशी प्रतिज्ञा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माजी खासदार आणि पडेल आमदार संजय निरुपम यांना स्मरण केल्यानंतर त्यांना कुठे ठेवू आणि कुठे नको असे माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्याला झाले. खरे तर ते १ मेपासून ते ही मराठीसक्ती करणार होते, पण मराठी भाषा शिकणे हे शिव्या देण्याइतके सोपे नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी मराठी शिकण्याला मुदतवाढ दिली, हे त्यांच्या दयाळू आणि प्रेमळ स्वभावाला अनुसरूनच झाले, असे पोक्या म्हणतो.

दरम्यान मराठी शिकण्यासाठी अतिशय छान पुस्तिकाही त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन प्रकाशित केली म्हणून फडणवीस साहेबांनीही त्यांचे कोडकौतुक केले. त्यावेळी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये आपण रिक्षाचालक असताना परप्रांतीय रिक्षाचालकांची टाप नव्हती मुजोरी करण्याची, असे एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा पुन्हा सांगितले, तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय उपस्थितांना पर्यायच नव्हता. आता मी रिक्षाचालक असतो तर या परप्रांतीयांना माझ्या पद्धतीने मराठी शिकवले असते असा इशारा त्यांनी दिला तेव्हा सरनाईकांच्या अंगावर काटा, रोमांच, शहारे एकाचवेळी उभे राहिले, पोक्या तिथे होताच. हीच योग्य वेळ आहे सरनाईकांना प्रश्न विचारण्याची असे पोक्याच्या मनात येताच सरनाईक त्याला म्हणाले, तुम्ही माझ्या गगनचुंबी टॉवरमध्ये येऊन मुलाखत घ्या, म्हणजे मला अधिक मोकळेपणाने बोलता येईल. कधी नव्हे तो इतका ज्वलंत विषय माझ्याकडे चालून आल्यामुळे मी माझी जीभ मोकाट सोडली आहे. मी या विषयावर कितीही बोलू शकतो आणि त्याचे कुणालाही माहीत नसतील इतके पैलू उलगडून दाखवू शकतो. गेल्या काही दिवसांत मी पत्रकारांना या विषयावर इतक्या मुलाखती दिल्या, तेवढ्या मुख्यमंत्री सोडून कुठल्याही मंत्र्याने दिल्या नसतील. आपण बीअर किंवा व्हिस्की जशी चव घेत सावकाश पितो तसाच या विषयावर चघळत चघळत आस्वाद घेतला तर त्याची मजा काही वेगळीच असते. माझ्या पूर्वपुण्याईने हे भाग्य मला लाभले, त्याबद्दल मी त्या परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सीचालकांचे शतशः आभार मानतो. माझ्यात मुळात शिकवण्याची म्हणजे शिक्षकाची वृत्ती उपजतच आहे. ती पण मारकुटेपणा करून नव्हे, तर पूज्य साने गुरुजींसारखी. मुलांना प्रेमळपणे अंतःकरणापासून शिकवण्याची, त्यांना प्रेम द्या, ते तुम्हाला प्रेम देतील. परप्रांतीय रिक्षाचालक आणि टॅक्सीवाले तुम्हाला जसे उर्मट वाटतात तसे मला वाटत नाहीत. तुसडे तर ते अजिबात नाहीत. ते भाडे नाकारतात, रिक्षा किंवा टॅक्सी थांबवण्याचा इशारा केला तर दुर्लक्ष करून पुढे जातात, या म्हणण्यालाही तसा अर्थ नाही. एकदा का ते मराठी बोलायला शिकले की मराठी संस्कृतीतील आदरभाव आपलेपणा हळूहळू त्यांच्यात नक्कीच झिरपत जाईल. बाळ जन्माला आल्यावर काही ताबडतोब बोलू लागत नाही. त्याला आई-बाबा म्हणायला शिकवावे लागते. आपले ऐकून ऐकून ते बोलू लागते, तरी तीन चार महिने जातातच यामध्ये आमच्या मराठी शिकण्याच्या फतव्यामुळे त्यांचाही नवा जन्मच होणार आहे. चार महिन्यात ते मराठी भाषा त्यातील शिव्या आणि ओव्यांसह आत्मसात करतील असा विश्वास मला आहे. त्यांना थोडे आंजारून गोंजारून शिकवायची गरज आहे. मी तर म्हणेन, मराठी फक्त बोलायला शिकू नका तर वाचायला आणि लिहायलाही शिका. त्यासाठी वह्या, मुळाक्षरांची पुस्तके, पोथ्या, पेन्सिली, खडू पुरवण्याची जबाबदारी माझी. त्यासाठी भय्यांच्या प्राथमिक रात्रशाळाही आपण काढू. आताही ते मोडके तोडके मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, पण तसे नको. त्यांना संजय निरूपमपेक्षा जास्त चांगले मराठी बोलता आले पाहिजे.

हे रिक्षाचालक प्रामुख्याने उत्तर भारतातले आहेत. त्यांना त्रास दिला तर त्याचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार राज्यात दिसू लागतो. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक आहे, त्यावरही या सक्तीचा परिणाम होईल, असे भाजपा नेत्यांना वाटते. त्यामुळे ते मराठीसक्तीला आणखी वर्षभर मुदतवाढ देण्यासाठी दबाव आणत आहेत, पण मी त्यांना ऐकणार नाही. भय्ये टॅक्सीचालक जर मनापासून मराठी शिकणार असतील तर मी एक काय, पाच वर्षेही मुदतवाढ देईन, पण ते माझ्या मनोदेवतेच्या इच्छेवर अवलंबून असेल. मला फक्त त्यातील काही रिक्षा-टॅक्सीचालकांची गुटखा वा तंबाखू खाण्याची सवय आवडत नाही, त्यावरही उपाय शोधेन. आमचे काही आमदार नशा न करता नशा केल्यासारखे बोलतात. रिक्षा-टॅक्सीचालकांचे तसे नाही. त्यांना नशिल्या पदार्थांचे व्यसन न लागता मराठी बोलण्याचे व्यसन कसे लागेल याचाच मी सतत विचार करतो. मंत्रालयात माझी काही नेत्यांबरोबर बैठकही झाली होती. त्या बैठकीत रिक्षा-टॅक्सीचालकांचे तथाकथित नेते संजय निरुपम, शशांक राव, हाजी अराफत, छगन भुजबळ इत्यादी नेते उपस्थित होते. या सर्वांनी मराठी शिकण्याला दीर्घ मुदतवाढ द्यावी अशी मागणी केली होती, मलाही त्यांचे म्हणणे पटले. उद्या आणखी कोणी काही टॅक्सी-रिक्षाचालकांच्या बाजूने शिकवले तर तेही मला पटेल. शेवटी प्रश्न त्या आपल्या लाडक्या भय्यांच्या रोजगाराचा आहे. मराठी येत नसल्यामुळे त्यांना रोजगार गमवावा लागला तर सर्वात जास्त दुःख मला होईल, म्हणून हा विषय ढकलत ढकलत आमचे मंत्रीपद असेपर्यंत रेंगाळत ठेवता येईल, तितका ठेवावा असे मला मनापासून वाटते. दंडुके छड्या मारून, जबरदस्तीने मराठी भाषा शिकता येत नाही हे सत्य असले तरी टॅक्सी-रिक्षाचालकांना मराठी बोलता आलेच पाहिजे या भूमिकेवर मी ठाम आहे. यातून मी डबल ढोलकी आहे, असा अर्थ कोणी काढू नये. एकवेळ आपले मराठी तरुण बेरोजगार राहिले तरी चालतील, पण या परप्रांतीय चालकांसाठी आपण त्याग केलाच पाहिजे.

Previous Post

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.