दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून शिख समाजाविषयी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्याविरुद्ध चंद्रपूर पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात चंद्रपूरच्या एका व्हॉटसअप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला. या पोस्टचे स्क्रीन शॉट्स शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या शीख बांधवांच्या हाती लागले. त्यामुळे शीख समुदाय आक्रमक झाला. रात्रीच रामनगर पोलीस ठाण्यात शीख बांधवांनी तक्रार करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
या तक्रारीची दखल घेत उजाला ग्रुप नामक व्हॉटसअप ग्रुपच्या एका सदस्याला अटक करण्यात आहे. या ग्रुपमध्ये जिल्ह्यातील भाजपच्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत शीख समुदायातील लोक रामनगर पोलीस ठाण्यात आरोपींच्या अटकेसाठी ठाण मांडून बसले होते. केंद्राने तीन नवे कृषी विधेयक मागे घ्यावे यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र, काही जणांकडून आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
चंद्रपुरातही शीख आणि शेतकरी समुदायाविरोधात उजाला नामक व्हाटसअप ग्रुप मागील काही दिवसांपासून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करीत आहे. या ग्रुपचे अॅडमिन भाजपचे माजी नगरसेवक बलराम डोडानी आहेत. याच ग्रुपवर अरविंद सोनी, हरिकिशन मल्लन (पप्पू मल्लन), बजरंग सिंग आणि प्रदीप भिमनवार नामक व्यक्तींनी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या आहेत. हा मजकुर शीख समुदायाच्या हाती पडल्यानंतर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. चंद्रपुर शहरातील सहा गुरूद्वाराच्या प्रमुखांनी एकत्र येत ही तक्रार केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
सौजन्य- सामना