ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर सिरमची आणखी एक लस येत्या जूनपर्यंत येण्याची शक्यता असून ही लस ब्रिटिश कोरोनावर 89 टक्के प्रभावी असल्याचा दावा सिरमने केला आहे. सिरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी नोवावॅक्स इंकसोबत भागीदारी करीत ‘कोवावॅक्स’ या नव्या कोरोना लसीचे ट्रायल सुरू करण्यासाठी अर्ज केला आहे.
कोवावॅक्स ही लस ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेत पसरणाऱया कोरोनाच्या नव्या स्ट्रेनविरोधात प्रतिकारशक्ती विकसित करण्यास प्रभावी असल्याचे सिरम आणि नोवावॅक्स इंकचा दावा आहे. अदार पूनावाला यांनी ट्विट करीत या लसीचे उत्पादन जून 2021 पर्यंत सुरू होण्याची आशा व्यक्त केली. सिरममध्ये सध्या कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन सुरू आहे. ही लस ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि एस्ट्राजेनकाच्या सहाय्याने विकसित करण्यात आली आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने या लसीचे 1 कोटी 10 लाख डोस खरेदी केले आहेत.