बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन ऊर्फ बिग बी यांची नात आणि ऐश्वर्या-अभिषेक यांची मुलगी आराध्या आज 9 वर्षांची झाली. 16 नोव्हेंबर 2011 या दिवशी जन्मलेल्या आराध्याच्या वाढदिवसाचे निमित्त साधत दादाजी अमिताभ यांनी तिचे क्युट असे 9 फोटो कोलाज करून चाहत्यांशी शेयर केले, तर पापा अभिषेक याच्यासोबत आराध्याचा ताजा फोटो त्याचा मित्र सिकंदर खेर याने सोशल माध्यमांवर शेयर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोखाली कॅप्शनमध्ये सिकंदर लिहितात, लिटिल लेडी आराध्या हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा… सिकंदरने पोस्ट केलेल्या फोटोत आराध्या आपल्या पप्पांशी खेळताना दिसतेय.
या पोस्टआधी दादाजी अमिताभ यांनी नातीसाठी केलेल्या एका खास पोस्टमध्ये आराध्याचे गोड 9 फोटोंचे कोलाज करून ते आपल्या पेजवर टाकले आहे. या फोटोत आराध्या प्रत्येक वर्षाच्या बर्थडेला कशी दिसत होती त्याची कल्पना येते. हा कोलाज फोटो टाकताना बिग बी म्हणतात, ‘हॅप्पी बर्थ डे आराध्या, माझे सर्व प्रेम केवळ तुला आहे.’ या वाक्यानंतर त्यांनी अनेक हार्ट इमोजीस टाकले आहेत. प्रत्येक फोटोवर बिग बी यांनी नंबर टाकलेला आहे. त्यावरून आराध्या कशी मोठी होत गेलीये ते कळतेय.
पप्पा अभिषेक बच्चन आणि मम्मी ऐश्वर्या राय-बच्चन यांनी यापूर्वीच जाहीर केलंय की यंदा मुलीच्या वाढदिवसाचे कोणतेही सेलिब्रेशन केले जाणार नाहीये. यंदा दिवाळीही बॉलीवूडकरांनी अगदी थोडक्यातच साजरी केली आहे. त्यामुळे आराध्याच्या वाढदिवसाचा सोहळाही घरातल्या घरातच करण्यात आला.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बच्चन कुटुंबीयांनी यंदाची दिवाळी पार्टीही केली नाही. याचे कारण देताना अभिषेक बच्चन याने एका इंटरव्यूमध्ये म्हटले होते की, यावर्षी आमच्या कुटुंबात काही सदस्यांचे निधन झाले आहे. माझी बहीण श्वेता हिची सासू रितू नंदा यांचे निधन झाले आहे. अशा स्थितीत दिवाळी पार्टी करण्याची कुणाचीच मन:स्थिती नाही, असेही त्याने स्पष्ट केले होते. याच वर्षी 14 जनवरी रोजी रितू नंदा यांचे निधन झाले, तर त्यानंतर रितू नंदा यांच्या भावाचे म्हणजे ऋषी कपूर यांचेही कॅन्सरमुळे 30 एप्रिल रोजी निधन झाले होते.