आधुनिक महाराष्ट्राच्या विजेच्या स्वयंपूर्ततेसाठी कोयना विद्युत प्रकल्पाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळात या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी कोयना विद्युत प्रकल्प टप्पा चार विद्युतगृहाच्या पाहणीदरम्यान व्यक्त केला.
कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. कोयना नदीवर धरण बांधून पाणी अडविले आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी या सर्व टप्प्यातून 1920 मेगावॅट वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं.)या कंपनीतर्फे चालविला जातो. हेळवाक जवळील देशमुखवाडी येथे या प्रकल्पाचा चौथा टप्पा तयार करण्यात आला आहे. सह्याद्री डोंगरात 300 मीटर खोलीवर हा टप्पा आहे. या टप्प्यातुन लेक टॅपिंग पध्द्तीने 1000 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.
जलविद्युत केंद्राच्या पाहणीच्यावेळी प्रकल्पाविषयीचे सादरीकरण करण्यात आले. पाहणीवेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक तांत्रिक बाबींची अभियंत्यांकडून माहिती घेतली. जलविद्युत प्रकल्पाच्या पाहणीपूर्वी उपस्थित सर्वांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन व संसदीय कार्य अनिल परब, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, वीज निर्मिती कंपनीचे कार्यकारी संचालक संजय खंडारे, कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ,पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र संजय मोहिते, रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.
सौजन्य- सामना