वयाच्या आठव्या वर्षापासून अठ्ठ्याऐंशीव्या वर्षापर्यंत प्रबोधनकारांच्या आयुष्यात एक गोष्ट ठळक दिसते, ती म्हणजे स्त्रियांवर होणार्या अन्यायाच्या विरोधात पेटून उठणं. त्यांनी पेटवलेल्या वणव्याच्या उजेडात महाराष्ट्रभर अनेक मुलींना आत्मभान मिळालं.
`बालविधवांची पुन्हा लग्ने लावण्यात म्हणे धर्म आडवा येतो! येतो तर त्या धर्माला छाटला पाहिजे. हिंदू धर्माविषयी एक प्रकारची अढी माझ्या मनात अगदी लहानपणापासून पडत गेली. जो धर्म माणसांना माणुसकीने वागण्याइतपतही सवलत देत नाही. सदान्कदा देवाची इच्छा या सबबीखाली अश्रापांचा छळ खुशाल होऊ देतो, तो देव तरी कसला नि तो धर्म तरी काय म्हणून माणसांनी जुमानावा?' -प्रबोधनकार ठाकरे, `माझी जीवनगाथा.'
अन्याय कुणावरही होवो, तो आपल्या गावाचा, जातीचा की धर्माचा हे न पाहता त्याच्या बाजूने उभं राहण्याचे संस्कार प्रबोधनकार ठाकरेंवर लहानपणापासूनच झालेले होते. अन्यायावर तुटून पडणं हे व्रत त्यांनी आयुष्यभर पाळलं. तो अन्याय ब्राह्मणांनी बहुजनांवर केलेला असो, इंग्रजांनी देशावर केलेला असो, दिल्लीने महाराष्ट्रावर केलेला असो किंवा पुरुषांनी महिलांवर केलेला असो, प्रबोधनकार आपला कोदंड म्हणजे लेखणीचा चाबूक घेऊन हातात घेऊन सज्ज असलेले आपल्याला दिसतात.
नुकत्याच प्रकाशित झालेल्या धवल कुलकर्णी लिखित `द बावला मर्डर केस’ या इंग्रजी पुस्तकातही तुकोजीराव होळकर या संस्थानिकावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात उभे असलेले प्रबोधनकार आपल्याला भेटतात.
विशेषतः महिलांवर होणार्या अन्यायाच्या बाबतीत ते कायमच आक्रमक होते. आजी बय आणि आई ताई यांनी त्यांना तसंच घडवलं होतं. स्त्री, शूद्र आणि शूद्रातिशूद्र यांना त्यांच्यावर होणारे अन्याय चुकीचेच वाटत नव्हते, असा तो काळ होता. कारण त्यांना तोच धर्म वाटत होता. धर्माच्या नावाने केवळ एका जातीचं वर्चस्व संपूर्ण समाजावर लादलं होतं. अर्थातच प्रबोधनकारांचं संवेदनशील आणि विचारी मन त्यामुळे अस्वस्थ होतं. आजूबाजूला पावलापावलावर ते अन्याय पाहत होते आणि त्यामुळेच त्यांच्यातला विद्रोह फुलत गेला.
त्या काळात राजकीय स्वातंत्र्य आधी गरजेचं आहे, सामाजिक सुधारणा नंतर करता येतील, असा विचार असणारे लोक महाराष्ट्राच्या सुशिक्षित समाजात लोकमान्य टिळकांच्या प्रभावामुळे जास्त होते.
पण प्रबोधनकार तारुण्याच्या उंबरठ्यावर म्हणजे या विचारधारेच्या विरोधात सामाजिक सुधारणावादाच्या बाजूने उभे राहिले. त्याचीच आयुष्यभर पाठराखण केली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली भूमिका कशी बरोबर होती, हे आजूबाजूची उदाहरणं देऊन सिद्धही केलं.
मी काही पुस्तकी समाजसुधारक नाही, असं ते ठणकावून सांगत राहिले. लिहायचं, बोलायचं एक आणि प्रत्यक्षात करायचं वेगळंच, असा दुटप्पीपणा त्यांनी कधी केला नाही. त्याचं मूळ त्यांच्या लहानपणी संवेदनशील मनावर त्या वेळच्या घडामोडींच्या प्रभावात असावं. रूढींच्या राक्षसी प्रकारांमुळेच मी कडवा सुधारक बनत गेलो असं ते म्हणतातच. त्याविषयी ते लिहितात, `सुधारकाग्रणींची पुस्तके वाचून किंवा त्यांची व्याख्याने ऐकून माझ्या मनाचा कल हिंदूंच्या सामाजिक सुधारणावादाकडे वळलेला नाही. माझे बालपण आणि तारुण्यच मुळी अशा काळात गेले की त्या वेळी पांढरपेशा समाजात अनेक संतापजनक रूढी बिनअटकाव बोकाळलेल्या होत्या.’
तेव्हाच्या रूढींपैकी बालविवाहाचा आणि त्यामुळेच घडणार्या विधवांच्या केशवपनाच्या अमानुषपणाचा सर्वाधिक तिटकारा प्रबोधनकारांना येत गेला. या भयंकर रूढीचं वर्णन त्यांनी केलेलं आहेच. तेव्हा बालविवाह सर्रास होते. गरीबांच्या मुली पन्नाशी उलटलेल्या विधुरांच्या जाळ्यात सापडत. तीन बायका मेलेल्या असताना साठीचा थेरडाही नऊ दहा वर्षांच्या मुलीबरोबर चौथं लग्न करायचा. त्याचा निषेध तर व्हायचा नाहीच. उलट ती लग्नं जमवण्यासाठी शब्द टाकण्यातही कुणाला चुकीचं वाटायचं नाही.
त्यातून बालविधवा झाल्यानंतर तिचा आक्रोश सुरू असताना तिच्या तोंडात बोळा कोंबून, हातपाय बांधून तिचे केस कापून घेण्यात अनेकजण पटाईत झाले होते. कालपर्यंत आपल्याबरोबर खेळणारी मैत्रीण विधवा झाली की तिचं केशवपन म्हणजे टक्कल करण्यात येतं. ती स्वयंपाकघराच्याही बाहेर पडू शकत नाही. सगळे तिचा छळ करतात. हडतूड करतात. शिव्याशाप देतात. याचा प्रबोधनकारांना लहान वयातही राग यायचा.वयाने मोठी माणसंही हे अत्याचार स्वीकारायची, भोगायची किंवा करायचीही. तेव्हा एका शाळकरी मुलाचा राग जगावेगळा होता.
त्या काळात आपल्या मनात कोणते विचार यायचे, हेदेखील प्रबोधनकारांनी नोंदवून ठेवलंय, `वडीलधारे काहीही म्हणोत, पण चालले आहे ते ठीक नाही. कोणीतरी धीट पुढाकार घेऊन, जळजळीत धिःकाराचा आवाज उठवला पाहिजे, असे मला वाटायचे. महारादी मंडळींना काय शिवायचे नाही? त्यांच्या घरी चहासुद्धा का घ्यायचा नाही? बालविधवेला विकेशा करणारांना सरकारने खटला भरून तुरुंगात खडी फोडायला का धाडू नये? कोमल बालिकांशी लग्ने ठोकणार्या बिजवर तिजवर म्हातार्यांना गावच्या लोकांनी चिंचेच्या फोकांनी का फोडून काढू नये?’
हा राग अनेकदा कृतीतून व्यक्तही व्हायचा. कधीतरी म्हातारा नवरा आणि बाल नवरी अशा लग्नाला प्रबोधनकार वडील किंवा आजोबांबरोबर जायचे. जेवणाच्या पंगती सुरू असताना या चुणचुणीत मुलाला तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे श्लोक म्हणण्याचा आग्रह व्हायचा. तेव्हा ते `म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान’ हे `संगीत शारदा’ या नाटकातलं पद ठणकावून म्हणायचे. गो. ब. देवलांनी लिहिलेल्या या गाजलेल्या नाट्यगीतात लहान मुलीशी लग्न लावायला उभ्या असलेल्या एका म्हातार्याचं वर्णन आहे. सगळे अवयव निकामी होऊनही हा नवरा अजूनही लग्नासाठी लहान आहे, अशी टिंगल त्यात केलेली आहे. तशाच लग्नात प्रबोधनकारांच्या तोंडून हे नाट्यपद ऐकताना पंगतीतल्या मंडळींचे चेहरे खर्रकन उतरायचे.
पनवेलच्या जोशी आळीतल्या हॉटेलवाल्या बेहरेंच्या मुलीविषय़ी त्यांना शेवटपर्यंत वाईट वाटायचं. बेहरेंना एक बारा तेरा वर्षांची सुंदर मुलगी होती. तिचं लग्न झाल्यानंतर वर्षभरात नवरा मेला. दोन्ही कुळे नरकात जातील या भीतीने तिचं केशवपन करण्यात आलं. पण ती निरागस मुलगी विधवेच्या लाल कपड्यातच, पण मोकळेपणाने फिरायची. ठाकरे कुटुंबाशीही तिचा उत्तम परिचय होता. तिचा विद्रूप केलेला हसरा चेहरा बघून प्रबोधनकारांना केशवपनाचा संताप यायचा. साठीतल्या बिजवरांना हव्या तितक्या बायका करण्याची मुभा आहे आणि बालविधवांनाच पुन्हा लग्न करण्याला विरोध का? असा प्रश्न ते विचारत. अशा अमानुष रूढींचं समर्थन करणार्या हिंदू धर्माविषयी आपल्या मनात लहानपणीच अढी तयार झाल्याचं ते सांगतात.
फक्त वाटून शांत बसणारे प्रबोधनकार नव्हते. एकदा त्यांच्याबरोबर खेळणार्या मंजू नावाच्या मुलीचं लग्न ठरलं. तिचं वय दहा-अकरा वर्षं. तिचं लग्न मात्र निळोबा तळोजकर नावाच्या पासष्ट वर्षांच्या म्हातार्याबरोबर लावायचं ठरलं. ठाकरेंच्या शेजारी फणसेंच्या घराच्या अंगणात मांडव पडला.
प्रबोधनकार मंजूचे समवयीनच. म्हणजे आजच्या पाचवी-सहावीत जाणार्या मुलाच्या वयाचे. आपल्या मैत्रिणीचं लग्न आजोबाच्या वयाच्या मुलीशी लावण्याचा घाट त्यांना पटणारा नव्हता. त्यामुळे त्यांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी आगकाडी पेटवून मांडवालाच आग लावली.
प्रबोधनकार या स्त्रीदास्याला खतपाणी घालणार्या रूढींच्या विरोधात आपल्या लेखणीने कायमच आग पेटवत राहिले. सनातन्यांचे किती मांडव त्यांच्या लेखणीने पेटवले याचा हिशेब नाही. वयाच्या पस्तिशीत दादरमधे थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी पहिली चळवळ चालवली ती हुंडा देऊन झालेली लग्नं उधळून लावण्याची. तोवर जरठबाला विवाह, केशवपन अशा रूढी मागे पडल्या होत्या. त्यामुळे तेव्हाची सगळ्यात ज्वलंत समस्या असणार्या हुंड्याला त्यांनी हात घातला. पण त्यापुढे जात आजही आपल्यालाही न खटकणार्या दोन गोष्टींचा विरोध त्यांनी केलाय, एक लग्नासाठी मुलगी बघायला जाण्याच्या कार्यक्रमाचा आणि दुसरा कन्यादानाच्या विधीचा.
मुलाकडच्यांनी मुलीकडे जाऊन तिला प्रश्न विचारत तिची परीक्षा करायची. पसंती-नापसंती फक्त मुलालाच. त्याची परीक्षा करण्याचा हक्क मुलीकडच्यांना नाही. तेरा-चौदा ठिकाणी मुलगी बघायला जाऊन ‘यंदा कर्तव्य नाही’ असं सांगणारे आणि आपल्यात शेकडो दोष असताना सद्गुुणी मुलींचे दोष काढणारे महाभाग त्यांनी बघितले होते. त्यामुळे त्यांनी आपलं लग्न लावताना असं ठरवलं होतं की मुलगी बघायला कोणाच्याही घरी जायचं नाही आणि गरीब घरातली गरजू मुलगीच करायची. ते त्यांनी पाळलंही.
लग्नात होणार्या कन्यादानाच्या विधीविषयी प्रबोधनकार प्रश्न विचारतात, कन्या ही एखादी निर्जीव भावनाशून्य वस्तू आहे का? दाव्याला बांधून देईन तिथे मुकाटपणे जायला मुलगी जनावर आणि बाप खाटीक आहे का? असे प्रश्न विचारून प्रबोधनकार सांगतात,
`मी पारखून याला मनोमन माझा पती मानला आहे. हवे ते झाले तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, आईबापाची संमती असो नसो. मला त्याची पर्वा नाही. असा बळकट निर्धार दाखवील तीच खरी गृहिणी होऊ शकते.’
नव्वदीच्या उंबरठ्यावर प्रबोधनकारांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन झालं. त्यानंतर दोनच महिन्यांनी त्यांचं निधन झालं. त्यामुळे आत्मचरित्र `माझी जीवनगाथा’च्या प्रकाशनाला त्यांनी केलेलं भाषण त्यांचं शेवटचं भाषण ठरलं. ज्ञानेश महाराव यांनी `प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व’ या पुस्तकात या भाषणाचं शब्दांकन दिलंय. त्या भाषणाच्या सुरुवातीलाच प्रबोधनकार म्हणतात, `चार पिढ्यांचा काळ मी पाहिला, अनुभवला. पूर्वीचा काळ आणि आजचा काळ यात फार बदल झालेला आहे. विशेषतः महिला वर्गाच्या बाबतीत. महिलांनी फारच सुधारणा केलेली आहे. मला वाटतं, त्याकाळी रूढी, धर्म, परंपरेच्या नावाखाली जे अनंत अत्याचार झाले, त्याचा सध्याच्या महिलांनी चांगला सूड उगवला आहे. सध्याच्या महिलांना पुष्कळ लोक नावं ठेवतात. मी म्हणतो, तुम्ही आणखी सुधारणा करा. खूप सुधारणा करा.’
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक आहेत.)