साधारणपणे जैविक मानवांच्या, म्हणजे तुमच्याआमच्यासारख्या सर्वसामान्यांच्या जगात, आपण आपले काम करत राहावे, त्याचे मूल्यमापन लोक करतील, चांगलं काम केलं तर लोक कौतुक करतील, वाईट काम केलं तर लोक टीका करतील, असं गृहीत असतं. आपण किती हुशार आहोत, आपण केवढा मोठा पराक्रम गाजवला, आपण किती महान आहोत, हे इतरांनी बोलायचं असतं. आपला नेमस्तपणा इतका की पराक्रमी वडिलांची कीर्ती सांगितली तरी त्याच्यासाठी ‘सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख’ असं समर्थ रामदास म्हणून गेले आहेत; जो स्वत:चीच टिमकी वाजवत राहतो, त्याच्याबद्दल रामदास स्वामी काय म्हणाले असते, त्याची कल्पना करणे अशक्य नाही.
अर्थात, वर पहिल्यांदाच म्हटल्याप्रमाणे, हे सगळे बायॉलॉजिकल जन्म झालेल्या आणि लॉजिकल जगणाऱ्या सामान्यजनांसाठीचे नियम. ज्यांचा जन्मच नॉन बायॉलॉजिकल आहे (म्हणजे आपण अवतारपुरुष आहोत, असंही हेच सांगतात) त्यांना हे असले मर्त्य मानवांचे नियम लागू होत नाहीत. त्यामुळे मी सर्व भारतीयांना सल्ला दिला की सोनेखरेदी करू नका आणि त्यांनी तो सल्ला ऐकल्यामुळे आता सोन्याचे भाव कोसळत आहेत, झाला की नाही फायदा, असे स्व-कौतुकाचे उद्गार मोदींनी नुकतेच काढले तेव्हा त्याबद्दल कोणालाच काही आश्चर्य वाटलेले नाही. आकाशात ढग दाटले की विमानं रडारला चुकवू शकतात, असा अद्भुत बेनिफिट घेण्याची क्षमता आहे त्यांची. आपणच हाही बेनिफिट मिळवून दिला, असं त्यांनी ठरवलं असेल, तर त्यांना अडवणार कोण?
यात पुन्हा गंमत अशी की कोणी कोणाला, कशाबद्दल उपदेश करावा, याचेही काही संकेत असतात. आपण कोरडे पाषाण असताना लोकांना ब्रह्मज्ञान सांगू नये, असं मर्त्य मानवांच्या जगात मानलं जातं. अवतारपुरुषांना अर्थातच हेही लागू नाही. नाहीतर, परदेश प्रवास करू नका, महागड्या वस्तू खरेदी करू नका, चंगळबाजी बंद करा, सोने खरेदी करू नका, इंधनावर पैसे उधळू नका, हे सगळे उपदेश करण्याचा आपल्याला अधिकार आहे का, हा प्रश्न त्यांना पडला असता. शिवाय, ज्या देशात आपण ८० कोटी जनतेला जेवणाचा शिधाही मोफत पुरवत आहोत इतकी गरीबी आहे, तिथे युद्धाचं सावट असलेल्या, कमाल बेरोजगारीच्या, महागाईच्या काळात असली चंगळबाजी करण्याची क्षमता किती माणसांमध्ये असेल आणि ज्यांच्यात ती असेल, ती आपल्या आवाहनाला किती धूप घालतील, हा विचार काही त्यांनी केला नव्हता.
आज जगभरात सोन्याच्या किंमती १० ते १५ टक्क्यांनी कोसळल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्याचा मोदींच्या आवाहनाशी संबंध किती? शून्य. सोन्याचे भाव कोसळले आहेत, त्याला अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता, डॉलर अधिकाधिक मजबूत होत जाणे, एआय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागांची पडझड झाल्यामुळे गुंतवणूकदारांना सोन्यातली गुंतवणूक रोखीत बदलावी लागणे, अशी अनेक गुंतागुंतीची आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरची कारणं आहेत. भारतीयांना फिजिकल गोल्ड म्हणजे सोने या धातूची प्रचंड ओढ आहे, आपल्या लग्नसोहळ्यांमध्ये दागदागिन्यांची देवाणघेवाण हा पारंपरिक रिवाज आहे. अस्थिर अर्थव्यवस्थेमध्ये लोकांना सोन्याची गुंतवणूक भरवशाची वाटते. सोन्याचे भाव ज्या पद्धतीने गेल्या शंभरएक वर्षात वाढलेले आहेत, ते पाहता, ही भारतीयांची शहाणीवच म्हटली पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्था सोनेकेंद्रित असण्याच्या पलीकडे फारशी जाऊ शकली नाही, हे आजवरच्या सरकारांचे अपयश आहे. त्यात मोदींचा प्रदीर्घ कार्यकाळही आला. त्यामुळे, मोदींनी आवाहन केलं आणि लोकांनी सोनेखरेदी सोडून दिली, असं काही झालेलं नाही. सोन्याच्या बाबतीत लोक आकाशातून परमेश्वर उतरला तर त्याचं ऐकणार नाहीत, तर स्वघोषित अवताराला कोण विचारतो?
मोदींनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलं, त्या काळात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते आणि सरकारने आयात शुल्कात मोठी वाढ केल्यामुळे आयातही कमी झाली होती, त्यामुळे लोकांनी खरोखरच सोन्याची खरेदी कमी केली होती. हा मोदी यांच्या आवाहनाचा परिणाम असता तर सोन्याचे भाव कमी होताच लग्नसराईत पुन्हा भारतात जोरदार सोनेखरेदी सुरू झाली नसती.
थोडक्यात सांगायचं तर मोदींचा सल्ला आणि सोन्याच्या भावातली चढउतार यांचा परस्परांशी तेवढाच संबंध आहे, जेवढा मोदींचा आणि अर्थशास्त्राचा परस्परसंबंध आहे. कावळा बसणे आणि फांदी मोडणे यांच्यातही याहून अधिक संबंध शोधता येईल. आपला सल्ला लोक ऐकतात, त्यामुळे जगात खूप बदल होतात, असं मोदींना खरंच वाटत असेल, तर त्यांनी विविध सल्ले द्यावेत, असे असंख्य नमुने त्यांच्याच पक्षात खूप भरलेले आहेत. शिवाय, कधीतरी आरशासमोर उभं राहून आपली रुबाबदार छबी न्याहाळत न बसता, स्वत:लाही एखाददोन सल्ले द्यावेत!

