जगातील सर्वाधिक प्रतिष्ठीत मानल्या गेलेल्या ऑस्करच्या 93व्या पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ हा मल्याळी चित्रपट पाठवला जाणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ऑस्करमधील अांतरराष्ट्रीय फिचर फिल्म कटॅगरीसाठी हा चित्रपट पाठवण्याचा निर्णय आज घेतला आहे. विशेष म्हणजे यावेळी भारताकडून या कटॅगरीसाठी अनेक चित्रपट स्पर्धेत होते.
‘शिकारा’, ‘छपाक’, ‘सिरीयस मॅन’, ‘गुंजन सक्सेना’, ‘गुलाबो सिताबो’, ‘बुलबुल’, ‘कामयाब’ आणि ‘शकुंतला देवी’ असे एकाहून एक सरस चित्रपट या कटॅगरीसाठी डोळे लावून बसले होते, पण मल्याळी ‘जल्लीकट्टू’ने बाजी मारली.
‘जल्लीकट्टू’बद्दल बोलायचे तर हा चित्रपट केवळ प्रेक्षकांनीच नव्हे तर समीक्षकांनीही वाखाणला आहे. हा एक थ्रीलर ड्रामा असून या सिनेमाच्या सिनेमाटोग्राफीपासून ते पात्र निवडीपर्यंत सगळ्याचीच तारीफ झाली होती. बीएफआय लंडन फिल्म फेस्टिव्हलच्या 63व्या सोहळ्यातही हा चित्रपट दाखवण्यात आला होता. मनुष्य आणि प्राणी यांच्यातील हळव्या नात्याचे चित्रण या सिनेमात खूपच चांगल्या पद्धतीने करण्यात आले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन लिजो जोस पेल्लीसेरी यांनी केलंय, तर ओ थॉमस पेनिकर हे या सिनेमाचे निर्माते आहेत. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीच्या अध्यक्षांनी ही माहिती देताना सांगितले की, अनेक भाषांमधील एकूण २७ उत्तमोत्तम चित्रपटांमधून आम्ही ‘जल्लीकट्टू’ची निवड केली.