परमेश्वर नेमका कुठे आहे, हा आस्तिक-नास्तिक दोघांनाही पडणारा समान प्रश्न आहे. माणसाने विश्वाच्या आकलनासाठी तर्काची आणि बुद्धीची चौकट तयार केली आहे. त्या चौकटीत परमेश्वराच्या अस्तित्त्वाचा कोणताही ‘पुरावा’ मिळत नसल्याने परमेश्वर नावाची काही गोष्ट अस्तित्त्वातच नाही, असं नास्तिक मानतात. मुळात तर्काची चौकट ही माणसाची निर्मिती आहे, तिच्यातून परमेश्वर समजत नाही, कारण तो तर्कातीत आहे, असं आस्तिकांचं म्हणणं. यापलीकडचं जग आहे ते श्रद्धाळूंचं. ते वैचारिक वादात पडत नाहीत. परमेश्वरी अस्तित्त्वावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांना तो सगुण-साकार रूपात पाहायला आवडतो. परमेश्वरी शक्तीच्या आकलनासाठी मंदिरं, तीर्थस्थळं अशी माध्यमं त्यांना हवी असतात. ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या’ अशी त्यांची भावना असते…
कोविड-१९च्या म्हणजे कोरोनाच्या संकटाने साक्षात् देवांनाही टाळेबंदीत टाकले आणि मंदिरे बंद झाली… त्याने सश्रद्धांचा जीव कळवळला आणि श्रद्धेचा बाजार मांडणाऱ्यांना त्यातून राजकारण करण्याची संधी मिळाली. देवळात गेल्यावर ज्याला शांत वाटतं, इष्टदेवतेची मूर्ती पाहिल्यावर प्रसन्न वाटतं, भजन-कीर्तनाच्या सुरात जो तल्लीन होतो, त्या भाविकाला मंदिरं बंद झाल्याने चुकल्याचुकल्यासारखं झालंच. पण हे होण्यामागचं कारण त्याला नीट माहिती होतं. देवालयांमधली गर्दी आपल्याच जिवाला घातक ठरेल आणि वेळेआधीच जिवाशिवाची भेट घडवून आणेल, हे समजण्याइतका भाविक सुबुद्ध होता. त्याचबरोबर भाविक वृत्तीच्या प्रत्येकाला हेही माहिती असतं की देव देवळात नाही, दगडाच्या मूर्तीत नाही, तो माणसाच्या हृदयात आहे, श्रद्धेने डोळे मिटले की भगवंत आपल्याला हव्या त्या रूपात त्या आतल्या नजरेसमोर साकार होतो… त्यामुळे कोरोनाचं संकट टळेपर्यंत देवालयात जाण्याची आणि आपला किंवा इतरांचा जीव धोक्यात घालण्याची गरज नाही, हे त्याला कळत होतं. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जेव्हा कोरोनाच्या संकटाचा अदमास येईपर्यंत मंदिरं उघडणार नाहीत, या ठाम भूमिकेचा उच्चार केला, तेव्हा भाविकांनी मनोमन त्या निर्धाराला दुजोराच दिला.
त्यातही राजकारण करू पाहणाऱ्यांनी विविध प्रकारची आंदोलनं करून पाहिली, मात्र त्यांना त्यांच्या अपेक्षेएवढी गर्दी जमली नाही, कारण सर्वसामान्य जनतेला मंदिरं काही काळापुरती बंद असण्यामागचं कारण पटलेलं होतं.
देवालाही राजकारणात ओढणाऱ्यांना भीक न घालता जेव्हा योग्य वाटलं तेव्हा मंदिरं उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि आजपासूनच भाविकांना परमेश्वराचं, त्यांच्या आवडीचं सगुण-साकार रूप पाहण्याची मुभा मिळाली आहे. अर्थात, सर्वच मोठ्या मंदिर व्यवस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी आणि शारीर अंतराचे, मुखपट्टीचे नियम पाळले जावेत यासाठी नियमावली आखली आहे. तिचं पालन करूनच देवदर्शनाचा आनंद लुटता येणार आहे.
आज ‘देवाचिये द्वारी’ क्षणभर उभे राहण्याचे भाग्य ज्यांना लाभेल, ते मनोमन आनंदलाटांमध्ये डुंबतील यात शंकाच नाही. परमेश्वराचं मूर्तीरूप दर्शन त्यांच्या डोळ्यांत पाणी आणेल. अनेकांना तर काही काळ दुरावलेला जिवलग भेटल्याचा आनंद मिळेल. मात्र, देवाच्या दारी उभा राहिल्यावर भाविकाच्या मनात काय काय विचार येतील? कोरोनाकाळ हे देवानेच माणसाला काही शहाणपण शिकवण्यासाठी आणलेलं संकट होतं, अशी आपली प्रामाणिक श्रद्धा असेल, तर या संकटातून देवाने दिलेला धडा आपण शिकणार आहोत का?
माणूस पृथ्वीवरचा सर्वशक्तिमान जीव आहे आज. काही हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरचा नगण्य प्राणी असलेल्या मानवाची ही झेप विस्मयचकित करणारी आहे. मात्र, माणूस निसर्गावर विजय मिळवून, त्याला कह्यात घेऊन पृथ्वीचे भाग्यविधाते असल्यासारखा वागू लागला आहे. एक अतिसूक्ष्म कण, ज्याच्यात जीवही नाही असा एक विषाणू या सर्वशक्तिमान मानवाला गुडघ्यावर आणू शकला. त्याने सगळ्या जगाचं चक्र थांबवलं, याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत का?
कोरोना बळावल्यानंतर अनेक छद्मधार्मिकांनी देव आणि धर्माच्या नावाखाली काही द्रव्यं औषधी म्हणून खपवण्याचा प्रयत्न केला. काही भोंदू बुवांनी आपल्या आशीर्वादाने कोरोना बरा होतो किंवा कोरोनाचा संसर्ग होत नाही, असे दावे केले. कोविडच्या विषाणूने भक्तांबरोबरच अशा बुवांना आणि वैदूंनाही संसर्गाचा तडाखा दिला आणि अनेकांनी हकनाक जीव गमावला. यातून आपण काही शिकलो आहोत की नाही?
माणसं अडकून पडल्याने निसर्ग मुक्त झाला, बहरला. पक्षी मुक्तपणे बागडू लागले, हवा स्वच्छ झाली, उन्हाचा ताप मंदावला आणि एकंदर मानवेतर जीवनाने सुटकेचा सुस्कारा सोडला. तो आपण ऐकला की नाही?
कोरोना संकटाने अनेकांचे रोजगार हिरावले, कामं बंद पाडली, मात्र त्याचवेळी अनेकांना आपल्यातल्या वेगळ्या क्षमतांचा प्रत्यय आला, आपल्यातली उद्योजकता समजली, कोणतंही काम हलकं नसतं, प्रामाणिकपणे करायच्या कोणत्याही कामाची लाज बाळगायची नसते, हा धडा ठरावीक चाकोरीत अडकलेल्यांना मिळाला, तो आपण शिकलो का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘देवाचिये द्वारी’ क्षणभर उभे राहिल्यावर डोळे मिटून आपल्या मनाला विचारायला हवीत… त्यांची उत्तरं काय येतात, यावर देवाने कोरोनासंकटाच्या रूपाने शिकवलेला धडा आपण किती शिकलो आहोत, याचं उत्तर मिळणार आहे आणि ते यापुढच्या जगात फार महत्त्वाचं ठरणार आहे.