17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा यष्टिरक्षक फलंदाज पार्थिव पटेल याने बुधवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल साइटवर त्याने क्रिकेटला अलविदा करण्याची घोषणा केली.
पार्थिव पटेलने 25 कसोटी, 38 वन डे आणि 2 टी-20 सामन्यांमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सहा अर्धशतकांसह 934 धावा तडकावल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी 71 होय. वन डे क्रिकेटमध्ये चार अर्धशतकांसह त्याने 736 धावा तडकावल्या आहेत. क्रिकेटच्या या प्रकारात 95 धावांची खेळी त्याची सर्वोत्तम ठरलीय. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 62 झेल व 10 यष्टिचीत केले असून वन डे क्रिकेटमध्ये 30 झेल व 9 यष्टिचीत करण्यात त्याला यश मिळाले आहे.
हेडिंग्ले, ऍडलेड फेव्हरेट
पहिल्या कसोटीत दादा अर्थातच सौरभ गांगुलीकडून कसोटी कॅप मिळाली. त्या कॅपवर ‘पार्टीव’ असे चुकीच्या पद्धतीने माझे नाव लिहिले आहे. मात्र ती कॅप माझ्याकडे अजूनही आहे. ती मी जपून ठेवलीय. हेडिंग्ले, ऍडलेड येथील कसोटी विजय व रावळपिंडी येथे झळकावलेले अर्धशतक माझे फेव्हरेट आहेत, असे पार्थिव पटेल भावुकपणे म्हणाला. तसेच देशातील सर्व स्थानिक स्पर्धा जिंकलेल्या संघाचा मी सदस्य आहे. तीन वेळा आयपीएल जिंकणाऱया संघाचा मी सदस्य आहे. तसेच गुजरात क्रिकेटला योग्य दिशेने नेण्यात मला यश लाभले आहे, असेही तो आवर्जून म्हणाला.
गांगुली, कुंबळे यांच्या नेतृत्वावर फिदा
सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात मी पहिला सामना खेळलो. त्याच्याकडे नेतृत्वाचे सर्व गुण होते. सौरभ गांगुलीसह अनिल कुंबळे हे माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कर्णधार आहेत. माझ्यामध्ये जो बदल झालाय. आता मी जो आहे तो सौरभ गांगुली व अनिल कुंबळे या दोघांमुळेच, असे पार्थिव पटेल यावेळी म्हणाला.
सौजन्य- सामना