कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या पालिकेचा जी–दक्षिण विभाग म्हणजेच वरळी, लोअर परळ, एल्फिन्स्टन प्रभागाने आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. या विभागात आतापर्यंत 9 हजार 056 जणांनी कोरोनावर मात केली असून आता केवळ 388 सक्रिय रुग्ण राहिले आहे. विशेष म्हणजे चाळी–झोपडपट्टी विभाग ‘कंटेनमेंट झोनमुक्त’ झाला आहे.
पालिकेच्या जी–दक्षिण विभागातील दाटीवाटीच्या वस्तीमुळे कोरोनाची लागण झपाटय़ाने झाल्याने संपूर्ण प्रभाग कोरोना ‘हॉटस्पॉट’ बनला होता. त्यामुळे पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. यामध्ये घरोघरी तपासणी–स्क्रिनिंग करण्यासाठी ‘डॉक्टर आपल्या दारी उपक्रम’, कोरोना टाळण्यासाठी जनजागृती, रुणांच्या सेवेसाठी रोबोट, सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून चार वेळा सॅनिटायझेशन, शौचालयांमध्ये स्वयंचलित सॅनिटायझेशन, अडगळीच्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. याशिवाय जी–दक्षिण विभागातील वरळी ‘एनएससीआय’ डोम आणि पोदार रुग्णालयात सुरू केलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरमुळे पॉझिटिव्ह आणि निकट संपर्कातील नागरिकांसाठी आपल्याच विभागात अद्ययावत यंत्रणा उपलब्ध झाली. त्यामुळे जी–दक्षिण प्रभागात कोरोना नियंत्रणात आला असून कंटेनमेंट झोनमुक्त झाला असून फक्त 108 ठिकाणी इमारती–इमारतींचे भाग सील आहेत. दरम्यान, कोरोना नियंत्रणाचा वरळी पॅटर्न देशात गाजल्याने या ठिकाणी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेऊन अनेक ठिकाणी नियोजन करण्यात आले.
घरोघरी तपासणीमुळे मोठे यश
कोरोना नियंत्रणासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ प्रभावीपणे राबवण्यात आली. या मोहिमेत 101525 घरांपर्यंत पोहोचून तपासणी, सर्वेक्षण, स्क्रिनिंग, उपचार, मार्गदर्शन आणि जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत आढळलेल्या संशयितांबाबत तातडीन कार्यवाही करण्यात आली. यामध्ये तब्बल 3,34,982 जणांची तपासणी करण्यात आली.
रुग्ण दुपटीचा कालावधी 446 दिवसांवर
- संपूर्ण मुंबईचा रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी 280 दिवस असताना जी–दक्षिण विभागात रुग्ण दुपटीचा कालावधी 446 दिवसांवर गेला आहमुंबईची सरासरी रुग्णवाढ 0.25 असताना वरळीची सरासरी वाढ 0.16 पर्यंत खाली आली असून या ठिकाणी आता केवळ 388 सक्रिय रुग्ण आहेत.
- जी–दक्षिण विभागात आतापर्यंत एपूण 9975 रुग्ण आढळले असून यातील 9056 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर कोरोनामुळे 531 जणांचा मृत्यू झाला आहे.
सौजन्य- सामना