2008च्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ओलीस लोकांना वाचवताना शहीद झालेल्या संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनकार्यावर बेतलेला ‘मेजर’ हा चित्रपट बनला आहे. यात मराठमोळी सई मांजरेकर हिचीही एक महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहे.
सईने आपल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच इन्स्टाग्रामवर जाहीर केली. हा सिनेमा 2 जुलैला प्रदर्शित होतोय असे तिने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. या पोस्टमध्ये तिने या सिनेमाचे पोस्टरही चाहत्यांसाठी शेयर केले आहे. कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘मेजर… 2 जुलै 2021 रोजी रिलीज होणार आहे हे जाहीर करताना मला आनंद होतोय.
या रिलीजमुळे माझ्यापेक्षा कोण जास्त एक्सायटेड असू शकेल? या सिनेमाचा भाग झालेय याचा खरोखर आनंद होतोय. मेजर संदीप उन्नीकृष्णन हे देशाचे हीरो आहेत. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगूमध्ये पाहायला मी उत्सुक झाले आहे.’ महेश मांजरेकरांच्या या कन्येने सलमान खानच्या ‘दबंग-3’ सिनेमातून 2019 साली बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. ‘मेजर’ या सिनेमात तेलुगू अभिनेता अदिवी शेष हा प्रमुख भूमिकेत आहे, तर महेश बाबू आणि शोभिता धुलिपाला यांच्याही यात केंद्रीय भूमिका आहेत.