प्रशांत कुलकर्णी (आपलं महानगरपासून लोकसत्तापर्यंत अनेक प्रकाशनांमध्ये प्रकाशित झालेले महाराष्ट्राचे आघाडीचे व्यंगचित्रकार)
बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रात कल्पना, विनोद, चित्राची रचना, पात्र, कॅरिकेचर (अर्कचित्र), चेहर्यावरचे हावभाव, भाषा हे सगळे मिळून शंभर टक्के भाष्य असतच. हे सगळे मुद्दे स्वतंत्रपणे, बारकाईने पहावेत, अभ्यासावेत असं वाटत राहतं. बाळासाहेब ठाकरे यांचा जीवन प्रवास हा व्यंगचित्रकार बाळ ठाकरे ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असा झाला असला तरी त्यांच्या रेषेत काहीही फरक पडलेला नाही ही बाब फार महत्त्वाची आहे.
अगदी १९४७ पासूनची त्यांची व्यंगचित्र पाहिली तरी ते लक्षात येतं. इंग्रजी वृत्तपत्रात अगदी लहान वयात त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रातसुद्धा वर उल्लेख केलेले सगळे गुण दिसतात. त्यातही अर्कचित्र हा त्यांचा सर्वात प्रभावी गुण मला दिसतो. वास्तविक अर्कचित्रकला ही इतकी नाजूक कला आहे की ज्याला जमली त्याला जमली! ठाकरे हे या कलेतील भीष्माचार्य आहेत.
ज्या काळात ते चित्र काढत होते त्या काळात टीव्ही नव्हता. त्यामुळे देश-विदेशातील नेत्यांच्या चेहर्यांसाठी वर्तमानपत्रात (त्या काळातील ती रंगीत नव्हती आणि छपाई तंत्र हे सुद्धा जुन्या पद्धतीचं होतं) प्रसिद्ध झालेल्या काळ्यापांढर्या आणि अस्पष्ट फोटोवर अवलंबून राहावं लागत असे. या मर्यादा लक्षात घेतल्या तर शेकडो नेत्यांची अर्कचित्रं ही वेगवेगळ्या कोनातून आणि विविध भावभावनांसह दाखवणं हे प्रचंड मोठं आव्हान त्यानी सहज पेललं.
त्यांच्या अर्कचित्राबाबत एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या पात्रांचं वाढलेलं वयही ते दाखवत असत. उदाहरणार्थ, इंदिरा गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये जसजसा बदल होत गेला, तो त्यांनी सूक्ष्मपणे आणि उस्फूर्तपणे रेखाटला. ब्रशने मारलेल्या मोजक्याच नाजूक आणि बळकट रेषांच्या सहाय्याने त्यांची रेखाटने सजत.
त्याचप्रमाणे एखाद्या बातमीतील मर्म लक्षात येणं एक मोठा सेन्स राजकीय व्यंगचित्रकाराकडे आवश्यक असतो. तोही त्यांच्याकडे पुरेपूर होता. त्याचाच उपयोग नंतर त्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. अशी हजारो व्यंगचित्रं ठाकरे यांनी काढली. एखाद्या नवोदित राजकीय व्यंगचित्रकाराला डेविड लो या विद्यापीठातून पदवी घ्यायची असेल तर त्याला कुलगुरू बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचा मनापासून अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांची व्यंगचित्र हा महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कला संपत्तीतील एक महत्त्वाचा ऐवज आहे.