निसर्ग सौंदर्याची खाण असलेल्या आपल्या देशात अशा कितीतरी वनस्पती आहेत की ज्यांचा अद्याप थांगपत्ताच लागलेला नाही. त्यात मेघालय म्हटले तर निसर्ग सौंदर्याची उधळणच. या मेघालयाच्या जंगलातून इलेक्ट्रिक अळंबी संशोधकांनी शोधून काढली आहे. रात्रीच्या वेळी प्रकाशमय होणार्या या मशरूमचे तीन विविध रंग त्यांना पहायला मिळाले.
मेघालयाच्या हिल्स जिल्ह्यातील मॉवलीनॉन्स आणि क्रांग सुरी या भागात या इलेक्ट्रिक अळंबी पहायला मिळाल्या आहेत. मेघालयाच्या जंगलात सापडलेली ही वनस्पती जगातील चमकणार्या मशरूमच्या यादीत 97 व्या क्रमांकावर नोंदविण्यात आली आहे. या वनस्पतीचा शोध हिंदुस्थान आणि चीनच्या संशोधकांनी एकत्रित लावला आहे.
ही संशोधक मंडळी पावसाळ्यानंतर आसाममधील जंगलात बुरशी गटातील वनस्पतींचा शोध घेत होती. तिथल्या स्थानिक व्यक्तींनी या इलेक्ट्रिक अळंबीविषयी त्यांना माहिती दिली असता त्यांनी आपले शोधकार्य मेघालयाच्या दिशेने वळवले.
रात्रीच्या वेळी जेव्हा हे संशोधक मेघालयाच्या दोन भागात दाखल झाले तेव्हा त्यांना या चमकणार्या अळंबी दृष्टीस पडल्या. या अळंबींना शास्त्रीय भाषेत बायो ल्यूमिनीसेंट अळंबी म्हटले जाते. रात्रीच्या वेळी हलक्या निळ्या, हिरव्या आणि वांगी रंगात त्या चमकतात. रात्री चमकणार्या या अळंबी दिवसा मात्र इतर अळंबीप्रमाणेच दिसतात.
सौजन्य : दैनिक सामना