शिवसेनेचे मुंबईच्या सिनेसृष्टीवर अपार प्रेम आहे व त्यामुळेच या सिनेउद्योगाची भरभराट होण्यासाठी, तेथील कलावंतांना न्याय मिळण्यासाठी त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चित्रपट सेना निर्माण केली. ज्या ज्या वेळी ही सिनेसृष्टी किंवा त्यातील कलावंत संकटात आले त्या त्या वेळी शिवसेनेने त्यांना मदतीचा हात दिला. कोणताही जात-धर्म न पाहता बाळासाहेबांनी त्यांना न्याय दिला.
उत्तर प्रदेशात फिल्मसिटी स्थापन करण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत करताच मुंबईच्या फिल्मसिटीवर प्रेम करणारे असंख्य मुंबईकर आणि मुंबईतील फिल्म उद्योगावर अवलंबून असलेले बहुसंख्य कलाकार, तंत्रज्ञ, कामगार यांच्या संतापाची लाट उसळली. शिवसेनेचे मुंबईच्या सिनेसृष्टीवर अपार प्रेम आहे व त्यामुळेच या सिनेउद्योगाची भरभराट होण्यासाठी, तेथील कलावंतांना न्याय मिळण्यासाठी त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी चित्रपट सेना निर्माण केली. ज्या ज्या वेळी ही सिनेसृष्टी किंवा त्यातील कलावंत संकटात आले त्या त्यावेळी शिवसेनेने त्यांना मदतीचा हात दिला. कोणताही जात-धर्म न पाहता बाळासाहेबांनी त्यांना न्याय दिला. आज पुन्हा ती वेळ आली आहे. बाळासाहेब कलाप्रेमी असल्यामुळे कोणताही कलावंत बंगल्यावर जाऊन त्यांच्यापाशी आपले गार्हाणे मांडत असे. बाळासाहेब आणि या कलावंतांची दोस्ती अतूट होती.
मराठी चित्रपटांवर अन्याय होत आहे, असे दिसताच बाळासाहेब तो निवारण्यासाठी धावून जात. ज्यावेळी तामीळनाडूमधील चित्रपटगृहांनी आणि निर्मात्यांनी त्यांच्या राज्यात हिंदी सिनेमा दाखवण्यास बंदी केली होती, तेव्हा बाळासाहेब संतापले. शिवसेना त्यावेळी फक्त दोन वर्षांची होती. १९६८ साल होते ते. बाळासाहेबांनी तत्काळ मुंबईतील सर्व चित्रपटगृहांचे दाक्षिणात्य चित्रपटांचे व दाक्षिणात्य नट-दिग्दर्शक व निर्माते असलेल्या चित्रपटांचे प्रदर्शन थांबवण्याची विनंती केली. मुंबई शहरात शिवसेनेचा वचक तेव्हा जबरदस्त होता. काही चित्रपटगृहांच्या मालकांनी ही विनंती ऐकली नाही, तेव्हा शिवसैनिकांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला. तेव्हा चित्रपटगृह सुरू ठेवू पाहणार्या लालबागच्या गणेश टॉकिजवर शिवसैनिकांनी हल्ला केला आणि १९६७ साली प्रदर्शित झालेल्या व्ही. एस. वीरप्पन निर्मित ‘आदमी’ या चित्रपटाचा चालू असलेला ‘शो’ बंद पाडला. बाळासाहेबांचा युक्तिवाद हा होता की, ‘दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते इतर राज्यांत आपले चित्रपट प्रदर्शित करून पैसे कमावत आणि स्वत:च्या राज्यांची भरभराट करीत आहेत; परंतु हिंदी चित्रपट दक्षिणेत प्रदर्शित होऊ देत नाहीत. दरम्यान, तामीळनाडूमधील एक चित्रपट निर्माते ए. व्ही. मैयप्पन यांनी मार्च १९६८ मध्ये बाळासाहेबांची भेट घेतली आणि त्यांना ‘दो कलिया’ या हिंदी चित्रपटास परवानगी द्यावी, अशी विनंती केली. परंतु बाळासाहेबांनी त्यांच्याकडे तीन मागण्या केल्या.
- तामीळनाडूमधील चित्रपटगृहांमध्ये हिंदी चित्रपट दाखवावेत. यासाठी ए. व्ही. मैयप्पन यांना मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी लागेल.
- मुख्यमंत्र्यांनी हे मान्य केले नाही तर मयप्पन यांना तामीळनाडूत असलेला त्यांच्या स्टुडिओ मुंबईत हलवावा लागेल.
- आणि जर त्यांना येथे त्यांचा स्टुडिओ बांधायचा असेल तर त्यांना मुंबईच्या भूमिपुत्रांना कामावर घ्यावे लागेल. एकही कामगार तामीळनाडूचा नसावा.
या तिन्ही मागण्या जर आपण बारकाईने पाहिल्या तर आपल्याला हे जाणवेल की बाळासाहेबांनी या तीनही अटी घालताना फक्त आणि फक्त मुंबईतील नागरिकांच्या रोजगाराचा आणि शहराच्या अर्थकारणाचा विचार केला. जर स्टुडिओ मुंबईत आला तर मुंबई आणि मुंबईकर दोन्ही घटकांचे कल्याण होईल हे त्यांचे व्यावहारिक गणित होते. ए. व्ही. मैयप्पन लगेचच मद्रासला परतले व तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून नंतर बाळासाहेबांना मद्रासमधील हिंदी सिनेमांवरील बंदी उठविल्याचा निरोप पाठवला आणि बाळासाहेबांनी दिलेल्या अटीही मान्य केल्या. यानंतर लगेचच ‘दो कलिया’ या चित्रपटाला मुुंबईत प्रदर्शित करण्याची परवानगी बाळासाहेबांकडून मिळाली. दादरच्या कोहिनूर चित्रपटगृहाच्या बॉक्स ऑफिसवर सिनेमाच्या पोस्टरवर खाली एक बॅनर लावला होता व त्यावर लिहिले होते की, ‘हे चित्र शिवसेनेच्या आशीर्वादाने रीलीज केले आहे.’
याच सुमारास दक्षिण भारतीय अभिनेते, अभिनेत्री रेखाचे वडील शिवाजी गणेशन गोरेगाव फिल्मसिटी येथे त्यांच्या शूटिंगसाठी आले होते आणि अनेक शिवसैनिकांनी त्यांचे शूटिंग थांबविण्याचा प्रयत्न केला; परंतु बाळासाहेबांनी हस्तक्षेप करीत शिवसैनिकांना ‘मार्मिक’च्या माध्यमातून निषेध न करण्याचे आदेश दिले. बाळासाहेबानी ‘मार्मिक’मध्ये लिहिले की, ‘शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी शिवाजी गणेशन यांनी काही निधी दिला आणि बालगंधर्व यांचा सत्कार करताना त्यांनी नाटक क्षेत्रात बालगंधर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना गुरू मानले. त्याच समारंभात त्यांनी बालगंधर्वांना चांदीच्या बनावटीच्या दोन मोठ्या समया अर्पण केल्या.’
यानंतर हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी बाळासाहेब यांचा मुंबईच्या रणजित स्टुडिओत सत्कार केला.
बाळासाहेबांसाठी ‘कला आणि कलाकार’ हे दोन्ही शब्द अगदी जिव्हाळ्याचे होते. ते स्वत: कलावंत असल्यामुळे त्यांना एखाद्या कलाकाराची तपस्या कळू शकत होती. टेलिव्हिजनवरील एखादा चित्रपट आवडला तर ते दिग्दर्शकाला किंवा अभिनेत्याला फोन करून त्याचे कौतुक करायचे. याने काही झाले नाही तर समोरच्याचा आत्मविश्वास वाढतो ही त्यांची धारणा होती. म्हणूनच आजही अनेक कलावंत मंडळी त्यांची आठवण काढल्याशिवाय राहात नाहीत.
आज मुंबईच्या धर्तीवर उत्तर प्रदेशात फिल्मसिटी काढण्याच्या वल्गना केल्या जात आहेत; परंतु मुंबईच्या चित्रपट उद्योगाशी ज्यांचे नाते आणि तार जुळली आहे, त्यातील नैसर्गिक प्रेमाची ओढ काही वेगळीच आहे. त्याची सर कशालाच नाही.