टी-सिरीजचे भूषणकुमार लवकरच आपल्या बॅनरद्वारे एक गाण्याचा नवा म्युझिक अल्बम आणत आहेत. ‘नयन’ असे नाव असलेल्या या अल्बममधील गाणे राधिका राव आणि विनय सप्रू यांनी दिग्दर्शित केले आहे. पॉप सन्शेशन ध्वनी हिने काहीच दिवसांपूर्वी बॅक टु बॅक सुपरहीट चार्टबस्टर्स गाणी दिली आहेत. त्यामुळे तिच्या या नव्या गाण्याविषयी तिच्या चाहत्यांना उत्सुकता असेलच. ध्वनीने गायलेली याआधीची गाणी अजूनही तिच्या चाहत्यांच्या ओठांवर रेंगाळत आहेत. आता नव्या गाण्यातूनही ती एक कॉलेज लव्हस्टोरीचा अनुभव करून देणार आहे.
‘नयन’ हे गाणे मुळात गुजरातीमध्ये गाजलेल्या ‘नयन न बांध राखी’ या गाण्यावरून बेतलेले आहे. तिने यापूर्वी सुपरहीट केलेल्या ‘बेबी गर्ल’पेक्षाही हे गाणे वेगळे आणि आणखी चांगले असल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे. हे रोमान्टिक गाणे ध्वनीने जुबीन नौटियाल याच्यासोबत गायले आहे. हे गाणे मनोज मुंतशीर यांनी लिहिलेले आहे, तर डीजे चेतस आणि लिजो जॉर्ज यांनी त्याला मेलडियस संगीत दिलंय. यामुळे या म्युझिक ट्रॅकला ताजेपणा आला आहे. हे गाणे मुंबईतच चित्रीत करण्यात आले असल्याने येथील तरुणांना कॉलेजच्या आठवणी ताज्या होतील हे नक्की. म्हणूनच हे गाणे आपल्यासाठी खास असल्याचे ध्वनी भानुशाली सांगते. टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर हे गाणे पाहायला मिळेल.