• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एका उड्डाणाची दुसरी गोष्ट…

प्रज्ञा सामंत

Marmik Team by Marmik Team
November 27, 2026
in विशेष लेख
0
एका उड्डाणाची दुसरी गोष्ट…

चित्र-एआय

हे विमान फिरते अधांतरी, किती मौज दिसे ही पहा तरी… लहानपणी ऐकलेली ही कविता… आता मोठी झाल्यावरही हवाई सफारीची मौज मला वाटते. मग ते पहिले असो, सातवे असो कि सतरावे असो.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट. फ्लाय ९१ ह्या विमान कंपनीचे, नवी मुंबई ते चिपी मार्गावरील पहिलेच उड्डाण होते. मी उड्डाण दिसल्यावर तिकीट बुक केले होते. आजचे उड्डाण पहिलेच होते हे तेव्हा मला माहीत नव्हते. तर सकाळीच साखरझोप मोडून मी पावणे सहाच्या सुमारास नवी मुंबई विमानतळावर उबरने पोहोचले. सवारीचा खर्च साडे आठशे रुपये (पहाटेची वेळ). चेक-इन करून मी लाउंजमध्ये नाश्ता केला. अतिशय सुके पोहे आणि लगद्यासारखा उपमा. इडली त्यातल्या त्यात बरी होती. चहा घेऊन मी १०७ नंबरच्या गेटजवळ पोहोचले. तिथे बरेच मराठी चॅनेलचे पत्रकार आणि फोटोग्राफर होते. बहुदा २० प्रवासी होते. प्रत्येक चॅनेल त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते. कसं वाटतंय? आनंद झाला का? वगैरे वगैरे… विमानतळावर गेटचे चित्रीकरण, प्रवाशांचे बसमध्ये चढणे ह्याचा व्हिडियो बनतच होता. बसमध्ये बसल्यावरही प्रवाशांच्या बाइट्स घेणे चालू होते.

बसने आम्हाला टरमॅकवर विमानाच्या जवळ सोडले. इथेही व्हिडिओग्राफी आणि बाइट्स घेणे चालूच होते. मी विमानात चढणारी दुसरी का तिसरी व्यक्ती होते. माझी सीट सर्वात शेवटची १८ए होती. मी वर हॅन्डबॅग टाकून आसनस्थ झाले. मग विमानात प्रवाशांचा प्रवेश सुरू झाला. त्यात मध्येच मीडियावाले घुसले आणि त्यांचे वार्तांकन सुरू झाले. पाठी त्यांचा भला मोठा कॅमेरा घेतलेला कॅमेरामन. आधीच छोटे विमान, त्यात ह्यांची गर्दी. अनेक पॅसेंजरना ह्यांची व्हिडिओग्राफी आणि रनिंग कॉमेंटरी होईपर्यंत खोळंबून राहावे लागले. प्रवाशांकडून “जरा जाऊ द्या हो” अशा विनवणीवर “जरा थांबा हो. आमचे होऊ दे” असे उत्तर देण्यात येत होते. क्रू सतत सांगत होता की नागरी उड्डयनच्या नियमानुसार विमानात व्हिडिओग्राफीला परवानगी नाही. पण त्यांचे ऐकतोय कोण? ह्यांचे चालूच.

विमानाचे प्रस्थान ७.५०ला होणार होते. पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे येणार म्हणून विलंब होत होता. विमानाची उड्डाणाची वेळ टळल्यावर मंत्रीमहोदय दीपक केसरकरांबरोबर आले. त्यांच्याबरोबर किती कार्यकर्ते होते ते सांगता येत नाही. पण विमान खचाखच भरले. राणेंची सीट १८ सी होती. माझ्यासमोरच. सगळे कॅमेरामन सरसावले आणि ताडोबात वाघ दिसल्यावर कसा हुरूप येतो, तसा त्यांना हुरूप आला. हवाई कर्मचारी सांगत होते की उड्डाणाला वेळ होत आहे, सर्वांनी आपापल्या जागी आसनस्थ व्हावे. पण कोणाच्या कानात काही शिरत नव्हते. शेवटी राणे आणि केसरकर तिथून उठून विमानाच्या पुढच्या भागात जाऊन बसले. मग कोकणी परंपरेनुसार गाऱ्हाणे घालण्यात आले. त्या गदारोळात आणि गर्दीत राणेंचा बॉडीगार्ड माझ्या बाजूला अडकला आणि तिथेच बसला.

सगळे पारंपरिक सोपस्कार झाल्यावर वैमानिकाने उड्डाणाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले तेव्हा पत्रकार मंडळी आपापल्या जागेवर बसली. त्यांची आपापसात जोर-जोरात चर्चा आणि टीका-टिपण्णी चालू होती. विमान हवेत स्थिरावल्याबरोबर एकजण कॅमेरा घेऊन उठला. क्रूने त्याला ताबडतोब सांगितले की सीटबेल्ट साइन चालू असेपर्यंत उठायचे नाही. मग त्यांचे आपापसात ठरले की सीट बेल्ट साइन काढल्यावर आपण राणेंची बाईट घेऊ. थोड्याच वेळात सीटबेल्ट साइन बंद झाली. त्याबरोबर पत्रकार आणि त्यांचे कॅमेरामन सीट सोडून विमानाच्या पुढच्या भागात जायला गदारोळ करू लागले. क्रू त्यांना सबुरीचा सल्ला देत होते, तो त्यांनी मान्य केला नाही. मला अचानक जाणवले की ७२ सीटच्या विमानात जर पुढच्या भागात, साधारण २५ पॅसेंजर बसलेले आणि २५ मीडियावाले जमा झाले तर विमानाचे वजन पुढच्या बाजूला झुकेल आणि काहीतरी अनर्थ होईल. मी क्रूला इशारा केला, पण त्यांनी हताश होऊन हात वर केले. हे कोणी ऐकत नाहीत, असे ते म्हणाले.

इतक्यात माझ्या बाजूच्या सीटवर बसलेला फ्लाय ९१ कंपनीच्या फ्लाईट इंजिनियरच्या डोक्यात तिडीक गेली. तो उठला आणि तिरीमिरीत पुढे गेला. मीडियाने राणेंना इतके घेरले होते की तो पुढे जाऊ शकत नव्हता. तरी कसेबसे तो मीडियाला बाजूला ढकलत पुढे गेला आणि थेट राणेंवर बरसला “हे काय चालले आहे? हे विमान आहे. इथे अशी गर्दी करून कसे चालेल? विमानाच्या उड्डाणात व्यत्यय येणार नाही काय? हे नियमात बसत नाही.” राणेंनी लगेच “ओ, सॉरी” म्हणत वेळ मारली. मीडियावाले वैतागले आणि त्याचा व्हिडिओ करू लागले. फ्लाईट इंजिनियर म्हणाला, “काढा व्हिडिओ. हवी तिथे कम्प्लेंट करा. मी माझे काम करत आहे. मुळात हे माझे काम नाही. पण तुम्ही क्रूचे ऐकत नाही, हे बघून मला मध्ये पडावे लागले. मलाही आता ह्या घटनेबद्दल रिपोर्ट करावा लागणार.”

मग मीडियावाले नाईलाजाने पुन्हा जागेवर बसले. भले तुम्ही मीडिया असाल, भले तुम्ही लोकांपर्यंत बातम्या पोहोचवत असाल, भले तुम्ही फक्त तुमचे काम करत असाल, तरीही तुम्हाला विमानात अनिर्बंध वागून सर्वांच्याच जिवाला धोका निर्माण करायचा अजिबात अधिकार नाही. जोपर्यंत काही झाले नाही तोपर्यंत तुम्ही बोलत राहणार. पण चुकून जर विमान कलले असते आणि त्याने काही अघटित झाले असते, तर तेव्हा तुम्ही कोणाला जबाबदार धरणार? मीडियाचे लोक बहुदा ३५-४० वयाचे असावेत. बरेच म्हणत होते, “मी विमानात पहिल्यांदाच शूटिंग करतोय.” म्हणजे तुम्हाला नियम माहीत नाही. तुम्हाला टेक्निकल गोष्टींची माहिती नाही. मग तुम्ही क्रूचे का ऐकत नव्हता? अगदी तुमचे स्वतःचे प्रायव्हेट विमान असले तरीही तुम्हाला हवे तसे वागता येत नाही. सेफ्टी इंस्ट्रक्शन्स पाळावेच लागतात. नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

पण मीडियाची फ्रेन्झी, मंत्र्यांचा वरदहस्त आणि सरकारची पब्लिसिटीची गरज ह्या सर्वाच्या नादात आज कदाचित वाईट वेळ येऊ शकली असती. सुदैवाने ती आली नाही. ही विमानसेवा पुन्हा सुरू झाली, त्यात नितेश राणे ह्यांचे प्रयत्न आहेत ह्यात वादच नाही. पण मंत्र्यांनी सुद्धा सुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, हे बघणे गरजेचे आहे.

विमान चिपीला निर्धारित वेळेपेक्षा अर्ध्या तात उशिराने उतरले. कारण होता फक्त हा केऑस. मी शेवटच्या सीटवर असल्याने मी पहिल्यांदा उतरले. राणेंचा बॉडीगार्ड आणि एक कार्यकर्ता माझ्या आधी उतरले. बघते तर विमानतळावर रेड कार्पेट, हार-तुरे, प्रत्येकाला मिठाई-पुष्पगुच्छ सगळे तयार होते. टर्मिनलमध्ये स्टेज उभारले होते. निलेश राणे सर्वाचे स्वागत करत होते. सर्व प्रवाशांबरोबर फोटो झाला. सिंधुदुर्ग कलेक्टर तृप्ती घोडमिसे, एसपी, फलाना टलाना, सगळा गाव लोटला होता. कमानी-फुलांच्या माळा आणि हे कमी होते म्हणून ढोल-ताशे. तुम्ही विचाराल, त्यात वाईट काय? वाईट काहीच नाही. आनंदच आहे. पण मुंबई-चिपी ह्या विमानसेवेत नावीन्य आहे का? तीन वर्षे ही विमानसेवा चालून, मग दोन वर्षे ती बंद होती. करोडो रुपये खर्चून बांधलेला विमानतळ कोकणवासीयांच्या कामी येत नव्हता, हे सर्व किती पटकन सगळे विसरून गेले? एखादे बंद पडलेले काम दिरंगाईने पुन्हा सुरू झाले तर आनंदच आहे. पण त्याचा सोहळा करायची गरज नव्हती. तेही महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना. “काय फालतूगिरी आहे? पुन्हा यायचं का विचार करू” अशी वाक्ये कानावर पडली.

महत्त्वाचा विषय हा आहे की दररोज उड्डाण असलेले हे फ्लाय ९१चे विमान किती दिवस चालणार? सरकारने सबसिडी देऊन त्यांचा तोटा भरून काढायचे आश्वासन दिले आहे, पण माझे मन साशंक आहे. ही विमानसेवा अविरत चालू राहू दे, ही परमेश्वराकडे एक मुंबईकर तसेच एक कोकणी म्हणून माझी प्रार्थना.

देवा महाराजा, बघ जरा काय ता…

Previous Post

मोदीआजोबांचा सल्ला!

Next Post

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.