बोगस तिकीट तपासणीस बनुन प्रवाशांना लुटणाऱ्या तोतयाला आठवड्यात दुसऱ्यांदा अटक झाली आहे. गणेश अत्रे असे या बोगस टीसीचे नाव आहे. गणेश याला बेलापूर स्थानकात टीसी बनुण प्रवाशांकडून पैसे उकळताना पकडण्यात आले. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात त्याला दुसऱ्यांदा पकडण्याची कारवाई करण्यात आली.
प्रतिक्षानगर सायन येथे राहणारा गणेश हा प्रवाशांना आपण टीसी असल्याचे भासवण्यासाठी वारंवार प्रत्येक स्थानकाच्या बुकींग रूम मध्ये जायचा. बऱ्याच काळापासून बनावट टीसी म्हणून काम करणाNया गणेशची ही मोडस ऑपरेंडी होती. यामुळे प्रवाशांना खरोखरचं तो टीसी आहे असे वाटायचे. शुक्रवार २० नोव्हेंबरला त्याला वडाळा स्थानकात पकडण्यात आले. यावेळी तो प्रवाशांकडून पैसे लुबाडत होता. यानंतर जामिन मिळाल्यानंतर अवघ्या दोनच दिवसात या महाशयाने बेलापूर स्थानक गाठले. मात्र यावेळी बुकींग रूममध्ये फिरत असताना येथील लीपीकाला संशय आल्याने त्याने गणेशची चौकशी केली. या चौकशी टीसीचे ओळखपत्र नसल्याने पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
आठवडाभरात दोनदा जेलची हवा खाणाऱ्या या बोगस टीसीने आतापर्यंत शेकडोहून अधिक प्रवाशांना लुटले आहे. या तोतयाला पनवेल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरीष्ठ पोलीस अधिकारी वैशाली कामणपुरे यांनी सांगितले आहे.
वर्षभरात ११ तोतयांवर कारवाई
बोगस तिकीट तपासणीस बनून प्रवाशांना लूटण्याचा धंदा जोरदार सुरू आहे. मध्य रेल्वेच्या स्थानकांवर वर्षभरात अशा ११ तोतया टीसींना अटक केल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. यावेळी प्रवाशांनीही सतर्क राहून आपल्याकडे तिकीट मागणाऱ्या टीसीचे ओळखपत्र तपासावे असे आवाहन त्यांनी केले.