कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नाशिक येथील 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन स्थगित करण्याचा निर्णय आज रविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी जाहीर केला. मे महिन्याच्या आत हे संमेलन घ्यावे असे महामंडळाला अपेक्षित आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात डिसेंबरपर्यंत कोरोनाची स्थिती आटोक्यात आल्याने साहित्य महामंडळाने लोकहितवादी मंडळाचे निमंत्रण स्वीकारले. नाशिक येथे 26 ते 28 मार्च या कालावधीत 94वे साहित्य संमेलन घेण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात नियोजनही सुरू होते. एकूणच काम वेगात सुरू असताना कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. यामुळे साहित्य महामंडळाने सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संमेलन स्थगितीचा निर्णय घेतला आहे. संमेलन अध्यक्ष, निमंत्रित साहित्यिक यात बदल होणार नसल्याचेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सौजन्य : दैनिक सामना