आपल्या असामान्य कौशल्याने जगभरातील फुटबॉल प्रेमींनी बहाल केलेल्या दिएगो मॅराडोना याचे निधन चटका लावणारे आहे.
गेल्याच महिन्यात ६०वा वाढदिवस साजरा करणाऱ्या मॅराडोनाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दोनच आठवड्यापूर्वी मेंदूवर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर मॅराडोना घरी परतला होता. मात्र, या आजारपणाने त्याला सोडले नाही. घरीच विश्रांती घेत असलेल्या मॅराडोना याला आज हृय विकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले.
फुटबॉल विश्वातील एक महान खेळाडू म्हणून मॅराडोना याची ख्याती होती. ब्राझीलच्या पेले यांच्यानंतर फुटबॉल सम्राट म्हणून मॅराडोना याचेच नाव घेतले जाते. त्याच्याच नेतृत्वाखाली अर्जेंटिनाने १९८६ मध्ये विश्वविजेतेपद मिळविले. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स येथे एका अतिशय गरीब कुटुंबामध्ये मॅराडोनाचा जन्म झाला. जागेत रबराचा चेंडू करून तो फुटबॉल खेळत असे. त्यानंतर अर्जेंटिनाच्या प्रसिद्ध बोका जुनियर या क्लबच्या कुमार संघाकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितले नाही. २० वर्षाखालील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचे अर्जेंटिनाला त्याने विजेतेपद मिळवून दिले. तेव्हा जागतिक स्तरावर एका नवीन ताऱ्याचा उदय होत होता. युरोपमधील व्यवसायिक फुटबॉलमध्ये त्याची एंट्री धडाक्यात झाली.
मॅराडोनाची कारकिर्द पुढे नापोली, बार्सिलोना एफसी असा प्रवास करत फुटबॉल सम्राटपर्यंत येऊन ठेपली.
अर्जेंटिना ने डॅनियल पासरेला यांच्या नेतृत्वाखाली १९७८ साठी वर्ल्ड कपचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर जगप्रसिद्ध फुटबॉलपटू तयार करण्यात अर्जेंटिनाला फारसे यश आले नाही. मॅराडोनाने मात्र विश्वचषक विजयाचे शिवधनुष्य अक्षरशः एक हाती पेलले. १९८६ साली वर्ल्ड कप जिंकून देताना त्याने सामान्य संघाकडून असामान्य कामगिरी करून दाखवली. स्वतः त्या स्पर्धेत गोल मारण्याचा धडाका लावत एक हाती संघाचे मनोबल उंचावले. इंग्लंडविरुद्ध त्याने सात खेळाडूंना चकवून केलेला गोल हा शतकातील सर्वोत्कृष्ट गोल म्हणून गणला जातो. अर्थात त्याच स्पर्धेत पंचांची नजर चुकवून इंग्लंडविरुद्ध त्याने हाताने नोंदवलेला गोल आजही हॅंड ऑफ गॉड म्हणून वादग्रस्त म्हणून परिचीत आहे.
पुढे १९९० साली इटलीमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत देखील मॅराडोना विजेतेपद राखण्याचा निर्धाराने उतरला होता. यजमान इटलीला उपांत्य फेरीत पराभूत करीत मॅराडोनाचा अर्जेंटिना संघ सलग दुसऱ्यांदा विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. या खेपेस देखील त्यांचे प्रतिस्पर्धी होते पश्चिम जर्मनी. वादग्रस्त अशा पेनल्टी किक वर जर्मनीने १-० असा विजय मिळवला. कट कारस्थान करून वर्ल्ड कप आपल्या हातून हिरावून घेण्यात आला, असा आरोप मॅराडोनाने केला.
अंतिम सामन्यानंतर पारितोषिक वितरणाच्या वेळी तो अक्षरशः एखाद्या लहान मुलासारखा हमसून हमसून रडताना साऱ्या जगाने पाहिला.
इटली संघाला उपांत्य फेरीत पराभूत केल्याचा इटलीमधील फुटबॉल आणि व्यवसायिक घटकांना प्रचंड राग आला होता. त्यावेळी मॅराडोना इटलीमधील नापोली संघाकडून खेळत होता. किंबहुना त्याच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळेच नापोली संघाला इटालियन लीगचे विजेतेपद पटकाविले आले होते. म्हणूनच मॅराडोनाला नापोली शहरात देवत्व बहाल करण्यात आले होते. इटली विरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना याच नापोली शहरात होता. त्यावेळी मॅराडोनाने नापोलीवासियांना स्वतःचा देश असलेल्या इटली ऐवजी अर्जेंटिना संघाला समर्थन देण्याचे जाहीर आव्हान केले होते. त्यामुळे इटालियन माध्यमे, कॉर्पोरेट क्षेत्रातून त्याला प्रचंड टीकेचे लक्ष्य करण्यात आले.
पुढे चार वर्षांनी अमेरिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत मॅराडोना पुनरागमन करीत बहारदार खेळ करू लागला होता. पुन्हा फुटबॉल विश्वाची मने जिंकण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र त्याच वेळेस उत्तेजक द्रव्य सेवनात तो दोषी आढळल्याने त्याला स्पर्धेतून बाहेर हाकलण्यात आले. इटालियन माफियानेच हे कारस्थान केल्याचा आरोप मॅराडोना ने केला होता.
एकुणातच त्याच्या कारकिर्दीची अखेर वादग्रस्त ठरली होती. मात्र, त्याची गुणवत्ता, कौशल्य, त्याने फुटबॉल विश्वात केलेली कामगिरी आजही अद्वितीय ठरते आहे. म्हणूनच जगभरातील फुटबॉल प्रेमींनी त्याला गॉड ऑफ फुटबॉल म्हणजेच फुटबॉलचा देव अशी उपाधी दिली.
मॅडोनाने देखील वर्ल्डकप उंचावून युरोपच्या वर्चस्वाला धक्का दिला. नाही रे घटकांचा तो स्फूर्तीदायी विजय होता. कोणताही स्टार खेळाडू नसताना थेट विश्व विजेतेपद मिळवून देणे, ही असाधारण कामगिरी होती. आणि तेव्हाच्या तिसऱ्या विश्वातील समाजाला प्रेरणादायी होती. त्यांच्यात आशेचा अंगार चेतावणारी होती.
फिडेल कॅस्ट्रो यांच्या बरोबरची मैत्री मॅराडोना ने कधीही लपवून ठेवली नव्हती. आणि त्या नातेसंबंधांमध्ये तो कोलकातावासियांच्या अधिकच जवळ पोहोचला होता. २००८ मध्ये कोलकाता दौऱ्यादरम्यान दिएगो मॅराडोना ने ज्योती बसू यांची भेट घेतली होती. त्या भेटीदरम्यान आणि मदर टेरेसा आश्रमामध्ये भेट दिली, त्यावेळी या जिव्हाळ्याची आवर्जून प्रचिती आली. कोलकाताजवळील जाधवपूर येथे मॅराडोनाचे मंदिर आहे.
तसेच अर्जेंटिना राष्ट्रीय फुटबॉल संघाचा अधिकृत फॅन क्लब या ठिकाणी कार्यरत आहे. अर्जेंटिना फुटबॉल संघटना आणि अर्जेंटिना सरकारने त्याला अधिकृत म्हणून मान्यता दिली आहे अर्जेंटिना बाहेरील अशा प्रकारचा अधिकृत फॅन क्लब हा पहिलाच!
संपूर्ण जगावर आपली मोहिनी टाकणाऱ्या फुटबॉलसम्राट पेले यांच्या प्रमाणेच दिएगो मॅराडोना याचा फुटबॉल विश्वात दबदबा आहे. दिएगो मॅराडोना हा आता आपल्यात नसला तरी त्याची कामगिरी फुटबॉल विश्वासाठी कायमच प्रेरणादायी राहील यामध्ये शंका नाही.