कोरोना संकटामुळे महसुली उत्पन्नात झालेली 50 टक्क्यांची घट, केंद्राकडे असलेली जीएसटीची 29 हजार कोटींची थकबाकी या पार्श्वभूमीवर राज्याचा आर्थिक डोलारा सावरताना अर्थमंत्री अजित पवार सोमवारी दुपारी 2 वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर देतानाच पेट्रोल, डिझेल करात कपात करून महागाईच्या संकटातून दिलासा मिळणार का, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवडय़ातील पहिल्याच दिवशी आज विधानसभा, विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर होणार आहे. कोरोना संकटाचा सामना करताना राज्य सरकारने अधिकाधिक पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर द्यावा त्याच प्रमाणे मोठय़ा प्रमाणावर रोजगारनिर्मिती मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना वित्त विभागाकडून मिळाल्या होत्या. त्याचे प्रतिबिंब आज सादर होणाऱया अर्थसंकल्पात उमटणार आहे. शहरी तसेच ग्रामीण भागांतील रस्ते, मेट्रो प्रकल्प, सिंचन प्रकल्प यासाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असणार आहे.
पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे महागाई मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. यातून दिलासा मिळण्याची केंद्र सरकारकडून कोणतीही आशा नाही. अशा परिस्थितीत राज्य सरकार मात्र जनतेला दिलासा देण्याचा विचार करीत असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यामुळे या अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल करकपात होऊन दिलासा मिळेल अशा जनतेच्या अपेक्षा आहेत. राज्य सरकारने कर कपात केल्यास पेट्रोल दोन रुपयांनी व डिझेल 1 रुपयाने कमी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱयांना दिलासा देणार
कोरोना संकटातही राज्यातील कृषी क्षेत्राने दिलासा दिला आहे. कृषी क्षेत्रातील उत्पन्नात 11.7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा लाभ शेतकऱयांना मिळणार असून सौर कृषिपंप, अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी योजना, दर्जेदार बियाणे त्याचप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजनेनुसार वेळेवर कर्जफेड करणाऱयांना प्रोत्साहनपर निधी देण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद होण्याची शक्यता आहे.
सौजन्य : दैनिक सामना