स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी सर्वोच्च न्यायालयाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह ट्विटबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. मी मर्यादा ओलांडली असे न्यायालयाला वाटत असेल आणि माझे इंटरनेट अनिश्चित काळासाठी बंद करणार असतील तर मीसुद्धा माझ्या कश्मिरी मित्रांप्रमाणे प्रत्येक 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्टकार्डे लिहीन असे कामरा यांनी न्यायालयाला सांगितले आहे.
सोशल मीडियावर न्यायालय आणि न्यायाधीशांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या आरोपाखाली गेल्या 18 डिसेंबर रोजी कुणाल कामरा यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्यावर कामरा यांनी न्यायालयात आज प्रतिज्ञापत्र सादर केले.
‘कोणत्याही विनोदाची पाठराखण करण्याची गरजच नाही. विनोद म्हणजे हास्य कलाकाराचा एक विचार असतो आणि लोकांना हसवण्यासाठीच तो लोकांपर्यंत पोहोचवतो. विनोद काही खरा नसतो. अनेक लोक त्यांना विनोद आवडला नाही तर प्रतिसादही देत नाहीत. दुर्लक्ष करतात आणि तिथेच विनोदाचा शेवट होतो.’ असे कामरा यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.