भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेतील एका सामन्यात काही ऑस्ट्रेलियन नागरिकांनी मैदानात प्रवेश करून “SBI – No $1Bn Adani Loan” अशा आशयाचे बॅनर्स झळकवले. आता गौतम अदानी या भारतीय उद्योगपतीला स्टेट बँक ऑफ इंडिया या भारतीय बँकेने कर्ज देण्यास ऑस्ट्रेलियन नागरिक का विरोध करताय हा प्रश्न सामान्य भारतीय नागरिकांना पडणे फार साहजिक आहे.
गौतम अदानी हे भारतातील एक अग्रणीचे मोठे उद्योगपती असून त्यांचा व्यवसाय अनेक देशांमध्ये व्यापलेला आहे. गौतम अदानी यांची कंपनी ऑस्ट्रेलियामध्ये कर्मीशेल कोळशाची खाण आणि कर्मीशेल रेलरोड प्रोजेक्ट अशा दोन प्रकल्पांवर कार्यरत असून ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँड राज्यातील गालिले बेसिन या परिसरात या दोन्ही प्रकल्पांचा विकास केला जात आहे. हा कोळशाच्या खाणीचा प्रकल्प ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठा प्रकल्प असून जगातील काही प्रमुख प्रकल्पांपैकी एक आहे. क्वीन्सलँडच्या वायव्येला असलेल्या क्लेरमॉँट या भागात हा प्रकल्प विस्तारला असून या भागाला “कॅप्रिकोर्णीया” म्हणून देखील ओळखले जाते.
या संपूर्ण प्रकल्पाची किंमत १६.५ अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. या प्रकल्पातून भविष्यात ८० लाख ते १ कोटी टन कोळसा उत्पादित केला जाणार आहे. गेल्या वर्षीच ऑस्ट्रेलियन सरकारने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
गालिले बेसिन हा २,४७,००० वर्ग किलोमीटर वर पसरलेला जगातील सर्वात मोठा कोळश्याचा साठा आहे. पश्चिम चीनमधील खनिजांच्या साठ्यानंतर हा जगातील दुसरा सर्वात मोठा साठा आहे. हा कोळश्याचा साठा अबोट पावर प्लांटशी जोडलेला असणार आहे, ज्यावर गेल्या तीन दशकांपासून अदानीचे नियंत्रण आहे.
हे दोन्ही प्रकल्प कर्मीशेल रेल्वे लाईनने जोडले जाणार असून या रेल्वे रुळाची १० कोटी टन कोळश्याचे दळणवळण करण्याची क्षमता असणार आहे. २२० डब्ब्याच्या ३ रेल्वे या रेल्वे मार्गाचा वापर करणार असून एका फेरीत २३,७०० मॅट्रिक टन कोळशाच्या दळणवळणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ह्या प्रकल्पाचे आयुर्मान ६० वर्षे इतके आहे.
कोण आहे या प्रकल्पाच्या विरोधात?
अदानी यांच्या हा महत्वकांक्षी प्रकल्पाच्या विरोधात ऑस्ट्रेलियन पर्यावरणवादी गेल्या कित्येक वर्षांपासून आंदोलन करत असून क्वीन्सलँडमध्ये अदानी गो बॅक चे नारे तेथील स्थानिक नागरिक देत आहेत. आंदोलकांच्या मते हा प्रकल्प पर्यावरणाचा सर्वनाश करणारा सिद्ध होणार असून या परिसरातील जैवविविधता यामुळे धोक्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ऑस्ट्रेलियाच्या प्रसिद्ध ‘ग्रेट बॅरियर रिफ’ ला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
क्वीन्स लँडच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर वसलेल्या द ग्रेट बॅरियर रिफमध्ये असंख्य छोट्या छोट्या कोरल रिफचा तब्बल २३०० किमी लांबीचा एक मोठा पट्टा आहे. ही ग्रेट बॅरियर रिफ ६०० पेक्षा जास्त शेवाळाच्या व माश्यांच्या प्रजातींचे निवासस्थान आहे. एक संपूर्ण सागरी जैविक व्यवस्था याठिकाणी अस्तित्वात आहे. आता प्रकल्पामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता पर्यावरणवादी या प्रकल्पाला विरोध करत आहेत.
ऑस्ट्रेलियात कार्बन उत्सर्जन हे मोठया प्रमाणावर पर्यावरणाचा समस्यांना कारणीभूत असून कोळसा खनिज प्रकल्प त्याला जबाबदार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणवादी कोळश्याचा उत्पादनाला विरोध करत आहेत, अदानी यांचा प्रकल्पाला त्यामुळेच विरोध केला जातो आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या कोळसा प्रकल्पाच्या निर्मितीसाठी कर्ज देणार असल्याचे समोर आल्याने पर्यावरणवाद्यांनी भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पोस्टर्स घेऊन विरोध दर्शविला आहे.
सध्या भारतात केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषि कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करतोय. या नव्या कृषि कायद्यांनी अंबानी- अदानीचे खिसे भरले जाताय असा आरोप शेतकऱ्यांकडून केला जातोय, त्या पार्श्वभूमीवर अदानी यांना ऑस्ट्रेलियन नागरिक करत असलेला विरोध देखील लक्षणीयच आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन जंगलाला लागलेली भीषण आग ही याच कार्बन उत्सर्जनाचा परीणाम असून दिवसेंदिवस हे संकट भीषण होत चालले आहे, अशा परिस्थितीत अदानी यांच्या प्रकल्पाचे काय होईल, हे येणारा काळच स्पष्ट करेल.